टायटॅनिकवर खरंच इजिप्शियन ममी, सोनं होतं? या जहाजाबद्दलची 5 मिथकं

बरोबर 110 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. टायटॅनिक या जहाजातून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी तर झोपेतचं होते. त्या अंधाऱ्या रात्री टायटॅनिक हिमनगावर जाऊन आदळलं.
टायटॅनिक इंग्लंडच्या साउथॅम्प्टन येथून 41 किलोमीटर प्रतितास वेगाने अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे जात असताना हा अपघात घडला. अवघ्या तीन तासातच म्हणजे 14 आणि 15 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री टायटॅनिक अटलांटिक महासागरात बुडालं.
असं एक जहाज जे कधीच बुडणार नाही अशा चर्चा असायच्या त्याच जहाजाला जलसमाधी मिळाली. या अपघातात सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला. 110 वर्ष उलटून गेली तरी हा सर्वात मोठा सागरी अपघात मानला जातो.
सप्टेंबर 1985 मध्ये या जहाजाचे अवशेष अपघाताच्या ठिकाणाहून हलवण्यात आले. हा अपघात कॅनडापासून 650 किलोमीटर अंतरावर 3,843 मीटर खोलीवर झाला होता. अपघातात जहाजाचे दोन तुकडे झाले आणि दोन्ही भाग एकमेकांपासून 800 मीटर दूर अंतरावर होते.
या दुर्घटनेला 110 वर्षे उलटून गेली मात्र आजही हा अपघात एक रहस्य आहे. जलसमाधी मिळाल्यानंतर शंभर वर्षांनीही या जहाजाबद्दल अनेक कथा, दंतकथा, मिथकं प्रचलित आहेत.
त्यांपैकी 5 मिथकांची चर्चा या लेखात करूया.
1. टायटॅनिकचा जहाजाला स्पीड रेकॉर्ड बनवायचा होता
टायटॅनिक जहाजाच्या चालक दलाला त्यांच्या पहिल्या प्रवासात स्पीड रेकॉर्ड बनवायचा होता, असं सांगितलं जातं.
पण यात कोणतंही तथ्य नाहीये.
मुळात हे जहाज वेगासाठी बांधलंच नव्हतं. यावरचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली होती. शिवाय या जहाजाने अटलांटिकमधल्या वेगवान जहाजांशी स्पर्धा करणं शक्यच नव्हतं.

2. टायटॅनिक जहाजावर सोन्याची नाणी आणि इजिप्शियन ममी?
टायटॅनिकबद्दल सर्वात जास्त सांगितली गेलेली कथा म्हणजे या जहाजावर एक इजिप्शियन ममी आणि सोन्याची नाणी होती.
पण प्रत्यक्षात या जहाजाच्या मालवाहू सूचीमध्ये सोन्याची नाणी असल्याचा कोणताच उल्लेख आला नव्हता.
'व्हाईट स्टार' नावाचं दुसरं एक जहाज होतं जे एचएमएस लॉरेन्टिक या शिपयार्डमध्ये तयार झालं होतं. या जहाजावर सोन्याची नाणी होती आणि ते 1917 मध्ये बुडालं.
याशिवाय आणखीन एक अफवा म्हणजे या जहाजात इजिप्शियन ममी होती. टायटॅनिक जहाजावर प्रवाशांच्या अतिशय मौल्यवान वस्तू होत्या. जहाज बुडालं तशा या सर्व वस्तू हरवल्या. त्यानंतर अनेक प्रवाशांनी या वस्तूंचे अतिशय तपशीलवार विमा दावे सादर केले. पण यात इजिप्शियन ममीचा उल्लेख नव्हता.
3. टायटॅनिकच्या नामकरणावेळी शॅम्पेनच्या बाटलीचं टोपणच उघडलं नाही
जेव्हा टायटॅनिकची लाँच पार्टी होती तेव्हा शॅम्पेनची बाटली उघडण्यात आली. पण त्यावेळी या बाटलीचं टोपणच उघडलं नाही.
ही गोष्ट 'बॅड लक' म्हणजेच दुर्दैवी असल्याचं म्हटलं गेलं.
पण असं काही घडल्याचा कोणताही पुरावा सापडत नाही. व्हाईट स्टार लाइन जहाजांपैकी एकाही जहाजाचं अशा प्रकारे 'नामकरण' केलेलं नव्हतं.

4. तृतीय श्रेणीतील प्रवाशांना तळघरात बंद केलं होतं
या जहाजावर लाईफबोटची संख्या कमी होती. जहाज जेव्हा हिमनगावर आदळलं तेव्हा लाइफबोटींमध्ये तृतीय श्रेणीतील प्रवाशांना जागा मिळू नये म्हणून त्यांना खालच्या तळघरात बंद करून ठेवलं होतं.
टायटॅनिक सिनेमातही हेच दाखवण्यात आलं होतं. पण ही गोष्टी खरी नव्हती.
जहाजातील तृतीय श्रेणीतून प्रवास करणारे अनेक प्रवासी मरण पावले असले तरी त्यांना लाईफबोटवर जागा नाकारण्यात आली नव्हती.
यातल्याच डॅनियल बर्कले नामक आयरिश व्यक्तीने सांगितलं होतं की, जहाज हिमखंडावर आदळल्याचा आवाज आला तेव्हा मी माझ्या बंकमध्ये झोपलो होतो. आवाज आल्याबरोबर मी डेकवर गेलो.
पायऱ्यांवरून गेल्यावर गेट बंद नव्हतं. मला प्रथम श्रेणीतील प्रवाशाने लाइफबोटवर चढवलं आणि सुरक्षित ठिकाणी नेलं.
5. एका पुरुषाने स्त्रीचा पेहराव केल्याने त्याला लाईफबोटवर स्थान मिळालं
एका वृत्तपत्रात दावा केला होता की, विल्यम स्लोपर नावाच्या एका प्रवाशाने लाइफबोटीवर बसण्यासाठी स्त्रीचा वेश धारण केला होता. खरं तर ही गोष्टच खोटी होती आणि विल्यम स्लोपरने देखील ती गोष्ट कधी मान्य केली नाही.
एडवर्डियन काळात पुरुष हे स्त्रिया आणि मुलांना पुढे पाठवायचे आणि स्वतः मागे राहायचे. कदाचित इथूनच हे मिथक पुढे आलं असेल.
जहाजावरील बरेच पुरुष लाइफबोटवर चढले आणि जवळपास 50% पुरुष बचावले. जहाजावर पुरुषांची संख्या जास्त होती.
(हा लेख प्रथम एप्रिल 2022 मध्ये प्रकाशित झाला होता.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








