टायटॅनिक : 114 दिवसांच्या शोधानंतर टायटन पाणबुडीच्या अवशेषांमध्ये काय सापडलं?

फोटो स्रोत, DAWOOD FAMILY/LOTUS EYE PHOTOGRAPHY/REUTERS
टायटन पाणबुडीचे अवशेष 114 दिवसांनी अटलांटिक महासागरात सापडले. समुद्राच्या तळाशी बुडालेल्या प्रसिद्ध टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन या पाणबुडीचा स्फोट होऊन आतील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
18 जून 2023 रोजी अटलांटिक महासागरात टायटनचा स्फोट झाल्यानंतर पाणबुडीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. परिणामी, 114 दिवसांनंतर पाणबुडीचे काही भाग आणि मानवी अवशेष सापडले आहेत, असं शोध घेणा-या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अमेरिकन कोस्ट गार्डने जाहीर केले आहे की 111 वर्षांपूर्वी बुडालेल्या टायटॅनिकला पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीच्या आतमध्ये स्फोट होऊन त्यामध्ये असलेले सर्व पाच जण मृत्यूमुखी पडले होते.
अमेरिकन कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार टायटन पाणबुडीच्या आत एक विनाशकारी स्फोट झाल्यामुळे ती फुटली होती.
अमेरिका, कॅनडा आणि फ्रान्समधील पथके शोध आणि बचाव कार्यात सहभागी झाली होती.
अमेरिकन कोस्ट गार्डच्या माहितीनुसार त्यांना टायटॅनिक साइटच्या आजूबाजूच्या ढिगाऱ्यांमध्ये टायटन पाणबुडीचे पाच मोठे तुकडे सापडले. पाणबुडीचे प्रेशर चेंबर फुटल्याने हा अपघात झाला होता.

पाणबुडीतील प्रवासी कोण होते?
पाणबुडीमध्ये 3 पर्यटक, एक चालक आणि टूर गाईडसह 5 लोक होते.
हॅमिश हार्डिंग - 58 वर्षांचे ब्रिटनमधील एक मोठे उद्योगपती. त्यांनी अनेक वेळा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाला भेट दिली असून अवकाश प्रवासही केलेला.
शहजादा दाऊद - पाकिस्तानी वंशाचे 48 वर्षीय ब्रिटिश अब्जाधीश.
सुलेमान दाऊद - 19 वर्षांचा विद्यार्थी आणि शहजादा दाऊद यांचा मुलगा.
पॉल हेन्री नार्कोलेट - 77 वर्षांचे पॉल फ्रेंच नौदलात 'डायव्हर' होते. टायटॅनिकच्या अवशेषाचा शोध घेणारी पहिली व्यक्ती होण्याचा मान आणि 'मिस्टर टायटॅनिक' ही पदवीदेखील त्यांना मिळाली होती.
स्टॉकटन रश - 61 वर्षीय रश हे टायटॅनिक टूर आयोजित करणाऱ्या ओशन गेट कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडालं, त्याच्या आजूबाजूचं पाणी इतकं धोकादायक का आहे?
अटलांटिक महासागरात ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडालं, त्याच्या अवतीभोवतीचं क्षेत्र अत्यंत धोकादायक मानलं जातं.
याचं पहिलं कारण म्हणजे तिथे गडद अंधार आहे. टायटॅनिक जहाज अटलांटिक महासागरात सुमारे चार किलोमीटर खोल बुडालं आहे.

फोटो स्रोत, Reuters
या भागाला 'मिडनाईट झोन' म्हणतात. या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही.
पाणबुडीचा प्रकाश काही मीटर अंतरापर्यंतच जातो. त्यामुळे लक्ष विचलित होणं खूप सोपं आहे.
टायटॅनिक तज्ज्ञ टिम मॅटलिन सांगतात की, "इथे घनदाट अंधार आहे आणि पाणीही खूप थंड आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर चिखल असून तो सातत्याने हलतोय."
ते म्हणाले, "तुम्ही नेमके कुठे आहात हे समजण्यासाठी तुमच्याकडे केवळ सोनार सिस्टिम असते. इथे तर रडारही काम करत नाही."

