हमासच्या भीषण हल्ल्याचे 'ते' 6 तास, इस्रायलवर इतिहासातील सर्वात मोठा हल्ला नेमका झाला कसा?

हमासनं सात ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला एक वर्ष झालं आहे.
    • Author, एलिस कडी
    • Role, यरूशलम

हमासनं 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला एक वर्ष झालं आहे.

वर्षभरानंतर देखील इस्रायलच्या इतिहासातील या सर्वात भीषण हल्ल्याबाबत जगभरात तर विविध प्रश्न विचारले जात आहेतच; मात्र खुद्द इस्रायलमध्येही हे प्रश्न विचारले जात आहेत.

त्या दिवशी हमासनं केलेला हल्ला इतका मोठा होता की, इस्रायलच्या शक्तीशाली सैन्याला देखील धक्का बसला होता. फारच थोड्या वेळात हमासच्या सशस्त्र सदस्यांनी हा हल्ला यशस्वी केला होता.

गाझाच्या सीमेवर टेहळणी आणि देखरेख करणाऱ्या इस्रायली सैन्याच्या (IDF) एका चौकीवर त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, यासंदर्भात इस्रायली सैन्याकडून पीडित इस्रायली कुटुंबांना जी माहिती देण्यात आली, ती बीबीसीनं ऐकली आहे.

7 ऑक्टोबर 2023 च्या सकाळी हमासच्या सशस्त्र सदस्यांनी गाझा सीमेवरील इस्रायलची नहाल ओझ सैन्य चौकी ताब्यात घेतली होती.

समोर आलेल्या वृत्तांनुसार, या हल्ल्यात चौकीवरील इस्रायलचे 60 हून सैनिक मारले गेले होते, तर इतर लोकांना हमासनं ताब्यात घेत ओलीस ठेवलं होतं.

तसं पाहता सात ऑक्टोबरला नेमकं काय झालं होतं यासंदर्भातील अधिकृत तपास अहवाल इस्रायली सैन्यानं (IDF) अद्याप प्रसिद्ध केलेला नाही.

मात्र, इस्रायलच्या सैन्यानं त्या दिवशी मारल्या गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना बरीचशी माहिती दिली आहे. सैन्याकडून मिळालेली माहिती यामधील काहींनी बीबीसीला दिली आहे.

सात ऑक्टोबरच्या हल्ल्याबाबत इस्रायली सैन्याच्या अधिकृत वक्तव्यानंतर, या लोकांकडून मिळालेली माहिती सर्वात प्रामाणिक किंवा विश्वसनीय आहे.

बीबीसीनं केलेला तपास

त्या दिवशी घडलेल्या घटना एकमेकांशी जोडून पूर्ण चित्र उभं करण्यासाठी आम्ही हमासच्या हल्ल्यात थोडक्यात बचावलेल्या लोकांशी देखील बोललो.

मारले गेलेल्या लोकांचे संदेश आम्ही पाहिले आहेत आणि हल्ला होत असताना त्याची माहिती देणाऱ्या लोकांच्या आवाजाची रेकॉर्डिंग देखील ऐकली आहे.

या सर्व गोष्टींच्या मदतीनं आम्ही हमासच्या त्या हल्ल्याचा वेग आणि क्रौर्य यांची एक रूपरेखा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या तपासात बीबीसीच्या लक्षात आलं आहे की :

  • गाझामध्ये काय होतं आहे, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सीमेवरील नहाल ओझ सैन्य चौकीवर तैनात असलेल्या तरुण महिला सैनिकांची होती. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक सैनिकांनी सात ऑक्टोबरच्या हल्ल्याआधी गाझा सीमेवर संशयास्पद हालचाली पाहिल्या होत्या.
  • सैनिकांनी पाहिलं होतं की हल्ल्याच्या काही दिवस अगोदर हमासच्या कारवाया अचानक थांबल्या होत्या.
  • हल्ल्याच्या वेळेस चौकीवरील इस्रायलच्या बऱ्याचशा सैनिकांकडे शस्त्र नव्हती. अधिकृत प्रोटोकॉलनुसार हल्ल्याच्या वेळेस या सैनिकांना पुढे जाण्यास सांगण्याऐवजी तिथेच तग धरून राहण्याचा आदेश देण्यात आला होता.
  • गाझावर देखरेख करण्यासाठी लावण्यात आलेली काही उपकरणं त्या दिवशी एकतर बंद पडली होती किंवा हल्ला करताना हमासनं त्यांना सहजपणे नष्ट केलं होतं.
इस्रायल-हमास संघर्ष

फोटो स्रोत, bbc

आम्ही त्या दिवशी झालेल्या हल्ल्याची जी माहिती गोळा केली आहे, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.

यामध्ये एक प्रश्न असाही आहे की सीमेच्या जवळ असलेल्या सैन्याच्या चौकीवर सशस्त्र सैनिकांची इतकी कमी संख्या का होती?

हल्ल्याची गुप्त माहिती आणि इशारे मिळाल्यानंतर देखील त्याला तोंड देण्यासाठी आणखी पावलं का उचलण्यात आली नाहीत?

हल्ल्यात सापडलेल्या सैनिकांची मदत करण्यासाठी आणखी तुकड्या किंवा सैनिकांची कुमक पुरवण्यास इतका वेळ का लागला होता? या तळाची रचनाच अशी होती का, ज्यामुळे इथे तैनात असलेल्या सैनिक, कर्मचाऱ्यांचा बचाव करता आला नाही?

आमच्या तपासातून, पडताळणीतून समोर आलेली माहिती आम्ही इस्रायलच्या सैन्यासमोर ठेवली.

