पाहा फोटो : भारत-पाक सीमेवरचे काश्मिरी लोक 'युद्धजन्य परिस्थितीत' कसे राहतात?

फोटो स्रोत, Abid Bhat
मोहम्मद याकूब हे 50 वर्षांचे आहेत. भारत प्रशासित काश्मीरमधील त्यांच्या गावात झालेल्या गोळीबारात ते थोडक्यात बचावले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 22 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या गोळीबारानंतर याकूब सारख्या शेकडो गावकऱ्यांना आपलं घर सोडावं लागलं होतं. याला दोन्ही देशांमधला द्वेष वाढल्याची चिन्हं मानलं जात आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पूर्ण काश्मीरवर दावा सांगतात पण त्यातल्या काही भागावरच त्यांचा ताबा आहे. या वादावरून दोन युद्ध झाले आहेत तसंच दोन्ही अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमध्ये सतत खटके उडताना दिसतात.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 776 किमीची सीमा आहे, जिथे नेहमी गोळीबार सुरू राहतो. 2003 साली शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. पण 2013 पासून मात्र वारंवार या शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे.

फोटो स्रोत, Abid Bhat
"इथे सगळेच घाबरलेले आहेत. आम्ही कायम दहशतीत असतो," असं याकूब सांगतात. ते सध्या एका निर्वासितांच्या शिबिरात राहतात. हे शिबीर उरीच्या एका स्थानिक शाळेनं जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू केलं आहे.
सीमेवरच्या पाच गावातल्या रहिवाशांना गाव सोडून एका अशा गावात आश्रय घेण्यास सांगितलं आहे, ज्याला तिन्ही बाजूंनी सीमेनं वेढलेलं आहे. या संघर्षाचा सगळ्यांत जास्त फटका याच गावाला बसला आहे, जवळजवळ 7000 लोक त्यामुळे प्रभावित आहेत, असं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
सध्या सुरू असलेलं शस्त्रसंधीचं उल्लंघन हे 2003 नंतरचं सगळ्यांत भीषण आहे, असं काही गावकऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Abid Bhat
सिलिकोटमध्ये ही स्त्री आपल्या दहा दिवसांच्या बाळाला घेऊन 'फिरन' या पारंपरिक काश्मिरी पोशाखात लपवून घेऊन जात आहेत.
गावकऱ्यांना गोळीबारापासून वाचवण्यासाठी निर्वासितांच्या शिबिरात घेऊन जाणाऱ्या गाडीकडे त्या धावत होत्या.

फोटो स्रोत, Abid Bhat
सीमेलगतच्या गावांतून तीन महिन्यांमध्ये हजारहून अधिक लोकांनी स्थलांतर केलं आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. स्त्रिया आणि बालकांना या शिबिरात नेण्यासाठी रुग्णवाहिकांची सोय केली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Abid Bhat
या शिबिरातल्या आलेल्या लोकांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की संपूर्ण गावातले लोक इथे आल्यामुळे संपूर्ण गाव रिकामं झालं आहे. सीमेवर होणाऱ्या या गोळीबारामुळे किती जण जखमी झाले आहेत किंवा मारले गेले आहेत, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

फोटो स्रोत, Abid Bhat
ते त्यांचं घर, पशू आणि इतर मौल्यवान गोष्टी... सगळंकाही मागे सोडून आले आहेत, आणि यांना त्यां सगळ्यांची चिंता आहे. काही जण तर फक्त अंगावरच्या कपड्यानिशी इथे आले आहेत.
"अशा युद्धजन्य परिस्थितीत राहत असल्याचा आम्हाला त्रास होत आहे," असं उरीचे राहिवासी लाल दिन यांनी सांगितलं. "दोन्ही पक्षांनी सीमेवर राहणाऱ्या लोकांचा विचार करून युद्धबंदी करावी."

फोटो स्रोत, Abid Bhat
अबिद भट हे छायाचित्रकार असून श्रीनगरला राहतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








