टी 20 वर्ल्ड कप : पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेची अडखळत सुरुवात

फोटो स्रोत, Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषकातल्या पहिला उपांत्य सामना सुरु आहे. सुरुवातीच्या पाच ओव्हर्समध्येच दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत.
दक्षिण आफ्रिकेने 10 ओव्हर्समध्ये 4 बाद 77 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉक 8 बॉल्समध्ये 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रायन रिकल्टनला भोपळाही फोडता आला नाही.
त्यानंतर कर्णधार एडन मार्करम आणि डेव्हिड मिलर देखील स्वस्तात बाद झाले. मार्करमने 20 बॉल्समध्ये 1 चौकार आणि 1 षटकार खेचत 18 धावा केल्या. डेव्हिड मिलर फक्त 6 बॉल्समध्ये 6 धावा करून बाद झाला.
न्यूझीलंडच्या कोल मॅककोन्ची आणि रचिन रवींद्रने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. आणि न्यूझीलंडच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.
उद्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होईल.
अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळवला जाईल.

फोटो स्रोत, Surjeet Yadav-ICC/ICC via Getty Images
मागच्या विश्वचषकात अंतिम सामन्यात भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
आता हा उपांत्य सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचं त्यांचा लक्ष्य असेल तर त्यांच्याविरुद्ध चिवट खेळ करणारा न्यूझीलंडचा संघ त्यांच्या पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न घेऊन मैदानात उतरेल.
न्यूझीलंडने 2000 नंतर आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. पण मागच्या दशकभरात किवींच्या या संघाने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
'चोकर्स'चा शिक्का पुसणार?
दक्षिण आफ्रिकेने सलग टी-20 सामने जिंकले असले तरी त्यांच्या संघावर असणारा ऐतिहासिक 'चोकर्स'चा शिक्का यावेळी पुसून काढण्यास ते नक्कीच उत्सुक असतील.
अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी होऊन त्यांनी हा शिक्का काही प्रमाणात मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी मर्यादित ओव्हर्सच्या स्पर्धांमध्ये अजूनही त्यांना ही कामगिरी करायची आहे.

फोटो स्रोत, Matt Roberts-ICC/ICC via Getty Images
झिम्बाब्वेविरुद्ध विश्रांती घेतल्यानंतर एडन मार्क्ररमच्या संघात दिग्गज खेळाडू परत येतील.
मार्को यान्सन, कागिसो रबाडा आणि केशव महाराज हे तिघेही दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम 11 मध्ये परत येतील.
तर एडन मार्करम, क्विंटन डिकॉक, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्समुळे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी मजबूत असेल.
खेळपट्ट्यांतील बदल न्यूझीलंडसाठी आव्हान
न्यूझीलंडचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास दक्षिण आफ्रिकेसारखा सहज राहिलेला नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात झालेली डबल सुपर ओव्हर असो किंवा मग इंग्लंडविरुद्ध झालेला दारुण पराभव असो त्यांच्या संघाचा प्रवास नाट्यमय राहिलेला आहे.
एडन मार्करमच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिका आणि मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणारा न्यूझीलंड हे दोन्ही संघ अत्यंत गुणवान खेळाडूंनी भरलेले आहेत.
आता उपांत्य सामन्यात कोण शांत डोक्याने खेळ करतं यावर गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्याची समीकरणं अवलंबून असतील.

फोटो स्रोत, Dibyangshu SARKAR / AFP via Getty Images
न्यूझीलंडने त्यांचे याआधीचे दोन सामने श्रीलंकेच्या संथ खेळपट्ट्यांवर खेळले आहेत. पण ईडन गार्डन्समध्ये त्यांना त्यांची रणनीती बदलावी लागेल असं दिसतंय.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी पाच फिरकीपटूंना खेळवलं होतं. पण धावांचा पाऊस पडणाऱ्या कोलकात्याच्या मैदानात त्यांना संघात बदल करावे लागणार आहेत.
मिचेल सँटनरने सांगितलं आहे की, मॅट हेन्री त्याच्या बाळाच्या जन्मासाठी घरी परतल्यानंतर अजूनही भारतात परतण्याच्या मार्गावर आहे. सामन्याच्या आदल्या रात्री हा वेगवान गोलंदाज संघात पुन्हा सामील होईल. सामन्याच्या दिवशी तो कसा खेळतो हे पाहावे लागेल."
सामन्यापूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेत सँटनर म्हणाला की, "याआधी इथे झालेल्या सामन्यात [भारत विरुद्ध वेस्ट इंडिज] खेळपट्टी खूपच सपाट होती. मला वाटते की फिरकी गोलंदाजांची भूमिका अजूनही आहे.
तसेच वेगवान गोलंदाजांवर देखील बरीच भिस्त असणार आहे. मला वाटतं की मैदानाचा आकार मोठी भूमिका बजावतो. म्हणजे श्रीलंकेत झालेल्या दोन्ही सामन्यांसाठी मैदानं मोठी होती. तर इथे ती थोडी लहान आहेत."
या मैदानात धावांचा पाऊस पडण्याचा इतिहास आहे. खऱ्या पावसाची सध्यातरी चिन्हे नाहीत आणि खेळपट्टी कोरडी दिसत आहे. त्यामुळे एकूणच काय दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड या उपांत्य सामना क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरू शकतो, असं दिसतंय.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