अटलांटिक महासागराचा हा भाग धोकादायक असण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्याची खोली.
समुद्राच्या पृष्ठभागावरील दाबाच्या तुलनेत 390 पट जास्त दाब समुद्राच्या खोलीवर असतो.
त्यामुळे इतक्या खोलात जायचं असेल तर पाणबुडीच्या भिंती खूप जाड असाव्यात.
तिसरं कारण म्हणजे येथील पाण्याचा प्रवाह.
वारा, लाटांमुळे इथे जोरदार प्रवाह तयार होतो. शिवाय पाण्याच्या घनतेतही फरक पडतो.
यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या सामानाची जागा सुद्धा बदलते.
टिम मॅटलिन सांगतात, "हे काहीसं मून शॉट सारखं आहे. जसं की अंतराळवीर अंतराळात जातात त्याप्रमाणे म्हणता येईल."
चौथे कारण म्हणजे बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष. टायटॅनिक बुडून आज शंभर वर्ष झाली आहेत. त्यामुळे जहाजाचे अवशेष निखळून पडणं सुरूच आहे.
जर कोणी या अवशेषांच्या खूप जवळ गेलं तर त्यावर आदळण्याची, किंवा इथे हरवण्याची शक्यता असते.
बचाव मोहिमेचं केंद्र
टायटॅनिकचे अवशेष बघायला गेलेल्या टायटन पाणबुडीचा त्यांच्या समुद्रातील पोलर प्रिन्स या जहाजाशी संपर्क तुटला होता.
रविवारी एक तास 45 मिनिटांतच हा संपर्क तुटला होता. सोमवारी संध्याकाळी तज्ज्ञांनी लावलेल्या अंदाजानुसार केवळ चार दिवसांचाच ऑक्सिजन शिल्लक होता. पण त्याआधीच पाणबुडीचा स्फोट झाल्याचं बचावकर्त्यांनी जाहीर केलं.
टायटॅनिक जहाजाचे अवशेष कॅनडातील न्यूफाउंडलँड येथील सेंट जॉन्सच्या दक्षिणेस 700 किमी अंतरावर आहेत. तर, पाणबुडीचं बचावकार्य अमेरिकेतील बोस्टनमधून सुरू होतं.

या शोधबचाव मोहिमेत अमेरिका आणि कॅनडाच्या एजन्सीज व्यतिरिक्त, नौदल, खोल समुद्रात उतरणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांचा देखील समावेश होता.
या मोहिमेत लष्करी विमानं, पाणबुड्या आणि सोनार बॉय मशीनी अशी अद्ययावत यंत्रणा पाणबुडीच्या शोधमोहिमेत सहभागी झाल्या होत्या. तसंच बरीच खासगी जहाजंही मदतीला घेण्यात आली.
रिमोट पाणबुडी असलेलं डीप एनर्जी नावाचं व्यावसायिक जहाज घटनास्थळी पोहोचलं. तसंच अटलांटिक मर्लिन टग आणि एक पुरवठा जहाज देखील तिथे पोहोचलं होतं.
लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) चे सागरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक अॅलिस्टर ग्रेग सांगतात की, पाणबुडीचा शोध नेमका समुद्र तळाशी घ्यायचा की समुद्राच्या पृष्ठभागावर घ्यायचा हे कोडं बचावकर्त्यांसमोर होतं. त्यामुळे शोधमोहीम राबविताना प्रत्येक वळणावर आव्हानांना तोंड द्यावं लागलं.
खोल समुद्रात शोधमोहीम
अमेरिकेच्या तटरक्षक दलाने म्हटलं की, बेपत्ता पाणबुडीला टायटॅनिक जहाजाच्या अवशेषापर्यंत घेऊन जाणारं जहाज पोलर प्रिन्सने सोमवारी संध्याकाळी समुद्राच्या पृष्ठभागावरही शोध मोहीम राबवली.
या शोधमोहिमेसाठी सी-130 हर्क्युलिस विमानं देखील तैनात करण्यात आली आहेत. यातील दोन विमानं अमेरिकेची तर एक कॅनडाचं आहे. या विमानांनी आकाशातून समुद्राच्या पृष्ठभागावर शोध मोहीम राबवली होती.

