'स्पर्म डोनर' रेडा : महिन्याला 3 लाख कमावणारा हा रेडा पाहिलात का?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
आतापर्यंत तुम्ही 'स्पर्म डोनर' माणसाबद्दल ऐकलं असेल. पण एखादा रेडाही 'स्पर्म डोनर' असू शकतो आणि त्याच्या स्पर्म्सना बाजारात लाखोंचा भाव मिळू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? हरियाणातल्या नरेंद्र सिंग यांच्याकडे असा 'स्पर्म डोनर' रेडा आहे. ज्याचं नाव आहे शहेनशाह!
बीबीसी मराठीनं काही दिवसांपूर्वी या शहेनशाहवर बातमी केली होती. ती पुन्हा शेयर करत आहोत.
नरेंद्र सिंग पानिपत जिल्ह्यातल्या डिढवाडी गावात राहतात. त्यांच्या घरात प्रवेश करताच संपूर्ण हॉल प्रमाणपत्रांनी भरलेला दिसून येतो. ही प्रमाणपत्रं त्यांच्याकडच्या रेड्यांनी मिळवून दिल्याचं ते सांगतात.
"पहिल्यांदा आमच्याकडे 'गोलू' होता, तोही हरियाणाची शान होता. आता त्याचा मुलगा आहे 'शहेनशाह', जो बापापेक्षाही कमाल आहे," प्रमाणपत्रांना हात लावत नरेंद्र अभिमानानं सांगतात.
शहेनशहाला बघण्याची इच्छा आणि उत्सुकता अशी वाढत जाते. आपल्या पोराचं कौतुक सांगावं असं रेड्याचं कौतुक सांगताना नरेंद्र थकत नाहीत. शेवटी घराशेजारी असणाऱ्या त्यांच्या डेअरी फार्मकडे घेऊन जातात आणि अखेर त्या शहेनशाहचं दर्शन होतं.
काय चीज आहे शहेनशाह?
दोन एकरभर पसरलेल्या नरेंद्र यांच्या डेअरी फार्ममध्ये अनेक गाई-म्हशी आहेत. नरेंद्र त्यांच्या म्हशींबद्दल सांगत असतानाच नजर डेअरीतल्या भल्यामोठ्या मच्छरदाणीकडे जाते. तिथे काय आहे? असं विचारल्यावर नरेंद्र सांगतात, "ती जागा आहे शहेनशाहची, त्याला डास चावू नयेत म्हणून खास मच्छरदाणी लावलेली आहे."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
शहेनशाहकडे घेवून जाताना ते त्याच्याबद्दल आणखी माहिती सांगतात, "शहेनशाह मुर्रा जातीचा रेडा असून त्याचं वय साडेचार वर्षं आहे. त्याची उंची साडेपाच फूट तर वजन 17 क्विंटल (1700 किलो) आहे. शहेनशाहची शारीरिक वाढ बघून हा जगातला एकमेव रेडा आहे ज्याच्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाही, असं माझ्या लक्षात आलं आणि मी याचं नाव शहेनशाह ठेवलं."
25 किलो चारा, 10 लीटर दूध आणि 1700 किलोंचं धूड
1700 किलो वजनाच्या शहेनशाहचा दिवस सकाळी 4 वाजता सुरू होतो. चारापाणी करून झाल्यानंतर 8 वाजता त्याला नरेंद्र सिंग यांच्या शब्दांत 'स्वीमिंग पूल'मध्ये सोडलं जातं. त्याच्या अंघोळीसाठी डेअरी फार्ममध्ये खास 'स्वीमिंग पूल' बांधण्यात आला आहे. तब्बल 3 तास तो या डबक्यात घालवतो. त्यानंतर शहेनशाहला दररोजचा खुराक दिला जातो.
"दररोज 10 लीटर दूध, 20 ते 25 किलो चारा आणि इतर 8 किलो फीड," असा शहेनशाहचा डेली खुराक असल्याचं नरेंद्र सांगतात.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
शहेनशाहच्या व्यायामाबद्दल ते सांगतात, "सकाळ-संध्याकाळ त्याला 5 किलोमीटर एवढं अंतर चालवलं जातं. शिवाय मान आणि छाती खुलवण्यासाठी जमिनीशी टक्कर घ्यायला लावली जाते."
