'माझा जन्म बलात्कारातून झाला; पण ती ओळख मला नकोय'

तसनिम

फोटो स्रोत, SLATER KING

फोटो कॅप्शन, तसनिम
    • Author, इमा आइल्स
    • Role, बीबीसी न्यूज

बलात्कारातून जन्माला येणाऱ्या मुलांना इंग्लंड आणि वेल्समध्ये आता गुन्हातले पीडित (victims of crime)अशी ओळख मिळणार, असं तिथल्या सरकारने जाहीर केलं आहे.

पण बलात्कार झालेल्या आईपोटी जन्म घेतलेल्या अशा मुलांशी संवाद साधल्यावर भूतकाळाने आमच्या आयुष्यावर कायम राज्य करणं आम्हाला का नकोय हे ते सांगतात.

प्रिय टॅस,

तू आता फक्त दहा दिवसांची असलीस तरी हे वाचशील तेव्हा कदाचित बरीच मोठी झालेली असशील.

आय लव्ह यू सो मच.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

आपली आई ल्युसीने लिहिलेली डायरी पहिल्यांदा वाचताना तसनिमचे डोळे भरून आल्याचं तिला जाणवलं. ही वही अस्तित्वात असल्याची तिला कल्पनाच नव्हती. एवढंच कशाला ल्युसी ज्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडली त्या घटनेतून वाचलेली आपणच एकमेव व्यक्ती होतो, हेही तसनिमला माहीत नव्हतं. ही घटना घडली तेव्हा ती अगदी लहान होती.

तसनिमच्या गालावरचा सहज दिसून येणारी भाजल्याची खूण एवढाच त्या रात्रीच्या घटनेचा व्रण शिल्लक होता. आगीने घराला वेढलं होतं त्या वेळी तसनिमच्या वडिलांनीच तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून घराबाहेरच्या बागेतल्या सफरचंदाच्या झाडाखाली ठेवलं. म्हणूनच ती वाचली.

वडिलांनी तिचा जीव वाचवला हे खरं, पण त्यांनीच घरावर पेट्रोल ओतून काडी टाकली होती. घराला लागलेल्या त्या आगीत तसनिमची आईच नाही तर तिची मावशी आणि आजीसुद्धा मरण पावल्या.

आपले वडील खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात असल्याचं तसनिमला पहिल्यापासून माहीत होतं. पण त्या एका डायरीने तसनिमला आपल्या आयुष्याचं आणखी एक धक्कादायक सत्य सांगितलं.

18 वर्षं पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या डायरीबद्दल सगळ्यांनाच विसर पडला होता. आईच्या केसमधले पुरावे बघण्याची विनंती तसनिमने केली तेव्हा तिच्या हाती ही डायरी लागली.

ती डायरी वाचत असतानाच तसनिमपुढे विदारक सत्य समोर आलं. वडिलांनी तिच्या आईवर केलेल्या लैंगिक अत्याचारातून तिचा जन्म झाला आहे.

ल्युसी
फोटो कॅप्शन, ल्युसी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ल्युसीची स्वप्नं, भविष्याबद्दलची आशा याबरोबर या डायरीतून तिचं छुपं दुःखही तसनिमला उलगडलं. ल्युसीवर तिच्या वयाच्या 12 व्या वर्षापासून अत्याचार होत होता तोही तसनिमच्या बापाकडूनच. अझहर अली मेहमूद टॅक्सी ड्रायव्हर होता आणि ल्युसीपेक्षा 10 वर्षांनी मोठा होता.

तसनिमला तिच्या जन्माचं रहस्य कळल्यावर प्रचंड धक्का बसला. जगात आपल्यावरच का ही भयंकर वेळ आली असं तिला वाटायला लागलं. पण संशोधन सांगतं की, असा प्रसंग ओढवलेली ती एकटी नाही. बऱ्याच व्यक्तींच्या वाट्याला हे दुःख आलं आहे.

बलात्कार किंवा अत्याचारातून जन्माला आलेल्या अशा किती व्यक्ती यूकेमध्ये आहेत याची आकडेवारी उपलब्ध नाही. ते शोधणं अवघड आहे. पण डरहम युनिव्हर्सिटी आणि सेंटर फॉर विमेन्स जस्टिसने काही अंदाज सांगितला आहे. त्यानुसार 2021 या एका वर्षात इंग्लंड आणि वेल्समध्ये बलात्कारामुळे गरोदर राहिलेल्या किमान 3300 स्त्रिया असाव्यात.

