सलग तिसऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारत-इंग्लंड उपांत्य फेरीत आमने-सामने, कोणाचं पारडं जड?

हॅरी ब्रूक आणि सूर्यकुमार यादव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

सेमी फायनल आणि भारत विरुद्ध इंग्लंड अशी लढत. याच दोन संघांमध्ये सलग तिसऱ्यांदा पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीची लढत रंगते आहे.

फायनलचं तिकिट कोण मिळवणार याचा निर्णय आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. विजेत्या संघाला मग येत्या रविवारी (8 मार्च रोजी) होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा मुकाबला करायचा आहे.

आपल्या घरच्या मैदानात, चाहत्यांसमोर खेळताना टीम इंडियाचं पारडं साहजिकच जड आहे.

त्यात नव्यानं गवसलेला फॉर्म, फलंदाजांची मजबूत फळी आणि जसप्रीत बुमरासारख्या गोलंदाजाची कामगिरी यामुळे टीम इंडियाच्या पंखांत नवं बळ भरलं आहे.

दुसरीकडे इंग्लंड सातत्यानं चांगला खेळ करत असून या स्पर्धेत त्यांच्या टीमनं निर्णायक क्षणी त्यांनी आपली कामगिरी उंचावली आहे. तसंच त्यांच्याकडे गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि आदिल रशिदसारखी हत्यारं आहेत.

एक प्रकारे इंग्लंडचे हे गोलंदाज आणि भारताच्या फलंदाजांमधली लढतच या सामन्यात निर्णायक ठरू शकते, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

भारताच्या टॉप ऑर्डरचं पुनरुज्जीवन

अगदी दहा-बारा दिवसांपूर्वी फलंदाजीत टॉप ऑर्डरचं अपयश हे भारतासाठी डोकेदुखी ठरलं होतं.

पण सुपर एटच्या अखेरच्या लढतीत वेस्ट इंडीजविरुद्ध संजू सॅमसनला अभिषेक शर्मासोबत सलामीला पाठवायचा आणि तिलक वर्माला पाचव्या क्रमांकवर मधल्या फळीत खेळवण्याचा निर्णय भारतासाठी गेमचेंजर ठरला.

संजू सॅमसन सुपर एटच्या अखेरच्या लढतीत भारताच्या वेस्ट इंडीजवरील विजयाचा शिल्पकार ठरला.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, संजू सॅमसन सुपर एटच्या अखेरच्या लढतीत भारताच्या वेस्ट इंडीजवरील विजयाचा शिल्पकार ठरला.

विशेषतः संजू सॅमसननं सलामीला नाबाद 97 धावा ठोकत भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये नवी जान ओतली आहे. इंग्लंडविरुद्ध लढतीतही भारत अशीच रणनीती आखायची शक्यता नाकारता येत नाही.

तसं झालं, तर सर्वाधिक उत्सुकता आहे, ती सॅमसन आणि जोफ्रा आर्चर यांच्यातल्या लढतीची.

जोफ्रा आर्चरचं आव्हान

भारताला थोपवायचं, तर सुरुवातीला लवकर विकेट्स काढणं महत्त्वाचं ठरतं, याची इंग्लंडलाही जाणीव आहे. कारण भारताच्या बलाढ्य फलंदाजीवर दबाव टाकण्याचा आणि धावांचा ओघ कमी करण्याचा तो एकच मार्ग आहे.

सुपर एटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतानं पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स स्वस्तात गमवाल्या आणि मग तो सामनाही गमवाला होता.

त्याआधी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यूएसएविरुद्धच्या लढतीत भारतानं चार विकेट्स लवकर गमावल्या, मात्र तेव्हा सूर्यकुमार यादवनं भारताला सावरलं होतं.

जोफ्रा आर्चर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जोफ्रा आर्चर

वानखेडेवर आता इंग्लंडही गोलंदाजी करताना भारतावर असा दबाव बनवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी त्यांची भिस्त राहील जोफ्रा आर्चरवर.

सुरुवातीच्या दोन सामन्यांचा अपवाद वगळता, आर्चरनं या स्पर्धेत भेदक गोलंदाजी केली आहे. त्यानं या स्पर्धेत आतापर्यंत दहा विकेट्स काढल्या असून, त्यातल्या आठ विकेट्स पॉवरप्लेदरम्यान काढल्या आहेत.

