वैतरणा : 700 प्रवाशांसह जहाजाला मिळालेली जलसमाधी, नेमकं काय झालं हे आजही गूढच

फोटो स्रोत, FALKRIK GOV.UK
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होऊन आतमधील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर जगभरात त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली होती.
पण या निमित्ताने 110 वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिक या जहाजाची सुद्धा चर्चा सुरू झालेली.
शंभर वर्षांनंतरही टायटॅनिकचा अपघात जगभरात एक रहस्य, दंतकथा बनून राहिला आहे.
टायटॅनिकच्या दुर्घटनेच्या जवळपास वीस वर्षं आधी गुजरातच्या किनाऱ्यावरही एका जहाजाला जलसमाधी मिळाली होती.
या जहाजावर 700 प्रवासी होते. त्यांचा आक्रोश कोणाला ऐकू गेला नाही...त्यांचे मृतदेह सापडले नाहीत आणि या अपघाताच्या कथा सांगायलाही कोणी वाचलं नाही.
‘एस एस वैतरणा’ असं या जहाजाचं नाव होतं.
नवीन कंपनी, पहिले जहाज

फोटो स्रोत, Getty Images
1885 साली ग्रॅंजमाउथ डॉकयार्ड कंपनीने 'एसएस वैतरणा' बांधल्याचं सांगितलं जातं. आजच्या प्रगत तंत्रज्ञानातही 'एसएस वैतरणा'च्या आकाराचं जहाज बांधायला काही महिने लागतात, त्याकाळी तर हे काम अधिकच कठीण होतं. कारण भारतातले लोक ऑर्डर द्यायचे, लोखंड आणि इतर कच्च्या मालाची व्यवस्था करायचे आणि मग कंपनी जहाज बांधायला घ्यायची. यामध्ये बराच वेळ जायचा.
स्कॉटलंडच्या फाल्किर्क अर्काईव्हच्या कागदपत्रांमध्ये ग्रॅंजमाउथ डॉकयार्ड कंपनीबद्दलची माहिती मिळते. त्यानुसार विल्यम मिलर आणि सॅम्युअल पोपहाउस जॅक्सन यांनी ग्रँजमाउथ डॉकयार्ड कंपनीची स्थापना केली. त्यांनी ‘डॉब्सन अँड चार्ल्स’ नावाची जहाजबांधणी कंपनी विकत घेतली. या कंपनीची स्थापना 1879 साली झाली.
1869 साली सुएझ कालवा सुरू झालाय त्याचबरोबर व्यापारासाठी मोठ्या आकारांच्या आगबोटींची गरजही निर्माण झाली होती. ग्रँजमाउथला याचा फायदाच झाला. तत्कालिन बॉम्बे प्रांतातील ए. जे. शेफर्ड या कंपनीने वैतरणाच्या बांधकामाची ऑर्डर ग्रँजमाउथला दिली.
कमोडोर (निवृत्त) डॉ. जॉन्सन ओडाक्केल लिहितात , "या जहाजाचं बांधकाम 1882 मध्ये सुरू झालं आणि ते तयार करण्यासाठी तीन वर्षे लागली. तिची नोंदणी स्कॉटलंडच्या ग्लासगो बंदरात करण्यात आली. हे जहाज बांधण्यासाठी 10,000 पाउंड इतका खर्च करण्यात आला. तिचा साडेचार हजार पाउंड्सचा विमा उतरवला आहे."
'एसएस वैतरणा' हे ग्रॅंजमाउथ कंपनीने बनवलेलं पहिलं जहाज होतं.
डॉ. जॉन्सन हे मरीन हिस्ट्री सोसायटीचे माजी संचालक होते आणि भारतीय नौदलात 34 वर्षे सेवा केल्यानंतर कमोडोर पदावर निवृत्त झाले.

फोटो स्रोत, Getty Images
एसएस वैतरणाची लांबी 170 फूट लांब आणि रुंदी 26 फूट होती. 73 अश्वशक्तीचे (हॉर्स पॉवर) इंजिन चालवणारा कोळशावर चालणारा बॉयलर होता. आज कोणतीही सेडान कार सरासरी 80 हॉर्स पॉवर निर्माण करते. यावरून वैतरणाचं तंत्रज्ञान किती क्षमतेचं होतं, याचा अंदाज येतो.
