इस्रायलच्या उत्तर गाझावरील हल्ल्यातून 'शरण या किंवा उपाशी मरा' या युद्धनीतीचे संकेत मिळत आहेत का?

पॅलेस्टाईनच्या आणि मदत संघटनांना अशी शंका आहे की इस्रायल उत्तर गाझामध्ये हळूहळू नवीन युक्ती अवलंबत आहे

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पॅलेस्टाईनच्या आणि मदत संघटनांना अशी शंका आहे की इस्रायल उत्तर गाझामध्ये हळूहळू नवीन युक्ती अवलंबत आहे
    • Author, जेरेमी बोवेन
    • Role, बीबीसी न्यूज आंतराष्ट्रीय संपादक

इस्रायल सैन्याच्या अरेबिक प्रवक्त्याने शनिवारी एक मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला. यात उत्तर गाझातील डी-5 भागात राहणाऱ्या नागरिकांना दक्षिणेकडे जाण्याबाबत इशारा देण्यात आला.

डी-5 हा इस्रायल सैन्याने गाझाच्या नकाशावर निश्चित केलेला एक चौरसाकृती विभाग आहे. यात अनेक लहान भागांचा समावेश आहे.

"इस्रायल सैन्य (आयडीएफ) दहशतवादी संघटनांविरुद्ध पूर्ण ताकदीने लढत आहे आणि दीर्घकाळ असे करत राहील. या भागात असलेल्या आश्रयस्थानांसह घोषित क्षेत्र धोकादायक लढाऊ क्षेत्र मानले जाते. त्यामुळे हा परिसर त्वरीत रिकामा करणे आवश्यक आहे. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी अल-दीन रोडचा वापर करावा.”

यासाठी एक नकाशा जारी करण्यात आला आहे. त्यात डी-5 विभागातून गाझाच्या दक्षिणेकडे जाणारा एक मोठा पिवळा बाण दाखवला आहे.

सलाह अल-दिन रोड हा मुख्य उत्तर-दक्षिण मार्ग आहे. हा भाग मागील वर्षभर होत असलेल्या इस्रायली हल्ल्यांमुळे विस्कळीत झाला आहे. या भागातून लोकांनी परत यावं यासाठी हा संदेश पुरेसा नाही.

या संदेशात दीर्घकाळ मोठी ताकद वापरण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. दुसऱ्या शब्दात हा भाग सोडून गेलेल्या लोकांनी परत येण्याची अपेक्षा करू नका.

इस्रायलने युद्ध प्रभावित नागरिकांना आश्रयासाठी अल-मवासीची निवड केली आहे. अल-मवासी आधीचे रफाहजवळील किनारपट्टीवरील कृषी क्षेत्र आहे.

हा भाग गर्दीने भरलेला आहे आणि गाझाच्या इतर भागांप्रमाणे सुरक्षित नाही. बीबीसी व्हेरिफाईने दिलेल्या माहितीनुसार या भागावर किमान 18 हवाई हल्ले झाले आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हमासने उत्तर गाझामध्ये मागे राहिलेल्या जवळपास 4 लाख लोकांना हा भाग सोडू नका असा संदेश पाठवला आहे. या एकेकाळी हा भाग शहरी केंद्र होते आणि तेथे 14 लाख लोक राहायचे.

इस्रायलने जो भाग सुचवला आहे तोही आधीच्या भागा इतकाच धोकादायक आहे. हा भाग सोडल्यास पुन्हा परत येऊ दिले जाणार नाही, असा इशारा हमासने दिला आहे.

इस्त्रायलकडून सातत्याने हवाई हल्ले आणि तोफगोळे डागले जात असूनही बरेच लोक त्याच परिसरात थांबलेले दिसतात. जेव्हा मी उत्तर गाझातील भागात गेलो तेव्हा मला स्फोट ऐकू आले आणि धुराचे लोट उठताना दिसले. या तीव्रतेने मला युद्धाच्या पहिल्या महिन्याची आठवण करून दिली.

