ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'मी राजीनामा देणार नाही, मी हरले नाहीय'

फोटो स्रोत, Getty Images
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतरही तापलेलं राजकीय वातावरण काही शांत होताना दिसत नाहीय.
ममता बॅनर्जी यांनी निकालानंतर आज (5 मे) पत्रकार परिषद घेत माध्यमांशी सविस्तर बातचित केली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मीमी राजीनामा देणार नाही, मी हरले नाहीय. मी राजभवनात जाणार नाही. हा प्रश्नच उद्भवत नाही. नाही."
"आता मला हेही सांगायचंय की, आम्ही निवडणूक हरलो नाही. आम्हाला पराभूत करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. अधिकृतरीत्या, निवडणूक आयोगामार्फत ते आम्हाला हरवू शकतात, पण नैतिकदृष्ट्या आम्हीच निवडणूक जिंकलो आहोत."
'निवडणूक आयोग खलनायक, अन् मी आता मुक्त पक्षी'
तसंच, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप आणि निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले.
नागरिकांचे लोकशाही हक्क आणि ईव्हीएमची लूट करण्यासाठी निवडणूक आयोगानं या निवडणुकीत खलनायकाची भूमिका घेतल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.
सोमवारी लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 207 जागा मिळवल्या. तर तृणमूल काँग्रेसला फक्त 80 जागांसह पराभवाचा सामना करावा लागला.
तसंच ममता बॅनर्जींना भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून पराभूत केलं. ममतांना 15105 मतांनी पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर ममतांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत, मतमोजणी आणि ईव्हीएम संदर्भात त्यांनी विविध मुद्द्यांवरून आरोप केल्याचं पाहायला मिळालं.
'भाजप-निवडणूक आयोगाचा जुगार'
ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमतानं तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधल्याचा आरोप केला.
"मतदानानंतर ईव्हीएममध्ये 80-90 % चार्जिंग असते का? हे कसं शक्य आहे? निवडणुकीच्या दोन दिवस आधी त्यांनी आमच्या लोकांना अटक करायला, सर्वत्र छापे टाकायला सुरुवात केली.
सगळे आयपीएस आणि आयएएस अधिकारी बदलले. त्यांनी पक्षाशी संबंधित लोक निवडले आणि भाजपनं थेट निवडणूक आयोगाच्या साथीनं हा खेळ खेळला.
भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यातील हा एक जुगार आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचाही यात सहभाग आहे, हा थेट हस्तक्षेप आहे," अशा प्रकारचा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
"सोनियाजी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन यांनी मला फोन केला. इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांनी ते पूर्णपणे माझ्यासोबत आहेत, असं सांगितलं. येत्या काही दिवसांत आमची एकजूट अधिक घट्ट आणि मजबूत राहील.
आता माझ्याकडे कोणतीही खुर्ची नाही, त्यामुळे मी सामान्य माणूस आहे. त्यामुळं मी खुर्चीचा वापर करत आहे, असं कोणी म्हणू शकणार नाही. मी आता एक मुक्त पक्षी आहे," असंही ममता म्हणाल्या.
'त्यांनी काऊंटिंग में खेल होगा असं म्हटलं होतं'

फोटो स्रोत, Getty Images
ममता बॅनर्जींचा भवानीपूर मतदारसंघातून पराभव झाला. त्यावरही ममतांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं.
"पहिल्या फेरीनंतरच भाजपला 195-200 जागा मिळत असल्याचं सांगण्यात येऊ लागलं. 5-6 फेऱ्यांपर्यंतही वाट पाहिली नाही. भाजपचे लोक मतदान केंद्रात घुसले आणि त्यांनी लोकांना, मतमोजणी प्रतिनिधींना मारहाण सुरू केली. सर्व मतमोजणी प्रतिनिधी गेले तेव्हा मी 30 हजार मतांनी आघाडीवर होते. नंतर 5 शिल्लक होत्या.
आम्हाला 32 हजार पेक्षा जास्तं मतं मिळायला हवी होती. त्यानंतर भाजपचे उमेदवार 200 सीआरपीएफ जवान आणि 200 गुंडांना घेऊन आत गेले आणि त्यांनी आमच्या लोकांना मारहाण केली.
