इंडिगो विमानात 'अतिरिक्त' प्रवासी आल्यामुळे उडाला गोंधळ, काय आहे प्रकरण?

फोटो स्रोत, ANI
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
मंगळवारी (21 मे) सकाळी मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एक प्रवासी उभ्यानं प्रवास करताना आढळला, पण उड्डाणापूर्वीच हे लक्षात आल्याने त्याला खाली उतरविण्यात आले.
इंडिगोच्या मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या 6E 6543 या विमानात ही घटना घडली. या विमानात एका त्रुटीमुळे एक प्रवासी जास्त आला होता त्यामुळे हा गोंधळ उडाला.
इंडिगोच्या या विमानात एका प्रवाशानं वेळेत चेक इन न केल्याने दुसऱ्या एका प्रवाशाला त्याचे सीट देण्यात आले होते. पण ऐन वेळी दुसरा प्रवासीही आला आणि त्यालाही बोर्डिंग पास मिळाल्यानं विमानात चढला.
विमान उडण्याआधी टॅक्सिंग करत असताना म्हणजे धावपट्टीवर नियोजित जागी जात असताना एक अतिरिक्त प्रवासी विमानात उभाच असल्याचं दिसलं.
विमानातील कर्मचाऱ्यानं तशी माहिती पायलटला दिल्यावर उड्डाण रद्द करून माघारी आणण्यात आले आणि या अतिरिक्त प्रवाशाला उतरवण्यात आले.
त्यामुळे 7:50 वाजता उडणाऱ्या या विमानाने साधारण पाऊण तास उशिरा उड्डाण केलं.
इंडिगोनं या प्रकरणी चूक झाल्याचं मान्य केलं आहे आणि माध्यमांना एक निवेदन दिलं आहे.
एका प्रवाशाची सीट कन्फर्म झालेली असताना या अतिरिक्त प्रवाशाला विमानात कसं चढू दिलं गेलं याचा तपास केला जाईल आणि सुधारणा केली जाईल असं इंडिगोनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI
"प्रवाशांचं बोर्डिंग करण्याच्या प्रक्रियेत एक चूक झाली आणि एका स्टॅंडबाय प्रवाशाला कन्फर्म प्रवाशासाठीची आरक्षित जागा दिली गेली. विमानाचं उड्डाण होण्यापूर्वीच ही गोष्ट लक्षात आली आणि स्टॅंडबाय प्रवाशाला खाली उतरविण्यात आले, ज्यामुळे थोडा उशीर झाला,” असं इंडिगोनं म्हटलं आहे.
"इंडिगो आपली कार्यवाही पद्धत आणखी मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कंपनी प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल खेद व्यक्त करत आहे," असं इंडिगोनी म्हटलं आहे.
याआधी उडाला होता गोंधळ
असा गोंधळ उडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. कधीकधी फ्लाइटचे बुकिंगही जास्त होते. त्याला ओव्हरबुकिंग म्हटले जाते. कधी कधी सीटची अदलाबदल होते. अशा गोष्टी होताना दिसतात.
या घटनेचा ओव्हरबुकिंगशी संबंध नसला तरी सोशल मीडियावर ओव्हरबुकिंग विषयी चर्चा ही होत आहे आणि भीती देखील व्यक्त केली जात आहे. तेव्हा बीबीसी मराठीने तज्ज्ञांशी चर्चा करून ही गोष्ट या ठिकाणी वाचकांसाठी उलगडून दाखवली आहे.
विमान कंपन्या अधिकाधिक सीट्स भरवण्यासाठी शेवटच्या क्षणी काही प्रवासी रद्द करतील असा अंदाज बांधून त्यांच्या सर्व उपलब्ध जागांपेक्षा जास्त जागा विकतात. यालाच 'ओव्हरबुकिंग' म्हणतात. पण कधी कधी सर्व प्रवासी येऊन पोहोचले आणि जागा कमी पडली तर मग काही प्रवाशांना पुढच्या फ्लाइटवर बसण्याची वेळ येते.
'फ्लाइट ओव्हरबुक झाली तर घाबरू नका'
जगभरातील सर्व विमान कंपन्या ओव्हरबुकिंगचा अवलंब करतात आणि ही एक पूर्णपणे कायदेशीर पद्धत आहे. पण तुमची फ्लाइट ओव्हरबुक झाली तर काय कराल?
सर्वप्रथम, विमान कंपनी स्वतःहून प्रवाशांना पुढची फ्लाइट घेण्यासाठी विचारते. जर कोणी पुढच्या फ्लाइटवर जाण्यासाठी तयार होत नसेल, तर मग विमान कंपनी काही प्रवाशांना विमानातून उतरवू शकते.
विमान कंपनी कोणत्या प्रवाशांना विमानातून उतरवते? खरं तर, वेगवेगळ्या विमान कंपन्यांची यासाठी वेगवेगळे निकष असतात. जसं की चेक-इनचा वेळ, दिलेला प्रवासाचा दर, आणि फ्रीक्वेंट फ्लायरचा दर्जा.
पण कधी कधी वाईट प्रसंगही घडतात. जसं अमेरिकेत एका प्रवासीने विमानातून उतरण्यास नकार दिल्याने अमेरिकेत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी भांडण झालं होतं.

फोटो स्रोत, ANI
जर एखाद्या प्रवाशाला विमानातून उतरवले गेले तर, विमान कंपनी त्यांना पर्यायी फ्लाइट पर्याय उपलब्ध करू शकते. या परिस्थितीत वेगवेगळ्या विमान कंपन्या आणि वेगवेगळ्या देशांचे धोरण वेगवेगळे असतात
सर्व विमान प्रवाशांना माहिती असाव्यात या गोष्टी
विमान कंपनी विमानातून उतरवलेल्या प्रवाशांना पर्यायी फ्लाइट उपलब्ध करून देऊ शकते. भारतातील नागरी हवाई वाहतूक नियामक मंडळाने ओवरबुकिंगवर काही नियम केले आहेत.
डीजीसीए च्या नियमानुसार, जर एखादी विमान कंपनी प्रवासींसाठी त्यांच्या मूळ विमानाच्या निश्चित वेळापासून एक तासाच्या आत पर्यायी विमान उपलब्ध करून देते तर त्या प्रवाशांना कोणतीही भरपाई देण्याची गरज नाही.
परंतु, विमान कंपनीने 24 तासांच्या आत पर्यायी विमान सोय उपलब्ध करून दिली नाही तर त्यांनी बुक केलेल्या मूळ रकमेच्या (बेसिक फेअर) 200% तसेच विमान कंपनीच्या इंधन शुल्कासह भरपाई करणे आवश्यक आहे. ही रक्कम जास्तीत जास्त ₹10,000 इतकी मर्यादित आहे.
आपली फ्लाईट ओव्हर बुक आहे हे कसं समजतं?
विमान वाहतूक तज्ञांच्या मते, सुट्ट्यांच्या हंगामात किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये विमानतळांवर सर्वाधिक गर्दी असते त्यावेळी तुमची फ्लाइट ओव्हरबुक होण्याची शक्यता जास्त असते.
ऑनलाइन चेक-इन करण्याची परवानगी नसल्यास तुमची फ्लाइट ओव्हरबुक असण्याची शक्यता असते. कधीकधी विमान कंपन्या पर्यायी फ्लाइट बदल करण्याचा पर्याय देऊन बोनस देतात.