बरेच लोक आधीच उत्तर गाझा सोडून दक्षिणेकडे निघून गेले आहेत. असं असतानाही काही लोक असुरक्षित नातेवाईकांसोबत राहण्यासाठी याच भागात थांबून आहेत.

इतर लोक हमासशी संबंधित व्यक्तिंच्या कुटुंबातील आहेत. युद्ध कायद्यानुसार, मागे राहिलेले हे सर्व आपोआप युद्धात भाग घेणारे ठरत नाहीत.

गाझातील स्थानिक नागरिकांनी गेल्या वर्षभरात इस्रायली सैन्यांच्या कारवाया टाळण्यासाठी एक युक्ती केली. यानुसार इस्रायली सैन्य त्यांच्या घरांजवळ, आश्रय स्थळांजवळ आले की, ते गाझाच्या दक्षिणेकडील गर्दीच्या आणि धोकादायक भागाकडे जाण्याऐवजी बीट हॅनौन ते गाझा सिटी अशा उत्तरेकडील भागाकडे गेले. तसेच इस्रायली सैन्य पुढे गेल्यावर पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी आले.

गाझामधील पॅलेस्टिनींशी दररोज संपर्कात असणाऱ्या बीबीसीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली सैन्य स्थानिक नागरिकांनी गाझ्याच्या उत्तरेत थांबू नये यासाठी प्रयत्न करत आहे.

ते स्थानिकांनी दक्षिणेकडील मुख्य मार्ग सलाह अल-दीनच्या दिशेने जावं यासाठी प्रयत्न करत आहेत.

उत्तर गाझावर इस्रायलने केलेल्या बॉम्ब हल्ल्यातून धूर निघत आहे

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, उत्तर गाझावर इस्रायलने केलेल्या बॉम्ब हल्ल्यातून धूर निघत आहे

इस्रायलकडून पत्रकारांना युद्धाचे वृत्तांकन करण्यासाठी गाझामध्ये प्रवेश करू दिला जात नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीत सैन्याच्या देखरेखीत भेटीचे आयोजन केले जाते.

7 ऑक्टोबरपर्यंत या भागात असणाऱ्या पॅलेस्टिनी पत्रकारांनी आतापर्यंत धाडसी काम केलं.

कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील किमान 128 पॅलेस्टिनी पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर गाझामध्ये इस्रायलने जेव्हापासून हल्ले सुरू केले आहेत तेव्हापासून हे पत्रकार घाबरलेल्या आणि पळून जाणाऱ्या कुटुंबांची स्थिती जगासमोर मांडत आहेत.

त्यांनी चित्रीत केलेल्या व्हिडीओमध्ये स्थलांतरीत होताना लहान लहान मुलं पाठीवर मोठमोठ्या बॅग घेऊन कुटुंबाला मदत करताना दिसले.

या पत्रकारांपैकी एका पत्रकाराने आपल्या लहान मुलाला घेऊन रस्त्यावर धावत असलेल्या मनार अल-बायर नावाच्या महिलेची मुलाखत घेतली. यावेळी ती कधी चालत होती, तर कधी धावत होती.

ही महिला म्हणाली, "त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्याकडे फल्लुजाह शाळा सोडण्यासाठी पाच मिनिटे आहेत. दक्षिण गाझामध्ये हत्या होत आहेत. पश्चिम गाझामध्ये ते लोकांवर गोळीबार करत आहेत. अशावेळी आम्ही कुठे जावं? आता देवच आम्हाला वाचवू शकतो.”

हा प्रवास खडतर आहे. कधीकधी गाझामधील पॅलेस्टिनी लोक म्हणतात की, इस्रायल सैन्याकडून चालणाऱ्या लोकांवर गोळीबार केला जातो.

इस्रायली सैनिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचा आदर करणारे कठोर नियम पाळतात, असा दावा केला जातो.

