धोतऱ्याच्या पानांची भाजी खाल्ली, लगेच प्रकृती बिघडली; सोशल मीडियावरील रेसिपीनं पोहोचवलं रुग्णालयात

धोतऱ्याची भाजी खाल्ल्याने कुटुंब रुग्णालयात

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, लक्कोजू श्रीनिवास
    • Role, बीबीसीसाठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

सोशल मीडियावरील व्हीडिओवर विश्वास ठेवत एका कुटुंबानं धोतऱ्याच्या पानांची भाजी करून खाल्ली. पण त्यामुळं सर्वांची प्रकृती अचानक बिघडली.

काकीनाडा जिल्ह्यातील गंडेपल्ली भागातील यर्रामपालेम गावातील बिक्किन गंगाभवानी यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर हा दुर्दैवी प्रकार घडला.

त्यांनी सोशल मीडियावर धोतऱ्याच्या (उम्मेट्टा) पानांची भाजी करून खाल्ली तर ती आरोग्यास चांगली असते, असा एक व्हीडिओ पाहिला होता.

त्यावर विश्वास ठेवून त्यांच्या कुटुंबीयांनी ती भाजी करून खाल्ली.

व्हीडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांनी धोतऱ्याची पाने घालून आमटी केली. त्यानंतर बिक्किन गंगाभवानी, तिची आई मुथ्याल वीरलक्ष्मी, मामा बिक्किन वीरब्बू आणि नातेवाईक रिम्मलापुडी जयलक्ष्मी यांनी ती आमटी भातासोबत खाल्ली.

जेवण केल्यानंतर थोड्याच वेळात सर्वांची प्रकृती बिघडली. हे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना लगेचच काकीनाडा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

काकीनाडा जीजीएचचे उपअधीक्षक पद्मनाभन श्रीनिवासन सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं बीबीसीला सांगितलं.

नेमकं काय घडलं?

बिक्किन गंगाभवानी यांचं कुटुंब हैदराबादमध्ये राहतं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांचं मूळ गाव काकीनाडा जिल्ह्यातील गंडेपल्ली मंडलातील यर्रामपालेम आहे. तिथे देवीची यात्रा असल्यामुळे गंगाभवानी, तिचे मामा वीरब्बू आणि दोन मुलांसह ते हैदराबादहून यर्रामपालेमला आले होते. रविवारी (3 मे) तिथे यात्रा होती.

गंगाभवानीची आई वीरलक्ष्मी यांनी इन्स्टाग्रामवर पाहून धोतऱ्याची पाने आणि डाळ एकत्र करून सोमवारी आमटी बनवली.

दुपारी जेवल्यानंतर वीरब्बू, गंगाभवानी, वीरलक्ष्मी आणि आणखी एक नातेवाईक जयलक्ष्मी यांना उलटी, मळमळ आणि डोकेदुखी सुरू झाली आणि ते बेशुद्ध पडले.

दुपारी 4 च्या सुमारास गंगाभवानी यांचे वडील हरिबाबू यांनी त्यांची प्रकृती लक्षात घेत लगेचच सर्वांना स्थानिक पेद्दापूरम रुग्णालयात नेलं. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना काकीनाडा जीजीएच रुग्णालयात हलवण्यात आलं.

हरिबाबू आणि गंगाभवानीच्या दोन मुलांनी धोतऱ्याच्या पानांची ती आमटी खाल्ली नव्हती. त्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही.

"यात्रेसाठी माझ्या भावाचं कुटुंब आलं होतं. यात्रेत आम्ही सर्वजण एकत्र फिरलो आणि खूप वेळ घालवला. सोमवारी सायंकाळी त्यांना अचानक चक्कर येऊन ते पडले, म्हणून आम्ही लगेच त्यांना रुग्णालयात नेलं. नंतर कळलं की त्यांनी फोनवर व्हीडिओ पाहून धोतऱ्याच्या पानांची भाजी करून खाल्ली होती," असं वीरब्बूचे भाऊ प्रसाद यांनी सांगितलं.

धोतऱ्याची वनस्पती खरंच धोकादायक आहे का?

तज्ज्ञांच्या मते धोतऱ्याची (उम्मेट्टा) वनस्पती विषारी असते.

आंध्र विद्यापीठाच्या (एयू) वनस्पतिशास्त्र विभागातील हर्बेरियम क्युरेटर डॉ. प्रकाशराव यांनी धोतऱ्याची वनस्पती विषारी असल्याचं बीबीसीला सांगितलं.

त्या वनस्पतीचं शास्त्रीय नाव दातुरा स्ट्रामोनियम आहे. या वनस्पतीमध्ये ॲट्रोपिन आणि स्कोपोलामिन नावाचे अत्यंत विषारी घटक असतात.

"1999 मध्ये तैवानच्या शि-शिन चांग यांनी धोतऱ्याच्या झाडावर केलेलं संशोधन 'जर्नल ऑफ व्हेटर्नरी अँड ह्युमन टॉक्सिकोलॉजी' या जर्नलमध्ये प्रकाशित झालं होतं. त्या अभ्यासानुसार, धोतऱ्याचं झाड, त्याची पानं आणि फुलं सर्व विषारी आहेत," असं डॉ. प्रकाश राव यांनी सांगितलं.

