तृणमूलला SIR चा खरंच फटका बसला का? पाहा आकड्यांमधून

फोटो स्रोत, ANI
- Author, अभिक देब
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालचा निकाल सोमवारी (4 मे) जाहीर झाला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) 294 पैकी 206 जागा जिंकून सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे. तर 15 वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) अवघ्या 80 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
एका जागेसाठी सोमवारी मतमोजणी पूर्ण झाली नव्हती, तर फाल्ता येथील आणखी एका जागेसाठी 21 मे रोजी पुन्हा मतदान (रिपोलिंग) होणार आहे.
निवडणुकी पूर्वी राज्यात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एसआयआरचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला. या प्रक्रियेमध्ये राज्यातील मतदार यादीतून जवळपास 91 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली.
यात मृत व्यक्ती, स्थलांतरित झालेले, अनुपस्थित/गैरहजर असलेले, डुप्लिकेट नावे, 2002 च्या यादीशी न जुळणारे आणि नोंदींमध्ये विसंगती (तार्किक विसंगती) असलेल्या मतदारांचा समावेश होता.
आमच्या पक्षाचा महत्त्वाचा आधार असलेल्या मुस्लीम मतदारांना नावे वगळताना लक्ष्य करण्यात आलं, असा आरोप टीएमसीने सातत्याने केला. काही राजकीय विश्लेषकांनीही या दाव्याला पाठिंबा दिला होता.
परंतु, प्रत्यक्षात एसआयआर किती मोठा घटक ठरला?
प्रत्यक्षात एसआयआर किती मोठा घटक ठरला?
पश्चिम बंगालमधील 112 जागांवर 25 हजारांपेक्षा जास्त मतदारांची (नेट डिलिशन) नावे वगळण्यात आली होती.
नेट डिलीशन म्हणजेच मृत म्हणून नोंद केलेल्या मतदारांना वगळून उरलेली सर्व हटवलेली किंवा वगळलेली नावे.
बीबीसी हा आकडा विचारात घेत आहे, कारण मृत वगळता इतर सर्व हटवलेले मतदार एसआयआर अंतर्गत अपील करू शकतात आणि त्यांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
112 जागांपैकी ज्या ठिकाणी 25 हजारपेक्षा जास्त मतदारांची नावे वगळली गेली होती. त्या ठिकाणी 2021 मध्ये टीएमसीने 86 जागा जिंकल्या होत्या, तर भाजप 26 जागी विजयी झाला होता.
पण यावेळी हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. भाजपने या 112 पैकी 72 जागांवर विजय मिळवला आहे. ज्यात मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघाचाही समावेश आहे.
या मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. टीएमसीला केवळ 39 जागा टिकवता आल्या, तर एक जागा तृणमूल काँग्रेसकडून काँग्रेसकडे गेली.

"एसआयआर अंतर्गत मतदारांची नावे वगळणं हा निवडणूक निकालामागचा नक्कीच मोठा घटक आहे," असं एसआयआर अंतर्गत मतदार यादीच्या पुनरावृत्तीचे विश्लेषण करणाऱ्या सबर इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक साबीर अहमद म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "एसआयआरमुळे मतदारांची नावे वगळणं आणि जमिनीवरील 2 टक्के ते 3 टक्के मतदारांचा कल बदल (स्विंग) हा फरक भरून काढण्यासाठी पुरेसा असतो."

अधिक सूक्ष्म पातळीवर पाहिलं तरी एसआयआरचा परिणाम किंवा प्रभाव दिसून येतो.
जर आपण सर्वाधिक मतदार हटवलेल्या (मृत वगळता) 10 जागा पाहिल्या, तर 2021 मध्ये या सर्व 10 जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या.
तसेच 2011 पासून झालेल्या किमान 2 विधानसभा निवडणुकांमध्ये या 10 पैकी 9 जागा टीएमसी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जिंकल्या होत्या. यावरून हे मतदारसंघ टीएमसीचे बालेकिल्ले असल्याचे दिसते.
या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मात्र या 10 पैकी 2 जागा गमावल्या - जोरासांको आणि हावडा उत्तर.
इतर सर्व जागांवरही तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे अंतर कमी झाले आहे.
राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी म्हटलं की, "'लॉजिकल डिस्क्रेपन्सी'मुळे (तार्किक विसंगती) वगळले गेलेले 27 लाख मतदार हे राज्यातील एकूण मतदारांच्या सुमारे 5 टक्के इतके आहेत."
ते म्हणाले की, भाजपचा टीएमसीवर असलेल्या मतांच्या आघाडीचा फरकही साधारण 5 टक्के इतकाच आहे. "हा जरी योगायोग असला तरी एसआयआर हा या निवडणुकीत नक्कीच एक महत्त्वाचा घटक होता," असं त्यांनी स्पष्ट केलं.