ब्रिटनचं सरकार 'व्हिक्टिम्स बिल' नावाने इंग्लंड आणि वेल्ससाठी नव्या कायद्याचा विचार करत आहे. त्याअंतर्गत बलात्कारातून होणाऱ्या अपत्यांची अधिकृतपणे गणना 'व्हिक्टिम्स ऑफ क्राइम' म्हणजे गुन्ह्यातील पीडित म्हणून होईल.

तिथल्या सरकारच्या मते, अशी वेगळी ओळख दिली तर या मुलांना त्यादृष्टीने थेरपी, कौन्सेलिंग असा 'एक्स्ट्रा सपोर्ट' देता येईल किंवा त्यांच्या केससंदर्भातल्या माहिती त्यांना हवी असेल तर ती विनासायास मिळेल. शिक्षण, घर यासंदर्भातले फायदे त्यांना देता येतील आणि ड्रग्ज, अल्कोहोल या व्यसनातून सुटण्यासाठीही त्यांना मदत करता येईल.

बलात्कारपीडित मुलांसाठी सध्या कुठली चॅरिटी किंवा सपोर्ट सर्व्हिसेस नसल्याने तसनिमसारख्यांना टोकाच्या भावनिक चलबिचलीतून एकट्यानेच मार्ग काढावा लागतो.

तसनिम म्हणते, "आपले पालक एकमेकांच्या प्रेमात होते, अशीच कल्पना आपल्या मनात आपण करत असतो."

"अशा प्रकारचा धक्का बसल्यानंतर फक्त त्या कल्पनेला तडा जातो असं नाही पण तुमचा विश्वास असणाऱ्या सगळ्याच गोष्टी बदलतात. तुमचं कुटुंब, तुम्ही स्वतः या सगळ्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघावं लागतं मग. माझा बाप फक्त खुनी नाही तर बलात्कारी आहे, हे समजल्यावर मी हादरले आणि काहीबाही विचार यायला लागते. मी मोठी झाल्यावर त्यांच्यासारखीच झाले तर?" ती सांगते.

तसनिमसाठी त्या डायरीतली काही पानं वाचणं प्रचंड क्लेशकारक होतं. खरं तर ल्युसीचा सगळा भर हा तिच्याबद्दलच्या प्रेमात होता हे त्या लिखाणावरून स्पष्ट होतं. तिच्यावर प्रचंड जीव होता ल्युसीचा. सगळ्या पानांवर कविता, प्रेमाच्या कथा लिहिलेल्या होत्या.

"खरं तर मला आता स्वतःबद्दल वाईट वाटायला नको. तिला ते कधीच आवडलं नसतं", तसनिम म्हणते.

नील
फोटो कॅप्शन, नील

नील. वय वर्षं 27. तो स्वतःला जेंडर न्यूट्रल सर्वनामाने संबोधू इच्छितो.

तर या नीलचं बालपण वेस्ट यॉर्कशायर काउंटीतल्या एका गावात तसं आनंदातच गेलं. एक प्रदीर्घ उच्छवास सोडत तो पुढचं सगळं सांगतो.

नीलच्या दत्तक पालकांनी त्याचा सांभाळ केला. त्याचं बालपण आनंदी होतं. पण नीलला नेहमीच त्याच्या जन्मदात्रीविषयी उत्सुकता होती. त्यानं आपल्या मनात आईची एक परिकथेत असते तशी सुंदर प्रतिमा रंगवली होती. एक दिवस आपण एकत्र येऊ असं त्याला वाटत होतं.

आता वयाच्या 27 व्या वर्षी नील प्रायव्हेट डिटेक्टिव्हने पाठवलेलं पत्र उघडतो. आपल्या आईविषयी माहिती मिळवण्यासाठी त्यानंच डिटेक्टिव्ह नेमलेला असतो. पण डिटेक्टिव्हने मिळवलेल्या माहितीचं पत्र वाचत असताना आपण एका खोल दरीच्या तोंडाशी उभे आहोत आणि पाय घसरून थेट खोल गर्तेत चाललोय असं नीलला वाटतं.

