मक्काः हज यात्रा काय असते? लाखो मुसलमान या यात्रेमध्ये काय करतात?

फोटो स्रोत, Getty Images
जगभरातले लाखो मुसलमान दरवर्षी हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात.
सौदी अरेबियामधल्या मक्का शहरात काबा या जागेला इस्लाममधलं सगळ्यांत पवित्र स्थळ मानलं जातं. इस्लाममधली ही प्राचीन धार्मिक जागा मुसलमानांसाठी महत्त्वाची आहे.
हज यात्रेशी संबंधित या काही खास गोष्टी-
हज यात्रा का करतात?
इस्लामच्या एकूण पाच स्तंभांपैकी हज हा पाचवा स्तंभ आहे.
स्वस्थ आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुसलमानांकडून एक अपेक्षा असते की, जीवनात एकदा तरी त्यांनी हज यात्रा केली पाहिजे.
हज यात्रेकडे भूतकाळातली पापं मिटवण्यासाठीचं योग्य स्थान म्हणून पाहिलं जातं.

असं मानलं जातं की, हज यात्रेनंतर एखाद्या व्यक्तीचे सगळे पाप माफ केले जातात आणि तो आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकते.
आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी, अशी बहुतांश मुसलमानांची इच्छा असते. जे हज यात्रेचा खर्च करू शकत नाहीत, त्यांचा खर्च धार्मिक नेते आणि संघटना करतात.
काही मुसलमान असेही आहेत जे आपली जन्मभराची कमाई हज यात्रेसाठी वाचवून ठेवतात. जगातल्या काही भागातले मुसलमान हजारो किलोमीटर चालून काही महिन्यांमध्ये मक्का गाठतात.

मुसलमानांसाठी इस्लामचे पाच स्तंभ खूप महत्त्वाचे आहेत, जे पाच संकल्पांप्रमाणे आहेत.
हे आहेत इस्लामचे 5 स्तंभ
- तौहीद - एक अल्लाह असून मोहम्मद हे त्याने पाठवलेले प्रेषित आहेत. यावर प्रत्येक मुसलमानाचा विश्वास असणं आवश्यक आहे
- नमाज - दिवसातून पाच वेळा नियमानुसार नमाज पढणं गरजेचं आहे
- रोजा - रमजानच्या काळात उपास ठेवावा
- जकात - गरीब आणि गरजूंना दान करणं
- हज - मक्केला जाऊन येणं