वैतरणाच्या इंजिनला दोन सिलिंडर होते. त्यांचा व्यास 21 इंची होता. धूर बाहेर काढण्यासाठी जहाजाच्या मध्यभागी एक चिमणी होती. त्याला तीन डेक होते. हवा खेळती राहण्यासाठी या डेकच्या खाली पुरेशी व्यवस्था होती.
जहाजांची नोंदणी ठेवणाऱ्या लॉईड्स रजिस्टरच्या अहवालानुसार या जहाजाचे एकूण वजन 292 टन होते. त्यातून त्याची क्षमता लक्षात येते. जहाजावर इंधनासाठई जागा, खलाशांच्या खाण्या-पिण्यासाठी जागा, इंजिन रूम, प्रवाशांच्या सामानासाठी जागा अशा सगळ्या सोयीही होत्या.
22 टन कोळसा असलेलं हे जहाज कच्छ ते मुंबईदरम्यान प्रवास करायचं. त्याचं तिकीट आठ रुपये होतं.
शेफर्ड कंपनीने या जहाजाची तिकिटं विकण्यासाठी बंदरांवर एजंट्सची नियुक्ती केली होती. तिकीट विक्रीच्या पद्धतीमुळं अनेकदा जहाजावरील प्रवाशांमध्ये समन्वयाचा अभाव निर्माण झाला होता.
या जहाजाला ‘विजली’ नाव कसं मिळालं?

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटिश सरकारच्या नियमांमुळे त्याकाळी देशी जहाजांना लांब प्रवास करणे कठीण झालं होतं.
असे म्हणतात की, वीज नसलेल्या काळात हे जहाज जेव्हा समुद्रातून जायचं, तेव्हा ते किनाऱ्यावरून दिसायचं. या जहाजावर इलेक्ट्रिक बल्ब होते, जे चमकायचे. त्यामुळेच हे जहाज ‘विजली’ म्हणून ओळखलं जायचं. अर्थात, त्या काही इतरही जहाजांवर वीजेचे दिवे आले होते.
हे जहाज मध्यम अंतराच्या प्रवासासाठी योग्य होतं. या जहाजाने सध्याच्या इस्तंबूल आणि जेद्दाह इथूनही प्रवासी घेतले होते.
पहिल्या प्रवासादरम्यानही या जहाजाला समुद्रात रात्रीच्या वेळी अडचणी आल्या. त्याबद्दलचं वृत्तही 'द इलस्ट्रेटेड लंडन न्यूज'मध्ये छापण्यात आलं होतं.
या लेखात म्हटलं होतं की, 24 ऑगस्ट 1885 रोजी ग्लासगो इथं नोंदणी झालेलं 'एसएस वैतरणा' हे जहाज जेद्दाहपासून सहा मैल अंतरावर समुद्रात संकटात सापडले. तेव्हा 'एड्रिना' या तुर्की जहाजाचा कमांडर मोहम्मद बे याने तातडीने तेथे धाव घेऊन या जहाजाला मदत केली. त्यामुळे त्यांना व्यापार मंडळाने सोन्याचे घड्याळ दिलं. एड्रिनाने यापूर्वीही ब्रिटिश जहाजांना मदत केली होती.'
त्यावेळी जहाज कोणत्या अडचणीत होते आणि कॅप्टन कोण हे स्पष्टपणे नमूद केलं नव्हतं. पण या जहाजाच्या शेवटच्या प्रवासाचे कॅप्टन हाजी कासम होते. त्यांच्याबद्दलची लोकगीतं आजही अजरामर आहेत.
हाजी कासम आगबोटवाले
या जहाजासोबत दोन कासमची नावं जोडली गेली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे हाजी कासम इब्राहिम आगबोटवाला. ते या जहाजाचे कॅप्टन होते. दुसरं म्हणजे कासम नूर मोहम्मद हलाई. तो पोरबंदर इथल्या शेफर्ड कंपनीचा बुकिंग एजंट होता.
