हरमनप्रीत कौर : भारताला जगज्जेता बनवणारी कर्णधार, मोगामधून सुरू झालेल्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बरिंदर सिंग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"निळी जर्सी हे माझं स्वप्न होतं. क्रिकेट माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्याशिवाय मला काहीही कळलं नसतं आणि कदाचित कधीच कळणार नाही."
हेच निळ्या जर्सीचं स्वप्न पाहणारी एक सर्वसाधारण मुलगी सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. तिच्याच नेतृत्वात भारतीय संघानं आज क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरी केली आहे.
ही गोष्ट आहे, पंजाबमधील मोगामध्ये जन्मलेल्या हरमनप्रीत कौरची. हरमन एकेकाळी हॉकीही खेळायची. आता क्रिकेटच्या जगात तिच्या नावाचा डंका वाजतो.
2025च्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच विश्वविजेता बनला आहे.
या लेखात, आपण भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौरचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.
मोगाच्या मैदानात जेव्हा कोचने पाहिलं
भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर ही मोगा शहरातील आहे. प्रशिक्षक कमलदीश सिंग सोधी यांनी तिथल्या मैदानावर खेळताना हरमनप्रीतची प्रतिभा ओळखली.
याच भेटीमुळं हरमनप्रीत कौरला तिचं खेळाडू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंख मिळाले.

फोटो स्रोत, hartaj singh sodhi
हरमनप्रीतचे पहिले प्रशिक्षक कमलदीश सिंग यांनी बीबीसीशी खास संवाद साधला. यादरम्यान त्यांनी मोगाच्या मैदानात एका मुलीला खेळताना कसं पाहिलं आणि तिचं खेळातील कौशल्य कसं वाढवलं हे सांगितलं.
ते म्हणाले, "मी रोजच्याप्रमाणे मोगा मैदानात फिरत होतो. मला एक मुलगी मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसली. मी तिला विचारलं की तुला क्रिकेट खेळायचं आहे का?
तिनं म्हटलं, 'हो,' आणि मग मी तिच्या वडिलांना म्हटलं की, अभ्यासापासून खेळापर्यंतचा सर्व खर्च मी देईन आणि माझी स्कूल व्हॅन तिला घेऊन जाईल आणि सोडेलही."

फोटो स्रोत, Getty Images
कमलदीश सिंह मोगापासून वीस किलोमीटर अंतरावर ज्ञान ज्योती वरिष्ठ माध्यमिक शाळा आणि क्रिकेट अकादमी नावाची शाळा चालवतात.
ते पुढे म्हणाले की, हरमनच्या वडिलांनी त्यांच्या विनंतीनुसार होकार दिला.
"मी 2007 मध्ये हरमनला घेऊन आलो आणि तेव्हापासून मी तिला प्रशिक्षण देऊ लागलो."
दारापूर ते भारतीय संघापर्यंतचा प्रवास
कमलदीश हरमनप्रीतच्या सुरुवातीच्या प्रशिक्षणाबद्दल सांगतात की, ते तिला मुलांसोबत खेळायला लावायचे आणि सराव करायला सांगायचे.
ते म्हणाले, "हरमनला खेळाडू बनण्याची प्रचंड आवड होती आणि ती असाच सराव करायची. मी तिला शेकडो झेलचा सराव करायला लावायचो. इथूनच ती पहिलं राज्यस्तरीय आणि नंतर राष्ट्रीयस्तरावरील क्रिकेट खेळली आणि इथूनच तिची 2009 मध्ये भारतीय क्रिकेट संघात निवड झाली."
कमलदीश सांगतात की, ते आणि त्यांचा मुलगा यादविंदर सिंग हरमनप्रीत कौरला क्रिकेटचं प्रशिक्षण देत असत.

फोटो स्रोत, hartaj singh sodhi
हरमनप्रीतच्या स्वभावाबद्दल बोलताना कमलदीश सांगतात की, "मी तिला मुलांच्या संघात खेळवायचो. त्यामागील कारण असं होतं की, जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा बलाढ्य व्यक्तींसोबत खेळता तेव्हा तुमचा खेळ आणखी सुधारतो.
सुरुवातीला हरमन माझ्यासाठी वेगवान गोलंदाजी करायची, नंतर ती फलंदाजीकडं वळली. पण जेव्हा ती भारतीय संघात सामील झाली तेव्हा प्रशिक्षकांनी तिला फिरकी गोलंदाजी करायलाही भाग पाडलं."
एका घटनेची आठवण करून देताना कलामदीश म्हणतात, "आमचा संघ पटियालामध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत होता. हरमनने षटकार मारला तेव्हा मैदानाजवळील एका घराची काच फुटली.
त्या घराचा मालक रागाच्या भरात मैदानावर आला आणि हे कोणी केलं याबद्दल विचारणा करू लागला. जेव्हा त्याला कळलं की मुलीनं षटकार मारला आहे, तेव्हा त्यानंही हरमनला प्रोत्साहन दिलं आणि निघून गेला."
आजीचं स्वप्न कसं पूर्ण झालं?
हरमनप्रीत कौरला क्रिकेटर व्हायचं होतं, पण तिच्या आजीचंही एक स्वप्न होतं. कलर्स सिनेप्लेक्सला दिलेल्या मुलाखतीत हरमन म्हणाली होती की, "निळी जर्सी हे माझं स्वप्न होतं, पण माझ्या आजीला मला पोलिसांच्या गणवेशात पाहण्याची इच्छा होती."
2018 मध्ये, जेव्हा हरमनप्रीत भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत होती, तेव्हा तिच्या खेळातील कामगिरीमुळे तत्कालीन कॅप्टन सरकारनं तिला विशेष पद देऊन सन्मानित केलं होतं.
त्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री होते.

