जेमिमा रॉड्रिग्ज : ट्रोलिंगनंतरच्या तणावावर मात करत अशी बनली विश्व विजयातील मोलाची भागीदार

फोटो स्रोत, ICC via Getty Images
महिला विश्वचषकात भारतानं नवी मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजय मिळवला.
या विश्व विजयापूर्वी 30 ऑक्टोबरला झालेल्या उपांत्य सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतानं फायनल गाठली होती.
जेमिमाच्या आजवरच्या प्रवासाचा हा आढावा :
"तू क्रिकेट खेळणार, की हॉकी?" जेमिमा रॉड्रिग्ज जेमतेम अकरा वर्षांची असताना तिच्या वडिलांनी हा प्रश्न विचारला होता, तेव्हा तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.
दोन्ही खेळांत उत्तम कामगिरी करणाऱ्या जेमिमानं अखेर क्रिकेट निवडलं आणि चौदा वर्षांनंतर ती एका अविस्मरणीय विजयाची शिल्पकार ठरली आहे.
जेमिमाच्याच शतकानं वन डे विश्वचषकात भारताला फायनलमध्ये पोहोचवलं आहे. अर्थात हा प्रवास सोपा नव्हताच.
मुंबईच्या लोकलमध्ये धक्के खाण्यापासून ते संघातून वगळल्याचं दुःख सहन करण्यापर्यंत, जेमिमानं अनेक अडथळ्यांना तोंड दिलं आहे.
2022 साली तर तिला वन डे विश्वचषकासाठीच्या भारतीय महिला संघातून वगळण्यात आलं होतं. पण तीन वर्षानंतर त्याच जेमिमानं भारताला वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचवलं.
पण या विजयाच्या मागेही मोठा मानसिक संघर्ष होता, असं जेमिमानं सामन्यानंतर बोलताना जाहीर केलं.
"मी दररोज रडले आहे. मला अँक्झायटी जाणवत होती. माझ्यासाठी हे मोठं आव्हान होतं," असं ती म्हणाली.
जेमिमासाठी असा संघर्ष ही नवी गोष्ट नाही. पण घरच्यांचा पाठिंबा, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, टीममेट्सची साथ आणि अंगभूत गुणवत्ता यांच्या जोरावर तिनं आज क्रिकेटमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे.
बार्बी डॉल नाही, बॅट
जेमिमा, म्हणजेच चाहत्यांची लाडकी जेमी, साधारण तीन वर्षांची असताना तिच्या आजोबांनी तिला प्लॅस्टिकची क्रिकेट बॅट भेट दिली होती.
"मला बार्बी डॉल वगैरे आवडत नसे. आजोबांना ते माहिती होतं, म्हणून त्यांनी मला बॅट भेट दिली. आम्ही गल्लीतच क्रिकेट खेळायचो. दरवेळी हातात बॅट घेतली की मला अतिशय आनंद वाटायचा."
तिथून जेमिमाचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला ती तिच्या दोन भावांसोबतच, इनॉक आणि एली यांच्यासोबत खेळत असे. वडील आयव्हन रॉड्रिग्जच तिघांचे पहिले कोच होते.
पण पुढे एली वांद्र्याच्या एमआयजी क्लब अकॅडमीसाठी खेळू लागला, जिथे कोच प्रशांत शेट्टी मार्गदर्शन करायचे.
एक दिवस आयव्हन आणि जेमिमाची आई लविता प्रशांत यांना भेटले आणि आमच्या मुलीचाही खेळ एकदा पाहा, अशी विनंती त्यांना केली. जेमिमा प्रशांत यांना भेटली तेव्हा आठ-नऊ वर्षांची होती.

