समुद्रात 1600 फूट खोलवर जेव्हा दोघे जण 76 तास अडकून राहिले

पाणबुडी अपघात

फोटो स्रोत, PA Media

    • Author, वेनिसा बॅरफोर्ड
    • Role, बीबीसी न्यूज

सुमारे 50 वर्षांपूर्वी दोन ब्रिटिश सैनिक अशाच प्रकारे खोल समुद्रात अडकले होते. त्यांना सुमारे 3 दिवस एका सहा फूटी पाणबुडीत घालवावे लागले होते.

ही घटना आयर्लंड सुमारे 150 मैल अंतरावर घडली होती. दोघांना पाण्यातून बाहेर काढलं तेव्हा त्यांच्या पाणबुडीत केवळ 12 मिनिटांचं ऑक्सिजन उरलेलं होतं.

ही कहाणी आहे पायसीस 3 नामक पाणबुडीची. 29 ऑगस्ट 1973 रोजी रॉयल नेव्हीचे कर्मचारी रॉजर चॅपमन (वय 28) आणि इंजिनिअर रॉजर मॅलिन्सन एका अपघातानंतर अटलांटिक महासागरात खोल बुडाले होते. त्यांना वाचवण्यासाठी 76 तासांची मोहीम राबवण्यात आली होती.

त्या दिवशी काय घडलं?

घटनेच्या दिवशी रॉजर चॅपमन आणि रॉजर मेलिनसन हे आयर्लँडपासून सुमारे 150 मैल अंतरावर अटलांटिक महासागराच्या आतमध्ये टेलिफोन केबल लावण्याचं काम करत होते.

या प्रकरणी बीबीसीने 2013 साली दोघांशी चर्चा केली होती.

चॅपमन म्हणतात, “आम्ही पाण्याच्या आतमध्ये अर्धा मैल प्रतितास वेगाने जायचो. तळाशी पोहोचून पंप आणि जेटच्या मदतीने केबल टाकण्याचं काम केलं जायचं.”

मेलिनसन यांनी म्हटलं, “हे काम करताना खूप थकवा यायचा. असं वाटायचं की दाट धुक्यात आम्ही कोणतं तरी वाहन चालवत आहोत. फक्त पांढरी रेषा पाहून आम्ही पुढे चाललो आहोत, असं वाटायचं.

ते पुढे म्हणतात, “आम्हाला त्यावेळी 26-26 तास सलग काम करावं लागायचं. तेसुद्धा झोप न घेता. या घटनेच्या काही दिवस आधीच आमच्या पाणबुडीला एक छोटा अपघात झाला होता. त्यानंतर त्याची ऑक्सिजन टाकी बदलण्यात आली होती.

पायसिस 3 च्या आत अडकलेले रॉजर चॅपमन

फोटो स्रोत, OTHERS

त्यांनी पुढे सांगितलं, “आमची पाणबुडी एका दोरखंडाच्या साहाय्याने वर ओढली जाण्याची आम्ही प्रतीक्षा करत होतो. आम्हाला दोरखंड आणि बेड्यांचे आवाज येत होते. असं नेहमी व्हायच. पण अचानक आम्ही खाली जात असल्याचं आम्हाला जाणवलं पाणबुडीला जोरदार झटके बसत होते. तो खूपच भयानक अनुभव होता.”

यानंतर आम्ही पाणबुडीतील वीजप्रवाह बंद केला. पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावरून 1575 फूट खाली येऊन थांबली. सुदैवाने यादरम्यान दोन्ही नाविकांना फारशी दुखापत झाली नाही.

शोधमोहीमेस तत्काळ सुरुवात

अपघातानंतर चॅपमन आणि मॅलिनसन यांनी फोन करून तत्काळ मदत मागितली. अपघात झाला त्यावेळी त्यांच्या पाणबुडीत 66 तासांचा ऑक्सिजन शिल्लक होता.

पायसिस 3 पाणबुडी

फोटो स्रोत, PA Media

पायसिस 3 ने मदत मागितल्यानंतर सहयोगी जहाज विकर्स वॉयेगर हे वेळ न दवडता कोर्क शहराच्या दिशेने गेलं.

तिथून पायसिस 3 पाणबुडीच्या जोडीच्याच पायसिस 2 आणि पायसिस 5 या पाणबुड्या घेऊन ते घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर, काही जहाज आणि एका विमानाला परिसरात बचाव पथकाच्या मदतीसाठी तैनात करण्यात आलं.

अवघड बचावकार्य

तीन दिवस चाललेल्या बचावकार्यादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

सुरुवातीला पायसिस 2 पाणबुडीला दोरखंडाच्या साहाय्याने समुद्र तळाशी असलेल्या पायसिस 3 कडे पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण दोरखंड तुटल्याने पायसिस 2 ला माघारी परतावं लागलं.

पायसिस पाणबुडी बचावकार्य

फोटो स्रोत, PA Media

यानंतर पायसिस 5 नामक पाणबुडी दोरीच्या साहाय्याने खाली गेली. काही वेळ शोधाशोध करूनही त्यांना पायसिस 3 चा पत्ता लागला नाही. दरम्यान इंधन संपल्यामुळे पायसिस 5 पाणबुडीलाही वर यावं लागलं.

काही वेळानंतर पुन्हा पायसिस 5 ला खाली पाठवण्यात आलं. यावेळी मात्र पायसिस 5 ला पायसिस 3 पाणबुडीचा सुगावा लागला.

समुद्राच्या तळाशी असलेल्या दोन्ही नाविकांना पहिल्यांदा सांगण्यात आलं की क्वीन एलिझाबेथ यांनी तुम्हाला शुभेच्छा पाठवल्या आहेत.

मॅलिनसन त्या प्रसंगाची आठवण करून सांगतात, “ती अत्यंत बिकट परिस्थिती होती. प्रचंड थंडीत आम्ही कुडकुडत होतो. पण महाराणींच्या संदेशाने आमच्यातील उत्साह पुन्हा जागवला.”

पण नंतर लक्षात आलं की जो संदेश आला होता, तो महाराणी एलिझाबेथ यांच्याकडून नव्हे तर क्वीन एलिझाबेथ-2 नामक जहाजावरून आला होता.

तीन दिवसांनंतर जमिनीवर

अनेक अडचणींना तोंड दिल्यानंतर शेवटच्या क्षणी 1 सप्टेंबर 1973 ला दोघांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं.

चॅपमन आणि मॅलिनसन यांना वाचवण्यात आलं तोपर्यंत त्यांनी पाणबुडीत 84 तास 30 मिनिटे घालवली होती.

चॅपमन म्हणतात, “आम्ही पाण्यात डुबकी घेतली त्यावेळी आमच्याकडे 72 तासांचा लाईफ सपोर्ट होता. त्यामुळे आम्ही कसं तरी करून आणखी काही वेळ काढू शकलो. आम्हाला बाहेर काढलं तेव्हा केवळ 12 मिनिटं पुरेल इतकंच ऑक्सिजन पाणबुडीत शिल्लक होतं.”

या घटनेनंतर रॉजर चॅपमन यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी आपली स्वतःची संरक्षण संबंधित कंपनी सुरू केली. तर रॉजर मॅलिनसन पुढील पाच वर्षे त्याच कंपनीत काम करत होते.

या अपघातात पाणबुडीत अडकलेल्या चॅपमन आणि मॅलिनसन यांची मैत्री आणखी घनिष्ठ झाली. पुढील अनेक वर्षे ते एकमेकांच्या संपर्कात होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)