'ज्ञानोबा-तुकोबांहून रामदास स्वामी ग्रंथनिर्मितीत श्रेष्ठ'; गोविंददेव गिरी महाराजांच्या वक्तव्यावर वाद का सुरू आहे?

वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज तसेच दास परंपरेतील रामदास स्वामी यांच्या काव्यरचनांविषयी गोविंददेव गिरी महाराजांनी केलेलं भाष्य वादात सापडलं आहे.

फोटो स्रोत, Facebook/Swami Govindadev Giri

फोटो कॅप्शन, वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज तसेच दास परंपरेतील रामदास स्वामी यांच्या काव्यरचनांविषयी गोविंददेव गिरी महाराजांनी केलेलं भाष्य वादात सापडलं आहे.
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचनांविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमात करण्यात आलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलंय.

राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 'ज्ञानोबा ते तुकोबा' या चर्चासत्रातील बीजभाषणात हे वक्तव्य केलंय.

त्यांचं वक्तव्य वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांना देहूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाला येण्यापासून मज्जाव करण्यात आला.

त्यानंतर गोविंददेव गिरी महाराज यांनी आता माफी मागितली आहे.

नेमकं काय आहे ते वक्तव्य आणि त्यावर काय आक्षेप घेण्यात आले आहेत, ते आपण पाहूयात.

कोणत्या वक्तव्यावरून सुरू झाला वाद?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'ज्ञानोबा ते तुकोबा' या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं.

विद्यापीठाच्या जवळपास आठ विभागांनी एकत्र येत 'ज्ञानोबा ते तुकोबा राष्ट्रीय परिषद' आयोजित केलेली होती.

या चर्चासत्रात स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी शनिवारी (27 फेब्रुवारी) बीजभाषण केलं.

या बीजभाषणात बोलताना त्यांनी वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज तसेच दास परंपरेतील रामदास स्वामी यांच्या काव्यरचनांविषयी भाष्य केलं.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'ज्ञानोबा ते तुकोबा' या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Facebook/Swami Govindadev Giri

फोटो कॅप्शन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'ज्ञानोबा ते तुकोबा' या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं.

त्यांचं हेच भाष्य वादाचं कारण ठरलं आहे.

ते म्हणाले की, "ग्रंथाच्या दृष्टीने भाष्य करायचं झालं तर आपल्या परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त 'दासबोध'च आहे. ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे. एकनाथांचं भागवत हे अकराव्या स्कंदावरचं भाष्य आहे. संत नामदेवरायांच्या अभंगांचा गाथा हे संकलन आहे. तुकोबांचा गाथा हे देखील एकत्रीकरण वा संकलन आहे. स्वतंत्र ग्रंथ नाही."

"स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा, याबाबत आदर्श रामदास स्वामी आहेत," असंही ते म्हणाले.

रामदास स्वामींना स्वतंत्र ग्रंथनिर्मितीच्या बाबतीत ज्ञानदेव-तुकोबांहून श्रेष्ठ ठरवणं, यावर अनेक वारकरी अभ्यासकांनी आक्षेप नोंदवला.

त्यानंतर या वादाला तोंड फुटलं.

देहूतील विराट हिंदू संमेलनाला येण्यापासून मज्जाव

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी (4 मार्च) विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडून त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतला.

त्यांनी म्हटलं की, "ज्ञानेश्वरी हा फक्त ग्रंथ नाही तर ज्ञान देणारा स्वतंत्र प्रज्ञा प्रवाह आहे. तुकाराम महाराजांचा गाथा पाचवा वेद मानला जातो. या ग्रंथांना दुय्यम ठरवणे किंवा संकलन म्हणणे हा वारकरी संप्रदायाचा आणि करोडो भाविकांचा अपमान आहे."

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी (4 मार्च) विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडून त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतला.

फोटो स्रोत, Facebook/Jayant Patil

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी (4 मार्च) विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडून त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतला.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"दासबोध आणि ज्ञानेश्वरी, गाथा यांची तुलना करून एकाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला दुय्यम दाखवणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. ज्ञानेश्वर महाराज पाया, तुकाराम महाराज कळस आहेत. या ग्रंथांनी जातीपातीच्या भिंती तोडून भक्ती, समानता आणि बंधुतेचा मार्ग दाखवला. अशा क्रांतीकारी ग्रंथांना भाष्य आणि संकलन म्हणणे हे सामाजिक क्रांतीकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे."

स्वामी गोविंददेव गिरी यांनी लोकांची माफी मागावी, अशीही त्यांनी मागणी केली.

