सुवेंदू अधिकारी : ममता बॅनर्जींना सोडून आलेला नेता पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी कसा ठरला गेमचेंजर?

फोटो स्रोत, ANI
- Author, प्रभाकर मणि तिवारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अभेद्य किल्ल्याला खिंडार पाडत सत्तेत येण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. या यशाचं श्रेय मोठ्या प्रमाणात सुवेंदू अधिकारी यांनादेखील जातं.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे जे कल समोर आले आहेत, त्यात भाजपानं बहुमत गाठलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपा पहिल्यांदाच सरकार स्थापन करेल, असं आता निश्चितपणे मानलं जात आहे.
राजकीय सक्रियपणा आणि आक्रमक भूमिका यामुळे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे लाडके झालेले सुवेंदू अधिकारी आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदासाठीचे सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत.
सुवेंदू अधिकारी यांना 2020 पर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानलं जायचं. मात्र पक्षात अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावामुळे ते हळूहळू बाजूला पडले होते. त्यानंतर 2021च्या निवडणुकीच्या आधीच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर 4 महिन्यांच्या आत झालेल्या त्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपाच्या आमदारांची संख्या 3 वरून 77 पर्यंत नेली होती.
अर्थात भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी त्यावेळेस 'अबकी बार दो सौ पार'ची घोषणा दिली होती. ते स्वप्न त्यावेळेस पूर्ण झालं नव्हतं. मात्र 3 जागांवरून 77 जागांपर्यंत मजल मारणं, हेदेखील पक्षासाठी मोठं यश होतं.
आता 5 वर्षांनी भाजपानं बंगालमध्ये 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सत्तेतून हटवून त्या संख्येच्या अगदी जवळ मजल मारली आहे. भाजपा आता बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्तेत येण्याच्या मार्गावर आहे.
पक्षाचा पाया मजबूत करत राहिले सुवेंदू अधिकारी
या विजयामुळे 'अंग-बंग आणि कलिंग' (बिहार, बंगाल आणि ओडिशा) ची सत्ता मिळवण्याचं भाजपाचं जुनं स्वप्नदेखील पूर्ण झालं आहे. यातील अंग (बिहार) आणि कलिंग (ओडिशा)ची सत्ता तर त्यांनी आधीच मिळवली होती. मात्र आता बंग म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भाजपा पहिल्यांदाच सत्तेत येणार आहे.
पक्षाचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहसारखे दिग्गज नेते प्रयत्न करतच होते. मात्र बंगालमध्ये प्रत्यक्षात पक्षाचा पाया मजबूत करत या विजयासाठीची पार्श्वभूमी तयार करण्यात सुवेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती.

फोटो स्रोत, Getty Images
सुवेंदू यांना 2021 मध्ये जिंकल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते करण्यात आलं होतं. त्यानंतर गेली 5 वर्षे ते सातत्यानं सरकारवर हल्ला चढवत होते. तसंच तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या भागातदेखील आंदोलनं करून भाजपाचा सातत्यानं बळकट करत होते.
सुवेंदू अधिकारी आमदार, दोन वेळा खासदार झाले आणि नंतर नंदीग्राम मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. ते ममता बॅनर्जी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात परिवहन मंत्री झाले होते. अशा सुवेंदू अधिकारी यांचं नाव डिसेंबर 2020 च्या आधी पश्चिम बंगालबाहेर क्वचितच माहित होतं.
मात्र त्याच महिन्यात त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यानंतर पक्षातील सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
टीएमसीमध्ये होते दुसऱ्या क्रमांकावर
अर्थात त्यांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्न उपस्थित केले जात राहिले आहेत. पक्षातदेखील त्यांच्याबाबत प्रश्न उपस्थित होत राहिले. केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना जे महत्त्व दिलं जात होतं, त्यांच्याकडे जे लक्ष दिलं जात होतं, त्यामुळे पक्षातील जुन्या नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दलची नाराजीदेखील वाढली.
