'पाकिस्तानी, दहशतवादी, तालिबानी!' भारतीय शाळांमध्ये मुस्लीम मुलांना हिणवलं जातंय का?

शाळांमधील मुस्लीम मुलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नाझिया इरम लिखित 'Mothering a Muslim' या पुस्तकात उच्चभ्रू शाळांमधील मुस्लीम मुलांना सहन करावा लागणाऱ्या भेदभावाचं वास्तव समोर येतं.
    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मुलांच्या आयुष्यात शाळेचं आवार आणि मैदानं सर्वांत सुरक्षित ठिकाणं असायला हवी. पण अनेकदा मुलं अशाच ठिकाणं एकाकी पडण्याचीही शक्यता असते. याच ठिकाणी त्यांना त्यांच्याच मित्रमैत्रिणींकडून हिणवलं जातं, कधी वर्ण तर कधी खानपानावरून शाळेत मतभेद होतात आणि त्यातून उद्भवणाऱ्या वादांना ही शाळकरी मुलं बळी पडतात.

भारतात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकातून मुस्लीम विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या हेटाळणीचं वास्तव समोर आलं आहे. भारतातच नव्हे तर जगभरात मुस्लिमांविषयी एक अनाठायी भीती (इस्लामफोबिया) आहे. धार्मिक ओळखीवरून या मुलांना उच्चभ्रू शाळांमधल्या वातावरणातही लक्ष्य केलं जात आहे.

नाझिया इरम या लेखिकेने 'Mothering a Muslim' हे पुस्तक लिहिण्यासाठी बारा शहरांमधल्या 145 कुटुंबांशी संवाद साधला आणि दिल्लीतल्या 25 उच्चभ्रू शाळांमधील शंभर विद्यार्थ्यांशी बातचीत केली. इरम यांच्या मते अगदी पाच वर्षांच्या मुलांनाही लक्ष्य केलं जातं.

'तुझे आई-वडील घरी बॉम्ब बनवतात का?'

"पुस्तकासाठी संशोधन करताना धक्कादायक वास्तव समोर आलं. उच्चभ्रू शाळांमध्ये असं घडत असेल याची मला कल्पना नव्हती," नाझिया इरम बीबीसीला सांगत होत्या. "जेव्हा पाच-सहा वर्षांच्या मुलांना 'पाकिस्तानी किंवा दहशतवादी आहेस?' असं म्हटल्यावर ते काय उत्तर देणार? आणि शाळेत तक्रार तरी कशी करणार?"

"शाळेत या मुलांसोबत जे होतं त्याचा सारांश काढला, तर केवळ गंमत म्हणून हे छेडलेलं असतं. वरवर पाहता हे अगदी सामान्य आणि अपायकारक वाटतं. पण तसं नसतं. खरंतर ते द्वेषाने भरलेलं आणि यातना देणारं असतं."

लेखिकेने पुस्तकासाठी घेतलेल्या मुलाखतींमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात आणि नेमकं काय हिणवलं जातं, याविषयी मुलांकडून जाणून घेतलं.

  • तू मुस्लीम आहेस का? मला मुस्लिमांचा तिरस्कार आहे.
  • तुझे आई-वडील घरी बॉम्ब बनवतात का?
  • तुझे वडील तालिबानमध्ये आहेत का?
  • हा पाकिस्तानी आहे.
  • हा दहशतवादी आहे.
  • तिला त्रास देऊ नका. ती तुमच्यावर बॉम्ब टाकेल.

'Mothering a Muslim' हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून धार्मिक द्वेष, शाळांमधले पूर्वग्रह आणि भेदाभेद यावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वी #MotheringAMuslim हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला. यानिमित्ताने सोशल मीडियावर अनेकांनी स्वतःचे अनुभव लिहिले आहेत.

लेखिका नाझिया इरम

फोटो स्रोत, NAZIA ERUM

फोटो कॅप्शन, लेखिका नाझिया इरम यांना संशोधनादरम्यान मुस्लीम मुलांना समवयस्क मुलांकडून कसा त्रास होतो हे ऐकून धक्का बसला.

