रेल्वेने प्रवास करून हे तिघे युट्युबर लाखो रुपये कमावत आहेत

फोटो स्रोत, Himanshu Yadav
- Author, शेरिलन मोनन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ट्रेन स्टेशनवरून सुटल्याचा एक व्हीडिओ तुम्हाला दिसतो. बाजूला एका पिवळ्या फलकावर रामेश्वरम लिहिलेलं असतं. त्यावरून भारताच्या एका कोपऱ्यातून ट्रेन सुटल्याची वर्दी तुम्हाला मिळते.
मग तुम्हाला एक सुंदर हिरवळ दिसत असते. मग खिडकीतून समुद्र दिसतो, हे होत असताना दुकानदार चहा समोसे विकताना दिसतात. लोक गप्पा मारताना दिसतात. कधी वॉशरुम दिसते तर कधी दोन लोक भांडताना दिसतात.
हे सगळं सुरू असताना तुम्ही तुमच्या स्टेशनला पोहोचलेले असतात. स्टेशनचं नाव असतं चेन्नई. हा 10 तासांचा प्रवास फक्त 13 मिनिटांच्या व्हीडिओत तुम्हाला करायला मिळतो.
22 वर्षीय हिमांशू यादवने भारतीय रेल्वेववर असे अनेक व्हीडिओ केले आहेत.
भारतीय रेल्वे ही आशियातील सगळ्यांत मोठी रेल्वेसेवा आहे. जगात चौथ्या क्रमाकांवर असलेली रेल्वे ही तमाम भारतीयांना परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे.
भारतीय रेल्वे रोज 1.3 कोटी प्रवासी ने आण करते. हाच सगळा प्रवास कॅमेऱ्यात टिपण्याचं काम व्लॉगर करत आहेत. बीबीसीने या व्लॉगरशी चर्चा केली. भारतीय रेल्वेत अधिकाधिक रस निर्माण व्हावा हा त्यांचा उद्देश आहे. प्रवास कसा आनंददायी होतो हे काही व्लॉगर्स दाखवतात तर काही व्लॉगर्स प्रवाश्यांना येणाऱ्या अडचणी देखील दाखवतात.
अक्षय मल्होत्रा हा त्यांपैकी एक आहे. तो इन्स्टाग्रामवर एक मिनिटाच्या व्लॉगमध्ये भारतीय रेल्वे किती आरामदायी असू शकते हे दाखवतो.
25 वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला अक्षय भारताच्या काही सर्वोच्च दर्जाच्या आणि लांबच्या प्रवाशाच्या ट्रेनमध्ये रील्स शूट करतो. मग हे व्हीडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकतो.
@JourneyswithAK या त्याच्या हँडलला फक्त सहा महिन्यात 13,5000 फॉलोअर्स मिळाले आहेत. याच व्हीडिओचा मोठा भाग तो युट्यूब चॅनेलवर टाकतो.
त्याच्या व्हीडिओमध्ये काचेचे डबे, डायनिंग कार, वातानुकुलित कुपे दिसतात. रेल्वेमध्ये मिळणारं जेवण, प्रसाधनगृह यांच्याबद्दलही तो सांगतो. तसंच ज्या ब्लँकेट, उश्या यांच्याबद्दलही प्रतिक्रिया सांगतो. जे लोक पाळीव प्राण्यांबरोबर प्रवास करत आहेत त्यांन तो टीपही देण्याचा प्रयत्न करतो.

फोटो स्रोत, Akshay Malhotra
अक्षय हा संपूर्ण प्रवास त्याच्या पैशाने करतो. या तिकिटाची किंमत साधारण 8,000 इतकी असते. मात्र अक्षय खर्चाची चिंता करत नाही. "रेल्वेत प्रवास केला की बऱ्याचदा नवीन बघायला आणि शिकायला मिळतात. मग ती व्यक्ती असो, रस्ता असो किंवा एखादी जाग," तो सांगतो.
25 वर्षांच्याच विश्वजित सिंह ने मात्र एक वेगळा मार्ग चोखाळला आहे. रेल्वेचा प्रवास निम्न मध्यमवर्गीयांसाठी कसा आहे हे तो दाखवतो.
V S Monu Vlog या त्याच्या यु ट्यूब चॅनलचे 88,5000 सबस्क्रायबर्स आहेत. ज्या डब्यात तिकिटाचे दर कमी आहेत अशा डब्यातून तो प्रवास करतो. तिथे सोयी कमी असतात पण प्रवाशांची संख्या जास्त असतात.
विश्वजित बिहारच्या एका छोट्या खेड्यातला आहे. त्याने पाच वर्षांपूर्वी हे व्हीडिओ करायला सुरुवात केली. विश्वजित सत्य परिस्थिती दाखवतो आणि रेल्वेमधले घोटाळे समोर आणतो अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे.
त्याच्या व्हीडिओमध्ये ट्रेन वेळेवर निघाली की नाही, वेटिंग रुम, बर्थ, बाथरुम स्वच्छ आहेत की नाही याचं चित्रण तो करतो. तो अन्नपदार्थाच्या किमती आणि दर्जाचा आढावाही घेतो. तसंच इतर प्रवाशांबरोबर आणि रेल्वेच्या लोकांबरोबर संवादही साधतो.
रेल्वेची खरी परिस्थिती दाखवल्याबद्दल लोक त्याचे आभार मानतात. तसंच त्याला तिकिटाचे दर आणि अन्नपदार्थाच्या दर्जाबद्दल प्रश्नही विचारतात, तसंच त्यांचे अनुभवही शेअर करतात. ज्या लोकांना आधी वाईट अनुभव आलेत त्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचं आवाहनही लोक त्याला करतात.

फोटो स्रोत, VS Monu
त्याचे व्हीडिओ युट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहेत. त्याला सिल्व्हर बटन आणि काही प्रायोजकत्वही मिळाली आहेत. मात्र ही लोकप्रियता दुधारी तलवार असल्याचं तो सांगतो. "रेल्वेचे अनेक लोक आता मला ओळखतात. त्यामुळे मी ट्रेनमध्ये असताना ते अतिशय सावध असतात," तो सांगतो.
हिमांशू यादव Train lovers HY नावाचं एक चॅनेल चालवतात आणि त्याचे 1,65,000 सबस्क्राईबर्स आहेत. त्याचा सगळा भर आकर्षक कंटेट देण्याकडे असतो. या वर्षाच्या सुरुवातीला तो बनिहाल ते बारामुल्लाहला गेला होता. त्यावेळी तापमान उणे 5 डिग्री सेल्सिअस होतं. 11 मिनिटांच्या व्हीडिओत त्याने आतून हे दृश्य शूट केलं. त्याला मिलियन व्ह्युज मिळाले.
सुंदर जागा कॅमेऱ्यात टिपण्याबरोबरच तो ट्रेनच्या इतिहासाबद्दलही सांगतो. उदा. भारतीय रेल्वेचा समुद्रावरचा सगळ्यांत मोठा पूल कोणता किंवा सगळ्यांत मोठा बोगदा कोणता?
त्याने मागच्या वर्षी नोकरी सोडली आणि आता तो युट्यूबवरच्या जाहिराती आणि इतर गोष्टीतून महिन्याला 1 लाखाच्या वर पैसे मिळवतो.
"मला लहानपणापासून ट्रेन अतिशय आवडतात," तो सांगतो.
"रेल्वेचा प्रवास कायमच अनेक शक्यतांना जन्म देत असतो. मला रेल्वेच्या प्रवासाबद्दल जे वाटतं ते मी माझ्या व्हीडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