फोटो स्रोत, Getty Images
एक तर मुलगी आणि तीही एवढी लहान असताना क्रिकेट खेळायचं म्हणतेय, म्हटल्यावर प्रशांत यांना सुरुवातीला प्रश्न पडला.
"त्या काळी म्हणजे 2007-08 साली फारच कमी मुली क्रिकेट खेळायच्या. मी कधी एमआयजी क्लबवर मुलींना क्रिकेट खेळताना पाहिलं नव्हतं," असं प्रशांत शेट्टी एका मुलाखतीत सांगतात.
तरीही प्रशांत यांनी जेमिमाच्या आई-वडिलांना होकार दिला. दुसऱ्या दिवशी जेमिमा मैदानात आली आणि सरावासाठी उतरली.
जेमिमानं पहिलाच बॉल खेळला तो कव्हर ड्राईव्ह होता. या मुलीत काहीतरी वेगळं आहे, याची जाणीव प्रशांत यांना झाली.
मुलगी असूनही एमआयजीमध्ये तिला क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली. अर्थात त्या काळी ती मुलांसोबतच खेळायची.

फोटो स्रोत, Getty Images
मुलीला क्रिकेट कसं खेळू देताय, असं नातेवाईक म्हणायचे. पण आई वडील आणि प्रशिक्षकांनी जेमिमाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असं तिनं नंतर मुलाखतीत सांगितलं आहे.
रॉड्रिग्ज कुटुंब त्यावेळी भांडूपला राहायाचं. लविता पहाटे चार वाजता उठून मुलांचे डबे तयार करायच्या आणि लोकल ट्रेननं जेमिमा भावांसोबत खेळण्यासाठी वांद्रे इथे जायची.
मुंबईत कधी फिरला असाल, तर अवजड क्रिकेट किटसह दादरला ट्रेन बदलून वांद्र्यापर्यंत जाणं किती कठीण असतं, याची कल्पना येईल.
पण त्याच लोकलच्या प्रवासानं मुंबईच्या क्रिकेटर्समध्ये आणखी जिद्द आणि चिकाटी निर्माण केली आहे. जेमिमाचाही त्याला अपवाद ठरला नाही.
पुढे खेळासाठी रॉड्रिग्ज परिवार वांद्रे इथेच येऊन राहू लागला.
हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल की क्रिकेट?
त्या दिवसांत जेमिमा फक्त हॉकी आणि क्रिकेटच नाही, तर शाळेसाठी फुटबॉल आणि बास्केटबॉलही खेळायची.
बारा वर्षांची होईपर्यंत हॉकीत तिनं लहान वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि क्रिकेटमध्येही तिच्या वयोगटात झोनल स्पर्धेत खेळली होती.

फोटो स्रोत, ANI
मुंबईचे दिग्गज ऑलिंपियन आणि भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार-प्रशिक्षक जोआकिम कार्व्हालो यांनी तर तुमची मुलगी भारतासाठी खेळू शकते, असं एकदा जेमिमाच्या वडिलांना सांगितलं होतं.
हॉकी खेळून ऑलिंपिक गाठायचं की क्रिकेटमध्ये करियर करायचं, असे दोन पर्याय समोर ठेवले गेले, तेव्हा अकरा वर्षांच्या जेमिमानं क्रिकेटला प्राधान्य द्यायचं ठरवलं.
क्रिकेटमध्ये आपण आणखी पुढे जाऊ असं तिला तेव्हा वाटलं होतं. तो निर्णय किती सार्थ होता, हे लगेच दिसूनही आलं.
2012-13 साली, अवघ्या तेरा वर्षांच्या वयातच जेमिमानं मुंबईच्या अंडर-19 संघात स्थान मिळवलं.
'बेबी' जेव्हा मोठी झाली...
मुंबई क्रिकेटमध्ये, विशेषतः महिलांच्या क्रिकेटमध्ये तेव्हा जेमिमाच्या नावाची चर्चा होत असे. पण लवकरच देशाला तिच्यातली चुणूक दिसून आली.
2017 साली देशांतर्गत अंडर-19 वन डे स्पर्धेत जेमिमानं सौराष्ट्रविरुद्ध नाबाद 202 धावांची खेळी केली. स्मृती मंधानानंतर अशी कामगिरी करणारी जेमी दुसरीच खेळाडू. त्या खेळीनं जेमिमाचं नाव गाजू लागलं.
मग चॅलेंजर ट्रॉफीतलं यश आणि भारत अ संघासाठीची उत्तम कामगिरी यांच्या जोरावर जेमिमाला 2018 च्या सुरुवातीला भारताच्या वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली.
त्याच वर्षी ट्वेन्टी20 वर्ल्ड कपमधलं पदार्पण तिनं अर्धशतकासह साजरं केलं.