भारताची एकूण लोकसंख्या जवळपास 130 कोटी आहे. त्यापैकी 80 टक्के लोक हिंदू तर 14.2 टक्के लोक मुस्लीम आहेत.

भारतात अनेक ठिकाणी हिंदू आणि मुस्लीम समाज शांततेने राहाताना दिसतो. पण शांततेच्या या आवरणाखाली अजूनही 1947 साली झालेल्या भारत-पाक फाळणीची धग कायम आहे. फाळणीच्या रक्तरंजित इतिहासात लाखो लोकांमध्ये दुफळी पडली, तर लाखो लोक उफाळलेल्या धार्मिक हिंसेत मृत्यूमुखी पडले.

नाझिया इरम म्हणतात, "मुस्लीमविरोधी गरळ साधारण 1990 नंतर सुरू झालेली दिसते. हिंदुत्ववादी गटांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर हिंदू-मुस्लीम दंगली सुरू झाल्या. आता इतक्या वर्षांनंतर या गटांची आक्रमकता बदलली आहे."

मुस्लीम ही ओळख बनण्याची भीती

नाझिया यांनी 2014मध्ये मुलीला जन्म दिला. "त्यानंतर त्यांना नेमक्या परिस्थितीची जाणीव झाली," त्या सांगतात. नाझिया यांना अजूनही तो प्रसंग आठवतो. नावावरून मुस्लीम असल्याची ओळख पटणं सहज शक्य होतं, त्यामुळे मुलीला नाव काय द्यायचं, यावरून त्यांच्या मनात संभ्रम होता.

"मी माझ्या लहानग्या मायराला हातात धरलं होतं, आणि पहिल्यांदाच मला भीती वाटली."

भारतात दोन धर्मांचं ध्रुवीकरण होतंय. हिंदू राष्ट्रवाद बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण केल्याचं चित्र आहे. त्याचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत येण्यासाठी झाला.

हिंदुत्ववादी देशभक्तीच्या भावना वाढताना दिसत आहेत. आणि त्यात काही टिव्ही चॅनेल्स आपल्या बातम्यांमध्ये मुस्लिमांचं चित्र "आक्रमक, देशद्रोही आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणारे" असं रंगवताना दिसत आहेत.

पुस्तकाचं मुखपृष्ठ

फोटो स्रोत, NAZIA ERUM

फोटो कॅप्शन, पुस्तकाचं मुखपृष्ठ

"2014 पासून माझी पहिली ओळख 'मुस्लीम' अशी झाली आहे. त्याव्यतिरिक्त माझी असणारी मूळ ओळख ही दुय्यम बनली आहे. माझ्या समाजातल्या लोकांच्या मनात एका अनामिक भीतीने घर केलंय," नाझिया इरम सांगतात.

आणि तेव्हापासून दुभंगलेल्या समाजातली ही दरी वाढतच चालली आहे. पूर्वग्रहदूषितपणे समाजाचं ध्रुवीकरण करणाऱ्या चर्चा आणि वादविवाद टेलिव्हिजन चॅनेल्सवर सुरू आहेत. त्याचा परिणाम प्रेक्षकांवर होतोय. या सगळ्या चर्चा घरातल्या मोठ्यांकडून पाझरत लहान्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.

"याचाच परिपाक म्हणजे मैदानं, शाळा, क्लासरूम्स, स्कूलबस या सर्व ठिकाणी मुस्लीम मुलं एकाकी पडतात. त्यांना 'पाकिस्तानी', 'IS', 'बगदादी' आणि 'दहशतवादी' म्हटलं जातं," असं नाझिया इरम सांगतात.

