25 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या अनुपच्या डोक्याला ताप; मदत मागणाऱ्या लोकांची रांग

फोटो स्रोत, AV MUZAFAR
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
25 कोटी रुपयांची लॉटरी लागलेला अनुप आता आर्थिक मदतीसाठी लागणाऱ्या रांगेमुळे वैतागून गेला आहे. जेव्हापासून लॉटरी जिंकलो आहे तेव्हापासून मदतीसाठी येणाऱ्या लोकांची रीघ लागली आहे.
माझ्याकडे आर्थिक मदतीसाठी येऊ नका असं आवाहन अनुपने व्हीडिओद्वारे केलं आहे. मी जिंकलो नसतो तर बरं झालं असतं असं अनुप खेदाने म्हणतो.
लोकांनी घरी जमा होऊ नये यासाठी दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा विचार करत असल्याचं अनुपने सांगितलं.
जेव्हा लॉटरी जिंकलो तेव्हा छान वाटलं होतं. घरी मीडियाची माणसं आली होती. असंख्य माणसं आली होती. पण आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आहे. सकाळपासून लोक घरी येऊ लागतात.
मी घरून बाहेर कुठेही जाऊ शकत नाही. माझा मुलगा आजारी आहे पण त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकत नाही. मला अद्याप बक्षीसाचे पैसे मिळालेले नाहीत असं लोकांना सांगतो पण कुणीही ऐकत नाही.
कर वजा केल्यानंतर अनुपला 15 कोटी रुपये मिळणार होते. राज्य सरकारने अनुपसाठी एका प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं आहे, जेणेकरून या मोठ्या रकमेचा तो योग्य प्रकारे विनियोग करू शकेल.

फोटो स्रोत, ANI
दोन वर्षांच्या मुलाची पिगी बँक फोडून जेव्हा अनूप बी. पैसे काढत होता, तेव्हा त्याची पत्नी संतापली होती. मात्र, पत्नीच्या संतापाकडे दुर्लक्ष करत अनूपने मुलाच्या पिगी बँकमधून 50 रुपये काढले आणि ओनम बंपर लॉटरीचं तिकीट काढलं, जिथं त्याला 25 कोटी रुपयांची लॉटरी लागली.
अनूप बी. यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "ती रागाच्या भरात म्हणत होती की, लॉटरीच्या तिकिटासाठी पिगी बँक तोडणं योग्य नाही. नंतर जेव्हा मला कळलं की, लॉटरी मला लागलीय, तेव्हा विश्वासच बसत नव्हता. माझ्या पत्नीलाही विश्वास बसला नाही. मात्र, नंतर ती खूप खूश झाली."
अनूपला या लॉटरीचं तिकीट घेण्यासाठी 500 रुपये पाहिजे होते. मात्र, 50 रुपये कमी पडत होते. त्यासाठी त्यांनी मुलाची पिगी बँक फोडली.
अनूप म्हणतात की, "लॉटरीचं ड्रॉ दुसऱ्याच दिवशी निघणार होतं. त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांचा हा प्रयत्न संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदलण्यास कारणीभूत ठरला."
योगायोग म्हणजे गेल्यावर्षीही ओनम बंपर लॉटरीचं तिकीट एका रिक्षाचालकालाच लागलं होतं आणि अनूपही रिक्षाचालकच आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरमचे रहिवाशी अनूप बी. यांच्यावर लाखो रुपयांचं कर्जही आहे.
29 वर्षांचे अनूप सांगतात की, "मी एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होतो. काही काळ दुबईत राहिलो. तिथून परतल्यानंतर रिक्षा चालवू लागलो. प्रत्येक महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवत होतो. मात्र, तीन महिन्यांपूर्वी माझं काम सुटलं होतं."
25 कोटींची लॉटरी
- केरळच्या श्रीवराहम शहरातील 29 वर्षांचे रिक्षाचालक अनूप यांना लॉटरीत 25 कोटी रूपये मिळाले.
- अनूप यांनी शनिवारी 500 रुपयात ओनम बंपर लॉटरचं तिकीट खरेदी केलं होतं.
- गेल्या 22 वर्षांपासून अनूप लॉटरीचं तिकीट खरेदी करत होते. आतापर्यंत त्यांना दोन हजार रूपये मिळाले होते.
- टॅक्स कापून अनूप यांच्या हातात 15 कोटी 75 लाख रुपये येतील.
बँकेकडून कर्ज घेणार होतो...
रिक्षाचालकाची नोकरी सुटल्यानंतर अनूप शेफचं काम शोधत होते. मलेशियात त्यांना 50 हजार रुपये प्रति महिना अशी नोकरीही मिळाली होती.
त्यांनी एका स्थानिक बँकेकडून तीन लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्जही केला होता. ते म्हणतात की, "लॉटरी निघण्याच्या एक दिवस आधीच बँकेचं कर्जही मंजूर झालं होतं. मात्र, मी अजून बँकेत गेलो नाहीय."

फोटो स्रोत, AV MUZAFAR
अनूपची लॉटरी अचानक लागली नाहीय. ते गेल्या सात वर्षांपासून लॉटरीचं तिकीट काढत होते. याआधी त्यांना कधीही दोन हजार रुपयांहून अधिकची रक्कम लॉटरीत लागली नाही. ते सांगतात की, "पूर्वी मी कधी कधी लॉटरीचं तिकीट खरेदी करत होतो. मात्र, गेल्या काही काळापासून नियमित तिकीट खरेदी करत होतो."
लॉटरीतून जिंकलेल्या पैशातून काय करणार, याबाबत बोलताना अनूप म्हणतात की, "सर्वांत आधी कर्ज फेडेन. पाच-सहा लाख रुपयांचं कर्ज आहे."
केरळ सरकारची लॉटरी
- केरळ सरकारच्या लॉटरीत गेल्या वर्षीही एका रिक्षा चालकानं 12 कोटी रुपये जिंकले होते.
- यावर्षी दुसऱ्या क्रमांकावरील विजेत्याला 5 कोटी रुपये मिळाले होते.
- इतर 10 जणांना एक-एक कोटी मिळाले.
केरळ सरकारने यावर्षी साडे 66 लाख तिकीट विकली होती. बक्षीस आणि करकापून 270 कोटी रुपये कमावले.
तिकीट काढणं सुरूच ठेवणं
कर कापून आणि लॉटरी एजंटचं कमीशन दिल्यानंतर अनूप यांना 15.75 कोटीं रुपये मिळतील.

फोटो स्रोत, AV MUZAFAR
अनूप सांगतात की, "या पैशाचं आता काय करायचं, याबाबत अजून विचार केला नाहीय. सध्यातरी मी आश्चर्याच्या धक्क्यात आहे. मात्र, मी घर बांधेन आणि गरजवंतांना मदतही करेन. त्याशिवाय, एक हॉटेलही सुरू करेन. मात्र, हे सर्व तेव्हाच होईल, जेव्हा केरळ सरकारकडून लॉटरीची रक्कम मिळेल."
कोट्यवधींची लॉटरी लागल्यानंतरही ते लॉटरीचं तिकीट काढणं सुरूच ठेवणार आहेत, असं ते म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