यावर इस्रायली सैन्याचं म्हणणं होतं की अद्याप, नहाल ओझ सैन्य तळासह इतर सर्व ठिकाणी सात ऑक्टोबरला झालेल्या घटना आणि त्या घटनांआधीची परिस्थिती याचा तपशीलात तपास केला जातो आहे.

7 ऑक्टोबरला गाझाच्या सीमेवरील इस्रायली तळांची स्थिती

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सात ऑक्टोबरला शरोन (नाव बदललं आहे) यांनी सकाळी चार वाजता नहाल ओझ चौकीवरील त्यांच्या शिफ्टची सुरूवात केली होती. ही चौकी गाझा सीमेवर लावण्यात आलेल्या मोठ्या लोखंडी कुंपणापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर आहे.

इस्रायली सैन्यात महिला सैनिकांची तुकडी आहे. या तुकडीला हिब्रू भाषेत 'तत्जपिटानियोट' म्हणतात. नहाल ओझ चौकीवर महिलांची ही तुकडी तैनात होती आणि शरोन या तुकडीत होत्या.

या महिला सैनिकांचं काम सीमेवरील कुंपणावर लावण्यात आलेल्या कॅमेराच्या फुटेजवर रेकॉर्डिंगच्या वेळेस लक्ष ठेवण्याचं आणि तिथे होणाऱ्या संशयास्पद किंवा धोकादायक हालचालीवर लक्ष ठेवण्याचं होतं.

सैन्याच्या या चौकीवर असणाऱ्या वॉर रुममध्ये या महिला सैनिक शिफ्टमध्ये काम करायच्या. या वॉर रुमला इस्रायली सैन्यात 'हमाल' असं म्हटलं जातं. महिला सैनिक या वॉर रुममध्ये बसून सीमेवरील कुंपणावर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांवर चोवीस तास लक्ष ठेवून असायच्या.

हमाल किंवा वॉर रुम म्हणजे एक अशी खोली असते, जिला खिडक्या नसतात. याचा दरवाजा खूप मजबूत असतो. त्याचबरोबर हमाल च्या भिंती देखील अतिशय मजबूत असतात. इतक्या की या भिंतींमध्ये स्फोटात तग धरण्याची देखील क्षमता असते.

या वॉर रुमच्या सुरक्षेसंदर्भात अत्यंत कडक कायदे किंवा नियम बनवण्यात आले आहेत.

हल्ल्याच्या वेळेस या चौकीवर तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना इस्रायली सैन्यानं सांगितलं आहे की 7 ऑक्टोबरला इथे तैनात असलेल्या बऱ्याचशा सैनिक, कर्मचाऱ्यांकडे शस्त्र नव्हती.

इस्रायली सैन्याच्या ऑपरेशन डिव्हिजनचे माजी प्रमुख जनरल इस्राएल जिव यांनी बीबीसीला सांगितलं की सीमेलगतच्या भागात तैनात असलेल्या सैनिकांकडे शस्त्र नाहीत, असं त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीही पाहिलं नाही.

जनरल जिव म्हणतात, 'ही गोष्ट समजण्यापलीकडची आहे. शस्त्र हीच तर सैनिकाची ओळख आहे.'

सात ऑक्टोबरला नहाल ओझ चौकीवर जे सशस्त्र सैनिक होते, त्यामध्ये इस्रायली सैन्यातील गौलानी ब्रिगेडमधील एक तुकडी देखील होती.

बीबीसीनं आधी हे वृत्त दिलं होतं की तत्जपिटानियोट तुकडीतील महिला सैनिकांनी सीमेवरील कुंपणापलीकडे होत असलेल्या संशयास्पद हालचालीत वाढ झाल्याची बाब लक्षात आणून दिली होती.

आता आमच्याकडे या गोष्टीची निश्चित माहिती आहे की देखरेख ठेवणाऱ्या महिला सैनिकांनी ही माहिती चौकीवर तैनात असलेल्या वेगवेगळ्या तुकड्यांमधील सैनिकांना देखील दिली होती.

इस्रायली सैन्याचा अहंकार आणि आकलनातील चूक

मात्र, सात ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या काही दिवस आधी सीमेवरील भागांमध्ये एक विचित्र शांतता अनुभवायला मिळत होती. ही परिस्थिती संशयास्पद होती.

नहाल ओझवर तैनात असलेल्या तोफखान्यातील एका सैनिकानं त्या दिवसाबद्दल आम्हाला सांगितलं की 'भीतीदायक वाटेल असं काहीही आम्हाला दिसलं नव्हतं. मात्र सर्वांना असं नक्कीच वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. ही गोष्ट समजण्यापलीकडे होती.'

जनरल इस्राएल जिव म्हणतात की, जे काही घडत होतं, त्याचं आकलन करण्यात इस्रायली सैन्याला अपयश आलं. त्यामागचं सर्वात मोठं कारण इस्रायली सैन्याचा 'अहंकार' होता.

इस्रायली सैन्याला वाटत होतं की, त्यांच्यावर हल्ला करण्याची हमासची हिंमत होणार नाही आणि जरी त्यांनी तशी हिंमत केली तरी त्यात यशस्वी होण्याची क्षमता त्यांच्यात नाही.

जनरल जिव म्हणाले की 6 ऑक्टोबरच्या रात्री आम्ही अशी कल्पना करून झोपलो होतो की सीमेपलीकडे एक मांजर आहे. मात्र पहाट झाली तेव्हा कळलं की तो तर एक नरभक्षक वाघ होता.

म्हणजेच इस्रायली सैन्याला धोक्याचं नीट आकलन झालं नव्हतं. त्यांना वाटत होतं की हमासची फारशी क्षमता नाही आणि आपण त्यांना सहजपणे हाताळू शकतो.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

7 ऑक्टोबर 2023 च्या पहाटे 5:30 वाजता गोलानी ब्रिगेडच्या सैनिकांनी सीमेवरील कुंपणाच्या इकडच्या बाजूनं (इस्रायलच्या बाजूनं) वाहनातून गस्त घालण्याची तयारी सुरू केली.

