पश्चिम आशिया पेटला आहे, हा संघर्ष कधी संपेल?

- Author, पॉल अॅडम्स
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पश्चिम आशियात एक वर्षापूर्वी वातावरण अतिशय तापलेलं होतं. इस्रायल त्याच्यावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातून सावरत होता आणि गाझावर हल्ले होत होते. तेव्हा हा एक निर्णायक क्षण होता.
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष बराच काळ नजरेआड झाला होता. तो आता पुन्हा ढळढळीतपणे समोर दिसू लागला होता.
या संघर्षामुळे प्रत्येकाला धक्का बसला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेर सुलिवान या हल्ल्याच्या एक आठवडा आधी म्हणाले होते, “गेल्या दोन दशकात जितका शांत नव्हता तितका आता पश्चिम आशियाचा हा भाग शांत झाला आहे.”
एका वर्षांनंतर हा भाग ज्वाळांनी धुमसत आहे.
आतापर्यंत 41,000 पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझातील 20 लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे. वेस्ट बँकेवर 600 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये 10 लाख लोक स्थलांतरित झाले आहेत आणि 2000 पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत.
या हल्ल्याच्या पहिल्या दिवशी 1200 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून गाझामध्ये 350 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीच्या जवळ असलेल्या आणि लेबनॉनच्या अस्वस्थ उत्तर सीमेवर असलेल्या 20 लाख लोकांना आपलं घर सोडण्याची नामुष्की ओढावली आहे. हिजबुल्लाहने केलेल्या रॉकेट हल्ल्यात 50 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
मध्य पूर्वेत आता इतरांनीसुद्धा युद्धात उडी घेतली आहे. हे युद्ध भडकू नये म्हणून अमेरिकेच्या सर्व प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यात राष्ट्राध्यक्षांची भेट, अनेक मुत्सद्दी चर्चा, सैन्य दलांना पाचारण सगळं व्यर्थ ठरलं आहे. इराक आणि येमेनवर सुद्धा रॉकेट हल्ले करण्यात येत आहेत.


एकमेकांचे पारंपरिक शत्रू असलेले इस्रायल आणि इराणमध्येही संघर्ष झाला आहे. तो आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत आहेतच. अमेरिकेची इतकी निष्प्रभता तशी दुर्मिळ आहे.
हा संघर्ष जसाजसा वाढला आहे आणि त्याचा प्रभाव वाढत चालला आहे, तसंतसं त्याचं मूळ कारण दृष्टीआड होत आहे. एखाद्या कारचा अपघात झाला तर आपल्या कारच्या मागच्या आरशात तो दिसतो, आपण जसेजसे पुढे जातो तसा तो अंधूक होऊ लागतो. किंवा एखादा महाकाय रथ वेगाने फक्त मोठा नाश करायलाच पुढे सरकतो अशी परिस्थिती सध्या झाली आहे.
गाझामधील 7 ऑक्टोबरच्या आधीचं आणि नंतरचं आयुष्य तर विसरूनच गेले आहेत. कारण प्रसारमाध्यमांनी सातत्याने संपूर्ण विध्वंसाचा अंदाज बांधत आहेत.
अशीच परिस्थिती इस्रायलच्या नागरिकांची झाली आहे. तिथल्या काही लोकांचं आयुष्य हा हल्ला झाल्यानंतर पूर्णपणे बदललं पण त्याकडे फारसं कुणाचं लक्ष नाही.

