हज यात्रा कशी असते? हजला जाऊन मुस्लीम काय करतात?

हज यात्रा

फोटो स्रोत, Getty Images

हज यात्रेला जाण्यासाठी आतापर्यंत 16 लाख 55 हजार लोक सौदी अरेबियाला पोहोचले आहेत. सौदी अरबच्या पासपोर्ट महासंचालनालयाने सांगितलं की या शनिवारपर्यंत 16 लाख 55 हजार 188 पर्यटक हज यात्रेला पोहोचले आहेत.

महासंचलनालयाने दिलेल्या माहितीनुसार, या एकूण प्रवाशांपैकी 15 लाख 87 हजार 590 लोक विमानाने आले आहेत. त्यापैकी 60 हजार 768 रस्त्याने आणि 6 हजार 830 प्रवाशी समुद्रामार्गे इथे पोहोचले आहेत.

कोव्हिडच्या साथीनंतर पहिल्यांदाच इतके हज प्रवासी कोणत्याही निर्बंधाविना आलेले आहेत.

दरवर्षी जून महिन्यात हज यात्रा होते. जगभरातून लाखो इस्लामधर्मीय हज यात्रेसाठी रवाना होतात.

इस्लाम धर्मात सांगण्यात आलेल्या पाच कर्तव्यांमध्ये हज यात्रेचा समावेश आहे. कलमा, रोजा, नमाज, जकात याबरोबरीने हज यात्रेचा उल्लेख आहे.

धार्मिक मान्यतांनुसार, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुसलमान व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जाण्याचं कर्तव्य निभवायला हवं.

गल्फ न्यूजने दिलेल्या बातमीनुसार 2019 मध्ये 25 लाख भाविकांना हजला भेट दिली. यानंतरच्या दोन वर्षात कोरोनामुळे हज यात्रेला येणाऱ्यांची संख्या मर्यादित करण्यात आली होती. कोरोना संकटाचा धोका लक्षात घेऊन 65 वयापर्यंतच्या भाविकांनाच प्रवेश देण्यात आला होता. मात्र आता हे वयाचं बंधन हटवण्यात आलं आहे.

2022 मध्ये 9 लाख भाविकांनी हजला भेट दिली होती. यामध्ये 7 लाख 80 हजार विदेशी भाविक होते.

हज यात्रा काय आहे?

इस्लाम धर्मात 5 कर्तव्ये (फर्ज) सांगण्यात आले आहेत. त्यापैकी एक कर्तव्य म्हणजे हज होय. याशिवाय, कलमा, रोजा, नमाज आणि जकात ही इतर चार कर्तव्ये आहेत.

इस्लाममधील धार्मिक मान्यतेनुसार, शारिरीक आणि आर्थिकरित्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे.

अल्लाहने एक तीर्थस्थान बनवून समर्पित करण्यासाठी पैगंबर इब्राहिम यांना सांगितलं होतं.

इब्राहिम आणि त्यांचे पुत्र इस्माईल यांनी एक दगडी इमारात बनवली. यालाच काबा संबोधलं जातं. हळूहळू लोकांनी इथे वेगवेगळ्या देवांची पूजा करणं सुरू केलं.पण काबाला पुन्हा पूर्वस्थितीत आणलं जावं. इथे केवळ अल्लाहची प्रार्थना करण्यात यावी, असं इस्लामचे अखेरचे पैगंबर हजरत मोहम्मद (इ.स. 570-632) यांनी म्हटलं.

हज

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे इ.स. 628 पासून पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या 1400 अनुयायांसोबत एक यात्रा सुरु केली. हीच इस्लाममधील प्रथम तीर्थयात्रा मानली जाते.

याच यात्रेमध्ये पैगंबर इब्राहिम यांनी धार्मिक परंपरा पुनःप्रस्थापित केली. यालाच हज म्हटलं जातं, अशी धार्मिक मान्यता आहे.

हज

फोटो स्रोत, Getty Images

यादरम्यान जगभरातील मुस्लीम सौदी अरेबियाच्या मक्का येथे हज यात्रेसाठी दाखल होतात.

हज यात्रा पाच दिवस चालते. ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदला ही यात्रा संपन्न होते.