परंतु, चर्चासत्राचा विषय 'ज्ञानोबा ते तुकोबा' असा असताना त्यात रामदास स्वामींना घुसडण्याचं कारण काय? असा सवालही अनेक जण करताना दिसत आहेत.

गोविंददेव गिरी महाराजांनी जाणीवपूर्वक हे विधान करून संत ज्ञानदेव, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांना अप्रत्यक्ष तुच्छ लेखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे, असा आरोप 'गाथा परिवार'चे संस्थापक अध्यक्ष उल्हास पाटील करतात.

ते म्हणतात की, "गोविंददेव गिरी वैदिक परंपरेतले असून त्याचा वारकऱ्यांशी काहीही संबंध नाही. ज्याला 'ज्ञानोबा-तुकोबा' कळले ते रामदासाची भलामन करणारच नाही. आगळीक अंगाशी आली म्हणून ही सारवासारव आहे. मनात कपट आहेच. ते उघड दिसून येतं. देवस्थानने देहूबंदी केली योग्यच झालं. "तुका म्हणे ऐशा नरा l मोजूनि माराव्या पैंजारा ll "

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलेला आहे.

फोटो स्रोत, Facebook/श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी

फोटो कॅप्शन, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलेला आहे.

सोशल मीडियावर गोविंददेव गिरी महाराज यांच्या वक्तव्यावर अशाप्रकारे जोरदार टीका होऊ लागल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा निषेध देहू आणि आळंदी संस्थानांच्या विश्वस्तांनीही केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जोपर्यंत ते या विधानाबाबत माफी मागत नाहीत, तोपर्यंत देहूमध्ये बुधवारी (4 मार्च) रोजी होणाऱ्या 'विराट हिंदू संमेलना'मध्येही त्यांना हजेरी लावू देऊ नये, अशी भूमिका देहू देवस्थानने घेतली.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांनीही निषेधाची भूमिका घेतली.

त्यामुळे, काल बुधवारी पार पडलेल्या या विराट हिंदू संमेलनामध्ये गोविंददेव गिरी महाराज उपस्थित झाले नाहीत. त्यांना या संमेलनातून माघार घ्यावी लागली.

वक्तव्याबाबत गोविंददेव गिरी महाराजांनी मागितली माफी

गोविंददेव गिरी महाराजांनी आज गुरुवारी (5 मार्च) आपल्या वक्तव्याबाबत खुलासा करत वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.

आधी 3 मार्च रोजी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक लिखित निवेदन प्रसृत केलं आणि त्यानंतर वाद आणखी वाढल्यावर 5 मार्च रोजी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला.

गोविंददेव गिरी महाराजांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा करत वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.

फोटो स्रोत, Facebook/Swami Govindadev Giri

फोटो कॅप्शन, गोविंददेव गिरी महाराजांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा करत वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.

फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये ते म्हणाले की, "विद्यापीठातील चर्चासत्राचा विषय 'ज्ञानोबा ते तुकोबा' असा असला तरी त्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असल्यामुळे दासबोधाचाही उल्लेख झाला. दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ असं म्हणताना तो इतर ग्रंथांपेक्षा श्रेष्ठ आहे, असं मी म्हटलं नाही. किंवा अन्य ग्रंथ ग्रंथच नाहीत, असंही म्हटलं नाही. तो वेगळ्या प्रकारचा ग्रंथ आहे, इतकंच मला रचनेच्या दृष्टीनं म्हणायचं होतं. पण विद्वानांनाही हे लक्षात घेणं, अवघड होऊ लागलं."

पुढे स्पष्टपणे माफी मागत ते म्हणाले की, "सामान्यातल्या सामान्य भाविकाचा कुठल्याही प्रकारे गैरसमज होऊ नये, यादृष्टीने मी अत्यंत विनयानं माझे शब्द मागे घेतो आणि क्षमायाचना करतो."

'निवेदन मूळ भाषणापेक्षाही अधिक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह'

'होय होय वारकरी' या ग्रंथाचे लेखक आणि कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.

बीबीसीशी बोलताना ते सांगतात की, मूळ भाषणापेक्षाही त्यांनी माफी मागताना केलेलं निवेदन अधिक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह आहे.

ते सांगतात की, "स्वामी गोविंददेव गिरी यांनी त्यांच्या निवेदनात हिंदू समाजात दुही माजू नये यासाठी क्षमायाचना व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे. हिंदू समाजात जी दुही निर्माण केली गेलेली आहे ती मुळात जातीविषमतेमुळे. एका बाजूला त्याच जातीविषमतेच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे हिंदू समाजात दुही निर्माण करु नका असं म्हणायचं यात विसंगती आहे."