गुणवंतराय आचार्य यांच्या 'हाजी कसम तरि धरती' या कादंबरीत नायक ‘नाखुदा’ आणि जहाजाचा मालकही आहे. तो मूळचा मंगरोळचा आहे.
कमोडोर (निवृत्त) ओडक्कल लिहितात की, हाजी कासम हा मूळचा कच्छचा जामीनदार होता. ते मुंबईत मलबार हिलला राहायचे. त्यांचं कार्यालय अब्दुल रहमान स्ट्रीट येथे होते. सध्याचं बोरिवली ते दहिसर दरम्यान त्यांच्याकडे बरीच जमीन होती.
हाजी यांना शिपिंगचा दोन दशकांहून अधिक अनुभव होता. मात्र, गुजरातच्या सौराष्ट्र भागात समुद्रात उसळलेलं वादळ या अनुभवी नाविकाच्या आयुष्यातील शेवटची आणि सर्वात मोठी परीक्षा ठरलं.

फोटो स्रोत, TWITTER/GO_MOVIE_MANGO
तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या जहाजांसाठीच्या नियमांमुळे कच्छच्या जहाजांना लांबचा प्रवास करणे कठीण झाले होते. कच्छला लांबलचक समुद्रकिनारा असला तरी त्याची बंदरे उथळ आणि जहाजांसाठी अयोग्य होती.
तसंच ब्रिटिश राजवटीत मुंबई आणि कराची बंदरांना प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यामुळे समुद्रमार्गे परदेशात व्यापार करणारे जैन, भाटिया आणि लोहाणा शाह व्यापारी मुंबई किंवा कराचीत स्थायिक झाले होते.
नोव्हेंबर-1888 मध्ये मोठ्या संख्येने व्यापारी कच्छमध्ये आले होते. त्यांनी लाभ पंचमीच्या दिवशी (दिवाळीनंतरचा पाचवा दिवस) वैतरणाची तिकीटं खरेदी केली होती. हा दिवस नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ मानला जातो.
पौष महिन्यात लग्नकार्य होत नसल्यामुळे 13 नवरदेव वऱ्हाडासह या जहाजावर चढले होते. लग्नकार्य पार पाडण्यासाठी ते प्रवासाला निघाले होते.
त्यावेळी कच्छ-सौराष्ट्रातील तरुणांना दहावीची परीक्षा देण्यासाठी मुंबई विद्यापीठात जावे लागत होते. तेव्हा ते उच्च शिक्षण मानलं जायचं. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी निघालेले तरुणही या प्रवासात सामील झाले. 8 नोव्हेंबर 1888 ला लाभ पंचमीच्या सकाळी साडेसात वाजता 'विजली'ने कच्छहून शेवटचा प्रवास सुरू केला.
पण, तीन दिवस आधीपासूनच या प्रवासावर संकटाचे ढग गोळा व्हायला लागले होते, ज्याची त्यांना कल्पना नव्हती.
'मेमवा चक्रीवादळाचा तपशील-भाग तीन’मध्ये नमूद केलं होतं की,
मध्य अरबी समुद्रातील वातावरण अनेक दिवसांपासून अशांत आहे. 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी एक लहान चक्रीवादळ तयार झाले आणि ते उत्तरेकडे सरकले. 7 तारखेच्या संध्याकाळी ते नैऋत्येकडे सरकले.
8 नोव्हेंबरच्या दुपारपासून हे वादळ काठियावाडच्या किनाऱ्याकडे सरकायला लागलं होतं. वादळ तीव्र नव्हतं, पण वाऱ्याचा वेग खूप जास्त होता. काही ब्रिटिश भारतीय जहाजं या वादळातून सुखरूप बाहेर निघाली, पण त्यांना कडाडणाऱ्या वीजांचा धक्का बसला.
9 नोव्हेंबरच्या सकाळी हे वादळ किनाऱ्याला धडकलं.
नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार वाय.एम. चितळवाला यांनी 'एस.एस. वैतरणा'च्या शोकांतिकेबद्दल 'विजली हाजी कासमनी' हे पुस्तक लिहिले आहे. 2018 साली या दुर्घटनेला 130 वर्षं पूर्ण झाली तेव्हा 'अभियान' या गुजराती मासिकाने त्यावर कव्हर स्टोरी केली होती.
चितळवाला हे गुजरातच्या पुरातत्त्व खात्यात अनेक वर्षं सेवा बजावली होती. हडप्पा अवशेषांच्या शोधातही त्यांची मोठी भूमिका होती.
चितळवाला यांच्या पुस्तकाचा हवाला देऊन या स्टोरीमध्ये असं म्हटलं गेलं की, अपघाताच्या वेळी जहाजावर 43 खलाशी आणि सुमारे 700 प्रवासी होते. बहुतेक यात्रेकरू मांडवी आणि द्वारका येथून जहाजावर चढले होते. अपघाताच्या वेळी 1,000 ते 1,300 प्रवासी जहाजावर होते, हा दावा ते नाकारतात.
पोरबंदरपासून थोड्याच अंतरावर हे जहाज थांबलं. नांगर न टाकता अवघ्या पाच-सात मिनिटांत ते तिथून निघालं. त्यामुळे सुमारे शंभर प्रवाशांचा प्रवास चुकला आणि त्यांचे प्राण वाचले. बहुतेक वेळा जहाज किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर नांगरलेले असायचं आणि एजंटने भाड्याने घेतलेल्या छोट्या बोटी प्रवाशांना घेऊन यायच्या.
प्रशासक लिली यांनी घेतलेली खबरदारी आणि नौका समुद्रात न नेण्याचा इशारा दिल्याने अनेकांचे प्राण वाचले हे नाकारले जात असल्याचं सांगितलं गेलं. पण नंतर हा दावा फेटाळून लावण्यात आला. चितळवाला यांच्या मते समुद्र तेव्हा एवढा खवळलेलाही नव्हता.
बाळकृष्ण बावाजी हे या जहाजाचे मांगरोळे इथले एजंट होते. त्यांनी 9 तारखेला रात्री एक वाजण्याच्या सुमारास मांगरोळे किनाऱ्यावर विजांचा कडकडाट पाहिला. जहाजावर वीज कोसळल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यानंतर पहाटे 4-5 च्या सुमारास मांगरोळेपासून 30-40 किमी अंतरावर हे जहाज समुद्रात बुडाल्याचा त्यांचा अंदाज आहे.
चौकशीत काय समोर आलं?
तपासादरम्यान, शेफर्ड कंपनीने कबूल केले की, त्यांच्या जहाजांवर बसवलेले दाब मापक आणि बॅरोमीटर सदोष आहेत आणि ते बदलले जातील. जहाजावर अपुरी बचाव व्यवस्था असल्याचेही तपासात समोर आले आहे.
वैतरणा पाच दिवसांच्या छोट्या प्रवासासाठी योग्य मानलं जात होतं आणि ते वादळाला सामोरं जाऊ शकलं असतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं होतं.
तपासात शेफर्ड कंपनी किंवा त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली नसल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
चार्ल्स एडवर्ड ब्लॅक त्यांच्या ‘मेमॉयर्स ऑन द इंडियन सर्व्हे’ 1875-1890 या पुस्तकात लिहितात, 'कोर्ट ऑफ इन्क्वायरीने नमूद केलं की, वादळाचा इशारा देण्यासाठी एक मजबूत यंत्रणा अस्तित्वात होती. त्यासाठी सर्व बंदरांना कळवण्यात आले होते.'
त्याची माहिती वैतरणापर्यंत वेळेत पोहोचवता आली असती, तर त्यांचा तो वादळी प्रवास टाळता आला असता. बॉम्बे येथील यंत्रणेतील बिघाडाचा हा ठोस पुरावा होता. या घटनेनंतर दररोज स्थानिक पातळीवर हवामान प्रकाशित केले जाते.'
त्यानंतर नेटिव्ह पॅसेंजर शिपिंग कायद्यात सुधारणा प्रस्तावित केल्या गेल्या. त्यामध्ये प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक शिफारसी केल्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








