दोन कुटुंबांमधील शत्रुत्वाची कहाणी, वीस वर्षांपासून धुमसणारं वैर आणि 20 जणांचा मृत्यू

    • Author, सत् सिंग
    • Role, बीबीसी पंजाबीसाठी

रोहतक जिल्ह्यातील करोर गाव 1998 पर्यंत इतर गावांप्रमाणेच सर्वसामान्य गाव होतं.

गावातील रहिवाशांमध्ये असलेली शांतता आणि बंधुभाव यासाठी गाव ओळखलं जात होतं. पण आज ओसाड पडत चाललेल्या या गावात घुबडांचे घुत्कार ऐकू येतात.

गावातील अर्ध्याहून अधिक रहिवासी गाव सोडून गेले आहेत.

आपली मुलं सुरक्षित राहावीत म्हणून इथल्या लोकांना लवकरात लवकर गाव सोडून इतर ठिकाणी किंवा जवळच्या शहरात निघून जायचं आहे.

गावामध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीमागचं कारण आहे दोन कुटुंबांमधील शत्रुत्व.

जवळपास 20 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या वाद आणि वैरामुळं जो हिंसाचार झाला त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

आतापर्यंतचा विचार करता दोन्ही गटांच्या जवळपास 20 जणांचा यात मृत्यू झाला आहे.

पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत करोर गावामध्ये 16 हत्यांच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

हे वैर आहे छाजू आणि छिप्पी या दोन कुटुंबांमधलं.

छाजू गट हा छाजूराम यांच्याशी संबंधित आहे. या संघर्षामध्ये आतापर्यंत छाजूराम यांच्या सातपैकी सहा मुलांची हत्या झाली आहे.

दिवाळीच्या दिवशीच हत्या

दिवाळीच्या दिवशी 12 नोव्हेंबर रोजी एका गटाच्या व्यक्तीनं दुसऱ्या गटाच्या व्यक्तीची हत्या केली.

12 नोव्हेंबरला दिवाळीच्याच दिवशी छिप्पी यांच्या बाजूच्या मोहित नावाच्या एका व्यक्तीची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.

या सर्वामुळं गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.

'मोहितच्या हत्येनंतर परत आले मारेकरी'

दिवाळीच्या दिवशी जवळच्या शहरातून खतं आणि बियाणे घेऊन आलो होतो, असं मोहितच्या वडिलांनी सांगितलं.

जेव्हा त्यांनी ट्रॅक्टरमधून सामान काढण्यासाठी मोहितला बोलावलं तेव्हा अचानक अनेक जणांनी मोहितला घेराव घातला आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या, असं ते म्हणाले.

"त्यांनी आधी गोळीबार केल्यानंतर ते परत आले आणि जोपर्यंत मोहीत ठार झाल्याची खात्री पटली नाही तोपर्यंत ते गेले नाहीत," असंही ते म्हणाले.

"डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू होताना पाहणं, यापेक्षा एका पित्यासाठी आणखी काय वाईट असू शकतं."

गावातील इतर कोणी व्यक्ती या संघर्षाचा किंवा शत्रुत्वाचा बळी पडू नये, अशी विनंती पोलिसांना आणि प्रशासनाला केली असल्याचंही ते म्हणाले.

एप्रिल 2018 मध्ये छाजू यांचा मुलगा आनंद यांची छिप्पी गटातील लोकांकडून हत्या करण्यात आली होती.

त्या हत्या प्रकरणात मोहितला अटक झाली होती.

आनंदच्या ठावठिकाण्याबाबत मोहितनं माहिती गोळा केली होती, असे आरोप या प्रकरणात मोहितच्या विरोधात होते.

आता मोहित यांच्या हत्येच्या प्रकरणातच श्रीभगवान, मलिकित आणि इतरांची नावे समोर आली आहेत.

मोहितच्या वडिलांनी त्यांचा मुलगा निरपराध होता असं म्हटलं आहे.

गावकरी काय म्हणतात?

आम्ही या गावामध्ये पोहोचलो तेव्हा गावातील लोक बोलायला घाबरत होते.

काही बोलल्यास आपणही कुणाच्यातरी निशाण्यावर येऊ, अशी भीती गावकऱ्यांना वाटत आहे.

एका गावकऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बोलायची तयारी दाखवली. ते म्हणाले की, 20 वर्षांपूर्वी या दोनपैकी एका कुटुंबातील एका व्यक्तीनं दुसऱ्या कुटुंबातील एका लहान मुलाला दोन थप्पड मारल्या होत्या.

त्यानंतर दुसऱ्या कुटुंबानं त्या रागातून थप्पड मारणाऱ्याची हत्या केली.

त्यावेळी छिप्पी कुटुंबातील सदस्य हे कमी वयाचे किंवा अल्पवयीन होते. पण ते जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांनी छाजुराम यांच्या गटातील लोकांना मारणं सुरू केलं.

गावकऱ्यांच्या मते, त्यांच्या गावातील रस्ते दिवसाही निर्जन आणि सामसूम असतात. तसंच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण असल्यासारखं आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.

गावकऱ्यांनी सांगितलं की, छाजू कुटुंबातील लोक इतरांचा छळ करायचे.