तृणमूलच्या पराभवाची इतर कोणती कारणं आहेत?
परंतु, ममता बॅनर्जी यांच्या मजबूत सरकारला पराभूत करण्यामागे एसआयआर हेच एकमेव कारण आहे का?
खालील चार्टमधील आकडेवारीनुसार, सर्वाधिक निव्वळ एसआयआर अंतर्गत हटवलेल्या 10 पैकी 4 मतदारसंघांमध्ये 2021 च्या तुलनेत यावेळी प्रत्यक्षात जास्त मतदान झालं आहे.
उरलेल्या 6 मतदारसंघांमध्ये मतदान कमी झालं, परंतु ही घट वगळलेल्या मतदारांच्या संख्येपेक्षा खूपच कमी होती.

विश्लेषकांनी सांगितलं की, यामागील आणखी एक कारण म्हणजे इतर राज्यांमध्ये काम करणारे अनेक स्थलांतरित कामगार यंदा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये परत आले होते.
निवडणुकीपूर्वी अनेक विश्लेषकांना वाटत होतं की, हे मतदार एसआयआरविरोधात राग व्यक्त करण्यासाठी आणि मताधिकार गमावण्याच्या भीतीमुळे मतदान करतील, असं वरिष्ठ पत्रकार मोनिदीपा बॅनर्जी यांनी बीबीसीला सांगितलं.
"पण निकालांवरून तर असं दिसतं की, या मतदारांच्या मोठ्या वर्गाने प्रत्यक्षात टीएमसीच्या विरोधात मतदान केलं आहे," असं त्या म्हणाल्या.
बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, एसआयआरमुळे लाखो मतदारांचा 'छळ' झाला आणि त्यापैकी अनेक लोकांना कोणतंही कारण नसताना 'आपला मतदानाचा हक्क गमावावा' लागला.
"परंतु असं असूनही, एसआयआर आणि त्यावरून झालेले वाद टीएमसीसाठी लक्ष विचलित करणारी ठरले," असं त्या म्हणाल्या.
"त्यामुळे ममता बॅनर्जी एसआयआर विरोधात लढण्यातच गुंतल्या आणि त्यामुळे सरकारविरोधी मोठ्या नाराजीवर लक्ष देण्यापासूनही टीएमसीचं लक्ष विचलित झालं," असंही त्यांनी सांगितले.
राजकीय विश्लेषक स्निग्धेंदू भट्टाचार्य म्हणाले की, पश्चिम बंगालच्या निकालासाठी फक्त एसआयआर हेच कारण मानता येणार नाही.
"एसआयआरमुळे तृणमूल काँग्रेसच्या मतांचा टक्का काही प्रमाणात कमी झाला, पण त्याचबरोबर अनेक टीएमसी विरोधी मतदार अधिक सक्रिय झाले. या मतदारांना सरकार बदलण्यासाठी हीच सर्वोत्तम संधी आहे, असं वाटलं."
बॅनर्जी आणि भट्टाचार्य दोघांनीही सांगितलं की, बेरोजगारी आणि तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीमुळे मतदारांमध्ये सरकारविरोधात मोठी नाराजी निर्माण झाली होती.
मुस्लीम मतांमध्ये फूट
एसआयआर आणि राज्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीय सुरक्षा दलाच्या तैनातीमुळे मतदारांमध्ये खरोखरच सरकार बदलणं शक्य आहे, असा विश्वास निर्माण झाला.
मुस्लीम मतांची बहुसंख्य एकत्रित मते टीएमसीच्या बाजूने जाऊ शकतील, असा अंदाज निकाल येण्यापूर्वीच विश्लेषकांनी वर्तवला होता. पश्चिम बंगालमध्ये सुमारे 27 टक्के मुस्लीम मतदार आहेत आणि 2011 पासून यातील बहुसंख्य मतदारांनी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला पाठिंबा दिला आहे.
या वेळी मात्र मुस्लीम मतांमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे.
अहमद म्हणाले की, मुस्लीम मतदारांचा काही प्रमाणात भ्रमनिरास झाला आहे. याचं कारण म्हणजे 'स्पर्धात्मक धार्मिक किंवा जातीय राजकारण' असं त्यांनी म्हटलं आहे.
"त्यामुळे काँग्रेसचा मतांचा टक्का वाढला आहे, कारण मालदा आणि मुर्शिदाबादसारख्या जिल्ह्यांमध्ये त्यांची कामगिरी चांगली झाली आहे. हे जिल्हे आधी तृणमूल काँग्रेसचे मजबूत बालेकिल्ले मानले जात होते," असे अहमद म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
ते पुढे म्हणाले, "एसआयआर झाला नसता तर काँग्रेसला कदाचित आणखी जास्त फायदा झाला असता."
मुस्लीम मतांमध्ये फूट पडल्यासारखी परिस्थिती दिसत आहे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं.
"पश्चिम बंगालमध्ये सुमारे 90 ते 100 जागा अशा आहेत, ज्यांचा निकाल मुस्लीम मतांवर ठरतो," असं त्या म्हणाल्या.
तृणमूल काँग्रेसची एकूण जागांची संख्या कमी झाली आहे, यावरून दिसतं की मुस्लीम मतदारांचा काही भाग या वेळी पक्षापासून दूर गेला आहे, असं बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.
(सर्व तक्ते चेतन सिंग यांनी बनवले आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























