शेफाली वर्मा : टीममध्येही नव्हती, शेवटच्या 2 सामन्यांसाठी आली आणि 'प्लेयर ऑफ मॅच' बनली

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भारतानं नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर जगज्जेतेपद पटकावलं आणि अवघ्या देशात दिवाळीच्या दोन आठवड्यांनी पुन्हा दिवाळी साजरी झाली. भारतीय महिला संघानं कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा जगज्जेतेपद अनुभवण्याची संधी दिली आहे.
या स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत, स्मृती, जेमिमा, रेणुका, प्रतिका, क्रांती, दीप्ती, श्रीचरणी अशा सगळ्यांनीच अगदी सगळी शक्ती पणाला लावली.
पण सगळ्यांचंच योगदान असलं तरी आज प्रत्येकाच्या तोंडी असलेलं नाव म्हणजे शेफाली वर्मा.
शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात आलेल्या शेफालीनं तिच्या कर्तृत्वानं विश्वचषकाच्या फायनलमध्ये तिची छाप सोडली. नुसतीच छापच नव्हे, तर फायनलमध्ये ती 'प्लेयर ऑफ द मॅच' ठरली.
लहानपणी केस कापून मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यापासून सुरुवात करणाऱ्या शेफालीच्या जगातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये समावेश होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा आहे.
पण या प्रवासाआधी जाणून घेऊया शेफालीच्या अचानक टीममध्ये स्थान मिळण्यावर.

फोटो स्रोत, Getty Images
विश्वचषक आणि नशीब
30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान आयोजित आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिचं नाव नव्हतं. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्याही होत्या.
निवड समितीने शेफाली वर्माच्याऐवजी प्रतिका रावलला प्राधान्य दिलं. प्रतिकानंही तिची निवड सार्थ ठरवत, स्पर्धेत चांगली कामगिरी केली.

फोटो स्रोत, ANI
ऑक्टोबर 2024 नंतर आंतरराष्ट्रीय वनडे सामने न खेळल्यामुळे शेफालीच्या निवडीमध्ये अडथळा आला होता. त्यामुळं निवड समितीने शेफालीला पर्यायी सलामीवीर म्हणूनही स्थान दिलं नाही.
पण शेफालीच्या नशिबात काही तरी खास लिहिलेलं होतं. प्रतिका रावल जखमी झाल्यानं उपांत्य सामन्यासाठी निवड समितीनं सलामीचा पर्याय म्हणून शेफालीला निवडलं.
उपांत्य सामन्यात तिला फारशी कामगिरी करता आलेली नाही. पण अंतिम सामन्यात तिचं, "भगवानने मुझे कुछ ना कुछ अच्छा करने के लिए भेजा है", हे वाक्य अगदी तंतोतंत खरं ठरलं.
त्यामुळं अवघ्या 21 वर्षांच्या शेफालीसाठी नशिबामुळं मिळालेली ही संधी करिअरचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
केस कापून मुलांच्या स्पर्धांमध्ये खेळली
शेफालीचे वडील संजीव हे रोहतकमध्ये दागिने तयार करण्याचं काम करायचे. अगदी लहानपणापासून त्यांनी शेफालीला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी पाठिंबा दिला.
त्यावेळी स्थानिक क्लबमध्ये मुलींना क्रिकेटचं प्रशिक्षण द्यायला नकार दिला जात होता. त्यामुळं वयाच्या सहाव्या वर्षी शेफालीच्या वडिलांनी मुलासारखी दिसावी म्हणून शेफालीचे केस कापले.
त्यानंतर तिला मुलांच्या स्पर्धांमध्ये खेळवायला सुरुवात केली. त्यावेळी ती मुलगी आहे हे कुणाच्याही लक्षातही येत नव्हतं.
शेफालीचा भाऊही क्रिकेट खेळायचा. स्थानिक क्रिकेट संघामध्ये त्याचा समावेश असायचा. एकदा ऐन सामन्याच्या वेळी भाऊ आजारी पडल्यानंतर शेफाली त्याच्या जागी खेळायला गेली होती.