ते दररोज पहाटे सुर्योदयापूर्वी हे काम करायचे. मात्र त्या दिवशी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सैनिकांना थोडा वेळ थांबवण्याची आणि थोड्या वेळानं गस्त घालण्याची सूचना केली.

गस्त घालणाऱ्या तीन सैनिकांनी बीबीसीला सांगितलं की अँटी-टँक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांनी सध्या गस्त घालणं टाळावं.

अधिकाऱ्यांकडून त्या दिवशी मिळालेल्या आदेशाबद्दल एका सैनिकानं सांगितलं, "आम्हाला धोक्याचा इशारा देण्यात आला होता. आम्हाला सीमेवर लावण्यात आलेल्या कुंपणाच्या अगदी जवळून जाणाऱ्या रस्त्यापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले होते."

21 वर्षांचा शिमोन मलका या गोलानी ब्रिगेडच्या आणखी एका सैनिकानं सांगितलं की, असा धोक्याचा इशारा मिळणं ही खूपच विशेष गोष्ट होती.

मात्र, हे काही पहिल्यांदाच होत नव्हतं. त्यामुळे या इशाऱ्या संदर्भात सैनिकांना फारशी चिंता वाटली नव्हती.

इस्रायली सैन्यातील शिमोन मलका
फोटो कॅप्शन, इस्रायली सैन्यातील शिमोन मलका

इस्रायली सैन्याचे माजी जनरल जिव म्हणतात की, एखाद्या हल्ल्याची शक्यता असल्यास सैनिकांना मागे राहण्यास सांगितलं जाणं, हा सैन्यातील नेहमीचा प्रोटोकॉल आहे. 'सैनिक शत्रूच्या निशाण्यावर येऊ नयेत,' म्हणून असं केलं जातं.

मात्र, त्याचबरोबर ते असंही सांगतात की हमासनं इस्रायलच्या सैन्याच्या या प्रोटोकॉलचा अभ्यास केला होता आणि त्याचा वापर हल्ला करताना केला.

माजी इस्रायली जनरलनं सांगितलं की सैन्याच्या चौकीवर किंवा तळावर अशी व्यवस्था असायला हवी ज्यामुळे गोलानी ब्रिगेडचे सैनिक तिथे सुरक्षित राहून हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकतील.

जनरल जिव म्हणतात की, सैनिकांच्या बचावाचे किंवा संरक्षणाचे खूप सोपे उपाय आहेत. जेणेकरून एकाचवेळी लपून त्यांना स्वत:चा बचाव करता यावा आणि त्याचबरोबर हल्ल्याला प्रत्युत्तर देखील देता यावं. यामध्ये सैनिकांचं शत्रूवरचं लक्ष हटत नाही. शत्रूच्या हालचाली दिसत राहतात.

सीमेवरील कुंपणापासून दूर राहून गोलानी ब्रिगेड पुढील आदेशाची वाट पाहत होती. त्याचवेळी शरोननं पाहिलं की हमासचे सशस्त्र सदस्य सीमेच्या दिशेनं येत आहेत. मात्र शरोननं सांगितलं की ही गोष्ट देखील नेहमीचीच होती, कारण 'ते देखील शिफ्ट मध्येच काम करतात.'

6:20 वाजता : रॉकेट हल्ला

सकाळी 6:20 वाजेपर्यंत हमासनं इस्रायलवर रॉकेटचा मारा करण्यास सुरूवात केली होती.

मात्र, शरोन म्हणतात की सुरूवातीला हा रॉकेट हल्ला देखील धोकादायक वाटला नाही. शरोन यांनी याआधी देखील हमासचे रॉकेट हल्ले पाहिले होते. त्यांच्या चौकीवर देखील अशा रॉकेट हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्याची पूर्ण व्यवस्था होती.

त्या म्हणतात की, 'सर्वसाधारणपणे पलीकडून पाच मिनिटं रॉकेटचा मारा केला जायचा. त्यानंतर मग सर्वकाही शांत व्हायचं.'

मात्र, यावेळेस रॉकेटचा मारा बंद झाला नव्हता.

6:30 वाजता : हमासच्या सशस्त्र सदस्यांनी सीमेवरील कुंपण तोंडलं

शरोन सांगतात की सकाळी साधारण 6.30 वाजता त्यांना हमासचे सशस्त्र सदस्य त्यांच्या दिशेनं येताना दिसत होते.

तत्जपिटानियोट तुकडीनं वॉकी टॉकीवर सैनिकांच्या इतर तुकड्यांना लगेचच त्यासंदर्भातील संदेश पाठवून सावध केलं.

वॉर रुम म्हणजे हमालमध्ये तैनात असलेल्या एका तरुण महिला सैनिकानं भेदरलेल्या आवाजात सर्वांना इशारा दिला की सर्व चौक्यांनी सावध व्हावं. चार लोक कुंपणाच्या दिशेनं पळत येत आहेत. यातील कुंपणाकडे पळणारे दोन जण सशस्त्र आहेत.

बरोबर त्याच वेळी शिमोन मलका यांनी त्यांच्या वायरलेसवर रॉकेट हल्ल्यासाठी वापरण्यात येणारा कोड वर्ड ऐकला.

त्यांच्या कमांडरनं आदेश दिला की त्यांनी लगेच जीपमधून नामेर नावानं ओळखल्या जाणाऱ्या इस्रायली सैन्याच्या चिलखती वाहनात बसावं आणि कुंपणाच्या दिशेनं जावं.

मात्र, शिमोन यांना कुंपणाजवळ कोणतीही हालचाल दिसली नाही आणि त्यांना वाटलं की हा एक सरावाचा भाग आहे.