नीलच्या आईवर तिच्या किशोरवयातच एका पार्कमध्ये बलात्कार झाला होता. अपरिचित इसमाने केलेल्या या बलात्काराचा नील हा परिणाम होता.

"हे असलं काही वाचायची माझ्या मनाची अजिबातच तयारी नव्हती", नील सांगतो.

आपला जन्म हा अशा विकृत, हिंसक घटनेतून झाला आहे हे समजल्यावर 'कुणीतरी माझ्या छातीवर बुक्का मारून आतलं सगळं पिंजऱ्यासकट बाहेर काढलंय असं वाटलं', तो सांगतो.

नील म्हणतो, 'दुःख, लाज, मानसिक गोंधळ.... कुणाच्याही आयुष्यात येऊ नये अशी भयंकर वेळ माझ्यावर आली. मी अक्षरशः आतून कोलमडून गेलो.'

एवढे दिवस स्वतःला जे स्वतःबद्दल वाटत होते, ते सगळं त्या एका पत्राने हिरावून घेतलं. मी स्वतःला आरशात पाहू शकत नाही, कदाचित तो अपरिचित भीतीदायक हल्लेखोर वळून बघतोय की काय अशी भीती वाटते, नील सांगतो.

प्रेमातून नव्हे, तर हिंसेतून आपला जन्म झाला आहे याची जाणीव झाल्यावर काय वाटलं असेल? आणि नीलच्या जन्मदात्रीला या आपल्या मुलाला भेटायची कधी इच्छा तरी होईल का?

अझहर अली मेहमूद

फोटो स्रोत, WEST MERCIA POLICE

फोटो कॅप्शन, अझहर अली मेहमूद

तुरुंगाचा दरवाजा तिच्या मागे करकरत बंद झाला त्या वेळी तसनिमच्या छातीची धडधड इतकी वाढली की, हृदय फुटून बाहेर येईल असं तिला वाटलं. एका शिपायानं तिला आतल्या छोट्या थंडगार खोलीपाशी नेलं. तिथे दोन खुर्च्या आणि एक टेबल ठेवलेलं होतं.

खोलीच्या दुसऱ्या बाजूचं दार उघडलं आणि तसनिमची तिच्या वडिलांबरोबर आयुष्यात पहिल्यांदा नजरा नजर झाली. तुरुंगातला करडा गणवेश घातलेला समोरचा माणूस आपल्या कल्पनेतल्या वडिलांच्या चित्रापेक्षा बुटकाच असल्याचं तिला जाणवलं.

पण त्याचा आविर्भाव मात्र मोठा होता. त्यामुळे ती छोटी खोली भारल्यासारखी वाटली तिला. त्याने तिला मिठी मारली. त्याने तो प्रसंग 'साजरा' करायला तिच्यासाठी चॉकलेट केक मागवला होता.

तसनिमला अर्थातच केक नको होता. तिला ताळ्यावर आलेला माणूस हवा होता. त्यानं काय केलंय, त्याचा परिणाम काय झालाय हे त्यानं समजून घ्यायला तिला हवं होतं.

पण तिने समोर पाहिला तो तोच माणूस होता ज्याने तिच्या आईला अत्यंत वाईट वागवून काबूत ठेवलं होतं.

तसनिम त्या तुरुंगातून बाहेर पडली ती परत कधीच न जाण्यासाठी. तिला तिची सगळी उत्तरं मिळाली होती.

इकडे नील एका रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाट बघत उभा होता. आपल्या जन्मदात्या आईला पहिल्यांदाच भेटायचं असल्याने त्याच्या पोटात गोळा आला होता. अनामिक भीतीने आणि उत्सुकतेने. या क्षणाची त्याने बरीच वाट पाहिली होती. हा क्षण येईल त्या वेळी काय करायचं, कसं बोलायचं, कसं करायचं या सगळ्याची त्याने मनोमन अनेक वेळा तयारी केली होती खरी. तरी ही शेवटच्या क्षणाची चलबिचल सहाजिकच!

ती आली तेव्हाच नीलने ओळखलं हीच आपली आई.

दोघांची नजरानजर झाली आणि तिच्याविषयीच्या चिंतेनेच नीलचा कंठ अधिक दाटून आला.