तुकोबांच्या गाथेच्या शासकीय प्रतीचं मुखपृष्ठ
फोटो कॅप्शन, तुकोबांच्या गाथेच्या शासकीय प्रतीचं मुखपृष्ठ

पुढे ते सांगतात की, "स्वामी गोविंददेव गिरी यांनी 'आपल्या संतपरंपरेत स्वतंत्र असा फक्त दासबोध ग्रंथ आहे' असं म्हटलं. यात 'आपली संतपरंपरा' म्हणजे नेमकी 'कोणती संतपरंपरा?' असा प्रश्न निर्माण होतो."

यामागचं कारण स्पष्ट करताना ज्ञानेश्वर महाराज बंडगर सांगतात की, "रामदास स्वामींचा संप्रदाय आणि त्यांची परंपरा वारकरी संतांच्या परंपरेपेक्षा निराळी आहे. व्यापक अर्थाने त्यांनी रामदास स्वामींना संतपरंपरेचा भाग मानलं तरी त्यात अनेक अकादमीक अडचणी निर्माण होतात. जर वारकऱ्यांपेक्षा स्वतंत्र संप्रदाय असूनही रामदास स्वामी संतपरंपरेचा भाग असतील, असं मानायचं झाल्यास मग महाराष्ट्रातील इतर संप्रदायातील व्यक्तींनाही संतपरंपरेचा भाग मानवा लागेल."

मुळात, 'ज्ञानोबा ते तुकोबा' या नावाने घेतलेल्या राष्ट्रीय परिषदेत दासबोधाचं वेगळेपण आणि अर्थातच त्यानिमित्ताने मोठेपण सांगण्याचं कोणतंही प्रयोजन नव्हतं, असंही ते सांगतात.

तुकोबांचे वंशज सदानंद मोरे काय म्हणाले?

संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत यासंदर्भात सुमारे अर्ध्या तासाचं सविस्तर विश्लेषण केलंय.

त्यामध्ये ते म्हणाले की, "त्यांनी उपस्थित केलेल प्रश्न अत्यंत अकॅडमिक स्वरूपाचे आहेत. त्यामुळे, त्याची चर्चा अकॅडमिक पद्धतीनेच व्हायला पाहिजे. त्यामध्ये त्यांनी जे विधान केलंय ते ग्रंथरचनेसंदर्भातलं आहे."

ते सांगतात की, "भाष्यांना ग्रंथ म्हणायचं का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. जर 'नाही म्हणायचं' असं आपण क्षणभरासाठी ठरवलं, तर खुद्द शंकराचार्य हे सुद्धा मग ग्रंथकार राहणार नाहीत. मग ही भूमिका स्वामीजींना पचणार आहे का?" असा सवाल सदानंद मोरे करतात.

संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत यासंदर्भात सुमारे अर्ध्या तासाचं सविस्तर विश्लेषण केलंय.

फोटो स्रोत, Facebook/Sadanand More

फोटो कॅप्शन, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत यासंदर्भात सुमारे अर्ध्या तासाचं सविस्तर विश्लेषण केलंय.

पुढे ते विचारतात की, "शंकराचार्यांनी तरी कुठे स्वत:चा ग्रंथ लिहिलाय? त्यांनी भगवद्गीतेवर, दशोपनिषद आणि ब्रह्मसूत्रांवरती भाष्य लिहिली. त्यांनंतरही अनेकांनी जी भाष्य लिहिली आहेत त्यांनाही मग आपल्याला ग्रंथकार म्हणता येणार नाही."

पुढे ते सांगतात की, भारतीय परंपरेत आपण पहिल्यापासूनच भाष्यांना ग्रंथ म्हणतो आहोत."

"क्षणभरासाठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मानला नाही तरी 'अमृतानुभवा'चं तुम्ही काय करणार?" असा सवालही ते करतात.

पुढे ते म्हणतात की, "तो तर स्वतंत्र सिद्धांत सांगणारा अस्सल ग्रंथ आहे. हे आपण कुठल्याही कसोटीवर नाकारू शकत नाही."

वारकरी संप्रदायामध्ये समर्थ रामदास स्वामींबद्दल कुठल्याही प्रकारचा उल्लेख मिळत नाही. कुठल्याही प्रकारची कथा-ग्रंथकथा मिळत नाही, असंही ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)