बचावकर्त्यांना त्यांची शोध मोहीम 4 किलोमीटरच्या खोलीपर्यंत राबवावी लागली. कारण रेडिओ आणि जीपीएस सिग्नल पाण्याखाली जाऊ शकत नाहीत. ही पाणबुडी फक्त 6.7 मीटर लांब आहे.
अमेरिकेच्या तटरक्षक दलाने मंगळवारी खोल समुद्रात शोध मोहीम सुरू केल्याची माहिती दिली आहे. कॅनडाचे पी-3 अरोरा विमानही घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी सोनार बॉयच्या मदतीने परिसरात शोध मोहीम राबविली.
पाण्याच्या आतील गोष्टी ओळखण्यासाठी सोनार बॉयची मदत घेतली जाते. बऱ्याचदा खोल समुद्रातून येणाऱ्या शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी याचा वापर केला जातो.
यामुळे पाणबुडीचे प्रोपेलर आणि तिच्या मशीनमधून निघणारा आवाजही ऐकता येऊ शकतो. सोनार सिस्टीमच्या माध्यमातून पाणबुडीतील लोकांचा आवाज पृष्ठभागावरील जहाजापर्यंत पोहोचू शकतो.

ऑस्ट्रेलियन सबमरीन एस्केप अँड रेस्क्यू प्रोजेक्टचे माजी संचालक फ्रँक ओवेन यांनी इशारा देताना म्हटलं होतं की, जर पाणबुडी टायटॅनिकच्या अवशेषांच्या मधोमध असेल तर तिचा शोध घेणं खूप कठीण आहे.
बीबीसीशी बोलताना ते सांगतात की, "हे म्हणजे एखाद्या खाणीत सुई शोधण्यासारखं आहे. वाटेत एखादी शिळा असेल तर शोध घेणं कठीण आहे."
पाणबुडीची रचना
ही पाणबुडी सामान्य पाणबुडीपेक्षा वेगळी आहे.
नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, एखादी पाणबुडी किनाऱ्यापासून स्वतंत्रपणे फिरू शकते. पण सबमर्सिबल पाणबुडीची ताकद मर्यादित असते. तिला खाली-वर जाण्यासाठी जहाजाची आवश्यकता असते.
मागच्या वर्षी अमेरिकन टीव्ही नेटवर्क सीबीएसचे पत्रकार डेव्हिड पग टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी ओशनगेटच्या या पाणबुडीतून समुद्रात गेले होते. त्यांनी सांगितलं की, समुद्राच्या पृष्ठभागावर परत येण्यास पाणबुडीमध्ये अनेक सुरक्षा यंत्रणा आहेत. जसं की,