1998 मध्ये जून महिन्यात एका विवाहाच्या कार्यक्रमादरम्यान एक नवरदेव त्यांच्या घरासमोरून घोड्यावरून जात होता त्यावेळी छाजू कुटुंबानं गोळ्या झाडल्या होत्या.

यावेळी नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला होता.

शत्रूत्वाची सुरुवात कधी झाली?

दोन्ही कुटुंबांमध्ये है वैर 2001 पासून सुरू झालं.

छाजू यांचा मुलगा रोहताश आणि अनिल(छिप्पी) यांचे काका एकत्रितपणे अवैध दारुचा व्यवसाय करत होते.

काही कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी रोहताश यांचे भाऊ श्रीभगवान गावाचे सरपंच होते.

श्रीभगवान यांनी वादात भावाची बाजू घेतली आणि रमेश यांच्याबरोबर गैरवर्तन करत त्यांना शिविगाळही केली.

हा वाद एवढा विकोपाला गेला की, छिप्पी कुटुंबानं रोहताश यांचा भाऊ शिलक याची जानेवारी 2002 मध्ये खारवाड रेल्वे स्थानकावर गोळ्या घालून हत्या केली.

त्यावेळी रमेश आणि ईश्वर यांना अटक झाली होती.

गावाबाहेर रोहतकमध्ये राहणारे जसवीर सिंग म्हणाले की, गावाबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी हे छाजू आणि छिप्पी आहेत. पण ही कहाणी त्यांच्याशी संबंधित लोकांबाबतची आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, "गावात एकमेकांच्या मदतीशिवाय काहीही काम होऊ शकत नाही. संपूर्ण गाव हे एका मोठ्या कुटुंबासारखं असतं. त्यामुळं लोक कोणत्या तरी गटाच्या बाजूनं जातात, आणि त्यामुळं मृत्यू होतच आहेत."

एकामागून एक हत्यांचे सत्र

फेब्रुवारी 2002 मध्ये शिलकच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी छाजू गटाच्या मारेकऱ्यांनी गावात राहणाऱ्या तीन जणांची हत्या केली.

ते तिघे होते जय नारायण, रामचंद्र आणि रमेश.

या सर्व वैराचा परिणाम म्हणजे सोनिपत जिल्ह्याच्या नाहरी गावातील रहिवासी असलेले ईश्वर (छिप्पी गटातील) यांची हत्या करण्यात आली.

जून 2022 मध्ये अनिल छिप्पी यांचे वडील रामनिवास यांची छाजू गटाकडून हत्या करण्यात आली.

रोहतक कारागृहात भाऊ रमेशला भेटायला आलेले असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

जुलै 2003 मध्ये अनिल छिप्पी यांचे काका रमेश यांची छाजू गटाकडून गोहानामध्ये हत्या करण्यात आली.

1998 ते 2023 दरम्यान झालेल्या 14 हत्यांमध्ये छाजू गटाचा सहभाग होता. त्यापैकी 10 जणांची पोलिसांमध्ये नोंद आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, छाजू गटाच्या विरोधात हत्येच्या 10 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी सात प्रकरणांत त्यांना मुक्त करण्यात आलं आहे तर दोन प्रकरणांत शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दिवाळीला झालेल्या मोहित यांच्या हत्येप्रकरणीही गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या मते, छाजू गटाच्या विरोधात एकूण 23 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

दुसरीकडं अनिल छिप्पी गटाचा 2002 पासून आतापर्यंत 9 हत्यांमध्ये सहभाग आहे.

अनिल छिप्पी गटातील सदस्यांच्या विरोधात हत्येच्या कलमाखाली 6 तर इतर कलमांखाली चार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

'जे शहाणे आहेत ते गाव सोडून जातात'

गावातील लोकांनी आमच्याशी बोलताना सांगितलं की, मुलांच्या सुरक्षिततेसाठी गावापासून दूर जाऊन राहण्यातच आपलं भलं आहे, असं त्यांना वाटतं.

60 वर्ष वय असलेले करण सिंग यांनी काही वर्षांपूर्वीच गाव सोडलं होतं. त्यानंतर नुकतेच आता ते गावात परत आले आहेत.

छाजूराम यांच्या मुलांनी 20 वर्षांपूर्वी त्यांच्यावरही गोळीबार केला होता, त्यामुळं त्यांनी गाव सोडलं होतं असं सांगितलं.

"20 वर्षांनंतरही गावामध्ये काहीही बदलेलं नाही."

पोलिसांचं काय म्हणणं आहे?

दोन्ही कुटुंबातील लोक आता गाव सोडून गेले आहेत, असं बीबीसीबरोबर बोलताना पोलिस कॅप्टन हिमांशू गर्ग यांनी सांगितलं.

"अनिल छिप्पी तिहार तुरुंगात कैदेत आहे. त्यांच्याविरोधात हरियाणा आणि रोहतकमधील अनेक पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. करोर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी रोहतक पोलिसांचे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत."

गावातील प्रमुख व्यक्तींबरोबर चर्चा केली जात असून आजुबाजुच्या गावातील सरपंचांचाही या चर्चांमध्ये समावेश केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

गावात 24 तासांसाठी पोलिस तैनात करण्यात आले असून संशयास्पद व्यक्तीवर ते डोळा ठेवून आहेत, असंही ते म्हणाले.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)