मात्र असं म्हटलं जातं की यशामागे सर्व अवगुण, उणीवा लपतात. गेल्या 5 वर्षांच्या काळात केंद्रीय नेतृत्वानं देखील त्यांना सातत्यानं महत्त्व दिलं आणि पक्षाच्या बंगालशी संबंधित धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचं मत महत्त्वाचं होतं.
सुवेंदू 2006 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेमध्ये पहिल्यांदा निवडून आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी तमलुक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते जिंकले होते. नंतर 2014 च्या निवडणुकीत देखील त्यांनी पुन्हा विजय मिळवला होता.
मग 2016 च्या विधानसभा निवडणुकीत ते नंदीग्राम मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांना ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री करण्यात आलं होतं. हळूहळू त्यांना सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानलं जाऊ लागलं होतं.
विद्यार्थी राजकारणातून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. ते कांथीमधील पीके कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेत असताना विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले होते.
पुढे 1989 मध्ये ते काँग्रेसची विद्यार्थी संघटनेचे, छात्र परिषदेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. सुवेंदू 2006 मध्ये, वयाच्या 36 व्या वर्षी पहिल्यांदा कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
त्याच वर्षी त्यांना कांथी नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण्यात आलं होतं. शुभेंदू 2009 आणि 2014 मध्ये तमलुक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते.
मात्र 2016 मध्ये ममता बॅनर्जी यांनी त्यांना नंदीग्राम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. तिथे ते सहजपणे विजयी झाले. सुवेंदू यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात भलेही 1990 च्या दशकात झाली होती. मात्र 2007 मध्ये झालेल्या नंदीग्रामच्या अधिग्रहण विरोधी आंदोलनानं एक प्रभावशाली नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
नंदीग्राम आंदोलनाचे मुख्य शिल्पकार
सुवेंदू अधिकारी संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर अल्पावधीतच तृणमूल काँग्रेसमध्ये सत्तेचं एक पर्यायी केंद्र बनले.
पूर्व मेदिनीपूर जिल्हा, अधिकारी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शुभेंदू यांचे वडील आणि भाऊदेखील तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकत आले आहेत.
तृणमूल काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या नंदीग्राम आंदोलनानं महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्या आंदोलनाचे मुख्य शिल्पकार सुवेंदू हेच होते, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
सुवेंदू यांनी 2007 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून तत्कालीन डाव्या आघाडीच्या सरकारच्या विरोधात भूमी निष्कासन प्रतिकार समितीच्या (भूमि उच्छेद प्रतिरोध कमिटी) बॅनरखाली स्थानिक लोकांना संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळेस नंदीग्राममधील प्रस्तावित केमिकल हबसाठीच्या भूसंपादनाच्या विरोधातील आंदोलन नुकतंच सुरू झालं होतं. त्या काळात, हल्दियाचे सीपीएमचे नेते लक्ष्मण सेठ यांचा त्या भागात प्रभाव होता.
मात्र सुवेंदू यांच्यामुळे, या भागातील सर्वात शक्तिशाली नेते असलेल्या सेठ यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
जंगलमहल या नावानं कुप्रसिद्ध असलेल्या पश्चिम मेदिनीपूर, पुरुलिया आणि बांकुडा जिल्ह्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचा पाया मजबूत करण्यात देखील सुवेंदू यांचाच हात होता. आता त्यांच्यामुळेच भाजपानं त्या भागात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
सुवेंदू यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळेच तृणमूल काँग्रेस सोडली, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
अर्थात, त्यांच्या विरोधकांचा युक्तिवाद आहे की भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये सहभाग असल्यामुळे ईडी आणि सीबीआय यांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी नाईलाजानं ते भाजपामध्ये गेले होते.
मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपा राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. त्यातून तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या भागांमध्ये भाजपानं यशस्वीपणे शिरकाव करत तृणमूलकडून अनेक जागा हिसकावून घेतल्या आहेत. यामध्ये सुवेंदू अधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले सुवेंदू अधिकारी आता भाजपाच्या सरकारमध्ये पहिल्या क्रमांकावर असतील का, म्हणजेच ते मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नाचं उत्तरदेखील कदाचित याच आठवड्यात मिळेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