फोटो स्रोत, Getty Images
“आम्ही अगदी एका बाजूला फेकले गेलो आहोत,” असं येहुदा कोहेन म्हणतात. त्यांचा मुलगा निम्रोद कोहेनला ओलीस ठेवण्यात आलं होतं. इस्रायलच्या कान न्यूजशी ते बोलत होते. इस्रायलचं शक्य तितक्या सर्व शत्रूंशी जे निरर्थक युद्ध सुरू आहे त्यासाठी ते नेतन्याहूंना दोषी ठरवतात.
“नेतन्याहू शक्य ते सर्वकाही करत आहेत आणि त्यांना मिळालेल्या यशाच्या आड सात ऑक्टोबरला झालेला हल्ला हा क्षुल्लक होता असं दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहे,” ते म्हणाले.
मात्र कोहेन यांच्या मताशी सर्वच इस्रायली लोक सहमत नाहीत. इस्रायलच्या शत्रूंनी हे ज्यू राष्ट्र संपवण्याचा विडा उचलला होता, आणि हमासचा हल्ला ही व्यापक कट प्रत्यक्षात आणण्याची सुरुवात होती असं अनेकांना वाटतं.
इस्रायलने पेजर्सचे स्फोट घडवले, अनेकांना टिपून मारलं, बॉम्ब हल्ले केले, तसंच गुप्त माहितीवर आधारित कारवाई केली. या कारवायांमुळे देशाने काही वर्षांपूर्वी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला आहे असंही अनेकांना वाटतं.
“मध्य पूर्वेत अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायल पोहोचू शकत नाही,” असं वक्तव्य नेतन्याहू यांनी गेल्या आठवड्यात केलं होतं.
7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यानंतर अनेक महिने पंतप्रधान नेतन्याहू यांची निवडणुकीतली लोकप्रियता रसातळाला गेली होती. आता ती पुन्हा वर येत आहे. हा आणखी धाडसी हल्ल्यासाठीचा परवाना तर नाही ना अशी शंका येत आहे.
मग हे सगळं कुठे जातंय?
बीबीसीच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना ब्रिटनचे इराणमधील माजी राजदूत सिमॉन गॅस म्हणाले, “हे सगळं कधी थांबणार आहे आणि त्यावेळी प्रत्येकजण कुठे असेल याची आपल्यापैकी कुणालाच कल्पना नाही.”
या सगळ्यात अमेरिकेचा सहभाग आहेच. यूएस सेंट्रल कमांडचे प्रमुख जन. मिशेल कुरिला यांनी इस्रायलला भेट दिली होती. ही भेट राजनैतिक वाटाघाटीऐवजी आग विझवण्याचे प्रयत्न होते असं वाटतंय.
पुढच्या अगदी महिन्याभरात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. मध्य पूर्वेतलं वातावरण आधीपेक्षा राजकीयदृष्ट्या अधिक गढूळ झाले आहे. त्यामुळे अमेरिका याक्षणी कोणतंही धाडसी पाऊल उचलणार नाही अशी चिन्हं आहेत.
सध्याच्या काळात प्रादेशिक पातळीवर पेटलेला वणवा विझवणं एक मोठं आव्हान आहे.
इराणने मागच्या आठवड्यात केलेल्या बॅलिस्टिक मिसाईल हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायलाच हवं किंबहुना तो त्यांचा हक्कच आहे अशी इस्रायलमध्ये धारणा आहे, इतकंच काय तर इस्रायलच्या मित्रदेशांना सुद्धा हेच वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
या हल्ल्यात एकाही इस्रायली नागरिकाचा मृत्यू झाला नाही. इराणचं लक्ष्य गुप्तहेर संघटना आणि लष्करी तळ होतं. मात्र असं असलं तरी नेतन्याहू यांनी जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याची घोषणा केली आहे.
गेल्या अनेक आठवड्यांपासून इस्रायलच्या पंतप्रधानांना त्यांच्या मोहिमांमध्ये चांगलंच यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे.
इराणच्या लोकांना थेट उद्देशून बोलताना इराणची राजधानी तेहरानमध्ये सत्तापालट होणार असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, “येत्या काही काळात इराण मुक्त होणार आहे. लोकांनी केलेल्या कल्पनेपेक्षा हा क्षण लवकर येणार आहे. सगळं एकदम बदललेलं असेल.”
काही निरीक्षकांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे वक्तृत्व अस्वस्थ करणारे वाटते.
2003 साली इराकवर आक्रमण करण्यापूर्वी अमेरिकेने केलेल्या युक्तिवादाचीच ते आठवण करुन देते.
सध्याच्या परिस्थितीचा धोका कायम असला तरीही अशाही काही गोष्टी आहेत, जे या परिस्थितीची तीव्रता कमी करु शकतात. या गोष्टी कमकुवत असतीलही, पण किमान त्या अस्तित्वात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलशिवायच्या जगाची इराणचे राज्यकर्ते भलेही कल्पना करत असतील, पण इस्रायलशी संघर्ष करणं त्यांच्यासाठी धोकादायक आहे याचीही त्यांना कल्पना आहे. विशेषत: जेव्हा हिजबुल्लाह आणि हमास यासारख्या संघटनांवर हल्ले करण्यात येत आहेत ते पाहता इस्रायलशी युद्ध करणं इतकं सोपं नाही याची त्यांना जाणीव आहे.
आणखी कितीही यश मिळालं तरी इराणने दिलेल्या आव्हानाला तोंड देणं इतकं सोपं नाही हे इस्रायललासुद्धा चांगलंच माहिती आहे.
मात्र सरकार बदलणं हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन किंवा उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा आत्ताच उद्देश नाहीच.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना जून 2019 मध्ये इराणने अमेरिकेचा ड्रोन उद्धवस्त केला होता. हा ड्रोन इराणवर गस्त घालत होता. तेव्हा त्यांनी इराणवर हल्ला करण्याचं ठरवलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी हा निर्णय मागे घेतला.
(मात्र सात महिन्यानंतर इराणच्या लष्कराचा सर्वोच्च अधिकारी कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा आदेश दिला होता.)
मागच्या वर्षी मध्य पूर्वेत गेल्या अनेक दशकांमधला अतिशय धोकादायक क्षण येणार आहे याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
मात्र याच महाकाय रथातून मागच्या आरशात पाहिलं तर गेल्या वर्षांत जे झालं ते भीषण होतं.
या मार्गावर इतकं काही घडून गेलं आहे, आणि आताही गोष्टी धोकादायक पातळीवरच आहेत.त्यामुळे धोरणकर्त्यांना आणि आपल्यालाही या सगळ्याशी जुळवून घेणं कठीण जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गाझामध्ये उद्भवलेलं संकट आता दुसऱ्या वर्षात गेलं आहे. त्यामुळे गाझाचं पुनवर्सन कसं होणार, जेव्हा युद्ध संपेल तेव्हा तिथलं प्रशासन कसं सुरळीत होणार या चर्चा बंद झाल्या आहेत किंवा आता व्यापक युद्धाच्या वातावरणात कुठेतरी गुडूप झाल्या आहेत.
त्याचप्रमाणे इस्रायल आणि गाझामध्ये शांततापूर्ण चर्चा कधी सुरू होणार, हा मुद्दाही मागे गेला आहे. या मूळ संघर्षामुळेच आज ही वेळ आली आहे.
एका क्षणी इस्रायलला असं वाटत असावं की त्यांनी हमास आणि हिजबुल्लाहचं पुरेसं नुकसान केलं आहे. इस्रायल आणि इराणला हवं ते त्यांनी केलं आहे. त्यामुळे आता हे दोन्ही देश या भागाला आणखी संकटात टाकणार नाहीत आणि एकदा का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली राजनैतिक वाटाघाटीला आणखी एक संधी मिळेल.
पण आतातरी ही वाट खूप दूर असल्याचं भासत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











