टायटॅनिकच्या दिग्दर्शकांनी म्हटलं, पाणबुडी गायब झाल्याचं कळल्यावरच मनात विचार आला की

फोटो स्रोत, Getty Images
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीची वाचण्याची शक्यता कमी असेल, अशी जाणीव आधीच झाली असल्याचं विधान प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी केलं आहे.
1997 साली रिलीज झालेल्या टायटॅनिक या चित्रपटाचं दिग्दर्शन जेम्स कॅमेरून यांनी केलं होतं.
इतकंच नाही तर टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी कॅमेरून हे स्वतः 33 वेळा त्या ठिकाणी गेले आहेत.
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होऊत आतमधील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्याची जगभरात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यातही या पाणबुडीमध्ये बसलेल्या व्यक्तींची नावे पाहिल्यानंतर या प्रकरणाला मोठं वलय प्राप्त झाल्याचं दिसून येतं.
या पाणबुडीत स्वार झालेल्या पाच प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, अब्जाधीश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग, फ्रेंच एक्सप्लोरर पॉल ऑनरी नार्जेलेट, तसंच या टूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख स्टॉकटन रश यांचाही समावेश होता.
या सगळ्या घटनेवर कॅमेरून यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
कॅमेरून यांनी सांगितलं की, जेव्हा रविवारी (18 जून) टायटन पाणबुडी बेपत्ता झाली, तेव्हा आपण एका जहाजावर होतो. त्यानंतर सोमवारपर्यंत (19 जून) या पाणबुडीबद्दल कोणतीही बातमी मिळाली नाही.
जेव्हा पाणबुडी भरकटली आहे आणि तिचा संपर्क तुटला आहे, हे समजलं तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकल्याचंही कॅमेरून यांनी म्हटलं.
“संपर्क तुटल्याचं कळल्यावरच काय झालं असेल याची कल्पना मी केली. या पाणबुडीची संपर्क यंत्रणा बंद झाली होती, ट्रान्सपॉन्डरकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता, इलेक्ट्रॉनिक्स खराब झाले होते- याचा अर्थ एकच होता. ही पाणबुडी नष्ट झाली होती.”
कॅमेरून पुढे सांगत होते- “मी तातडीने याच क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या काही सूत्रांशी संपर्क साधला. त्यानंतर तासाभरातच माझ्याकडे काही माहिती जमा झाली. ते लोक 3500 मीटर खोल गेले होते आणि अजून 3800 मीटर खोल जाण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होता.
या परिस्थितीत त्यांचा संपर्क तुटला होता, त्यांची दिशा भरकटली होती. त्याचवेळी मी म्हटलं की, एकाचवेळी दिशा चुकणं आणि संपर्क तुटणं हे एखाद्या भयंकर अपघातानंतरच होऊ शकतं. पहिला विचार आला ‘इम्प्लोझिशन’चा. (विध्वंसक स्फोट)
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
“या पाणबुडीचं जे शेवटचं माहीत असलेलं लोकेशन होतं, त्याच्याच बरोबर खाली, खोलवर ती असणार. त्याच भागात तिचे अवशेष सापडले आहेत,” असं कॅमेरून यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.
टायटन पाणबुडी आणि त्यातील प्रवाशांचं असं नाहीसं होणं हे ‘भयंकर’ असल्याचं कॅमेरून यांनी म्हटलं. त्यांनी या दुर्घटनेची तुलना 1912 मध्ये झालेल्या टायटॅनिकच्या दुर्घटनेशीच केली.
“पूर्वसूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तशाच पद्धतीने घडलेली ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. ओशनगेट कंपनीला इशारा देण्यात आला होता,” असं त्यांनी म्हटलं.
या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांकडून ओशनगेटला इशारा दिला गेल्याचा दावा कॅमेरून यांनी केला. तुम्ही विध्वंसाच्या दिशेने जात आहात, असं पत्र ओशनगेटला लिहिण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
ओशनगेट कंपनीच्या या टूरिझमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे कॅमेरून हे पहिलेच नाहीयेत.
मार्च 2018 मध्ये मरीन टेक्नॉलॉजी सोसायटीने (एमटीएस) ओशनगेट कंपनीला एक पत्र लिहिलं होतं. न्यू यॉर्क टाइम्सला ते पत्र मिळालं होतं. या पत्रात म्हटलं होतं की, “ओशनगेटकडून सध्या जी प्रायोगिक कार्यपद्धती अवलंबली जात आहे तिचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.”
अमेरिकन कोर्टातील कागदपत्रांनुसार ओशनगेटच्याच एका माजी कर्मचाऱ्याने 2018 मध्येच पाणबुडीमधील सुरक्षाविषयक त्रुटींवर बोट ठेवणारं पत्र लिहिलं होतं.
ओशनगेट कंपनीच्या प्रवक्त्याने सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
विध्वंसक स्फोटाचे संकेत