"तुला यातना देणाऱ्या त्या माणसासारखा मी दिसतो का गं? तसं असेल तर मी आत्ताच चालता होतो", तो कसंतरी हे एवढंच बोलू शकला.

"नाही रे", आईचे ते शब्द ऐकले आणि त्याला आपल्या खांद्यावरचं मणामणाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं.

ते थोडं मोकळेपणाने चालत चालत बराच वेळ बोलत होते. आपापल्या आयुष्याबद्दल एकमेकांना माहिती देत होते. ती आपल्या कुटुंबाबद्दल सांगत होती. नीलला आतापर्यंत ज्यांच्या अस्तित्वाची कल्पनाच नाही अशा त्याच्या सावत्र भावंडांबद्दल ती सांगत होती. त्या दोघांचे बोलतानाचे हावभाव, हसणं आणि भावनाही सारख्याच होत्या बहुधा.

आपण ज्या क्षणी अस्तित्वात आलो त्या रात्री नेमकं काय झालं हे नीलने विचारलं नाही. आता त्याला ते जाणून घ्यायची आवश्यकता नव्हती. तिला पुन्हा त्या प्रसंगातून जायला लावायची त्याची इच्छा नव्हती. त्याच्यासाठी आता आपल्याला जन्मदाता बाप नाही, हेच सत्य आहे. जन्मदात्री आई आहे आणि हे नीलसाठी पुरेसं आहे.

'ममी, मी रेप बेबी आहे का?'

कारमध्ये शेजारी बसलेल्या आपल्या थोरल्या मुलाकडे सॅमी चमकून बघते. त्याला त्रास व्हावा म्हणून नव्हे तर मानसिक तयारी व्हावी आणि कुठल्याही त्रासातून त्याचं रक्षण करण्यासाठीच तिने ते त्याला सांगितलं होतं. आपल्या मुलाला मदत करायची तिची इच्छा आहे. पण कशी ते कळत नाही.

"नाही बेटा, तू माझा मुलगा आहेस", ती उत्तर देते.

2013 चा हा प्रसंग. सॅमीने आपल्या 12 वर्षांच्या मुलाला त्याच्या जन्माचं सत्य नुकतंच सांगितलं आहे. अर्शद हुसैन नावाचा माणूस जो आता त्याचा बाप म्हणवतो त्यानेच कसा सॅमीवर प्रेमाचं नाटक करून बलात्कार केला.

ती फक्त 14 वर्षांची असल्यापासून अर्शदने तिच्यावर अत्याचार केले. त्या वेळी 24 वर्षांच्या असलेल्या अर्शदने सॅमीसारखंच अनेक मुलींना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर अत्याचार केले होते.

सॅमीला आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच ती त्याच्या जाळ्यातून कशीबशी सुटली. साउथ यॉर्कशायर परगण्यात रोथरहम गावात तिच्यासारख्या किमान हजारभर मुलांवर कसे अत्याचार झालेत आणि यंत्रणा त्यांना यापासून कशी वाचवू शकलेली नाही याबद्दल सॅमी आता उघडपणे बोलते.

हुसैनवर गुन्हा दाखल झाला आहे आणि पोलीस तपास करत आहेत. सॅमीच्या मुलाचे डीएनए सँपल हा या तपासातला हुसैनविरुद्धचा मोठा पुरावा आहे.

सॅमी तिच्या बाळासोबत
फोटो कॅप्शन, सॅमी तिच्या बाळासोबत

पण आपल्या मुलावर या सगळ्याचा कसा परिणाम होतो आहे आणि तो काय त्रासातून जात आहे हे सॅमीला दिसत आहे. त्याला बिचाऱ्याला अनेक प्रश्न पडलेत - मी नकोसा होतो का? माझ्यावर कुणी प्रेम केलं का?

यूकेमधलं हे अत्याचाराचं प्रकरण नॅशनल न्यूज बनलं आहे. त्याविषयी बरंच काही लिहिलं बोललं गेलं आहे. आपल्याबद्दल सगळं सत्य सार्वजनिक होऊनसुद्धा त्यांना आता खूपच एकटं पडल्यासारखं वाटत आहे.