हज यात्रेचा इतिहास काय आहे?
जवळजवळ चार हजार वर्षांपूर्वी मक्केचं मैदान पूर्णतः निर्जन होतं.
मुसलमान असं मानतात की, अल्लाहने प्रेषित पैगंबर अब्राहम (ज्यांना मुसलमान इब्राहिम म्हणतात) यांना आदेश दिला की, त्यांनी त्यांची पत्नी हाजरा आणि मुलगा इस्माईल यांना पॅलेस्टाईनमधून सौदी अरेबियामध्ये आणावं, जेणेकरून त्यांची पहिली पत्नी सारा हिच्या ईर्ष्येपासून त्या दोघांना (हाजरा आणि इस्माईल) वाचवता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
मुसलमान असंही मानतात की, अल्लाहने पैगंबर अब्राहम यांना त्या दोघांना आपल्या नशिबावर सोडून द्यायला सांगितलं होतं. त्यांना खाण्याच्या काही गोष्टी आणि थोडं पाणी देण्यात आलं होतं.
काही दिवसांतच हे सामान संपून गेलं होतं. भूक आणि तहानेने हाजरा आणि इस्माईल व्याकूळ झाले होते.
मुसलमानांचं म्हणणं आहे की, हतबल हाजरा मक्का इथल्या सफा आणि मरवाच्या डोंगराळ भागातून मदतीसाठी खाली उतरली.
भुकेने व्याकूळ आणि थकलेली हाजरा खाली कोसळली आणि संकटातून मुक्त करण्यासाठी तिने अल्लाहला साद घातली.
यावेळी इस्माईलने जमिनीवर पाय आपटला तर आतून पाण्याचा झरा फुटून बाहेर आला आणि दोघांचा जीव वाचला.
हाजरा यांनी हे पाणी सुरक्षित केलं आणि खाण्याचं सामान मिळवण्यासाठी या पाण्याचा व्यापार सुरू केला. या पाण्याला आब-ए-जमजम म्हणजेच जमजम विहिरीचं पाणी म्हटलं जातं.
मुसलमान याला सगळ्यांत पवित्र पाणी मानतात. हज यात्रेनंतर यात्रेकरू या पवित्र पाण्याला आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात.
जेव्हा पैगंबर पॅलेस्टाईनहून आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचं कुटुंब एक चांगलं आयुष्य जगत आहे. त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. याच दरम्यान पैगंबर अब्राहम यांना अल्लाहने एका तीर्थस्थळाची निर्मिती करण्यास सांगितली.
पैगंबर अब्राहम आणि अल्लाह यांनी एक छोटी चौकोनी इमारत निर्माण केली. यालाच काबा म्हटलं जातं.
पाण्याच्या स्रोतामुळे मक्केला बरकत
अल्लाहवर आपला विश्वास व्यक्त करण्यासाठी इथे दरवर्षी मुसलमान येतात.
अनेक वर्षांनंतर मक्का एक राहण्याजोगं शहर बनलं आणि याचं एकमेव कारण होतं, ते म्हणजे तो पाण्याचा स्रोत.
हळू-हळू लोकांनी इथे वेगवेगळ्या देवांची पूजा सुरू केली. पैगंबर अब्राहम यांच्यामार्फत बनवल्या गेलेल्या या पवित्र इमारतीत मूर्ती ठेवण्यात येऊ लागल्या.
मुसलमानांची अशी श्रद्धा आहे की, शेवटचे पैगंबर मोहम्मद (570-632) यांना अल्लाहने सांगितलं की, त्यांनी काबाला पुन्हा आधीच्या स्थितीत आणावं, जिथे फक्त अल्लाहचीच भक्ती केली जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
628 मध्ये पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या 1,400 अनुयायींना एकत्र आणत एक यात्रा सुरू केली. ही इस्लामची पहिली तीर्थयात्रा बनली आणि या यात्रेवरून पैगंबर मोहम्मद यांनी धार्मिक परंपरा पुर्नस्थापित केली. यालाच 'हज' असं म्हणतात.
यात्रेकरू हजला जाऊन काय करतात?
हज यात्रेकरू प्रथम सौदी अरेबियामधल्या जेद्दा शहरांत पोहोचतात. तिथून ते एका बसने मक्का शहरांत जातात. पण मक्केच्या आधी एक अशी खास जागा आहे, जिथून खऱ्या अर्थानं हज यात्रा सुरू होते.
मक्का शहराच्या आठ किलोमीटर आधीच ही खास जागा सुरू होते. या विशेष जागेला मिकात म्हणतात.
हजवर जाणारे सगळे यात्रेकरू इथून एक खास पद्धतीचे कपडे परिधान करतात. याला अहराम म्हटलं जातं.
काही लोक बऱ्याच आधापासून अहराम परिधान करतात. काही जण तर अहराम परिधान करूनच विमान प्रवास करतात.
अहराम हा शिवलेला नसतो. महिलांना अहराम परिधान करण्याची आवश्यकता नसते. त्या आपल्या आवडीचे कुठलेही कपडे परिधान करू शकतात. याव्यतिरिक्त हज यात्रेकरूंना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

जसं की,
- या यात्रेदरम्यान पती-पत्नी शरीरसंबंध ठेऊ शकत नाहीत
- आपले केस आणि नखं कापू शकत नाहीत
- अत्तर किंवा कोणतंही सुगंधी द्रव्य लावू शकत नाहीत
- या काळात कुणाशीही भांडण करू शकतनाही. तसंच कोणत्याही जीवाची हत्या करू शकतनाही.