हज यात्रेसाठी सौदी अरेबियाने विशेष नियोजन केलेलं आहे. यानुसार प्रत्येक देशांना विशिष्ट असा कोटा देण्यात आलेला आहे. इतक्याच संख्येने भाविक यात्रेसाठी जाऊ शकतात.

सर्वाधिक कोटा इंडोनेशियाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर क्रमशः पाकिस्तान, मग भारत, बांगलादेश, नायजेरिया या देशांना भाविकांची संख्या निश्चित करून देण्यात आली आहे.

हज यात्रा

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय, ईराण, तुर्किये, इजिप्तसह इतर अनेक देशांमधून भाविक हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जात असतात.

हजला जाऊन मुस्लीम काय करतात?

हज यात्रेकरू सर्वप्रथम सौदी अरेबियातील जेद्दा शहरात दाखल होतात.

तिथून ते मक्का शहराकडे रवाना होतात. पण मक्केपूर्वी एक विशिष्ट असं ठिकाण आहे, तिथूनच हज यात्रा अधिकृतरित्या सुरू होते.

हज यात्रा

फोटो स्रोत, Getty Images

मक्का शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला मिकात असं संबोधतात.

अहराम

हज यात्रेकरू एक विशिष्ट असा पोशाख परिधान करतात, त्याला अहराम असं संबोधलं जातं. अहराम म्हणजे हे फक्त पांढऱ्या रंगाचं कापड असतं. ते कुठेही शिवलेलं नसतं.

महिलांना अहराम वापरण्याची सक्ती नाही. त्या फक्त पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात आणि आपलं डोकंही पांढऱ्या कपड्याने झाकतात.

अहराम

फोटो स्रोत, Getty Images

उमरा

मक्केला पोहोचून यात्रेकरू सर्वप्रथम उमरा करतात. ही एक छोटा धार्मिक विधी आहे.

उमरा वर्षातून कधीही केलं जाऊ शकतं. पण हजला गेल्यावर लोक सामान्यपणे हा विधी करून घेतात. पण हजचा हा अनिवार्य विधी नाही, याचीही नोंद घ्यायला हवी.

हज यात्रा

फोटो स्रोत, EPA

मीना शहर आणि अराफात मैदान

हज यात्रेची अधिकृत सुरुवात जिल-हिज या मुस्लीम महिन्याच्या 8 तारखेला होते.

8 तारखेला हज यात्रेकरू मक्का आणि सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील मीना शहरात जातात. 8 रोजी रात्री यात्रेकरी मीनामध्ये दाखल होतात. पुढच्या दिवशी म्हणजेच 9 तारखेला अराफात मैदानात पोहोचतात.

हज यात्रा

फोटो स्रोत, Getty Images

या मैदानावर उभे राहून भाविक अल्लाहचं स्मरण करतात. आपल्या गुन्ह्यांबाबत माफीही मागतात.

त्यानंतर संध्याकाळी ते मुजदलफा शहरात जातात. 9 तारखेच्या रात्री त्यांचा मुक्काम मुजदलफा येथेच असतो. 10 तारखेला सकाळी यात्रेकरू पुन्हा मीना शहरात परततात.

जमारात

यानंतर जमारात नामक एक विधी होतो. यात प्रतिकात्मक स्वरुपात सैतानाला दगड मारले जातात.

सैतानाला मारल्यानंतर बाजूला बकऱ्याची कुर्बानी देण्यात येते. इथे पुरुष आपलं मुंडण करून घेतात. तर महिला काही केस अर्पण करतात.

हज

फोटो स्रोत, Getty Images

ईद-उल-अजहा

मुंडण केल्यानंतर यात्रेकरू मक्काला परततात. इथे काबाच्या 7 फेऱ्या मारण्याची परंपरा आहे.

या विधीला तवाफ असं संबोधलं जातं. याच दिवशी म्हणजे जिल-हिजच्या 10 तारखेला संपूर्ण जगातील मुस्लीम नागरिक ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद सण साजरा करतात.

काबा

फोटो स्रोत, Getty Images

तवाफनंतर यात्रेकरू मीना शहरात परततात. तिथं आणखी दोन दिवस राहतात. महिन्याच्या 12 तारखेला यात्रेकरू पुन्हा एकदा शेवटच्या वेळी तवाफ तसंच दुआ करतात. यानंतर हज यात्रा संपन्न होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)