सॅमी एक चांगली आई व्हायचा अटोकाट प्रयत्न करते आहे. पण या सगळ्यात आपलाच दोष असल्याचं तिला आता वाटू लागलं आहे.

ती कधीकधी स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात बसून ढसाढसा रडते. तिचं आपल्या मुलावर जिवापाड प्रेम आहे, पण तिला आता वाटतं आपल्याशिवाय जगण्यातच त्याचं भलं होतं.

तसनिम आणि नीलप्रमाणेच सॅमीसुद्धा तिच्यातल्या या अंतर्गत भावनांच्या कल्लोळात एकटी पडली होती. तिला कसं वाटतंय याबद्दल कुणालाच काही माहीत नव्हतं.

2021 मध्ये तिच्यासारखीच आणखी एक आई- मँडी भेटेपर्यंत सॅमी अगदी एकटी होती. मँडी भेटल्यावर तिला आपल्या मनातलं नेमकं कळू शकेल अशी व्यक्ती सापडली.

आता हुसैन 35 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे. सॅमी मँडीच्या घरातल्या किचनमध्ये खुर्चीवर बसली आहे आणि मँडीचा कुत्रा टॉफी तिच्या खुर्चीखाली आरामात पहुडला आहे. मँडी तिची कहाणी सॅमीला सांगते आहे. 30 वर्षांपूर्वीची गोष्ट पण तिच्यासाठी अजूनही ती जखम ताजी असल्यासारखा त्रास होतो आहे.

मँडी 11 वर्षांची होती तेव्हाची पहिली अत्याचाराची आठवणच अंगावर सर्ऱकन काटा आणते. तिचे वडील पोलिसात स्पेशल कॉन्स्टेबल पदावर. ब्रिटीश सॅल्वेशन आर्मीचे मेंबर. त्यामुळे समाजातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. ते 11 वर्षांच्या आपल्या मुलीला विवस्त्र करून तिच्याबरोबर अंघोळीला गेले होते.

सॅमी
फोटो कॅप्शन, सॅमी

त्या दिवसापासून प्रत्येक रात्रीच असा अत्याचार व्हायचा. तिचा बाप गुपचूप तिच्या खोलीत यायचा आणि नको ते उद्योग करायचा. याविषयी कुणाला काही सांगायची मँडीची हिंमतच नव्हती. तो इतका भीतीदायक होता की त्याच्या दहशतीच्या जाळ्यात ती पुरती अडकली.

मग एके दिवशी तिला आपण गरोदर असल्याचं लक्षात आलं.

"कुणीतरी शरीरात विष पेरावं असं वाटलं. माझ्या बापानं आमच्याच जीन्स माझ्यात पेरल्या होत्या. आता काय करावं... मला काहीच माहीत नव्हतं तेव्हा...", मँडी सांगते.

पण मँडीच्या वडिलांना हे समजलं तेव्हा तिच्याकडे काही दुसरा पर्यायच राहिला नाही. तिचं मूल तिच्या बापालाच डॅडी म्हणणार होतं.

मँडीच्या डिलिव्हरीच्या वेळी तिचा हा बाप उपस्थित होता. ती बाळंत होताच सुईणीने तिचं नवजात बाळ त्याच्या हातात दिलं.

"माझ्या बाळाला पहिल्यांदा त्यानं हातात घेतलं. ते पाहूनच मी उद्ध्वस्त झाले", मँडी सांगते. "मी बोलू काहीच शकले नाही; पण ओरडावंसं वाटत होतं मोठ्यांदा.... दूर हो! माझ्या बाळाला तुझ्या हातांचा गलिच्छ स्पर्शसुद्धा नको...." आजही हे सांगताना मँडी त्या आठवणीने हतबल होते.

"ते बाळ माझं होतं. माझ्यासाठी मौल्यवान होतं. आणि काही झालं तरी त्याचं संरक्षण मी करणार होते, कायम!"

एक दिवस मँडीला संधी मिळाली आणि तिच्या बाळाच्या बाबागाडीत थोडी दुपटी आणि बेबी मिल्क घेऊन ती घराबाहेर पडली. पुन्हा कधीच तिकडे परत न जाण्यासाठी.