फोटो स्रोत, AFP
त्यात रोहतकमधल्या मैदानात सचिन तेंडुलकर शेवटचा रणजी सामना खेळत होता. तेव्हा संजीव तिला सामना पाहायला घेऊन गेले होते.
त्यावेळी सचिनला खेळताना पाहून नऊ वर्षांच्या शेफालीने क्रिकेटमध्येच करिअर करायचं हे मनाशी पक्क केलं होतं. त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलं नाही.
पुढे शेफालीनं वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 सामन्यात सचिनचाच विक्रम मोडला होता. शेफालीने त्यावेळी 49 चेंडूंत 73 धावा केल्या. तेव्हा तिचं वय 15 वर्षे 285 दिवस होतं.
त्यामुळे भारताकडून अर्धशतक नोंदवणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू शेफाली बनली. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 1989मध्ये पाकिस्तानविरुद्ध 59 धावांची नोंद केली होती.
मुलगी लहान आहे, म्हणून तिला खेळण्यापासून रोखू नये, जर तिची इच्छा असेल आणि तिने खेळाकडे लक्ष केंद्रीत केला तर ती काहीही करू शकते, असं शफाली सांगते.
आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध
शेफाली ही सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. त्यामुळं चाहते तिला महिला क्रिकेट संघाची सेहवाग असंही म्हणतात.
अगदी पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या काही मोजक्या बॅटर्समध्ये शेफालीचा समावेश होतो.

फोटो स्रोत, ANI
शेफाली चौकार आणि षटकारांच्या बाबतीतही इतरांच्या बरीच पुढे आहे.
इंग्लंडचा स्पिनर अलेक्स हर्टले यानं बीबीसी स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं होतं की, "आम्ही मंधानाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं. तिच्याप्रमाणे फटके कुणीच खेळू शकणार नाही, असं आम्हाला वाटलं. पण त्यानंतर आम्ही शेफालीची फलंदाजी पाहिली. तिच्यासमोर तर मंधानाही फिकी वाटते. शेफालीचे फटके अविश्वसनीय असतात."
शेफालीच्या यशामागचं रहस्य
बिनधास्तपणे फलंदाजी करण्याची शैली हेच शेफालीच्या यशामागचं खरं कारण असल्याचं तिच्याबरोबर खेळलेल्या क्रिकेटपटूंनी अनेकदा सांगितलं आहे.
शेफालीबरोबर खेळलेली शिखा पांडे हिच्या मते, "आम्ही तिला देशांतर्गत स्पर्धांमध्ये पहिल्यांदा पाहिलं होत. तेव्हापासूनच ती आक्रमक क्रिकेट खेळते. पुढे तिला राष्ट्रीय संघात घेण्यात आलं. आम्ही तिला तिच्या खेळात बदल करण्यास कधीच सांगितलं नाही."
"मी 16 वर्षांची होते, तेव्हा क्रिकेटचा सरावसुद्धा सुरू केला नव्हता. मी गल्ली क्रिकेट खेळायचे. त्यामुळं 16 वर्षांची मुलगी भारतासाठी क्रिकेट खेळते हे पाहून छान वाटलं."
शेफालीची क्रिकेट कारकीर्द
शेफालीने 5 कसोटीत एक शतक आणि 3 अर्धशतकांसह 567 धावा केल्या आहेत. कसोटीत द्विशतकही तिच्या नावावर आहे. तर वनडे मध्ये तिने 31 सामन्यांत 741 धावा केल्या आहेत. त्यात तिला शतकी कामगिरी करता आलेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
टी ट्वेंटीमध्ये मात्र तिची बॅट चांगलीच तळपत असल्याचं कायम दिसून आलं आहे. 90 टी 20 सामन्यांत तिनं 2221 धावा केल्या आहेत. त्यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 2020 मध्ये टी ट्वेंटी रँकिंगमध्ये तिने फलंदाजीची अव्वल रँकिंगही मिळवली होती.
तसंच वुमेन्स प्रिमियर लीगमध्येही तिची बॅट चांगलीच तळपत असल्याचं दिसून येतं. दिल्लीच्या संघाकडून खेळताना तिनं 865 धावा केल्या आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