प्रदीर्घ काळापासून इस्रायलचे सर्व नागरिक आणि सैनिक लोखंडाच्या या तथाकथित भिंतीला अभेद्य मानत आले होते. मात्र, सीमेवरील अनेक चौक्या या कुंपणाला भगदाड पाडल्याची माहिती देत होत्या.

शरोन सांगतात की त्या दिवशी नहाल ओझ चौकीवर तैनात असलेल्या सर्व तत्जपिटानियोट महिला सैनिकांनी पाहिलं की सीमेवरील कुंपणाच्या ज्या भागाची टेहळणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, त्या भागात दोन ते पाच ठिकाणी कुंपण कापून घुसखोरी करण्यात आली होती.

त्यांनी हमासच्या सशस्त्र सदस्यांना लोखंडी कुंपण कापून इस्रायलमध्ये शिरताना पाहिलं होतं.

गाझाच्या सीमेवर टेहळणी करणाऱ्या इस्रायली सैन्याच्या बलूनचा 2021 मध्ये घेण्यात आलेला फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गाझाच्या सीमेवर टेहळणी करणाऱ्या इस्रायली सैन्याच्या बलूनचा 2021 मध्ये घेण्यात आलेला फोटो

निवृत्त जनरल जिव म्हणतात की हमासचे सशस्त्र सदस्य ज्या सहजतेनं कुंपण पार करून इस्रायली सीमेत शिरले, त्यावरून अभेद्य म्हणवल्या जाणाऱ्या या भिंतीमधील कच्चे दुवे उघडपणे समोर आले.

ते म्हणतात की 'तुम्ही देखील पाहिलं, त्याप्रमाणे दोन भरलेले ट्रक या भिंतीला सहजपणे पाडू शकत होते.'

'त्याच्या पुढे कोणतंही सुरक्षा कवच नव्हतं. जर कुंपणापासून 50 ते 60 मीटर अंतरावर अलीकडच्या बाजूस भूसुरुंग पेरण्यात आले असते तर त्यामुळे देखील इतकंच झालं असतं की हमासच्या हल्ल्याला काही तास लांबवता आलं असतं.'

मारले गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना इस्रायलच्या सैन्यानं हल्ल्याबाबत माहिती दिली आहे आणि त्या कुटुंबियांनी ती बीबीसीला दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वाजून 40 मिनिटांच्या आधी नहाल ओझ तळाच्या टेहळणी चौकीवर रॉकेटचा हल्ला झाला. त्यामुळे त्या चौकीचं खूप नुकसान झालं.

इस्रायली सैन्यानं सैनिकांच्या कुटुंबियांना सांगितलं की हल्ला झाल्याची माहिती मिळताच हमाल म्हणजे वॉर रुम मधून स्नायपरशी निगडीत सिस्टमला अॅक्टिव्ह करण्यात आलं.

यातील एक अधिकाऱ्यानं सीमेच्या आत शिरणाऱ्या हमासच्या एका सशस्त्र सदस्यावर लांबूनच निशाणा साधण्याचा देखील प्रयत्न केला.

भूदलाचे अधिकारी देखील हमालमध्ये तैनात असलेल्या तत्जपिटानियोटच्या जवळ पोहोचले. त्या दिवसाबद्दल शरोन सांगतात की एक अधिकारी तर पायजम्यातच वॉर रुम मध्ये पोहोचले होते.

आणि जेव्हा हमासचे सशस्त्र सदस्य देखरेख करणाऱ्या कॅमेऱ्यांवर सतत गोळीबार करू लागले, तेव्हा हमालच्या आत लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या मॉनिटर स्क्रीन एकापाठोपाठ एक बंद पडू लागल्या.

जनरल जिव म्हणतात की या हल्ल्याच्या काही आठवडे आधीपर्यंत सीमेवर हमासचे सदस्य या कॅमेऱ्यांसमोरच त्यांच्या कारवाया करत होते. त्यांनी हे नियोजनपूर्वक केलं होतं.

जेणेकरून इस्रायली सैनिकांना त्यांच्या या कारवाया म्हणजे 'नेहमीच्याच हालचाली' वाटाव्यात.

तत्जपिटानियोट तुकडी जिथे काम करत होती, तिथून फक्त 100 मीटर अंतरावर गाझावर टेहळणी करण्यासाठी इस्रायली सैन्याचं आणखी एक उपकरण लावण्यात आलेलं होतं.

याला बलून म्हणतात. गाझा आणि इस्रायलच्या सीमेवर असे अनेक 'हेरगिरी करणारे बलून' लावण्यात आले आहेत.

ग्राफिक्स

या बातम्याही वाचा :

ग्राफिक्स

नहाल ओझ तळाजवळ लावण्यात आलेल्या बलून वरून टेहळणी करण्यासाठी एलरॉयसह पाच सैनिक तैनात होते.

एलरॉय यांचे वडील रफी बेन शितरिट यांनी बीबीसीला सांगितलं की सात ऑक्टोबरच्या सकाळी रॉकेटच्या स्फोटांच्या आणि सायरनच्या आवाजानं त्यांचा मुलगा झोपेतून जागा झाला होता.

त्यानंतर इस्रायली सैन्यानं प्राथमिक तपासाची आणि संबंधित माहिती एलरॉयच्या कुटुंबाला दिली होती.

नहाल ओझ सीमेवर लावण्यात आलेला बलून द्वारे गाझा मध्ये दूरवर टेहळणी करता येत होती. असं मानलं जातं होतं की हे बलून चोवीस सातत्यानं काम करतात.

मात्र सात ऑक्टोबरला गाझाच्या सीमेवर लावण्यात आलेले तीन बलून काम करत नव्हते. नहाल ओझवरील बलून त्यातलाच एक होता.