फोटो स्रोत, ANI
अगदी सुरुवातीच्या दिवसांत इतर खेळाडूंपेक्षा लहान असल्यानं जेमीला सगळे एखाद्या बेबीसारखं, बाळासारखं जपायचे. तिची काळजी घ्यायचे. वयातील फरकामुळे जेमिमाला कधीकधी काहीसं एकटंही वाटायचं.
त्यावेळी स्मृती मंधानासोबत तिची मैत्री जुळली. सुरुवातीच्या त्या दिवसांमध्ये दोघी एकमेकींच्या रूममेट्स होत्या आणि आता जणू एकमेकींच्या बहिणीसारख्या आहेत.
दरम्यान क्रिकेटच्या मैदानात जेमिमाची लोकप्रियता वाढू लागली. खेळासोबतच तिचं गिटार वाजवणं आणि सोशल मीडियावरचा उत्स्फूर्त वावर यांचीही चर्चा होऊ लागली.
जेमिमा बिग बॅश लीगसारख्या ट्वेन्टी20 लीग स्पर्धांमध्ये खेळू लागली आणि अनेकदा या स्पर्धांचा चेहराच बनली. आज भारतात महिला क्रिकेटच्या प्रमुख ब्रँड अँबॅसेडर्समध्ये जेमिमाचं नाव घेतलं जातं.
कमबॅक क्वीन
भारतीय संघात मात्र जेमिमाच्या वाटचालीत चढ उतार येत राहिले.
जेमिमाला 2022 च्या एप्रिलमध्ये झालेल्या वन डे विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. पण लवकरच तिनं संघात पुनरागमन केलं.
जेमिमाचा समावेश असलेल्या भारतीय संघानं ऑगस्ट 2022 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं. तर पुढच्याच वर्षी म्हणजे2023 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
2023 साली विमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात ती दिल्ली कॅपिटल्सकडून खेळली. डिसेंबर 2023 मध्ये तिला इंग्लंडविरुद्ध सामन्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.

फोटो स्रोत, ANI
नवी मुंबईत डीवाय पाटील स्टेडियमवर तो सामना खेळवला गेला होता, त्यात पहिल्या डावात जेमिमानं अर्धशतकाची वेस ओलांडली.
एक प्रकारे डीवाय पाटील स्टेडियम हे तिचंच नाही, तर भारतीय महिला टीमचंच होम ग्राऊंड आहे. त्याच मैदानात जेमीनं आता वन डे वर्ल्ड कपमध्ये खेळताना क्रिकेटच्या इतिहासातली एक अजरामर खेळी साकारली.
खरंतर या स्पर्धेतही जेमिमाची वाटचाल अडखळती झाली. श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात आणि मग दक्षिण आफ्रिकेविरुद्धही ती शून्यावर बाद झाली.
पण एका 'कमबॅक क्वीन'सारखं तिनं थाटात पुनरागमन केलं. आधी न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 76 धावा ठोकत भारताला उपांत्य फेरीत पोहोचवलं.
मग 30 ऑक्टोबर 2025 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 127 धावा ठोकत भारताला एक अविस्मरणीय विजय आणि फायनलचं तिकीट मिळवून दिलं.
"ही खेळी फक्त महिला क्रिकेटमधली खास खेळी नाही, तर प्रत्येक क्रिकेटरनं त्यातून काही शिकण्यासारखं आहे. खरंतर कुठल्याही आव्हानांचा सामना करणाऱ्या प्रत्येकासाठीच ती प्रेरणादायी आहे," असं कोच प्रशांत शेट्टी या खेळीविषयी सांगतात.
विश्वचषकातली विक्रमी खेळी
आपल्या पहिल्याच वन डे विश्वचषकात उपांत्य फेरीत खेळताना जेमिमानं 134 चेंडूंमध्ये 14 चौकारांसह नाबाद 127 धावांची खेळी केली. जेमिमाचं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधलं हे तिसरंच शतक ठरलं.
तिच्या या खेळीमुळेच भारताला तब्बल 339 धावांचं महाकाय लक्ष्य गाठता आलं. महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमनं धावांचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
खरं तर जेमिमा एरवी मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करते, पण या सामन्यात तिला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं.