मिल, मिक्श्चर आणि औषधपाण्याचा विचार केल्यास शहेनशाहच्या महिन्याभराच्या खुराकासाठी 20 ते 25 हजारांचा खर्च येत असल्याचं नरेंद्र सांगतात. पण यापेक्षा कित्येक पटीनं अधिक पैसे ते महिन्याभरात कमावतात.
कसे काढतात स्पर्म?
स्पर्म काढण्यासाठी नरेंद्र आठवड्यातून एकदा शहेनशाहला कर्नालला घेऊन जातात. स्पर्म काढण्याच्या प्रक्रियेबद्दलही नरेंद्र सांगतात.
"कर्नालला जाताना आम्ही शहेनशाह आणि डेअरीमधली एक म्हैस बरोबर घेऊन जातो. ही म्हैस रीपिटरी (गरोदर राहू शकणार नाही अशी) असते. तिथे गेल्यानंतर शहेनशाह आणि म्हैस यांचा संबंध घडवून आणला जातो. त्यापूर्वी शहेनशाहच्या लिंगाला निप्पल लावलं जातं. हे निप्पल कंडोमप्रमाणेच असतं. संबंध झाल्यावर ते निप्पल काढलं जातं आणि त्यातले स्पर्म कलेक्ट करतात."

फोटो स्रोत, MANOJ DHAKA/BBC
"शहेनशाहाला एकदा कर्नालला घेऊन गेलं की, तो एका दमात 750 ते 900 डोस इतके स्पर्म देतो. त्याच्या स्पर्मचा एक डोस 300 रुपयांना विकला जातो. शहेनशाहचे स्पर्म विकून आम्ही महिन्याला 3 लाख रुपये कमावतो," नरेंद्र पुढे सांगतात.
"जुलै ते फेब्रुवारी हे आठ महिने स्पर्मला चांगली मागणी असते. पण मार्च ते जूनदरम्यान यात घसरण होते. शहेनशाहचे स्पर्म पंजाब, उत्तप्रदेश, राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेशासह संपूर्ण भारतभर विकले जातात. शहेनशाहच्या स्पर्मची आम्ही गेल्या दीड वर्षांपासून विक्री करत आहोत. हरियाणातच शहेनशाहची 2000 रेडकू असतील," स्पर्मच्या विक्रीबद्दल नरेंद्र सांगतात.
शहेनशाहच्या स्पर्मना मागणी का?
शहेनसाहसारख्या मुर्रा जातीच्या रेड्यांच्या स्पर्मला मागणी का आहे यावर औरंगाबादचे पशुधन विकास अधिकारी रत्नाकर पेडगावकर यांना विचारलं. "मुर्रा जातीची म्हैस ही दर्जेदार दूध उत्पादनासाठी जगभरात क्रमांक 1ची मानली जाते. शिवाय भारतामध्ये 'बफेलो ब्रीडिंग'चा कार्यक्रम लक्षात घेता गावरान म्हशींना आपल्या मुर्राच्या क्वालिटीला अपग्रेड करायचं आहे", असं पेडगावकर म्हणाले.
"भारतभरात मुर्रा जातीच्या रेड्यापासून बनलेल्या स्पर्मनेच म्हशींची गर्भधारणा (Insemination) करण्याला प्रधान्य दिलं जातं. पण हे असे रेडे देशभरात तुरळक ठिकाणी आढळतात. त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी म्हशीला सर्व्हिस द्यायला जाऊ शकत नाहीत. म्हणून मग या रेड्यांचे स्पर्म गोळा करून ते विकले जातात."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
"एखादा रेडा हा वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षांपर्यंत स्पर्मची सर्व्हिस देऊ शकतो. लिक्विड नायट्रोजनचा वापर करून त्याचे स्पर्म उणे 196 अंश तापमानाला साठवून ठेवले जातात. हे स्पर्म 20 ते 30 वर्षांपर्यंत साठवून ठेवले जाऊ शकतात," पेडगावकर पुढे सांगतात.