रफी बेन शितरिट म्हणाले की नहाल ओझ चा बलून काम करत नव्हता आणि त्या गोष्टीची कोणालाही चिंता नव्हती. त्यांना सांगण्यात आलं होतं की रविवारपर्यंत बलून दुरुस्त करून कार्यरत केला जाईल.

ते म्हणतात की, 'असं वातावरण होतं जणूकाही हमास घाबरलेलं आहे आणि जास्तीत जास्त काय होईल तर दहशतवादी घुसखोरी करतील किंवा काही दहशतवादी हल्ला करतील.'

तर, आपल्या चौकीतून शरोन सातत्यानं आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांशी बोलत होती.

त्या दिवसाबद्दल शरोन म्हणतात की, 'मी रडत रडत बोलत होते.'

शरोन म्हणाल्या की हा भयानक हल्ला होत असताना काही महिला विचलित झाल्या होत्या आणि त्यांना कामावर लक्ष देणं शक्य होत नव्हतं. तेव्हा चौकीवर तैनात असलेल्या कमांडिग ऑफिसरनं त्यांना ओरडून 'गप्प होण्यास' सांगितलं होतं.

कुंपणाजवळ पोहोचलेल्या शिमोन यांनी सांगितलं की ते वायरलेस वर येत असलेल्या आदेशांचं पालन करत होते. त्यांना अजूनही ही गोष्ट लक्षात येत नव्हती की ज्या महिलेचा आवाज त्यांना ऐकू येत होता ती इतकी घाबरलेली का होती.

शिमोन म्हणतात की, 'मला तो तणाव जाणवत तर होता, मात्र मला काहीही दिसत नव्हतं.'

तत्जपिटानियोटनं शिमोन यांना टेकडीवर जाण्यास सांगितलं होतं. टेकडीवर पोहोचताच त्यांना हमासचा ट्रक कुंपण तोडून इस्रायलमध्ये शिरताना दिसला.

शिमोन सांगतात की, 'ते आमच्यावर गोळीबार करू लागले. तिथे बहुधा पाच ट्रक होते.'

हमासचे सशस्त्र सदस्य मोटरसायकलींवर आलेले होते.

मग प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायली सैनिकांनी देखील गोळीबार केला आणि मोटरसायकलवर आलेल्या हमासच्या सशस्त्र सदस्यांच्या दिशेनं चिलखती वाहनं पुढे नेलं.

7:00 वाजता: वॉर रुम पर्यंत पोहोचले हमासचे सशस्त्र सदस्य

सकाळी 7:00 वाजेनंतर थोड्याच वेळात तो क्षण आला, ज्याची सर्वांना भीती वाटत होती. मात्र असं काही घडेल याची कोणीही कल्पना देखील केली नव्हती.

हमासचे सशस्त्र सदस्य नहाल ओझ च्या हमाल म्हणजे वॉर रूमच्या दरवाजापर्यंत पोहोचले होते.

शरोन यांना आठवतं की त्यावेळेस त्यांना सूचना देण्यात आली होती की, 'लगेच उठा, दहशतवादी दरवाजापर्यंत पोहोचले आहेत.'

तत्जपिटानियोटना त्यांच्या खुर्च्या सोडून वॉर रूमच्या आतील बाजूस तयार करण्यात आलेल्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आलं.

निवृत्त जनरल जिव म्हणतात की सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सैन्य तळ, चौक्यांच्या संरक्षणासाठी फार अधिक विचार केला नव्हता. त्याऐवजी त्यांचा सर्व भर गस्त घालणाऱ्या तुकड्यांवर होता.

ते पुढे सांगतात, 'त्या दिवशी झालेल्या संपूर्ण विध्वंसासाठी हे एक प्रमुख कारण होतं. कारण शत्रूनं चौकीपर्यंत पोहोचून त्यांना आश्चर्यचकित केलं होतं. त्यानंतर घडणाऱ्या गोष्टी हाताळण्यासाठी कमांडर सज्ज नव्हते. त्यांची सर्व सुरक्षा यंत्रणा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.'

7:20 वाजता: बॉम्बपासून संरक्षण देणाऱ्या खोलीवर हल्ला

साधारण 7 वाजून 20 मिनिटांनी हमालच्या बाहेर असणाऱ्या बॉम्ब शेल्टरवर हल्ला करण्यात आला. हे हमाल साठीचं सुरक्षा कवच असतं.

त्या जागेच्या आत आश्रय घेतलेल्या अशा महिला सैनिक किंवा तत्जपिटानियोट देखील होत्या ज्यांची त्या दिवशी ड्युटी नव्हती.

त्यावेळेस त्यांचं संरक्षण 'चार महिला सैनिक' करत होत्या. सकाळी सात वाजून 38 मिनिटांनी तिथे आश्रय घेतलेल्या एका तत्जपिटानियोटनं व्हॉट्सअॅपवरून ही माहिती पाठवली होती. बीबीसीनं तो मेसेज पाहिला आहे.

त्या बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घेणाऱ्यांकडून यानंतर कोणताही मेसेज पाठवला गेला नाही.

इस्रायली सैन्यानं त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं की, त्या ठिकाणी फक्त या महिला सैनिकांकडेच शस्त्रं होती. तोपर्यंत त्यांनी हमासच्या सशस्त्र सदस्यांना या बॉम्ब शेल्टर मध्ये शिरण्यापासून रोखून धरलं होतं.

मात्र, एका ग्रेनेड स्फोटात त्यांच्या कमाडंरचा मृत्यू झाला आणि इतर लोक जखमी झाले.