महिलांनाही सोडलं नाही आणि सर्व अर्ज हिसकावून घेतले. मला हे कळलं तेव्हा मी तिथे गेले. आत शिरल्यावर सीआरपीएफने मला आत जाण्याची परवानगी नाही, असं सांगितलं.
नंतर मी मतदान अधिकाऱ्यांकडे तक्रार करत परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत मतमोजणी तत्काळ थांबवावी, अशी विनंती केली. मी डीईओंनाही पाहिलं. त्यांनी 15 दिवसांपूर्वी कोणाला तरी 'काऊंटिंग में खेल होगा' असा मेसेज दिला होता, हे मला माहिती आहे.
मी काही मिनिटांसाठी आत गेले, पण त्यांनी माझ्या पोटावर पाठीवर लाथा मारल्या आणि मला धक्काबुक्की करून मारहाण केली. त्यावेळी सीसीटीव्ही बंद होता..." असे आरोप ममता बॅनर्जींनी केले आहेत.
ममतांचा 15 हजार मतांनी पराभव
पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून पराभूत केलं. ममतांना 15105 मतांनी पराभव पत्करावा लागला आहे. सुवेंदू अधिकारी यांना 73917 मतं मिळाली. तर ममतांना 58812 मतं मिळाली.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसवर भाजपने विजयी आघाडी घेतल्यानंतर सोमवारीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर 'मतचोरी' केल्याचा आरोप केला होता.
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की,"भाजपने 100 हून अधिक जागा चोरल्या आहेत. भाजपने घोटाळा केला आहे. निवडणूक आयोग आता भाजप आयोग बनला आहे. आम्ही वेळोवेळी याबद्दल तक्रार केली आहे. पण कोणी ऐकलं नाही."
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "भाजपचा विजय अनैतिक आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या संगनमताने जे काही केले आहे ते पूर्णपणे अनैतिक आहे. त्यांनी जबरदस्तीने एसआयआर (SIR) राबवला. त्यांनी अत्याचार केले. त्यांनी मतमोजणी प्रतिनिधींना अटक केली. आम्ही प्रत्युत्तर देऊ."
ममता बॅनर्जींच्या घराजवळ 'जय श्री राम'च्या घोषणा
दरम्यान सोमवारी भाजपच्या बाजुने कल समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातल्या कालीघाट परिसरातील निवासस्थानाजवळ सुरक्षा कडक करण्यात आली.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं एका वरिष्ठ राज्य अधिकाऱ्याने सांगितलं.
पीटीआयच्या वृत्तानुसार, काही लोकांनी ममता बॅनर्जी यांच्या घराजवळ 'जय श्री राम' अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने सुरक्षेसंदर्भातील सूचना दिल्या.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सचिवालय 'नबन्ना' परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली होती.
2021 मध्येही झाला होता पराभव
ममता बॅनर्जी 2011 पासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि तेव्हापासून त्या कोलकात्यातील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी होत होत्या. मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
2021 मध्ये ममता बॅनर्जी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना भाजपचे शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर ममता यांनी पुन्हा भवानीपूरमधून निवडणूक लढवली आणि पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळी भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना भवानीपूरमधून आव्हान दिलं. शुभेंदू अधिकारी यांनी भवानीपूरसोबतच नंदीग्राममधूनही निवडणूक लढवली. तिथंही ते विजयी झाले.
सुरुवातीच्या कलांमध्ये भवानीपूरमध्ये ममता कधी पुढे तर कधी मागे होत्या. अखेर त्यांचा पराभव झाला.
नंदीग्राममध्ये 23 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते, तर भवानीपूरमध्ये 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते.
'मी सर्वांना हात जोडून सांगते...',
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवेदन प्रसिद्ध करून टीएमसीच्या मतदान प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रांवरच थांबण्याचे आवाहन केले होते.
ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ प्रसिद्ध केला. या व्हीडिओमध्ये ममता यांनी म्हटलं होतं की," सर्वांना हात जोडून सांगते, कृपया कोणत्याही मतमोजणी प्रतिनिधीआणि उमेदवार यांनी मतदान क्षेत्र सोडून येऊ नये. स्ट्राँग रूममध्ये जिथे मतमोजणी होतेय, म्हणजे केंद्रात, तिथे कोणीही येऊ नये.हाच भाजपाचा डाव आहे.पहिल्या दोन-तीन फेऱ्यांबाबत मी काल पासूनच सांगत होते की,त्यांचे आधी कल दाखवतील, आमचे नंतर कल दाखवतील."

फोटो स्रोत, X/@MamataOfficial
ममता बॅनर्जी यांनी व्हीडिओमध्ये पुढे दावा केला की, अनेक ठिकाणी दोन-तीन फेऱ्यांची मतमोजणी केल्यानंतर जवळजवळ शंभर ठिकाणी मतमोजणी बंद ठेवली आणि कल्याणीमध्ये सात यंत्रं सापडली.
ते संपूर्ण पोलीस बळ, केंद्रीय दल वापरून सर्व बाजूंनी तृणमूल काँग्रेसवर अत्याचार करत आहेत.कार्यालयं तोडत आहेत, जबरदस्तीने ताबा घेत आहेत, असंही ममता सोमवारी म्हणाल्या होत्या.
"SIRच्या नावाखाली तुम्ही पाहिलंय की मतं लुटली गेली. जेणेकरून ते काही जागा जिंकू शकतील. पण अजूनही अशा 70-100 जागा आहेत, ज्यात आम्ही आघाडीवर आहोत, ते सांगत नाहीयेत.सर्वच खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आधी DISU या बातम्या द्यायचे, पण त्या काल बदलल्या गेल्या. निवडणूक आयोग स्वतःच्या मर्जीनुसार खेळत आहे आणि केंद्रीय दलांना सोबत घेऊन आणि आमचे पोलीस पूर्णपणे मान तुकवून केंद्रीय दलांच्या अधीन काम करत आहेत," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.
पंतप्रधानांनी झालमुरी खाल्ली तिथे भाजप विजयी
निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिथे झालमुरी खाल्ली होती, त्या झारग्राम मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला.
विजयानंतर झारग्रामच्या विजयी भाजप उमेदवारानंही पंतप्रधानांनी झालमुरी खाल्ली होती, त्या दुकानाला भेट दिली.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीदरम्यान टीएमसी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाले.
टीएमसीच्या नेत्या शशि पांजा यांनी आरोप केला की, पक्षाच्या एजंट्सना मतमोजणी केंद्रांमध्ये जाण्यापासून रोखले जात आहे आणि खूप प्रयत्नांनंतरच त्यांना आत प्रवेश मिळत आहे.
याआधीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी म्हटलं होतं की, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक अनेक भागांत वीज पुरवठा खंडित करत आहे, जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अडथळा निर्माण होईल आणि गोंधळ पसरवता येईल.
ममता बॅनर्जी यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजप नेते समिक भट्टाचार्य यांनी म्हटले की, दीदी थकल्या आहेत, त्यांनी थोडी विश्रांती घ्यावी.
त्यांनी म्हटलं की, "काही तासांतच जनतेने ममता बॅनर्जी यांना नाकारले आहे, हे मोठ्या बहुमताने स्पष्ट होईल."
बालेकिल्ला ढासळला
भवानीपूर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जातो.
पण हा बालेकिल्ला ढासळला. त्यांचा सुवेंदू यांनी 15 हजार मतांनी पराभव केला.
यावेळी भारतीय जनता पक्षाने (भाजप) भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांना कडवे आव्हान देण्यासाठी शुभेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवले होते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांना टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम इथूनही निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी शुभेंदू अधिकारी यांनी सुमारे दोन हजार मतांच्या फरकाने ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता.
यावेळी शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भवानीपूरमध्ये दिलं.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान झालं.
या निवडणुकीत चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात मुख्य लढत होती.
भाजपनं 200 हून अधिक जागा मिळवल्यानं याठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





