बऱ्याच ठिकाणी रेडा आणि म्हैस यांचा प्रत्यक्षरित्या (निप्पल न वापरता) संबंध घडवून आणला जातो. यावर पेडगावकर सांगतात, "निप्पल न लावता म्हैस आणि रेड्याचं मीलन करण्यात धोके असतात. थेट गर्भधारणेला नॅचरल ब्रीडिंग म्हणतात. बाहेरच्या रेड्याबरोबर नॅचरल ब्रीडिंग केल्यास गर्भधारणेचा धोका असतो. कारण त्या रेड्याला एखादा आजार असू शकतो. थेट संबंध घडवून आणल्यास तो आजार म्हशीला होऊन गर्भपात होण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी मग कृत्रिम गर्भधारणा (Artificial Insemination) आधिक सोयीची ठरते."
रशियातून मागणी आणि २५ कोटींची बोली
''गेल्या वर्षी सुरजकुंडमध्ये रशियाच्या व्यापाऱ्यांनी 25 कोटी रुपये एवढी शहेनशाहची किंमत लावली होती. पण मी त्याला विकण्यास नकार दिला,'' शहेनशाहच्या किंमतीबद्दल नरेंद्र सांगतात.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
"हा जगातला एकमेव रेडा आहे. याच्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाही. याला बघण्यासाठी इतर राज्यांतले लोक आमच्याकडे येतात. त्यामुळे याचा आम्हाला अभिमान वाटतो. तसंच शहेनशाहमुळे आसपासच्या परिसरातल्या म्हशींच्या दूध उत्पादनात वाढ व्हावी आणि त्यातून त्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं मला वाटतं," एवढी मोठी किंमत मिळत असूनही शहेनशाहला का विकलं नाही यावर नरेंद्र हे उत्तर देतात.
कौटुंबिक वारसा
2004 साली नरेंद्र यांनी गोलू नावाचा मुर्रा जातीचा रेडा 1 लाख रुपयांना खरेदी केला होता. ''आमच्या काकांच्या मुलाला सर्व जण प्रेमानं गोलू म्हणायचे. म्हणून मग विकत आणलेल्या रेड्याचं नाव आम्ही गोलू ठेवलं,'' गोलू या नावाविषयी विचारल्यावर नरेंद्र यांचा मुलगा नवीन उत्साहाने सांगतो.
हा गोलू म्हणजे शहेनशहाचा बाप. गोलूची शहेनशहासारखी अनेक तगडी अपत्यं हरियाणात प्रसिद्ध आहेत. "आमच्याकडे राणी नावाची म्हैस होती. त्या दोघांचं अपत्य म्हणजेच शहेनशाह होय," नरेंद्र सांगतात.
"गोलू म्हणजे हरियाणाची शान होता. त्यानं हरियाणा सांड, साईवाला सांड अशा प्रत्येक स्पर्धेत विजय मिळवला होता,'' नरेंद्र पुढे सांगतात.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
इतकंच नाही तर सध्या प्रसिद्ध असलेल्या सुलतान, युवराज, राका या रेड्यांचा बापही गोलू असल्याचा दावा नरेंद्र करतात. गेल्या वर्षी शहेनशाहला राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार मिळाला. यावर्षी हरियाणातल्या पशू मेळाव्यात तो विशेष आकर्षण ठरला.
शहेनशाहचं महाराष्ट्र कनेक्शन
शहेनशहा आणि गोलूचा लौकिक महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. नरेंद्र सांगतात की, 2007 मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरमध्ये 'केशर माती कृषीप्रदर्शन' आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात गोलूचा सहभाग होता. प्रदर्शनातल्या पशू स्पर्धेमध्ये मुर्रा रेडा विभागात गोलूनं 'विशेष' क्रमांक पटकावला होता.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
तसंच 2009 साली हरियाणातल्या जिंदमध्ये रेड्यांच्या 'रॅम्प शो'चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात तत्कालीन कृषीमंत्री शरद पवारांनी नरेंद्र यांचा सत्कार केला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