या ग्रेनेड हल्ल्यामुळे जो गोंधळ उडाला त्याचा फायदा घेत 10 सैनिक तिथून पळाले आणि त्यांनी निवासी बॅरेकमध्ये आश्रय घेतला. या 10 सैनिकां व्यतिरिक्त बॉम्ब शेल्टर मध्ये लपलेले उर्वरित सर्व जण एकतर हमासकडून मारले गेले किंवा त्यांना ओलीस ठेवण्यात आलं.

शिमोन आणि त्यांचे कमाडंर त्यांच्या तळाकडे परतले होते. मात्र किती मोठा हल्ला झाला आहे या गोष्टीची त्यांना देखील कल्पना नव्हती.

सैन्य तळावर हमासचा ड्रोन हल्ला

फोटो स्रोत, Telegram

फोटो कॅप्शन, सैन्य तळावर हमासचा ड्रोन हल्ला

इस्रायली सैन्यानं नंतर नहाल ओझ मध्ये मारले गेलेल्या एका सैनिकाच्या कुटुंबाला सांगितलं होतं की त्या सैनिक तळावरील हल्ल्याची सुरूवात ड्रोन हल्ल्याद्वारे करण्यात आली होती.

यानंतर चारी दिशांनी हमासच्या जवळपास 70 सशस्त्र सदस्यांनी नहाल ओझ तळावर हल्ला चढवला होता. त्यानंतर हळूहळू तिथे हमासचे इतर सशस्त्र सदस्य देखील पोहोचत गेले.

गाझा चौकीतून हमासचे हजारो सशस्त्र सदस्य इस्रायलच्या सीमेत शिरले होते.

शिमोन यांनी सांगितलं की ते त्यांच्या तळाकडे परतत असताना त्यांना कल्पना आली होती की हा किती मोठ्या स्वरुपाचा हल्ला आहे.

ते पुढे सांगतात की 'ज्यावेळेस आम्ही आमच्या तळावर पोहोचलो, तेव्हा सर्व काही जळालं होतं.'

हमालच्या आतील बाजूस असणाऱ्या कार्यालयात जवळपास 20 सैनिक लपलेले होते, ते एकमेकांना धीर देत शांत राहण्याचा प्रयत्न करत होते.

या दरम्यान मदतीसाठी ते वारंवार आपल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत राहिले.

शरोन म्हणतात की "मला वाटतं की त्यांच्यातील एकानं बहुधा असं म्हटलं होतं की 'कोणतीही मदत येणार नाही. इथे कोणीच पोहोचू शकत नाही.' मला आठवतं की त्यावर माझ्या अधिकाऱ्यानं म्हटलं होतं की 'आपल्याला मदत नको आहे, आपण इथून निसटण्याची गरज आहे."

8:00 वाजता: इस्रायली ड्रोन पोहोचले

सकाळी 8:00 वाजण्याच्या थोडंसं आधी जिक नावाचं इस्रायली ड्रोन तिथे पोहोचलं होतं. मात्र इस्रायली सैन्यानुसार, त्यांच्या या ड्रोनला इस्रायली सैनिक कोणते आणि हमासचे सशस्त्र सदस्य कोणते हे ओळखण्यात अडचण येत होती.

याचा परिणाम असा झाला की हा ड्रोन शत्रूवर फार धीम्या गतीनं हल्ला करत होता.

जवळपास याच वेळी हमालवर हल्ला सुरू झाला. प्रचंड गोळीबार झाला. ज्यांच्याकडे शस्त्रं होती त्यांनी इमारतीच्या दरवाजांवर मोर्चा सांभाळला आणि हमासच्या सदस्यांना आत येण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले. ही लढाई जवळपास चार तास सुरू होती.

शिमोन सांगतात की या लढाईमध्ये हमासच्या सशस्त्र सदस्यांची संख्या त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा कित्येक पट अधिक होती. शिवाय बाहेरून कोणतीही मदत येण्याची चिन्हे दिसत नव्हती.

सर्व परिस्थिती खूपच अस्पष्ट, धुसर होती.

सकाळी जवळपास 9:00 वाजता गोलानी ब्रिगेडनं नहाल ओझ च्या तळावरील डायनिंग रुमच्या दिशेनं पुढे सरकण्यास सुरूवात केली. तत्जपिटानियोटनं सांगितलं होतं की हमासचे बहुतांश सशस्त्र सदस्य तिथेच लपलेले होते.

नंतर इस्रायली सैन्यानं सैनिकांच्या कुटुंबियांना माहिती दिली होती की सात ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याच्या वेळेस त्या तळावरील इस्रायली सैनिकांच्या तुलनेत हमासचे सदस्य कित्येक पट अधिक होते. इस्रायलच्या प्रत्येक 25 सैनिकांसमोर हमासचे 150 सशस्त्र सदस्य होते.

जनरल जिव म्हणतात की 'त्या दिवशी हमासनं टोळ्यांनी हल्ला चढवला होता.'

इस्रायलमध्ये काम करणाऱ्या भारतीयांचे कुटुंबिय
फोटो कॅप्शन, इस्रायलमध्ये काम करणाऱ्या भारतीयांचे कुटुंबीय

ते सांगतात की, 'त्या दिवशी 70 हून ठिकाणांहून हमासचे सशस्त्र सदस्य इस्रायलमध्ये शिरले होते. जवळपास तीन हजार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. त्यांना ही गोष्ट माहित होती की इस्रायली सैन्याएवढी त्यांच्याकडे शस्त्र आणि उपकरणं नाहीत. यावर उपाय म्हणून त्यांनी मोठ्या संख्येनं सशस्त्र सदस्यांचा वापर करून त्यालाच शस्त्र बनवलं होतं.'

इस्रायली प्रसार माध्यमांनुसार, याच दरम्यान बनवण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये नहाल ओझ मध्ये तैनात असलेले तरुण टेहळणी अधिकारी दिसत होते. या अधिकाऱ्यांना हमासच्या सशस्त्र सदस्यांनी ओलीस ठेवलं होतं.