लाल रेष

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

लाल रेष
इस्रायलच्या संरक्षण दलाने आदेश दिल्यानंतर पॅलेटाईनच्या नागरिकांनी D5 क्षेत्र सोडून गाझा पट्टीच्या दक्षिणेकडे जाण्यास सुरुवात केली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलच्या संरक्षण दलाने आदेश दिल्यानंतर पॅलेटाईनच्या नागरिकांनी D5 क्षेत्र सोडून गाझा पट्टीच्या दक्षिणेकडे जाण्यास सुरुवात केली

दुसरीकडे मेडिकल एड फॉर पॅलेस्टिनियनचे संरक्षण प्रमुख लिझ ऑलकॉक सांगतात की, जखमी नागरिकांनी दिलेल्या पुराव्यानुसार त्यांना लक्ष्य केले गेले आहे.

“जेव्हा आमच्याकडे रुग्णालयात रुग्ण येतात, तेव्हा त्यात स्त्रिया आणि मुलांची संख्या मोठी असते. तेव्हा लढू न शकणाऱ्या वयातील लोकांच्या डोक्यावर, मणक्यावर, हातपायांवर थेट गोळ्या लागलेल्या दिसतात. यावरून त्या लोकांना थेट लक्ष्य करून हल्ला केल्याचं दिसतं," असंही त्यांनी नमूद केलं.

पुन्हा एकदा गाझामध्ये काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र आणि इतर मदत संस्था म्हणत आहेत की, आधीच मानवतावादासाठी संकट ठरलेल्या इस्त्रायली लष्कराचा दबाव वाढत आहे.

उत्तर गाझामधील उर्वरित रुग्णालयांमधून हताश करणारी माहिती समोर येत आहे.

तेथे रुग्णालयातील जनरेटर चालू ठेवण्यासाठी आणि गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना जिवंत ठेवण्यासाठी इंधनाचा तुटवडा आहे. रुग्णालय इमारतींवर इस्रायलकडून हल्ले होत असल्याचंही काही रुग्णालयांकडून सांगितलं जात आहे.

पॅलेस्टिनी नागरिक, संयुक्त राष्ट्र आणि मदत करणाऱ्या संस्थांना असाही संशय आहे की, इस्रायल सैन्य हळूहळू ‘जनरल प्लॅन’ अशी ओळख असणाऱ्या रणनीतीचा वापर करत आहे.

या रणनीतीचा प्रस्ताव इस्रायलचे निवृत्त मेजर जनरल जिओरा आयलँड यांच्या नेतृत्वातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या गटाने दिला आहे. जिओरा माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही आहेत.

या युद्धाला एक वर्ष उलटूनही इस्रायलने हमासचा नायनाट केला नाही आणि ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांनाही मुक्त केले नाही, यामुळे जिओरा आयलँडही बहुतेक इस्रायली लोकांप्रमाणे निराश आणि संतप्त आहेत.

‘जनरल्स प्लॅन’मुळे युद्ध जिंकण्यात येणारे अडथळे संपू शकतात, असं युद्ध समर्थकांना वाटतं.

उत्तर गाझामधील सर्व नागरिकांवर दबाव वाढवून इस्रायल हमास आणि त्याचा नेता याह्या सिनवार यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडू शकतो, असा या जनरल्स प्लॅनचा केंद्र आहे.

याची पहिली पायरी म्हणजे नागरिकांना उत्तर गाझामधील इव्हॅक्युएशन कॉरिडॉर सोडण्याचे आदेश देणे आणि त्यांना गाझाच्या दक्षिणेकडे जाण्यास भाग पाडणे ही आहे.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलने हल्ला केल्यानंतर हाच पूर्व-पश्चिम भाग गाझाची विभाजन रेषा झाला आहे.

गेल्या महिन्यात जबलिया येथील निर्वासितांनी आश्रय घेतलेल्या शाळेवर इस्रायलने हल्ला केला होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या महिन्यात जबलिया येथील निर्वासितांनी आश्रय घेतलेल्या शाळेवर इस्रायलने हल्ला केला होता

जिओरा आयलँड यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलचा उद्देश संपूर्ण गाझा रिकामे करणं हा असला तरी त्यांनी ओलिसांच्या सुटकेसाठी त्वरित करार करायला हवा होता.

