मक्का मशीद ते मालेगाव : हिंदू संघटनांवर आरोप असलेली 5 प्रकरणं

फोटो स्रोत, Getty Images
2007 साली झालेल्या मक्का मशीद स्फोटाप्रकरणी हैदराबादच्या एका न्यायालयानं सोमवारी सर्व आरोपींना दोषमुक्त केलं. 2006 ते 2008 दरम्यान झालेल्या बाँब स्फोटाच्या कोणकोणत्या प्रकरणांमध्ये हिंदू संघटनांवर आरोप झाले? आणि या प्रकरणांमधले आरोपी कोण होते?
1. मक्का मशीद स्फोट
हैदराबादच्या चार मीनारजवळच्या मक्का मशिदीच्या वजुखान्यात 18 मे 2007ला झालेल्या या स्फोटात नऊ लोक ठार आणि 58 जण जखमी झाले होते.
सुरुवातीला या घटनेमागे कट्टरवादी संघटना हरकत उल जमात-ए-इस्लामी म्हणजेच 'हुजी' असल्याचं म्हटलं गेलं.
पण तीन वर्षांनंतर 2010 मध्ये पोलिसांनी 'अभिनव भारत' नावाच्या संघटनेशी निगडीत स्वामी असीमानंद यांना अटक केली. याशिवाय या संघटनेचे लोकेश शर्मा, देवेंद्र गुप्ता आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना स्फोट प्रकरणात आरोपी करण्यात आलं.
पण सोमवारी न्यायालयाने पुराव्यांअभावी या सर्वांची मुक्तता केली.

फोटो स्रोत, NOAH SEELAM/AFP/GETTY IMAGES
केवळ मक्का मशीद स्फोट प्रकरणच नव्हे, या काही प्रकरणांमध्येही हिंदू संघटनांचा हात असल्याचे आरोप झाले.
2. अजमेर शरीफ बाँबस्फोट
राजस्थानच्या अजमेरमध्ये 11 ऑक्टोबर 2007ला रोजा इफ्तारनंतर अजमेर शरीफ दर्गाच्या परिसरात उभ्या असलेल्या मोटारसायकलमध्ये जोरदार स्फोट झाला. या स्फोटात तीन लोकांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले होते.
या स्फोटानंतर तीन वर्षांनी राजस्थानचे तत्कालीन गृहमंत्री शांती धारीवाल यांनी आरोप अनेक गंभीर आरोप केले. भारतीय जनता पक्षाला अजमेर शरीफ बाँबस्फोटाची संपूर्ण माहिती होती, असं असतानाही सरकार मूग गिळून गप्प राहिलं कारण, यात हिंदू संघटना संघाच्या माणसांचा कथित सहभाग होता, असा आरोप त्यांनी केला.

फोटो स्रोत, BBC WORLD SERVICE
पण 8 मार्च 2017 रोजी NIAच्या विशेष न्यायालयाने या घटनेतील संशयित आरोपी स्वामी असीमानंदसह इतर पाच जणांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
असं असलं तरी 2007मध्ये हत्या करण्यात आलेले संघाचे प्रचारक सुनील जोशींसह देवेंद्र गुप्ता आणि भावेश पटेल यांना स्फोटप्रकरणात दोषी ठरवण्यात आलं.
3. सुनील जोशी हत्या प्रकरण
मध्य प्रदेशच्या देवासमध्ये 29 डिसेंबर 2007ला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरणही नंतर 2011मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) सोपवण्यात आलं होतं.
देशात चर्चेत आलेल्या कथित 'भगवा दहशतवादा'च्या आरोपींची चौकशी करता यावी, हा त्या मागचा उद्देश होता.

फोटो स्रोत, S. NIYAZI
या प्रकरणात संघाशी निगडीत प्रज्ञा सिंह ठाकूरसहीत हर्षद सोळंकी, रामचरण पटेल, वासुदेव परमार, आनंदराज कटारिया, लोकेश शर्मा, राजेंद्र चौधरी आणि जितेंद्र शर्मा यांना आरोपी करण्यात आलं होतं.
पण जोशी हत्या प्रकरणात फेब्रुवारी 2017मध्ये न्यायालयानं साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या समवेत आठही आरोपींची मुक्तता केली. हा निकाल देवासचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजीव कुमार आपटे यांनी दिला होता.
4. समझौता एक्सप्रेस स्फोट
भारत-पाकिस्तान दरम्यान धावणाऱ्या समझौता एक्सप्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007ला हरियाणाच्या पानीपतजवळ स्फोट झाला. या स्फोटात 68 प्रवासी ठार तर 12 जण गंभीर जखमी झाले होते.
मृतांमध्ये 16 लहान मुलं आणि चार रेल्वे कर्मचारीही होते. मरण पावलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या पाकिस्तानी नागरिकांची होती.

26 जुलै 2010ला हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आलं होतं. तपास संस्थेने त्या वेळेस दावा केला होता की, त्यांच्याकडे कट्टरवादी संघटनेशी निगडीत स्वामी असीमानंद यांच्या विरोधात सबळ पुरावे असून तेच या स्फोटामागील मास्टरमाइंड आहेत.
तपास संस्थेचं म्हणणं होतं की, ही सगळी मंडळी अक्षरधाम (गुजरात), रघुनाथ मंदिर (जम्मू), संकट मोचन (वाराणसी) मंदिरांमध्ये झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यांमुळे दुःखी होते आणि 'बाँबस्फोटाचा बदला बाँबस्फोटानेच' घेऊ इच्छित होते.
या साखळी स्फोटांच्या प्रकरणात संघाचे नेते इंद्रेश कुमार यांची सुद्धा चौकशी करण्यात आली होती.

