अहमदिया मुसलमान : भारतात पंथ स्थापन झाला, पाकिस्तानने गैरइस्लामिक मानलं, सौदीने हजवर बंदी घातली

मुस्लिम एक धर्म असला तरी त्याता अनेक पंथ आहेत. आणि ते एकमेकांपासून वेगवेगळेसुद्धा आहेत.
इस्लाम समाजाचे सर्व अनुयायी स्वत:ला मुसलमान म्हणवतात. मात्र इस्लामचा कायदा (फ़िक़ह) आणि इतिहास याविषयीच्या आकलनानुसार मुसलमान विविध पंथांमध्ये विभागले गेले आहेत.
प्रामुख्यानं मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत. मात्र या दोन्ही पंथांमध्येही असंख्य उपपंथ आहेत.
शिया आणि सुन्नी दोन स्वतंत्र गट असले तरी अल्ला एकच आहे, यावर त्यांचं एकमत आहे. मोहम्मद साहब अल्लाचे दूत असल्याचं हे दोन्ही पंथ मानतात.
कुराण हा पवित्र ग्रंथ अल्लाची देणगी आहे यावर दोन्ही पंथांची श्रद्धा आहे.
मात्र धर्मपालनाच्या विविध पद्धती तसंच पैगंबर मोहम्मद यांच्या निर्वाणानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यासंदर्भात दोन्ही पंथांमध्ये तीव्र मतभेद आहेत.
दोन्ही पंथांचे कायदेकानूनही वेगळे आहेत. पण या सर्व पथांमध्ये एक असा पंथ आहे ज्याला इस्लामिक लोक मुसलामन मानत नाहीत. ज्यांच्या मुलभूत सिद्धांतांवर इतर मुस्लिम पंथ संशय घेतात. त्या पंथाचं नाव आहे अहमदिया.
कोण आहेत अहमदिया मुसलमान?
हनफी इस्लामिक कायद्याचं पालन करणाऱ्या समुदायाला 'अहमदिया' म्हटलं जातं.
या समुदायाची स्थापना भारतातल्या पंजाबमधल्या कादियानमध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती.
मिर्झा गुलाम अहमद, नबी यांचाच अवतार असल्याचं या समुदायाच्या अनुयायींचं म्हणणं आहे.
मिर्झा यांनी नवा शरियतचा कायदा मांडला नाही. पैगंबरांनी सांगितलेल्या शरियतचंच हा समुदाय पालन करतो.
पैगंबरांनंतर जगभरात अल्लानं दूत पाठवण्याची परंपरा बंद झाली यावर मुसलमानांच्या बहुतांशी संप्रदायांमध्ये एकमत आहे.
पण, अहमदिया समुदायाच्या म्हणण्यानुसार मिर्झा यांना नबीचा दर्जा प्राप्त आहे.
या मुद्यावरून मुसलमानांमध्ये तीव्र मतभेद आहेत. मुसलमानांमधील एक मोठ्ठा वर्ग अहमदिया समुदायाला मुसलमान मानतच नाही.
पण, तरीही भारत, पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये या समुदायाच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
पाकिस्तानात अधिकृतपणे अहमदिया समुदायाला इस्लाममधून वगळण्यात आलं आहे. त्यांची लोकसंख्या 40 लाखांच्या आसपास आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांमध्ये त्यांची संख्या सर्वांत जास्त आहे.
हज यात्रोची परवानगी नाही

जगभरातले लाखो मुसलमान हजयात्रा करायला दरवर्षी सौदी अरेबियाला पोहोचतात.
मक्का शहरातल्या काबा या चौकोनी वास्तूला इस्लाममधली सगळ्यांत पवित्र जागा म्हटलं जातं. ही प्राचीन जागा मुस्लीम धर्मीयांसाठी फार महत्त्वाची आहे.
मुस्लीम धर्मीयांच्या पाच स्तभांपैकी एक हज आहे. सगळ्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या मुस्लिमांनी जीवनात एकदा तरी हज यात्रा जरूर करावी, असा नियम आहे.
पण अहमदियांना इतर इस्लामधर्मीय मुस्लीम मानत नाही. सौदी अरेबियाने अहमदियांच्या हज यात्रेवर बंदी घातली आहे.
असं असतानाही जे हज यात्रेसाठी मक्केला जातात त्यांना अटक होण्याची किंवा डिपोर्ट (मायदेशी परत पाठवून देणं) होण्याची भीती असते.
डिपोर्ट होण्याचा धोका
बीबीसीची टीम अशाच एका व्यक्तीला भेटली जिने काही वर्षांपूर्वी लपून-छपून हज यात्रा केली होती.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं, "हजला जाण्यात धोका आहे, हे सतत तुमच्या डोक्यात असतं. पण तुम्ही त्या यात्रेला जाता तेव्हा मनात एक आनंद पण असतो, की तुम्ही अल्लाहसाठी तिथे जात आहात. तुम्हाला अल्लाहसुध्दा मदत करतात कारण त्यांना माहितेय की मी मुस्लीम आहे."
यूकेमधल्या मॅचेंस्टरस्थित दारुल उलूम मशिदीचे इमाम मोहम्मद सांगतात की, "काही देशांनी आणि संघटनांनी आम्हाला बिगरमुस्लीम घोषित केलं आहे. हे त्यांचं मत आहे. पण यामुळे गोष्टी जरा गुंतागुंतीच्या होतात. अहमदियांसाठी हजची यात्रा थोडी कठीण आहे. म्हणून ते जेव्हा हजसाठी जातात तेव्हा जास्त सतर्क असतात."
इमाम मोहम्मद सांगतात, "सहसा लोक विचारत नाहीत की तुम्ही कोणत्या पंथाचे आहात. तिथे आम्ही कुणाला त्रास देत नाही. तिथली परिस्थिती बदलायलाही आम्ही जात नाही आणि कुणाला दुखवायचा आमचा हेतू नसतो."
इमामांना वाटतं की असं सगळं असूनही अहमदिया मुस्लिमांना डिपोर्ट केलं जातं.
"जेव्हा अहमदिया मुस्लिमांना डिपोर्ट करायचा निर्णय घेतला जातो तेव्हाही तुम्ही पाहाल की ते काही विरोध करत नाहीत. कारण आम्ही त्या देशाचाही सन्मान करतो आणि जिथे आम्ही राहतो त्या देशाचाही."
मँचेस्टरच्या या मशिदीत येणाऱ्या अनेकांना त्या लोकांविषयी माहिती आहे जे हजयात्रेला जाऊन आले आहेत. या मशिदीत येणाऱ्या एक महिला सांगतात, "मी कधीही हजयात्रेला गेलेले नाही पण मला जायला आवडेल. माझी खूप इच्छा आहे कारण मी अल्लाहला मानते. मला तो आध्यात्मिक अनुभव घ्यायचा आहे जो मिळवायची इच्छा जगभरातल्या लोकांना आहे."
या मशिदीत येणारी आणखी एक व्यक्ती सांगते, "कधी कधी लोकांना त्यांच्या मनासारख्या गोष्टी करण्यापासून रोखलं जातं. पण त्यांनाही भावना असतात. तुमच्या लक्षात येईल की अहमदिया मुस्लिमांमध्ये हजला जाण्याची तीव्र इच्छा असते."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