फोटो स्रोत, Getty Images
रिअर अॅडमिरल जॉन मॅगर यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत जे काही सापडलंय, ते ‘विध्वंसक स्फोटा’च्या शक्यतेला दुजोरा देणारं आहे.
कारण आतापर्यंत पाणबुडीच्या अवशेषांचे दोन ढीग सापडले. एका ठिकाणी टायटन पाणबुडीच्या मागचा भाग, तर दुसऱ्या ठिकाणी टायटनची लँडिंग फ्रेम सापडली. यावरून पाणबुडीचा स्फोट झाला असावा, असे संकेत मिळतात.
ते म्हणतात, “या पाणबुडीमध्ये ब्लॅक बॉक्स नव्हता. त्यामुळे पाणबुडीच्या शेवटच्या ठिकाणची माहिती मिळणार नाही. पण या अपघाताच्या तपासाची प्रक्रिया एखाद्या विमान अपघाताच्या तपासापेक्षा वेगळी असणार नाही.”
प्रत्येक तुकड्याचा तपास होईल
पाणबुडीचे अवशेष समुद्रातून बाहेर काढल्यानंतर तिच्या प्रत्येक तुकड्याची कसून तपासणी केली जाईल.
कार्बन फायबर फिलामेंट्सची दिशा समजण्यासाठी सापडलेले अवशेष मायक्रोस्कोपमधून पाहिले जातील. यातून लहानातल्या लहान खरचटण्याचाही तपास केला जाईल आणि त्यावरून या पाणबुडीच्या अपघाताला सुरुवात कुठून झाली हे कळेल.
संरचनात्मक बिघाडामुळे अपघात झाला का, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तपासकर्ते करतील.
लंडनस्थित इम्पीरियल कॉलेजचे प्रोफेसर रॉडरिक ए. स्मिथ म्हणतात, “कार्बन फायबरच्या उत्पादनादरम्यान अंतर्गत दोष असल्यास त्याने नुकसान होतं. कार्बन फायबर आणि टायटॅनियम यांना जोडणाऱ्या भागांना अत्यंत सखोल पद्धतीच्या चाचणीची आवश्यकता असते.”

फोटो स्रोत, Getty Images
या पाणबुडीला झालेल्या वेगवान स्फोटामुळे म्हणजे अंतर्बाह्य आकुंचन पावल्यानं अपघाताच्या घटनाक्रमाचा मागोवा घेणं कठीण होईल.
स्मिथ म्हणतात, “म्हणूनच ढिगारा बाहेर काढून त्याचे परीक्षण करण्याची गरज आहे.”
या तपासाचं नेतृत्व कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण या प्रकारच्या पाणबुडी अपघातासाठी अद्याप कोणतीही निश्चित प्रक्रिया नाही.
अॅडमिरल मॅगर म्हणतात की, हे खूप गुंतागुंतीचे आहे. कारण ही घटना खोल समुद्रात घडली, ज्यात वेगवेगळ्या देशांचे लोक सामील होते.
मात्र, बचावकार्यात अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या नेतृत्वामुळे अमेरिकी तटरक्षक दलच महत्त्वाची भूमिका बजावू शकतं, असं मानलं जातंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