फिरकी गोलंदाजांमधली लढत

वानखेडे स्टेडियमच्या ज्या पिचवर वेस्ट इंडीजनं इंग्लंडला आणि इटलीनं नेपाळला हरवलं, त्याच मधल्या खेळपट्टीवर हा उपांत्य सामना होणार आहे.

या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फायदा मिळताना दिसला होता. त्यामुळेच उपांत्य फेरीतही दोन्ही संघांचा फिरकी मारा कितपत प्रभावी ठरतो, यावर बरंच अवलंबून राहील.

भारताचे वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलसारखे फिरकी गोलंदाज इंग्लंडला त्रास देऊ शकतात.

वरूणनं तर या स्पर्धेत आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक 12 विकेट्स काढल्या आहेत. त्याशिवाय अक्षर पटेलनं सात विकेट्स काढल्या आहेत

भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकीचा सामना कसा करतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकीचा सामना कसा करतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

पण इंग्लंडच्या भात्यातही आदिल रशिद, लियाम डॉसन आणि विल जॅक्स अशी तीन फिरकी अस्त्रं आहेत. रशीदनं 11 विकेट्स , डॉसननं 10 विकेट्स तर जॅक्सनं 7 विकेट्स काढल्या आहेत.

जसप्रीत बुमरावर भारताची भिस्त

जसप्रीत बुमरा भारतीय गोलंदाजीचा कणा आहे आणि या स्पर्धेत, विशेषतः सुपर एट फेरीत तेच पुन्हा दिसून आलं.

बुमरानं या स्पर्धेतल्या सहा सामन्यात 9 विकेट्स काढल्या आहेत. त्यानं या दरम्यानं 6.30 च्या इकॉनॉमी रेटनं गोलंदाजी केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेत केवळ तीनदाच त्याच्या गोलंदाजीवर सिक्सर लगावण्यात फलंदाजांना यश आलं आहे.

केवळ सुरुवातीच्या ओव्हर्समध्येच नाही, तर अगदी शेवटी निर्णायक क्षणीही बुमरा धावांना हमखास चाप लावू शकतो, आणि म्हणूनच तो भरवशाचा गोलंदाज असल्याचा निर्वाळा भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही दिला आहे.

सलग तिसरी भारत-इंग्लंड सेमी फायनल

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सलग तिसऱ्या ट्वेन्टी20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत एकमेकांना भिडणार आहेत.

याआधी 2022 साली अ‍ॅडलेड ओव्हलवर झालेल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडनं भारताला दहा विकेट्सनी हरवलं होतं आणि पुढे विजेतेपदही मिळवलं.

त्यानंतर 2024 साली गयानामध्ये भारतानं इंग्लंडला 68 धावांनी हरवून फायनल गाठली होती आणि विजेतेपद मिळवलं होतं.

2024 च्या T20 वर्ल्ड कपनंतर आतापर्यंत टीम इंडिया 41 ट्वेन्टी20 सामने खेळली असून, त्यात 33 वेळा भारतानं विजय साजरा केला आहे. त्यामुळे या फॉरमॅटमध्ये भारत सध्या सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ ठरला.

टीम इंडिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टीम इंडिया

2017 पासून वानखेडे स्टेडियमवर झालेल्या T20 सामन्यांपैकी एकही भारतानं गमावलेला नाही. पण इंग्लंडनं याच स्पर्धेच्या साखळी फेरीदरम्यान वानखेडेवरच वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामना गमावला होता.

तर गेल्या वर्षी फेब्रुवारीत या मैदानात झालेल्या T20 सामन्यात भारतानं इंग्लंडवर 150 धावांनी विक्रमी विजय मिळवला होता. त्या सामन्यात अभिषेक शर्मानं 54 चेंडूंमध्ये 135 धावा फटकावल्या होत्या.

पण ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये अनेकदा एखादी ओव्हरच अशा रेकॉर्ड्‌सवर भारी ठरू शकते.

हवामान कसं असेल?

वेस्ट इंडीजविरुद्ध इंग्लंडनं सामना गमावला ती लढत दिवसा उजेडी खेळवण्यात आली होती आणि तेव्हा इंग्लंडला उष्णतेचा त्रासही जाणवला.

आता गुरुवारी उपांत्य सामना रात्री होतो आहे, पण त्या दिवशी दुपारचं तापमान 39 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे. दोन्ही टीम्सना प्रतिस्पर्ध्यांसोबतच उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)