ट्रिपल वेट्स : तीन मुख्य पाईप हायड्रोलिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणबुडी पृष्ठभागावर आणू शकतात.
रोल वेट्स : जर हायड्रॉलिक तंत्रज्ञानाने काम करणं बंद केलं तर पाणबुडीमध्ये बसलेले लोक पाणबुडीच्या एका टोकाला जाऊन दुसऱ्या टोकाचं वजन कमी करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने समुद्रतळाला गेलेली पाणबुडी एका बाजूने वर येऊ लागेल.
बॅलेस्ट बॅग: पाणबुडीच्या तळाशी धातूने भरलेल्या पिशव्या लावलेल्या असतात. मोटरच्या साहाय्याने त्या सोडल्या जातात.
फ्यूजिबल लिंक्स: या अशा तारा असतात ज्या बॅलेस्ट बॅगच्या सहाय्याने पाणबुडीला जोडल्या जातात. पाणबुडी सलग 16 तास पाण्याखाली राहिली आणि कोणत्याही कारणामुळे तिचे इलेक्ट्रिक आणि हायड्रॉलिक तंत्रज्ञान बिघडले तर या तारा आपोआप वितळतात आणि बॅलेस्ट बॅग पाणबुडीपासून वेगळ्या होतात.
थ्रस्टर्स : ही सिस्टम पाणबुडीला वरच्या दिशेने ढकलते.
पाणबुडीचे लेग्ज: पाणबुडीचे लेग्ज (पाय) पाणबुडीच्या मुख्य भागापासून वेगळे करून पाणबुडी तळातून वर आणली जाते.
एअरबॅग्ज : पाणबुडीमध्ये असलेले लोक एअरबॅग्ज फुगवून पाणबुडी तळापासून वर आणतात.
समुद्रतळातून अवशेष कसे काढतात?
अमेरिकन तटरक्षक दलाचे रिअर अॅडमिरल जॉन मॉगर सांगतात की, पाणबुडीचे अवशेष समुद्रतळाशी असतील तर ते बाहेर काढण्यासाठी इतर तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल. यासाठी अमेरिकन नौदल आणि काही खासगी कंपन्यांचीही मदत घेत आहोत.
ओशनगेटच्या मते, जगात अशा पाच सबमर्सिबल पाणबुड्या आहेत ज्या समुद्रात 12,500 फूट (3,800 मीटर) खोलीपर्यंत जाऊ शकतात, जिथे टायटॅनिकचे अवशेष आहेत. टायटन पाणबुडी त्यापैकीच एक आहे.
पाणबुडी तज्ज्ञ प्राध्यापक अॅलिस्टर ग्रेग म्हणतात की, टायटन पाणबुडी समुद्रतळाशी असेल आणि तिला स्वतःहून वर येता येत नसेल तर बचावकर्त्यांकडे फारच मर्यादित पर्याय शिल्लक राहिलेत.

एवढ्या खोलवर बचाव कार्य करण्यासाठी मानवरहित रिमोट कंट्रोल व्हेईकल (आरओव्ही) चा वापर करावा लागतो.
ओशियन रिकव्हरी एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ डेव्हिड मीयर्न्स म्हणतात की, “बचाव कार्यात सामील असलेल्या डीप एनर्जी केबल लेयरमध्ये आरओव्ही असून ते चालवण्याची क्षमता आहे. पण या शोध मोहिमेत कंपनीने एखादं आरओव्ही पाण्याखाली पाठवलं आहे का? याचा अंदाज नाही. किंवा मग त्यांचे आरओव्ही टायटॅनिकच्या खोलीपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहेत का? हे देखील स्पष्ट नाही.”
अमेरिकन नौदलाकडे असलेले आरओव्ही समुद्रात खोलवर काम करू शकतात. गेल्या वर्षी दक्षिण चीन समुद्रात कोसळलेल्या लढाऊ विमानाचे अवशेष हटवण्यासाठी त्याची मदत घेण्यात आली होती. विमानाचे अवशेष 12,400 फूट (3,780 मीटर) खोलीवर आढळले होते.
त्यावेळी विमानाचे अवशेष बाहेर काढण्यासाठी आरओव्हीला तारा बांधण्यात आल्या होत्या. या तारेचा हुक समुद्रातील एका क्रेनला जोडलेला होता.
ओशियन रिकव्हरी एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ डेव्हिड मीयर्न्स म्हणतात की, "आरओव्हीच्या माध्यमातून टायटनचा शोध लावणं आणि तिचे अवशेष बाहेर काढणं शक्य होईल.
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "ट्विन मॅनिपुलेटर असलेलं रिमोट कंट्रोल व्हेईकल टायटनला हुक लाइनने जोडता येऊ शकतं. जेणेकरून तिला हळूहळू समुद्राच्या तळातून बाहेर काढता येईल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