या व्हिडिओमध्ये एका महिलेचे हात बांधलेले आहेत आणि तिचा चेहरा भिंतीच्या दिशेनं आहे. हमासचा एक सदस्य तिला म्हणतो की, 'तुम्ही सर्व कुत्रे आहेत...तुम्हाला चिरडून टाकू.'

19 वर्षांच्या नामा लेवीनं एक दिवस आधीच या तळावर काम करण्यास सुरूवात केली होती. या व्हिडिओमध्ये रक्तानं माखलेल्या चेहऱ्यानं ती विनवणी करताना दिसते, ती म्हणते, 'पॅलेस्टाईनमध्ये देखील तिचे अनेक मित्र राहतात.'

व्हिडिओमध्ये दिसतं की जवळच उभ्या असलेल्या गाडीपर्यंत महिलांना ओढत नेलं जातं आणि मग ती गाडी तिथून निघून जाते.

नामा च्या आईसाठी हे सर्व पाहणं सहन करण्यापलीकडचं आहे. नामा च्या आई डॉक्टर ऐतलेट लेवी म्हणतात की, 'त्या जखमा. माझी मुलगी जे म्हणत होती आणि दहशतवादी तिला जे बोलत होते. ते सर्व क्षण खूपच भीतीदायक होते.'

जनरल जिव म्हणतात की नहाल ओझ चौकीवर तैनात तत्जपिटानियोटनं 'खूपच शौर्य दाखवलं. चूक सिस्टमची होती. कमांडरांची होती. तत्जपिटानियोटची काहीही चूक नव्हती.'

9:45 वाजता: इस्रायलचे हेलिकॉप्टर पोहोचले

सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सैनिकांच्या शोकाकूल कुटुंबियांना सांगितलं की हमासचा हल्ला सुरू होऊन तीन तासांहून अधिक काळ झाल्यानंतर इस्रायली सैन्याच्या हेलिकॉप्टरनं हमासच्या सशस्त्र सदस्यांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली होती.

या हेलिकॉप्टरनं नहाल ओझ चौकीवर 12 वेळा गोळीबार केला होता.

शिमोन आणि त्यांच्या कमांडरसह सहा जण नहाल ओझ चौकीमधून पायी चालत बाहेर आले. ते म्हणतात की 'त्यांच्यावर चारी बाजूंनी गोळीबार होत होता.'

ऑटोमॅटिक शस्त्रांच्या आवाजामध्ये क्वचितच मधून एक गोळी मारल्याचा आवाज देखील येत होता. त्या आवाजावरून लक्षात येत होतं की हमासचा एखादा स्नायपर सुद्धा त्यांच्यावर गोळी चालवत होता. मात्र तो इस्रायलच्या सैनिकांना दिसत नव्हता.

शिमोन म्हणतात की, 'प्रत्येकवेळी जेव्हा तो स्नायपरनं गोळी मारायचा तेव्हा माझ्या कोणत्यातरी मित्राच्या डोक्यात गोळी लागत होती.'

सिमोन सांगतात की त्यांच्यासोबत लढणाऱ्या सैनिकांमध्ये ते एकटेच होते जे त्या हल्ल्यातून बचावले होते. स्नायपरच्या गोळीतून तेही अगदी थोडक्यात वाचले होते.

शिमोन यांनी सांगितलं की, 'एक गोळी माझ्या डोक्याच्या अगदी शेजारून गेली होती....ती गोळी माझ्या जवळच्या कॉंक्रिटला आदळलेली मला ऐकू आली होती आणि त्यातून जी उष्णता निर्माण झाली होती ती देखील मला जाणवली होती.'

शिमोन यांनी सांगितलं की त्या वेळेपर्यंत त्यांचा वायरलेस बंद पडला होता.

जनरल जिव या हल्ल्याला, 'एक जबरदस्त तुफानी हल्ला' म्हणतात.

हल्ल्याबद्दल ते सांगतात की, 'कित्येक तास सैनिकांना कोणतीही मदत मिळाली नाही, सैनिकांची कुमक पोहोचली नाही. कारण कोणालाच हे माहित नव्हतं की प्रत्यक्षात नेमकं काय होतं आहे आणि कुठे मदत पोहोचवायला हवी.'

शिमोन तिथून निसटण्यात यशस्वी झाले. त्यानंतर ते इस्रायलच्या किब्बुत्जच्या संरक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या सैनिकांची तुकडी सामील झाले होते.

11 वाजता: वॉर रूमवर सुद्धा हल्ला

11 वाजेच्या सुमारास वॉर रूम किंवा हमाल च्या अवतीभोवती अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या.

हमासच्या सदस्यांनी तिथला वीज पुरवठा खंडित केला होता. त्याचा परिणाम असा झाला की वॉर रूमची अत्याधुनिक कुलुपं उघडली गेली. कारण ही कुलुपं वीजेवर चालणाऱ्या सिस्टमद्वारे उघड होती आणि बंद होत होती.

इस्रायली सैन्यानं, सैनिकांच्या कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार, वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे वॉर रूम उघडली गेली. हमासच्या सशस्त्र सदस्यांनी वॉर रूमच्या आत ग्रेनेड फेकले आणि तुफान गोळीबार करण्यास सुरूवात केली.

सैन्यानं सैनिकांच्या कुटुंबियांना सांगितलं की गोलानी ब्रिगेडच्या एक सैनिकाची हमासच्या एका सदस्याशी हातघाईची लढाई झाली. चाकूनं झालेल्या या समोरासमोरच्या लढाईत हमासचा एक सदस्य मारला गेला होता.

