टायटॅनिक : टायटन पाणबुडीला अपघात नेमका झाला कसा, हे कसं समजणार?

- Author, पल्लब घोष
- Role, सायन्स करस्पाँडन्ट
जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा अपघात झाला. गेल्या रविवारपासून टायटन पाणबुडी बेपत्ता होती.
या टायटन पाणबुडीला शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बचावकार्याची मोहीम राबवली जात होती. मात्र, गुरुवारी या पाणबुडीचे अवशेष समुद्राच्या पृष्ठभागावर सापडले.
आता बचावकार्य करणारे या अपघाताची कारणं शोधण्याचा प्रयत्न करतायेत.
विध्वंसक स्फोटाचे संकेत
रिअर अॅडमिरल जॉन मॅगर यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत जे काही सापडलंय, ते ‘विध्वंसक स्फोटा’च्या शक्यतेला दुजोरा देणारं आहे.
कारण आतापर्यंत पाणबुडीच्या अवशेषांचे दोन ढीग सापडले. एका ठिकाणी टायटन पाणबुडीच्या मागचा भाग, तर दुसऱ्या ठिकाणी टायटनची लँडिंग फ्रेम सापडली. यावरून पाणबुडीचा स्फोट झाला असावा, असे संकेत मिळतात.

फोटो स्रोत, Reuters
ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमधील माजी पाणबुडी कमांडर रायन रामसे यांच्या म्हणण्यानुसार, बचावकार्यात सहभागी असलेल्या एजन्सी अपघाताची कारणं शोधण्याचा प्रयत्न करतील आणि हा अपघात कसा टाळता आला असता, यासाठी ते समुद्राच्या पृष्ठभागावरील ढिगाऱ्यातून मिळालेला प्रत्येक तुकडा सांभाळून ठेवतील.
ते म्हणतात, “या पाणबुडीमध्ये ब्लॅक बॉक्स नव्हता. त्यामुळे पाणबुडीच्या शेवटच्या ठिकाणची माहिती मिळणार नाही. पण या अपघाताच्या तपासाची प्रक्रिया एखाद्या विमान अपघाताच्या तपासापेक्षा वेगळी असणार नाही.”
प्रत्येक तुकड्याचा तपास होईल
पाणबुडीचे अवशेष समुद्रातून बाहेर काढल्यानंतर तिच्या प्रत्येक तुकड्याची कसून तपासणी केली जाईल.
कार्बन फायबर फिलामेंट्सची दिशा समजण्यासाठी सापडलेले अवशेष मायक्रोस्कोपमधून पाहिले जातील. यातून लहानातल्या लहान खरचटण्याचाही तपास केला जाईल आणि त्यावरून या पाणबुडीच्या अपघाताला सुरुवात कुठून झाली हे कळेल.
संरचनात्मक बिघाडामुळे अपघात झाला का, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तपासकर्ते करतील.

आयफेल टॉवर सारखा जड असावा
लंडनस्थित इम्पीरियल कॉलेजचे प्रोफेसर रॉडरिक ए. स्मिथ म्हणतात, “कार्बन फायबरच्या उत्पादनादरम्यान अंतर्गत दोष असल्यास त्याने नुकसान होतं. कार्बन फायबर आणि टायटॅनियम यांना जोडणाऱ्या भागांना अत्यंत सखोल पद्धतीच्या चाचणीची आवश्यकता असते.”
या पाणबुडीला झालेल्या वेगवान स्फोटामुळे म्हणजे अंतर्बाह्य आकुंचन पावल्यानं अपघाताच्या घटनाक्रमाचा मागोवा घेणं कठीण होईल.
स्मिथ म्हणतात, “म्हणूनच ढिगारा बाहेर काढून त्याचे परीक्षण करण्याची गरज आहे.”

या तपासाचं नेतृत्व कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण या प्रकारच्या पाणबुडी अपघातासाठी अद्याप कोणतीही निश्चित प्रक्रिया नाही.
अॅडमिरल मॅगर म्हणतात की, हे खूप गुंतागुंतीचे आहे. कारण ही घटना खोल समुद्रात घडली, ज्यात वेगवेगळ्या देशांचे लोक सामील होते.
मात्र, बचावकार्यात अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या नेतृत्वामुळे अमेरिकी तटरक्षक दलच महत्त्वाची भूमिका बजावू शकतं, असं मानलं जातंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