फोटो स्रोत, ANI
त्याविषयी सामन्यानंतर बोलताना जेमिमानं सांगितलं की भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर जेमिमा शॉवर घ्यायला गेली. आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायचं आहे, हे तिला आधी माहिती नव्हतं.
खेळायला उतरण्याच्या जेमतेम पाच मिनिटं आधी तिला तिसऱ्या क्रमांकवार खेळावं लागणार असल्याची माहिती मिळाली.
अचानक मैदानात उतरावं लागूनही जेमिमाच्या खेळात त्याचं प्रतिबिंब दिसलं नाही. तिनं कर्णधार हरमनप्रीतनं 167 धावांची झुंजार भागीदारी रचत भारताच्या विजयाचा पाया घातला.
एरवी कुणीही शतक ठोकलं की हवेत बॅट उंचावून साजरं करतात. विश्वचषकॉतलं शतक तर आणखी खास मानलं जातं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतकं सुंदर शतक ठोकूनही जेमिमानं तो क्षण साजरा केला नाही.
ती विजयाची वाट पाहात होती आणि विजय निश्चित झाल्यावरचं तिनं भावनांना वाट मोकळी करून दिली.
मानसिक ताण-तणावांवर मात
"हा महिना अतिशय खडतर होता. हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय आणि अजून माझा विश्वासच बसत नाहीये.
गेल्या वेळेस मला या स्पर्धेतून वगळण्यात आलं होतं. मी तेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये होते. पण एकामागोमाग एक गोष्टी घडत होत्या आणि मला कशावरच ताबा ठेवता आला नाही."
मैदानावर फॉर्मसाठी संघर्ष सुरु असतानाच जेमीनं बाहेरही वादांना तोंड दिलं.
ऑक्टोबर 2024 मध्ये जेमिमाच्या वडिलांनी खार जिमखान्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमांवरून वाद झाला होता. हे कार्यक्रम धार्मिक स्वरुपाचे होते आणि त्यात धर्मांतरण केलं जात असल्याचा आरोप ठेवण्यात आला.
जिमखान्यात धार्मिक आयोजनांना परवानगी नसल्यानं जेमिमाचं मानद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. जेमिमाच्या वडिलांनी तिथे धर्मांतरण केलं जात नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.
हा सगळा प्रकार माध्यमांतून समोर आल्यावर सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली होती आणि जेमिमाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

फोटो स्रोत, ANI
त्या सगळ्यातही जेमीचा तोल ढळला नाही. वर्ल्ड कपमध्ये धावा होत नसतानाही ती फील्डिंगमध्ये लक्ष वेधून घेत होती.
"मी या स्पर्धेत जवळपास प्रत्येक दिवशी रडले आहे. मानसिकदृष्या हा काळ चांगला नाहीये. मला अँक्झायटी जाणवली. मी ठरवलं की मैदानात उतरत राहायचं आहे, देव बाकीच्या सगळ्याची काळजी घेईल.
"सुरुवातीला मी फक्त खेळत होते, स्वतःशी बोलत होते. शेवटी शेवटी मी फक्त उभं राहता यावं यासाठी अक्षरशः बायबलमधल्या ओळी म्हणत होते," असं जेमिमानं सांगितलं.
आतली अशी खळबळ सुरू असतानाही जेमिमा शांत राहायचा प्रयत्न करत होती, कारण तिला खात्री होती की ती अजून बरंच काही करू शकते.
ती अजूनही बरंच काही करू शकते, यावर चाहतेच नाही तर क्रिकेट तज्ज्ञांचाही विश्वास आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