फोटो स्रोत, PTI
पहिल्या चार्जशीटमध्ये नाबा कुमार उर्फ स्वामी असीमानंदबरोबरच सुनील जोशी, रामचंद्र कालसंघ्रा, संदीप डांगे आणि लोकेश शर्मा यांचीही नावं होती. या सर्वांनी मिळून देशी बनावटीचा बाँब तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
CBIने 2010मध्ये हरिद्वारमध्ये असीमानंद यांना अटक केली होती. असीमानंद यांनी दिलेल्या कबुली जवाबावरच ही केस तयार करण्यात आली होती. पण नंतर त्यांनी हा जवाब फिरवला आणि 'पोलिसांनी माझा छळ केल्यामुळेच मी तो जवाब दिला होता,' असं सांगितलं.

फोटो स्रोत, PTI
या प्रकरणाची सुनावणी सध्या धीम्या गतीने पुढे सरकत आहे कारण NIAला पाकिस्तानातील 13 साक्षीदारांची प्रतीक्षा आहे, जे या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आहेत.
5. मालेगाव साखळी बाँबस्फोट
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 8 सप्टेंबर 2006ला शुक्रवारच्या नमाजानंतर काही स्फोट झाले. यात 37 लोकांचा मृत्यू झाला होता.
मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं या प्रकरणाचा तपास केला आणि सात लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात दोन पाकिस्तानी नागरिकांचीही नावं होती.
पण राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) चार्जशीटमध्ये ATS आणि CBIने केलेले दावे चुकीचे ठरले.

फोटो स्रोत, Reuters
चौकशीअंती NIAने या प्रकरणात चार लोकांना अटक केली - लोकेश शर्मा, धन सिंह, मनोहर सिंह आणि राजेंद्र चौधरी.
याच दरम्यान मालेगावच्या अंजुमन चौक आणि भीकू चौक इथं 29 सप्टेंबर 2008ला साखळी बाँबस्फोट झाले. यात सहा लोकांचा मृत्यू झाला आणि 101 लोक जखमी झाले.
रमझान महिन्यात झालेल्या या स्फोटांची चौकशीही महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने केली. त्यांच्या मते या स्फोटांसाठी एक मोटरसायकल वापरण्यात आली होती. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या नावावर ती मोटारसायकल असल्याच्या बातम्या त्या वेळी आल्या होत्या.

फोटो स्रोत, PTI
तपास संस्थांच्या मते, मालेगाव बाँबस्फोटांमागे कथितरीत्या 'अभिनव भारत' नावाच्या एका कट्टरवादी संघटनेचा हात होता. या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांचा या संघटनेशी संबध असल्याचा सांगण्यात आलं होतं.
या प्रकरणात साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितसहीत सात इतर जणांना आरोपी ठरवण्यात आलं होते. नंतर या घटनेचा तपासही NIAकडे आला.

फोटो स्रोत, PTI
कर्नल पुरोहीत यांनी गुप्त बैठकांमध्ये बाँबस्फोटांसाठी विस्फोटक जमा करण्यास सहमती दर्शविली होती, असं NIAने म्हटलं होतं.
तथापि, कर्नल पुरोहीत हे नेहमी न्यायालयात स्वतःला राजकीय बळी ठरवण्यात येत असल्याचा दावा करत आले.
13 मे 2016ला NIAने नवीन चार्जशीट दाखल केली. यामध्ये रमेश शिवाजी उपाध्याय, समीर शरद कुलकर्णी, अजय राहिरकर, राकेश धावडे, जगदीश महात्रे, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी, रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा केला होता.

फोटो स्रोत, PTI
याशिवाय साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, शिव नारायण कालसांगरा, श्याम भवरलाल साहू, प्रवीण टक्कलकी, लोकेश शर्मा, धानसिंह चौधरी यांच्या विरोधात केस चालवण्याइतपत सबळ पुरावे नसल्याचाही दावा केला होता.
एप्रिल 2017 मध्ये मुंबई हायकोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुरला जामीन दिला पण कर्नल पुरोहित यांना जामीन नाकारण्यात आला.
ऑगस्ट 2017मध्ये कर्नल पुरोहित हे जेलमधून बाहेर आले. पण सर्वाधिक चर्चा झाली तेव्हा जेव्हा जेलमधून बाहेर पडलेल्या कर्नल पुरोहितांसाठी सैन्याची तीन वाहनं तिथं हजर होती.
डिसेंबर 2017मध्ये मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर आणि कर्नल पुरोहीत यांच्यावरील मकोका (महाराष्ट्र संगठीत अपराध नियंत्रण कायदा) हटवण्यात आला. दोघांवर आता UAPA आणि IPCअंतर्गत खटले सुरू आहेत.
हेही वाचलंत का?
- महिन्याला तीन लाख कमावणारा हा 'स्पर्म डोनर' रेडा पाहिलात का?
- 'निर्भयाच्या वेळी झाला होता तसा जनआक्रोश जम्मूच्या पीडितेसाठी का नाही?'
- 'मी पाहिली 'बॉम्बे'ची पहिलीवहिली ट्रेन' : 165 वर्षांपूर्वी नोंदवलेल्या पहिल्या भारतीय रेल्वेच्या आठवणी
- कर्नाटक निवडणूक 2018 : वेगळ्या धर्माची मागणी करणारे लिंगायत हिंदू आहेत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