फोटो स्रोत, hartaj singh sodhi
कमलदीश सिंह सांगतात की, कॅप्टन साहेबांना त्यांच्याशी बोलायचं आहे म्हणून एके दिवशी त्यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पीएचा फोन आला.
"मला त्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा फोन कसा आला याचं खूप आश्चर्य वाटलं. मी त्यांच्याशी फोनवर बोललो तेव्हा त्यांनी म्हटलं की, तुम्ही हरमनचे प्रशिक्षक आहात ना.
मी हो म्हटलं आणि त्यांनी सांगितलं की, तुम्ही हरमन आणि तिच्या कुटुंबाला माझ्या घरी घेऊन या. आम्ही हरमनप्रीतला डीएसपी म्हणून नियुक्त करतोय."
कमलदीश सांगतात की, त्या दिवशी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हरमनप्रीत कौरला पंजाब पोलिसांत डीएसपी पद दिलं.
मैदानावरील वर्तन
बीबीसीशी बोलताना, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन म्हणाले, "हरमनसोबत काम करताना मला आठवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती नेहमीच संघासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करायची."
कमलदीश देखील म्हणतात की, हरमनमध्ये एक गोष्ट खूप खास आहे ती म्हणजे ती स्वतःसाठी नाही तर संघासाठी खेळते.

फोटो स्रोत, hartaj singh sodhi
"मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही, पण असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वतःला प्रथम स्थान दिलं आहे. परंतु हरमनच्या बाबतीत अगदी उलट आहे.
तिचा स्वभाव खूप आक्रमक आहे, तिला नेहमीच संघासाठी काहीतरी करायचं आहे, याची जाणीव असते."
कर्णधार आणि फलंदाज म्हणून भूमिका
2017 च्या महिला विश्वचषकात हरमनप्रीत कौरनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 171 धावा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. याच सामन्यामुळं एकेकाळी भारतीय महिला क्रिकेट संघानं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
हरमनप्रीतनं 160 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4300 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यात 7 शतकं आहेत. यासोबतच, तिनं टी- 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3600 हून अधिक धावा केल्या आहेत.
त्या अविस्मरणीय खेळीनंतर, ती पुन्हा अशी कामगिरी करू शकली नाही. परंतु क्रीडा चाहते आणि तज्ज्ञ आशा करत आहेत की, नक्कीच ती पुन्हा अशी कामगिरी करेल.

फोटो स्रोत, ANI
कमलदीश सिंग सोधी म्हणतात, "ज्या प्रकारे विराट कोहलीनं त्याच्या खेळात जीव ओतला आहे, हरमननंही तसंच केलं आहे. जेव्हा तिची बॅट तळपत असते तेव्हा कोणीही तिच्यासमोर उभं राहू शकत नाही. हरमन तिचा खेळ पूर्ण उत्साहानं खेळते आणि ती खूप मजबूत आहे. तिच्यात मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे."
ते म्हणतात की, सुरुवातीला हरमनला थोडं दडपण जाणवलं पण नंतर तिनं स्वतःवर नियंत्रण ठेवलं.
"हरमनच्या नेतृत्वाखाली इतर खेळाडूही दडपण न घेता एकजुटीनं खेळतात. हरमननं पंजाबच्या मुलींसाठीही मार्ग मोकळा केला आहे."
हरमनप्रीतच्या खेळातील कामगिरीनंतर महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे असं त्यांचं मत आहे.
हरताज सिंग हे कलामदीश सिंग यांचे पुत्र आहेत आणि ते ही राष्ट्रीयस्तरावरील क्रिकेटपटू आहेत.
ते म्हणतात की, "आता मुलींचे दिवस आले आहेत."
"पूर्वी, महिलांसाठी मॅच फी पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी होती आणि आता ती समान आहे. हरमन इतर मुलींसाठीही प्रेरणास्त्रोत बनत आहे.
ती तिच्या फिटनेसकडं खूप लक्ष देतं आणि आजही तुम्हाला दिसेल की हरमन नवीन मुलींपेक्षा खूपच तंदुरुस्त आहे, ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन











