नाना शंकरशेट : मुंबईला 'रुळावर' आणणारे जगन्नाथ शंकरशेट कोण होते?

नाना शंकरशेट

फोटो स्रोत, Twitter

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

167 वर्षांपूर्वी, 16 एप्रिल 1853 रोजी, दुपारी साडेतीन वाजता 21 तोफांची सलामी स्वीकारत मुंबईतील बोरिबंदरहून (आताचं CSMT) ठाण्याच्या दिशेनं भारतातील पहिली रेल्वेगाडी ट्रॅकवरून धावली.

मुंबई ते ठाणे हा 32 किलोमीटरचा प्रवास या रेल्वेनं 57 मिनिटांत पूर्ण केला.

पहिल्या रेल्वे प्रवासात तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांची पत्नी लेडी फॉकलंड यांच्यासह 400 प्रवासी होते. त्यात ब्रिटीश अधिकारी, स्थानिक जमीनदार, मुंबईतील प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश होता.

या रेल्वेतल्या एका कंपार्टमेंटला फुलांनी सजवलं होतं. यात बसण्याचा मान मोजक्याच लोकांना होता, त्यातले एक होते - जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ 'नाना शंकरशेट'.

इंडियन रेल्वे असोसिएशनच्या स्थापनेसाठी प्रयत्न

सप्टेंबर 1830 मध्ये इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मँचेस्टर या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकरशेट यांना समजली आणि त्यांनी अशी गाडी आपल्या शहरातही हवी, असा ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेत जोमानं काम करण्यास सुरुवात केली.

त्यांनी मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना पहिल्यांदा त्यांचेच मित्र जमशेटजी जिजिभोय यांच्याकडे मांडली.

या दोघांनी मिळून 1845 साली 'इंडियन रेल्वे असोसिएशन'ची स्थापना केली. या माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजवू लागले. त्याचाच परिपाक म्हणजे, 1 ऑगस्ट 1849 रोजी 'द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे' (GIP रेल्वे) ची स्थापना झाली.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, CENTRAL RAILWAY

GIP रेल्वेमध्ये तेव्हा दोनच भारतीय होते, त्यातले एक जमशेटजी जिजिभोय आणि दुसरे होते, नाना शंकरशेट.

या GIP रेल्वेच्या माध्यमातूनच भारतातील, नव्हे आशियातील पहिली रेल्वे मुंबईत धावली. खरंतर मुंबई हे काही राजधानीचं शहर नव्हतं, पण नाना शंकरशेट यांच्या प्रभावामुळं तो मान मुंबईला मिळाला, असं सतिश पितळे लिहितात.

पहिल्या रेल्वेचं काम सुरू असताना नाना शंकरशेट अत्यंत बारकाईनं कामावर लक्ष ठेवून होते. लागेल ती मदत ते करत असत. तिकीट बुकिंग आणि इतर कार्यालयीन कामांसाठी त्यांनी स्वत:च्या बंगल्यातीलच काही जागा दिली होती. नाना शंकरशेट यांच्या पाचव्या पिढीचे वंशज विलास शंकरशेट यांनी ही माहिती डीएनएला दिली.

'मुंबई सेंट्रल' रेल्वेस्थानकाला नाना शंकरशेट यांचं नाव देत असताना, त्यांनी भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी केलेली धडपड दुर्लक्षून चालणार नाही आणि त्यांचं नाव रेल्वेस्थानकाला देणं किती यथोचित आहे, हे कळण्यासही मदत होईल.

'मुंबईला आधुनिक बनवणारा महारथी'

संस्थात्मक काम हे नाना शंकरशेट यांच्या आयुष्याचं ध्येय असल्याचं त्यांचा जीवनप्रवास उलगडताना जाणवत राहतं. त्यांनी स्वत: शिक्षणाचं महत्त्वही जाणलं होतं. ब्रिटिश काळात भारतीयांनी शिक्षण घ्यावं आणि मुख्य प्रवाहात यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येतात.

त्यांच्या संस्थात्मक कामाचा आढावा घेताना, आधी त्यांच्या वैयक्तिक जीवनाचाही आढावा घेणं आवश्यक ठरतं. कारण त्यावरुन त्यांनी पुढं उभारलेल्या शिखराचं महत्त्व लक्षात येईल.

जुनी मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

10 फेब्रुवारी 1803 रोजी मुरबाडसारख्या त्या काळात दुर्गम भागात त्यांचा जन्म झाला. मुरबाड हे आता ठाणे जिल्ह्यात येतं. जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे हे त्यांचं पूर्ण नाव.

वडील शंकरशेट मुरकुटे हे श्रीमंत होते. मराठी विश्वकोशातील माहितीनुसार, 1799 च्या टिपू-इंग्रज युद्धात त्यांना अमाप पैसा मिळाला होता.

नाना शंकरशेट लहान असताना, त्यांच्या आई भवानीबाई वारल्या. आईचं छत्र हरपल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे 1822 साली वडिलांचं छत्रही हरपलं. त्यामुळं अर्थात, लहानपणीच नानांवर घर आणि व्यापार या सगळ्याचीच जबाबदारी आली.

नाना शंकरशेट यांचं शिक्षणकार्य

समजत्या वयापासूनच वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीचं भान आलेल्या नाना शंकरशेट यांचं शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय मानलं जातं. त्यांनी पाया रचलेल्या संस्थांवर नुसती नजर टाकली, तरी त्यांचं महात्म्य लक्षात येईल.

'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' या पश्चिम भारतातील पहिल्या शिक्षणसंस्थेच्या संस्थापकांपैकी नाना शंकरशेट हे एक होते. भारतीयांच्या शिक्षणाला प्राधान्य देणारी ही संस्था होती. या अनेक संस्थेच्या संस्थापकांपैकी एक नाना असले, तरी या संस्थेच्या मूळाशी नाना कसे होते, हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे रिसर्च फेलो नीलेश बने यांच्या लेखातील उताऱ्यातून लक्षात येतं.

नीलेश बने लिहितात, "1819 मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्सटन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते. एलफिन्स्टन आणि नानांची ओळख झाली. शिक्षणविषय कामांमध्ये नानांनी एलफिन्स्टन यांना मदतीचं आश्वासन दिलं आणि त्यांच्या प्रयत्नांतूनच 1822 साली 'मुंबईची हैंदशाळा आणि स्कूल बुक सोसायटी'ची स्थापना झाली. याच संस्थेचे पुढे म्हणजे 1824 साली 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'त रुपांतर झाले."

नाना शंकरशेट

फोटो स्रोत, Getty Images

'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' ही संस्था मुंबई इलाख्यातील शिक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड ठरली.

पुढे उच्च शिक्षणासाठी 'एलफिन्स्टन फंड' गोळा केला गेला, त्याचे विश्वस्त नाना शंकरशेट होते. याच निधीतून 1827 साली पुढे एलिन्स्टन हायस्कूल आणि कॉलेज सुरु करण्यात आलं. 1841 साली ते बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या मंडळावर गेले. तिथं सतत 16 वर्षे ते निवडून आले. 1845 साली नानांच्या सहकार्यानं ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली.

मुलींसाठी शाळा, विधी महाविद्यालयाचा पाया, ॲग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया आणि जिऑग्राफिकल सोसायटी या संस्थांचं प्रमुख, अध्यक्षपद, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या स्थापनेत सहाकर्य, मुंबई विद्यापीठ... शिक्षण आणि संस्थांत्मक कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं.

सामाजिक आणि राजकीय कामं

वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्या काळात मुलींच्या शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं, त्या काळात त्यांचे हे प्रयत्न होते. महिलांसाठी त्यांनी प्रसंगी समाजाचा रोषही पत्कारला. सती प्रथेला त्यांनी केलेला विरोध हे त्यांचं उदाहरण होय.

1823 साली ब्रिटिश पार्लमेंटकडे सती या अमानुष प्रथेवर बंदी आणण्यासाठी अर्ज केला गेला. त्यावर राजा राममोहन रॉय आणि नाना शंकरशेट यांच्या प्रामुख्यानं सह्या होत्या. पुढे म्हणजे 1829 साली ज्यावेळी सती चालीस बंदी घालणारा कायदा आणला गेला, त्यावेळी नाना शंकरशेट यांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला होता.

नाना शंकरशेट यांची राजकीय सक्रियताही प्रभावी राहिली. 1861 साली तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधिमंडळात नानांना स्थान मिळालं. पुढे त्यांनी अनेक राजकीय निर्णयांवर सकारात्मक प्रभाव टाकल्याचं दिसून येतं.

1862 साली ते तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागर म्हणूनही नियुक्त झाले.

बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार करण्यात नाना शंकरशेट यांनी योगदान दिलंय. याच कायद्यान्वये मुंबई महापालिकेची स्थापना झाली होती.

31 जुलै 1865 रोजी नाना शंकरशेट यांचं निधन झालं. आयुष्यातील अर्धशतकाच्या कालावधीत त्यांनी संस्थात्मक कामातून मुंबईच्या विकासाचा पाया रचला. या संस्थात्मक कामाच्या सोबतीनं त्यांनी सामाजिक सुधारणेतही योगदान दिलं.

नाना शंकरशेट यांच्याबद्दल लोकसत्ताचे माजी संपादक दिवंगत अरुण टिकेकर यांनी 'मुंबईला आधुनिक बनवणारा महारथी' असे गौरवोद्गार काढले आहेत. ते किती समर्पक आहेत, हेही नाना शंकरशेट यांच्या मुंबईसाठीच्या योगदानावरुन लक्षात येतं.

हेही नक्की वाचा -

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)