धावत्या रेल्वेत तरुणीशी लगट करणाऱ्यास अटक, पण सुप्रिया सुळेंच्या ट्वीटमुळे वाद

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून धावणाऱ्या एका लोकल रेल्वेत तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
रेल्वे पोलिसांनी यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी करून कारवाईची माहिती दिली. पण दुसरीकडे या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलेल्या दाव्यावरून खळबळ माजली आहे.
संबंधित प्रकरणावरून राज्य सरकावर टीका करताना लोकल रेल्वेत मुलीवर बलात्कार झाल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला होता.
पण, पोलीस आयुक्तालय लोहमार्ग यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ‘लगट’ असा शब्दप्रयोग करण्यात आल्याने नागरिकांमध्ये या कारवाईबाबत संभ्रमावस्था आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा प्रकार काल (बुधवार, 14 जून) सकाळी 7.26 वाजताच्या पनवेल स्लो लोकल रेल्वेत घडला.
लोकलमध्ये एक 20 वर्षीय तरुणी महिला राखीव डब्यात एकटी बसली होती. गाडी सुरू होताच एका अज्ञात व्यक्तीने त्या डब्यात प्रवेश केला. त्याने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने आरडा-ओरडा केल्याने मस्जिद रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच आरोपी खाली उतरून पळून गेला.
यानंतर तरूणीने दुसऱ्या डब्यात जाऊन इतर प्रवाशांना याबाबत माहिती दिली. सहप्रवाशांनी याची माहिती रेल्वे पोलीस हेल्पलाईन 1512 वर संपर्क साधून माहिती दिली. मुलीच्या तक्रारीनंतर सदर गुन्ह्याच्या तपासाकरिता CSMT रेल्वे पोलिसांनी 4 पथके तयार केली.
संशयित आरोपीला पोलिसांनी 4 तासांत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांनी काय म्हटलं?
रेल्वे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना माहिती दिली.
ते म्हणाले, “या प्रकरणात आरोपीने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने त्यातून स्वतःची सुटका करून घेतली.”

“या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अतिशय प्रोअक्टिव्हली कारवाई केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. महिला पोलीस अधिकारी मुलीच्या कॉलेजमध्ये गेल्या. तिथून तिच्याकडून अधिक माहिती घेण्यात आली. तक्रारदार तरुणी पोलीस स्टेशनला येण्याच्या आधीच सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीची ओळख पटवण्यात आली.”
तक्रार दाखल झाल्यानंतर दोन तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
संबंधित घटनेची माहिती समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तत्काळ ट्विट करून त्याकडे लक्ष वेधण्याच्या प्रयत्न केला.

फोटो स्रोत, twitter
त्या म्हणाल्या, “संतापजनक, चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे.”
सुळे यांच्या या ट्विटवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
अजित पवार यांची टीका
राज्याचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीही महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले, "मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थीनी अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थीनीसोबत सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती? याला कोण जबाबदार आहे? सुरक्षाव्यवस्था असती तर एका विद्यार्थीनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता."
चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया येताच भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
त्या म्हणाल्या, “अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो पण लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठ्ठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती."

फोटो स्रोत, TWITTER/@ChitraKWagh
"तुम्ही मुलीवर लोकल रेल्वेत बलात्कार झाल्याचं ट्विट केलंय पण तसं काहीच घडलं नाही. नाहक मुलीची बदनामी करू नका. त्या आरोपीनं मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल त्याला अटक केली, ही वस्तुस्थिती."
"आपण रेल्वे पोलिस आयुक्त यांच्याकडूनही माहिती घेऊ शकला असता. पण ते न करता बलात्कार झाला म्हणत ट्वीट केलंत.तुमच्या या वक्तव्यामुळे खोट्या बातम्यांचा आणि अफवांचा सुकाळ होण्यास हातभार लागणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अफवा पसरवू नका आणि माझी संपूर्ण जनतेला विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका."
"अत्याचार करण्याचा प्रयत्न असेल किंवा अत्याचार हे दोन्ही गंभीर आहे. महिला सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाहीच, लोकल मध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देणं ही रेल्वे पोलिसांची जबाबदारी आहे, त्यापासून पळ काढता येणार नाही."
"या निमित्ताने रेल्वे हेल्पलाईन आणि लोकल मधील महिलांबाबतचे गुन्हे याचं ॲाडीट करणं गरजेचं आहे व ते येणाऱ्या दिवसात नक्कीच होईल, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








