टायटन : पाणबुडीतला ऑक्सिजन संपला की पुढे काय होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इलोस अलाना, नादीन युसुफ, अॅलेक्स थेरीन, कॅथरिन आर्मस्ट्राँग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होऊन आतमधील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती US कोस्ट गार्डने दिली आहे.
टायटॅनिक जहाजाचे अवशेष असलेल्या परिसरातच या पाणबुडीचे अवशेष आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्याची जगभरात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती.
ही पाणबुडी चार दिवसांपूर्वी गायब झाली होती. यातला ऑक्सिजन पूर्णपणे संपला होता.
22-फुट लांब असलेली ही टायटन पाणबुडी अटलांटिक महासागरात हजारो फुट खाली तळाशी गेली होती.
या पाणबुडीत स्वार झालेल्या पाच प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, अब्जाधीश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग, फ्रेंच एक्सप्लोरर पॉल ऑनरी नार्जेलेट, तसंच या टूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख स्टॉकटन रश यांचाही समावेश होता.
पण या पाचही जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. शिवाय येथील बिकट परिस्थिती आणि प्रतिकूल वातावरण पाहता, ते सापडण्याची शक्यताही नाही, असं म्हटलं जात आहे.
अटलांटिक महासागरात ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडालं, त्याच्या अवतीभोवतीचं क्षेत्र अत्यंत धोकादायक मानलं जातं.

याचं पहिलं कारण म्हणजे तिथे गडद अंधार आहे.
टायटॅनिक जहाज अटलांटिक महासागरात सुमारे चार किलोमीटर खोल बुडालं आहे.
या भागाला 'मिडनाईट झोन' म्हणतात. या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही.
पाणबुडीचा प्रकाश काही मीटर अंतरापर्यंतच जातो. त्यामुळे लक्ष विचलित होणं खूप सोपं आहे.
टायटॅनिक तज्ज्ञ टिम मॅटलिन सांगतात की, "इथे घनदाट अंधार आहे आणि पाणीही खूप थंड आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर चिखल असून तो सातत्याने हलतोय."
ते म्हणाले, "तुम्ही नेमके कुठे आहात हे समजण्यासाठी तुमच्याकडे केवळ सोनार सिस्टिम असते. इथे तर रडारही काम करत नाही."
ऑक्सिजन संपला की काय होतं?
या पाणबुडीचा स्फोट झाला हे निष्पन्न झालं असलं तरी आतमध्ये ऑक्सिजन संपल्यानंतर काय घडू शकतं याचं वर्णन तज्ज्ञ करतात.
कॅनडालतल्या सेंट जॉन्स मेमोरियल विद्यापीठातले डॉ. केन लेड्स हायपरबेरिक मेडिसिन (ऑक्सिजनशी संबधित वैद्यकशास्त्र) मधले तज्ज्ञ आहेत.
ते म्हणतात, “जेव्हा एखाद्या बंद खोलीतला ऑक्सिजन संपतो तेव्हा ती खोली त्या असणाऱ्या लोकांच्या उच्छवासातून बाहेर पडलेल्या कार्बनडाय ऑक्साईडने भरून जाते. हे जीवघेणं आहे.”
“तुमच्या प्रत्येक श्वासागणिक जेव्हा शरीरात कार्बनडाय ऑक्साईड जातो तेव्हा ते नशा केल्यासारखं आहे. तुम्ही गुंगता, झोप आल्यासारखं वाटतं.”

मानवी रक्तात कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण वाढण्याला हायपरकॅप्निया म्हणतात. यावर तातडीने उपचार झाले नाही तर लगेचच जीव जाऊ शकतो.
रायन रॅमसे रॉयल नेव्हीतल्या पाणबुडीचे माजी कॅप्टन होते. त्यांच्यामते टायटनमध्ये अतिरिक्त कार्बनडाय ऑक्साईड बाहेर काढण्याची कोणतीही सिस्टिम नव्हती.
ते म्हणतात, “मी त्या पाणबुडीचे व्हीडिओ पाहिले आहेत. त्यात स्क्रबर सिस्टिम दिसत नाहीये ज्यायोगे कार्बनडाय ऑक्साईड बाहेर फेकला जातो. ही खूप मोठी समस्या होती,” ते म्हणतात.
दुसरं म्हणजे स्फोट होण्याआधीच यातल्या प्रवाशांचा हायपोथर्मियामुळे मृत्यू होऊ झालेला असू शकतो. हायपोथर्मिया म्हणजे शरीराचं तापमान अतिशय कमी होणं.
कॅप्टन रॅमसे म्हणतात, “पाणबुडी महासागराच्या तळाशी गेली होती. तिथलं तापमान जवळपास 0 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं.”
अशा वेळी जर पाणबुडीतली आतली वीज गेली असेल तर तिथे ऊर्जा निर्माण करणं अशक्य आहे, आणि आतलं वातावरणही उबदार राहाणार नाही.
गंभीर परिस्थिती
जर पाणबुडीतल्या प्रवाशांना हायपोथर्मिया, कमी होत जाणारा ऑक्सिजन आणि वाढत जाणारा कार्बनडाय ऑक्साईड या समस्यांचा एकाच वेळी सामना करावा लागला असेल तर ते स्वतःला वाचवण्यासाठी पाऊलं उचलण्याच्या परिस्थितीतही नसावेत असं डॉ लेड्स यांना वाटतं.

“त्यांची शुद्ध हरपण्याची शक्यता आहे, आणि त्यांना बेशुद्धावस्थेत शोधून काढणं अशक्य होतं. दुर्दैवाने तसंच झालं,” ते म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