या वनस्पतीमध्ये ॲट्रोपिन आणि स्कोपोलामिनसारखे विषारी घटक असतात. त्यामुळे काही वेळा हे खूप धोकादायक ठरू शकतं आणि काही प्रकरणांमध्ये प्राणघातक देखील ठरू शकतात, असं त्यांनी सांगितलं.

धोतऱ्याची भाजी खाल्ल्याने कुटुंब रुग्णालयात

फोटो स्रोत, UGC

काकीनाडा जीजीएचचे उपअधीक्षक पद्मनाभन श्रीनिवासन यांनी सांगितलं की, या वनस्पतीची फुलं, पानं आणि बिया खाल्ल्याने चक्कर येणं, तोंड कोरडं पडणं, हृदयाचे ठोके वाढणं, भोवळ येणं आणि अंधुक किंवा दृष्टी धुसर होण्यासारख्या आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात.

यामुळे काही वेळा मृत्यूही होऊ शकतो, असं संशोधनात म्हटल्याचं क्युरेटर डॉ. प्रकाश राव यांनी बीबीसीला सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, "धोतऱ्याच्या वनस्पतीला पांढऱ्या आणि नारिंगी रंगाची फुलं येतात. त्याचा वासही खूप तीव्र असतो. या झाडात औषधी गुणधर्मही आहेत. प्रामुख्याने आयुर्वेदात याचा वापर केला जातो. काही मिश्रणासह इंग्रजी उपचारपद्धतीतही त्याचा उपयोग केला जातो."

'आयुर्वेदात वापर होतो, पण…'

तिरुपती येथील एसपी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेणू दीक्षित यांनी बीबीसीला सांगितलं की, धोतऱ्याच्या फुलांचा आयुर्वेदात वापर केला जातो. मात्र, त्यासाठी एक विशिष्ट पद्धत आणि नियम पाळावे लागतात.

बिक्किन वीरब्बू

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, बिक्किन वीरब्बू

डॉ. रेणू दीक्षित म्हणाल्या की, "धोतऱ्याची वनस्पती वापरण्यापूर्वी त्याचं योग्य शुद्धीकरण करावं लागतं. ही वनस्पती थेट वापरू नये, कारण ती विषारी असते. शिवाय वनस्पतींवर फवारलेली औषधेही त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकतात, त्यामुळे ती आणखी धोकादायक बनू शकतात."

"सोशल मीडियावर पाहून कोणतीही वनस्पती वापरून भाजी किंवा घरगुती उपचार करणं चुकीचं आहे. अशा गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे."

डॉ. प्रकाशराव म्हणतात की, "गन्नेरू, बिल्ला गन्नेरू आणि धोतरा ही वनस्पती एकाच कुळातील (सोलॅनेसी) आहेत. यापैकी काही वनस्पतींमध्ये विषारी गुणधर्म असतात."

विषारी वनस्पतींपासून सावध राहा

या कुळातील वनस्पतींना डेविल्स ट्रम्पेट, थॉर्न अॅपल आणि जिमसन वीड अशीही नावं आहेत. या वनस्पती दिसायला सुंदर असल्या तरी खूप विषारी असतात.

डॉ. पद्मनाभन श्रीनिवासन यांनी बीबीसीला सांगितलं की, "धोतऱ्याच्या वनस्पतीतील फक्त फुलंच नाही, तर बिया, पानं आणि मुळंही खूप विषारी असतात. या वनस्पतीचा कोणताही भाग खाण्यास योग्य नाही. ते शरीरावर गंभीर परिणाम करून विषबाधा होऊ शकते."

एयू वनस्पतिशास्त्र विभागाचे हर्बेरियम क्युरेटर डॉ. प्रकाश राव

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, एयू वनस्पतिशास्त्र विभागाचे हर्बेरियम क्युरेटर डॉ. प्रकाश राव

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे (एफएसएसएआय) उपसंचालक सुरेश उप्परपल्ली यांनी बीबीसीला सांगितलं की, "सोशल मीडियावर पाहून कोणतीही रेसिपी किंवा घरगुती उपाय तज्ज्ञांचा सल्ला न घेता करून पाहू नयेत. अशा गोष्टींना वैज्ञानिक आधार आहे का, हे पाहणं गरजेचं आहे."

"तसेच एफएसएसएआयच्या मार्गदर्शक सूचना पाहाव्यात. सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी मानू नका, विशेषतः ती आरोग्याशी संबंधित असेल तर डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या."

दोघांवर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू

"धोतऱ्याच्या वनस्पतीची पानं, फुलं आणि साल सगळंच विषारी असतं. त्याचा परिणाम लगेच कमी होत नाही, तो हळूहळू कमी होतो. सध्या चौघांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पद्मनाभन श्रीनिवासन यांनी बीबीसीला दिली."

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

धोतऱ्याची भाजी

फोटो स्रोत, Getty Images

"3 महिला आणि 1 पुरुष 4 मे रोजी रुग्णालयात दाखल झाले. चौघांवरही आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती सुधारल्याने त्यांना वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे."

"उर्वरित दोघांवर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, कारण त्यांना दमा आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे", अशी माहिती काकीनाडा जीजीएचच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कमला यांनी बीबीसीला दिली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.