आग आणि धूरामुळे नष्ट झालेलं वॉर रूम किंवा हमाल

फोटो स्रोत, Channel 12

फोटो कॅप्शन, आग आणि धूरामुळे नष्ट झालेलं वॉर रूम किंवा हमाल

जनरल जिव म्हणतात की त्या वेळेपर्यंत सैनिक त्यांच्या बचावासाठी वॉर रूमच्या कुलुपाच्या भरवशावर होते. कारण सैन्याचा पहिलं सुरक्षा कवच आधीच निकामी झालं होतं.

इस्रायली सैन्यानं मारले गेलेल्या सैनिकाच्या कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार, 'दहशतवाद्यांनी वॉर रूमध्ये एक ज्वलनशील पदार्थ फेकला आणि मग त्यात आग पेटवून दिली.'

त्या दिवसाच्या घटना आठवताना शरोन सांगतात की, 'आगीमुळे खूप जास्त धूर झाला होता. सर्वांना खोकला यायला सुरूवात झाली. त्यांचा जीव गुदमरत होता. सैनिक बेशुद्ध होऊन पडत होते.'

एका सैनिकाच्या आईनं सांगितलं की त्यांना इस्रायली सैन्यानं माहिती दिली की, 'हल्ल्यामध्ये हमासनं एक विषारी पदार्थ वापरला होता. अर्थात इतर लोकांना या गोष्टीची माहिती नव्हती. तर काहींनी सांगितलं की नंतर इस्रायली सैन्यानं त्यांच्या या माहितीत काही बदल केला होता.'

12:30 वाजता: शरोन आणि इतरजण देखील पळाले

त्या दिवशी तिथे हजर असलेल्या लोकांनुसार, दुपारी साधारण 12:30 वाजता हमाल मध्ये असलेल्या शरोनसह सात जण चाचपडत शौचालयाच्या खिडकीपर्यंत पोहोचले आणि तिथून बाहेर पळाले.

बाहेर पडून शरोनसह त्या सात जणांनी इतर लोकांच्या बाहेर पडण्याची वाट पाहिली. मात्र कोणीही बाहेर आलं नाही. त्या दिवशी नहाल ओझ तळावर तैनात असलेल्या तत्जपिटानियोट पैकी एकट्या शरोन या हल्ल्यातून वाचल्या होत्या.

या तुकडीच्या आणखी एक तरुण महिला सैनिकाचा देखील जीव वाचला होता. कारण ती तिथे तैनात तर होती, मात्र त्या सकाळी तिची ड्यूटी नव्हती.

7 ऑक्टोबर चा दिवस संपेपर्यंत इस्रायली सैन्यानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं होतं. त्या तळावर त्यांनी पुन्हा एकदा नियंत्रण मिळवलं होतं. मात्र त्या दिवशी तिथे तैनात असलेल्या बऱ्याच सैनिकांचा जीव मात्र वाचवता आला नव्हता.

नहाल ओझ तळावर तैनात असलेल्या सात तत्जपिटानियोटांना ओलीस बनवून नेण्यात आलं होतं. तिथे एकीची हत्या करण्यात आली होती. सैनिकांनी एकीची सुटका केली होती आणि पाच अजूनही हमासच्या ताब्यात आहेत.

त्या दिवशी संपूर्ण इस्रायलमध्ये 300 हून अधिक सैनिकांसह जवळपास 1,200 लोक मारले गेले होते. तर 251 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं.

हमासद्वारे संचलित आरोग्य मंत्रालयानुसार, त्यानंतर इस्रायली सैन्यानं गाझामध्ये केलेल्या कारवाईमुळे 41 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

हमाल किंवा वॉर रूममधील जळालेले दोन कॉम्प्युटर

फोटो स्रोत, Channel 12

फोटो कॅप्शन, हमाल किंवा वॉर रूममधील जळालेले दोन कॉम्प्युटर

नहाल ओझ मध्ये मारले गेलेल्या लोकांमध्ये बलूनमधून टेहळणी करणारे एलरॉय आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांचा देखील समावेश होता. त्यांनी हमासबरोबर बराच वेळ लढाई केली होती. एलरॉय यांच्या वडिलांनी सांगितलं की त्यांना ही माहिती इस्रायली सैन्यानं दिली होती.

एलरॉय आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हमासच्या दहा सशस्त्र सदस्यांना मारण्यात यश आलं होतं. मात्र त्या पाच जणांच्या तुलनेत हमासच्या सदस्यांची संख्या खूप जास्त होती.

दुपारी साधारण अडीच वाजेच्या सुमारास एलरॉय आणि त्यांच्या साथीदारांचे मृतदेह एका मोबाईल शेल्टरमधून हस्तगत करण्यात आले होते.

नहाल ओझच्या सैन्य तळावर तैनात असलेल्या सैनिकांसाठीचं सुरक्षित स्थान म्हणून तिथली वॉर रूम तयार करण्यात आली होती. मात्र हमासच्या सशस्त्र सदस्यांनी ती वॉर रूम नष्ट केली होती.

फोटो आणि व्हिडिओमध्ये जळालेली वॉर रूम आणि त्यामध्ये काळ्या पडलेल्या कॉम्प्युटर स्क्रीन्स पाहता येतात. याच स्क्रीनवर तत्जपिटानियोट अत्यंत सतर्कतेनं गाझावर देखरेख करण्याचं काम करायच्या. तिथल्या राखेतून हाडांचे तुकडे देखील हस्तगत करण्यात आले होते.

हल्ल्यात वाचलेल्या, मारले गेलेल्या किंवा ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांच्या कुटुंबियांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. ते प्रश्न म्हणजे, शेवटी हे सर्व झालं तरी कसं? नेमकी काय गडबड झाली? यामध्ये कोणाची चूक होती?

जॉन डॉनिसन आणि नॉओमी श्रेबेल-बॉल यांच्या वार्तांकनासह

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)