आता एक वर्षानंतर यासाठी वेगळ्या पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. त्यांच्या मध्य इस्रायलमधील कार्यालयात त्यांनी ही रणनीती मांडली.

“गेल्या 9-10 महिन्यांमध्ये इस्रायलने गाझाच्या उत्तरेकडील भागाला वेढा घातला आहे. त्यामुळे गाझाच्या उत्तरेकडील भागात अजूनही राहणाऱ्या सर्व 3 लाख रहिवाशांना (संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 4 लाख) हा भाग सोडण्यास सांगितलं पाहिजे. यासाठी त्यांना इस्रायलच्या सुरक्षित कॉरिडॉरमधून जाण्यासाठी 10 दिवसांचा अवधी द्यावा.”

"10 दिवसांनंतर हा सर्व भाग लष्करी क्षेत्र बनेल आणि या भागात उरलेले लोक हमासचे असो किंवा नागरिक असो, त्यांच्याकडे आत्मसमर्पण करणे किंवा उपाशी राहणे असे दोनच पर्याय शिल्लक असतील."

इव्हॅक्युएशन कॉरिडॉर बंद झाल्यावर इस्रायलने हा भाग सील करावा, अशी माजी मेजर जनरल आयलँड यांची इच्छा आहे.

ते म्हणतात की, या भागात मागे राहिलेल्या सर्वांना शत्रू मानले जाईल. या भागाला वेढा घातला जाईल. सैन्य या भागातील अन्न, पाणी किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंचा सर्व पुरवठा रोखेल. यामुळे दबाव असह्य होईल आणि हमास कोसळून इस्रायलला हवा असणारा विजय मिळेल. तसेच ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांचीही सुटका होईल.

मेजर-जनरल (निवृत्त) जिओरा आयलँड

फोटो स्रोत, Oren Rosenfeld/BBC

फोटो कॅप्शन, मेजर-जनरल (निवृत्त) जिओरा आयलँड हे उत्तर गाझावरील कारवाईसाठी काम करणाऱ्या गटाचे नेतृत्व करतात

संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामने म्हटले आहे की, सध्या गाझावरील हल्ल्याचा हजारो पॅलेस्टिनी कुटुंबांच्या अन्न सुरक्षेवर विनाशकारी परिणाम होत आहे.

1 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीमध्ये कोणतीही अन्न मदत पोहोचलेली नाही. हवाई हल्ल्यांमुळे मोबाईल किचन आणि बेकरींना काम बंद करावे लागले आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामचा पाठिंबा असलेल्या आणि उत्तर गाझात सुरू असलेल्या एकमेव बेकरीलाही स्फोटांमुळे आग लागली. दक्षिण गाझातील स्थितीही जवळपास इतकीच बिकट आहे.

इस्रायल सैन्याने अंशतः जनरल्स प्लॅन स्वीकारला की पूर्णपणे स्वीकारला हे स्पष्ट नाही. मात्र, गाझामध्ये इस्रायलकडून होत असलेल्या कारवाईचे परिस्थितीजन्य पुरावे हेच सूचित करतात की, सध्या तरी इस्रायलच्या डावपेचांवर त्याचा किमान प्रभाव आहे. याबाबत बीबीसीने इस्रायल सैन्याला प्रश्नांची यादी पाठवली आहे. त्याची अद्याप उत्तरे मिळाली नाहीत.

बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रिमंडळातील अति-राष्ट्रवादी लोकांना उत्तर गाझामधील पॅलेस्टिनींच्या जागेवर ज्यू लोकांना वसवायचे आहे.

अर्थमंत्री बेझलेल स्मोट्रिच म्हणाले, “आमचे वीर सैनिक हमास या राक्षसाचा नाश करत आहेत. आम्ही गाझा पट्टी ताब्यात घेऊ. खरे सांगायचे तर, जिथे कोणतीही वस्ती नाही, तिथे कोणतीही सुरक्षा नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.