सॅमी तिला विचारते. "एखाद्या नॉर्मल आनंदी रिलेशनशिपमधून झालेलं बाळ आणि अशा प्रकारे अत्याचाराचा परिणाम म्हणून जन्मलेलं बाळ यात फरक असतो असं वाटतं का?"

मँडी होकार भरत सांगते. "तो काही माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जन्माला आलेला नव्हता. तो एका राक्षसापासून झाला होता."

"पण माझं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं आणि आजही आहे."

मँडीच्या त्या मुलाला नंतर तिच्या नवऱ्याने अधिकृतपणे दत्तक घेतलं. आता त्या दोघांच्या मुलांबरोबर तोही आनंदात एकत्र राहतो आहे.

वडिलांच्या अत्याचारापासून मँडी तरुणपणीच दूर पळून गेली तरी त्याचे परिणाम आजही तिला आणि तिच्या मुलाला भोगावे लागत आहेत. तो मुलगा जन्मतःच जनुकीय कारणांनी विकलांग आहे.

आज 30 वर्षांनंतरही मँडी 24 तास त्याची काळजी घ्यायला तत्पर असते. त्याला त्याच्या प्लेस्टेशन आणि इतर खेळांमध्ये खूप रस आहे. आपला जन्म कसा झाला, अत्याचारातून झाला म्हणजे काय, हे सगळं समजून घेण्याची त्याची क्षमता नाही. मँडी म्हणते माझ्या दृष्टीने ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. माझ्यावर हे सगळं त्याला सांगायची वेळच येणार नाहीये. पण त्याला मात्र त्या घटनेचा वार आयुष्यभर वागवावा लागणार आहे.

मँडी
फोटो कॅप्शन, मँडी

"मी नेहमी म्हणते. मी सर्व्हायवर आहे आणि माझा मुलगा व्हिक्टिम. मी त्या प्रसंगातून तरले; पण मुलगा खरा पीडित आहे," मँडी सॅमीला सांगते.

"त्याने नव्हता मागितला असा जन्म. मी गुन्ह्याची शिकार झाले आणि तोसुद्धा त्यात हकनाक ओढला गेला."

मँडी आणि सॅमी एकमेकींना भेटण्यापूर्वी त्या आपापली दुःख उराशी बाळगून होत्या. आपण एकटे असल्याची भावनाही त्यात होती.

सॅमी सांगते, "काहीही झालं तरी आयुष्य पुढे जगत राहायचं आणि आनंदी राहायचं, हे मी मँडीकडून शिकले. खरंच एकमेकांशी बोलायला हवं तेव्हा नेमकं दुःख हलकं होईल."

ब्रिटनमध्ये 'व्हिक्टिम्स बिल'च्या निमित्ताने कायदाबदल करण्याबाबत चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे बलात्कार पीडितांचे अनेक प्रश्न प्रकाशात आले, असं समर्थक सांगतात. कार्यकर्त्यांच्या मते, हा जुन्या कायद्याचाच ऊहापोह आहे आणि खूपच उशिरा आलेली जाग आहे.

पण बलात्काराच्या गुन्ह्यानंतर त्याविषयी बोलल्यामुळे किमान पीडितांना आपण एकटं असल्याची भावना तरी येणार नाही, असं नील आणि तसनिमला वाटतं. प्रस्तावित कायदा बदल केला तर आमच्यासारख्यांचे आवाज किमान ऐकू जातील, असं त्यांना वाटतं.

"अजूनही याविषयी कलंक म्हणून बोललं जातं, असं व्हायला नको. तुम्ही कोणापासून झालायत हे महत्त्वाचं नाही. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मूळात यात माझा काही दोष नाही. उलट मला त्याचा फटका बसला आहे", तसनिम सांगते.

झाल्या गेल्याबद्दल मोकळेपणाने बोललं तरच त्यातून तिच्या आईची आठवण जिवंत राहील, असं तसनिमला वाटतं. आमच्या कहाणीचा शेवट दुःखी होणार नाही, हा तिचा विश्वास आहे.

"मला माझ्या आईला भेटायची, तिच्याशी बोलायची संधी कधी मिळाली तर ती किती धीराची होती हेच मला तिला सांगायचं असेल", तसनिम सांगते...

"आणि... सगळं ठीक आहे. मी ठीक आहे, हेच तिला सांगेन."

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)