नाझिया यांनी उदाहरणादाखल काही मुला-मुलींच्या कहाण्या पुस्तकात सांगितल्या आहेत :

  • पाच वर्षांच्या एका चिमुकलीला 'मुस्लीम येतील आणि ते आपल्याला मारून टाकतील' असं सांगून घाबरवण्यात आलं. खरं म्हणजे त्या मुलीला स्वतः मुस्लीम असल्याची जाणीवही नव्हती.
  • युरोपमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यावर वर्गातल्या एका मुलाने 10 वर्षांच्या मुस्लीम मुलाला ओरडून विचारलं, "तू हे काय केलंस?" त्यावर या मुस्लीम मुलाला संताप आला.
  • दुसऱ्या एका मुलाने एका 17 वर्षांच्या मुस्लीम मुलाला 'दहशतवादी' म्हटलं. जेव्हा त्या मुस्लीम मुलाच्या आईने त्या मुलाच्या आईला फोन केला, तेव्हा ती म्हणाली, 'पण तुमच्या मुलाने माझ्या मुलाला पहिले लठ्ठ म्हटलं म्हणून...'.

धार्मिक ओळखीवरून हिणवलं जाणं, हे फक्त भारतातल्या शाळांमध्येच होत नाही, तर जगभर होतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप निवडून आल्यावर काहीसा असाच परिणाम झाल्याचं अनेक वृत्तांमधून पुढे आलं होतं. ट्रंप यांच्या प्रचाराचा परिणाम शाळेच्या वर्गांमध्ये वर्णद्वेष आणि जातीय तणाव वाढण्यात झाला होता. विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि चिंतेने थैमान घातलं, असंही त्यां वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं होतं.

मग भारतातल्या शाळांमध्ये मुस्लीम मुलांना हिणवलं जाणं, हा मोदी सत्तेत आल्याचा परिणाम समजायचा का?

शाळांमधील मुस्लीम मुलं

फोटो स्रोत, Huw Evans picture agency

फोटो कॅप्शन, नाझिया इरम सांगतात, मुस्लीम मुलांना हिणवण्याच्या घटनांची दखल घेऊन वेळीच पाऊलं उचलायला हवीत.

नाझिया इरम यांच्या मते, "सगळ्या राजकीय नेत्यांसारखे इतर लोक वागतायत. अगदी मुस्लीम पक्षदेखील त्याला अपवाद नाहीत."

'ही धोक्याची घंटा'

"शाळांमध्ये किंवा आवारात मुस्लीम मुलांना हिणवलं जातं, याचा अनेक शाळांनी इन्कार केला," नाझिया पुढे सांगतात. "अनेक घटना अधिकृतपणे नोंदवल्याच जात नाहीत. मुलांना कुजबुज नको असते आणि बहुतांश पालक एक सर्वसाधारण घटना म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात."

पण अशा प्रकारची स्वतःहून घेतलेली सेन्सॉरशिप रोजच्या जगण्यात दहशत निर्माण करत आहे, हे अधिक चिंतेचं कारण आहे. अनेक मुस्लीम पालक आपल्या मुलांना उत्तम वागणूक ठेवा, वाद घालू नका, बॉम्ब-बंदुका असणारे कम्प्युटर गेम्स खेळू नका, अशा सूचना करत आहेत. इतकंच नाही तर एअरपोर्टवर विनोद करू नका, तसंच पारंपरिक पोषाख घालून घराबाहेर पडू नका, असंही मुलांना सांगितलं जात आहे.

नाझिया म्हणतात, "ही धोक्याची घंटा आहे. पालकांनी आणि शाळांनी वेळीच या जातीयवादी हिणवण्याविरोधात पाऊल उचलायला हवं."

"सर्वांत महत्त्वांचा मुद्दा आहे हे स्वीकारणं आणि त्याविषयी संवाद सुरू करणं. प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं हा त्यावरचा उपाय नाही," असं त्या स्पष्टपणे म्हणतात.

"या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. धार्मिक द्वेष केवळ टिव्हीवरील नऊच्या चर्चेपुरता किंवा पेपरातल्या हेडलाईनपुरता मर्यादित राहणारा नाही. हा द्वेष सगळ्यांनाच पोखरतो आहे आणि दोन्ही बाजूंच्या लोकांवर त्याचा परिणाम होत आहे. आणि दोन्हीकडे होरपळ होत आहे".

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)