मक्केला पोहोचून मुसलमान पहिले उमरा करतात. उमरा ही एक छोटी धार्मिक प्रक्रिया आहे. हज यात्रा एका विशेष महिन्यात केली जाते. पण उमरा वर्षातून कधीही करता येते. याची सक्तीही नाही. उमराच्या काळात हजमध्ये अनेक प्रकारची धार्मिक कर्म-कांड केली जातात.
अधिकृतरीत्या हज यात्रेची सुरुवात जिल-हिज या इस्लामिक महिन्याच्या आठ तारखेपासून होते. आठ तारखेला यात्रेकरू मक्का शहरापासून 12 किलोमीटर दूर असलेल्या मीना शहरात जातात. आठ तारखेची रात्र यात्रेकरू मीना शहरांत काढतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी यात्रेकरू अराफतच्या मैदानात पोहोचतात. या मैदानात उभे राहून ते अल्लाहचं स्मरण करतात. तसंच आपल्याकडून घडलेल्या पापांची माफी मागतात.
संध्याकाळी यात्रेकरू मुजदलफा शहरांत जातात आणि नऊ तारखेच्या रात्री तिथेच मुक्काम करतात. दहा तारखेला यात्रेकरू पुन्हा मीना शहरांत परततात.
त्यानंतर एका खास ठिकाणी जाऊन ते प्रतिकात्मरीत्या सैतानाला दगड मारतात. त्याला जमारत म्हणतात. अनेकदा यावेळी चेंगराचेंगरी होते आणि अनेकांचा त्यात मृत्यू होतो.
सैतानाला दगड मारल्यानंतर एक बकरी किंवा मेंढीचा बळी दिला जातो. त्यानंतर लोक आपले सगळे केस कापतात तर महिला थोडेसे केस कापतात.
अल्लाहने मागितला मुलाचा बळी, पण...
यानंतर यात्रेकरू मक्केला परततात आणि काबा या पवित्र जागेला सात फेऱ्या मारतात, ज्याला धार्मिक परिभाषेत तवाफ म्हणतात.
या दिवशी किंवा जिल-हिज या पवित्र महिन्याच्या दहा तारखेला सगळ्या जगातले मुसलमान ईद-उल-अजहा किंवा बकरी ईदचा सण साजरा करतात.
बकरी ईद हा सण पैगंबर अब्राहम आणि त्यांचा मुलगा पैगंबर इस्माईल यांच्या आठवणीनिमित्त साजरा केला जातो. मुसलमानांचा हा विश्वास आहे की, पैगंबर अब्राहम यांना एकदा स्वप्नात अल्लाह आले होते आणि अल्लाहने त्यांच्याकडे त्यांचा मुलगा इस्माईल याचा बळी मागितली.

फोटो स्रोत, Getty Images
अल्लाहच्या आदेशानुसार हजरत अब्राहम आपल्या मुलाचा बळी देण्यास तयार झाले.
पण जेव्हा ते आपल्या मुलाच्या मानेवर सुरा फिरवायला गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, अल्लाह फक्त त्यांची परीक्षा घेत होते. तेव्हा मुलाऐवजी त्यांना एका बकऱ्याचा बळी देण्याचा आदेश देण्यात आला.
दरवर्षी मुसलमान अब्राहम आणि इस्माईलच्या या बळी देण्याच्या प्रथेला स्मरणात ठेवत या दिवशी एका बकऱ्याचा बळी देतात.
तवाफनंतर हज यात्रेकरू मीना शहरात परतात आणि दोन दिवस तिथे राहतात.
महिन्याच्या 12 तारखेला पुन्हा काबाला जाऊन तवाफ करतात आणि आशीर्वाद घेतात. अशा रीतीने हज यात्रेची प्रक्रिया पूर्ण होते.
यानंतर हज यात्रेकरू मक्केपासून 450 किलोमीटर दूर मदिना शहरात जातात. तिथे असलेल्या मस्जिद-ए-नबवीमध्ये नमाज पढतात. याचा हज यात्रेच्या धार्मिक प्रक्रियेशी काही सरळ संबंध नाही. परंतु या मशिदीची उभारणी स्वतः पैगंबर मोहम्मद यांनी केली होती, अशी मान्यता आहे. म्हणून याला काबानंतरचं सगळ्यांत महत्त्वाचं धार्मिक स्थळ मानलं जातं.
इथे हजरत मोहम्मद यांची मजार देखील आहे. हज यात्रेकरू त्याचंही दर्शन घेतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








