बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर बनल्यानंतर काय म्हणाली मनू भाकर

- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज
पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदकं मिळवणारी नेमबाज मनू भाकर बीबीसीच्या स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2024 ची मानकरी ठरली आहे. दिल्लीत झालेल्या सोहळ्यात मनूचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आला.
दिल्लीमध्ये झालेल्या सोहळ्यात बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी आणि बॉक्सर मेरी कोम यांनी मनूला हा पुरस्कार दिला.
मनू ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. 2024 ऑलिम्पिकमध्ये तिनं एअर पिस्तूल नेमबाजीत 2 कांस्यपदकं जिंकली.
2020 च्याऑलिम्पिकमध्ये, पिस्तूल खराब झाल्यानं तिचं पदक हुकलं. त्यानंतर 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिचे दीर्घकाळ प्रशिक्षक असलेले जसपाल राणा आणि ती एकत्र आले. 2018 मध्ये नेमबाजी विश्वचषकात सुवर्ण पदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय ठरली.
यावेळी मनू भाकर हिने बीबीसीचे आभार मानले. "2021 साली बीबीसी इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द इयर ईमर्जिंग प्लेयर पुरस्कार मिळाला होता. यावर्षी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालाय."
मी खूप आनंदी आहे. हा प्रवास सोपा नव्हता, अनेक अडथळे आले, पण त्यावर मात करत मी पुढे जात राहिले. आपल्या जीवनाचे शिल्पकार स्वत: व्हा, असंही ती म्हणाली.
बुद्धिबळपटू तानिया सचदेवचा आणि खो-खो पटू नसरीन शेखला बीबीसी चेंजमेकर ऑद द इयर 2024 पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
भारताची महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजला जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 2004 ते 2022 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल तिला गौरवण्यात आलं.
"बीबीसी लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार दिल्याबद्दल बीबीसी आणि ज्युरींचे आभार. मला आशा आहे की हा पुरस्कार अनेक मुलींना या सुंदर खेळात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देईल," असं मिताली व्हीडिओ संदेशाद्वारे म्हणाली.

प्रीती पालला बीबीसी स्टार परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आलं. धावपटू असलेली प्रीती उत्तर प्रदेशच्या मेरठची आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिनं कांस्यपदक मिळवलं.
एशियन पॅरा ऑलिंपिक गेम्समध्ये भारताला पदक मिळवून देण्याच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी शीतल देवीला बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरुस्कार स्वीकारताना खूप आनंद होत असल्याची भावना तिनं व्यक्त केली.

पॅरा शूटिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अवनी लेखरा हिला पॅरा स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सोहळ्यात भारताचे माजी सरन्यायाधीश जस्टीस डी.वाय.चंद्रचूड, काँग्रेस नेते सचिन पायलट आणि खासदार कार्तिकेय शर्मा यांनी तिला पुरस्कार प्रदान केला. अवनी लेखरा ही 3 पॅरालिम्पिक पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.
"मागच्या वेळी मी टोकियोमध्ये पदक जिंकले होते, तेव्हा लोकं मला विचारत होते की, भविष्यात काय करणार आहेस, या क्षेत्रात पुढे कोणती कामगिरी करणार आहेस. त्यांना उत्तर देताना मी म्हणायचे की, 2024 साली माझ्या नावावर आणखी काही पदकं असतील आणि कायद्याची पदवीही असेल. मी जे म्हणाले होते, ते आज खरं ठरत आहे. गेल्या वर्षी मला दोन पदकं मिळाली आहेत. मी कायद्याचा अभ्यास करेन आणि त्यात मास्टर्स करेन," असंही अवनी म्हणाली.
या पुरस्कारासाठी अवनीनं व्हीडिओ संदेशाद्वारे बीबीसीचे मनापासून आभार मानले. माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी अवनीचं अभिनंदन केलं.
"खेळाच्या मैदानापासून वकील होण्यापर्यंत आता तुम्ही न्यायालयांमध्येही देशासाठी अनेक पदकं जिंकणार आहात याची मला खात्री आहे. तुम्ही राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध वकील, न्यायाधीश आणि न्यायशास्त्रज्ञ होण्याचा प्रवास पूर्ण केलात तर मला खरंच खूप आनंद होईल," असं चंद्रचूड यावेळी म्हणाले.
मेरी कोमनं काय म्हटलं?
यावेळी बोलताना मेरी कोमनं म्हटलं की, "हे व्यासपीठ खूपच खास असून, त्यासाठी मी अभिनंदन करते. सर्व विजेत्या आणि विशेषतः मनू भाकरचे मी बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकण्याबद्दल अभिनंदन करू इच्छिते."
"गेल्या काही वर्षांत महिलांनी क्रीडा क्षेत्रात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. माझ्या प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या 20 वर्षांपासून मी बॉक्सिंगमध्ये संघर्ष करत आहे. एक मुलगी, महिला आणि आई म्हणून 20 वर्षांचा हा संघर्ष सोपा नव्हता. आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, असंही मेरी कोमनं म्हटलं. त्या संघर्षाबद्दल बोलणं सुरू केलं तर ते संपणारच नाही."
आपल्या क्रीडापटूंनी आगामी काळात देशासाठी आणखी जास्तीत जास्त पदकं जिंकावीत, अशी आशा मी व्यक्त करते.
बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी
सोहळ्यामध्ये बोलताना बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी म्हणाले की, "तरुणी, महिला आणि मुली यांना महान क्रीडापटूंबाबत माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी जीवनात ज्या आव्हानांचा आणि समस्यांचा सामना केला आहे, त्याबद्दलही जाणणं तेवढंच गरजेचं आहे, हेही आपल्याला माहिती आहे.

या महिलांची कहाणी सर्वांसमोर मांडून त्याद्वारेच लैंगिकतेतील रुढीवादाला आव्हान देत, मर्यादा ओलांडून महिलांना खेळांशी संबंधित चर्चांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नव्या पिढीला प्रेरित करता येऊ शकते, असंही डेवी यावेळी म्हणाले.
कलेक्टिव्ह न्यूजरूमच्या सीईओ रुपा झा काय म्हणाल्या?
कलेक्टिव्ह न्यूजरूमच्या सीईओ रूपा झा म्हणाल्या, "ध्येय स्पष्ट आहे, क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या महिलांवर लक्ष केंद्रित करणं, बातम्यांच्या पलीकडे पाहण्याचा दृष्टीकोण आणि या देशातील महिला खेळाडूंमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज आणि समजून घेणं हा उद्देश असल्याचं त्या म्हणाल्या.
"खेळाडू बनण्याच्या त्यांच्या प्रवासात एक सुरक्षित स्थान तयार करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल आणि कायम खेळाडू म्हणून एका पुरुषाबरोबर होणारी तुलना बंद व्हावी म्हणून म्हणून काय करायला हवे, हे पाहावं लागेल," असंही त्यांनी म्हटलं.

अशा प्रकारचा बदल घडवणं म्हणजे आपल्याला अगदी डोंगर हलवाला लागेल असं नाही. फक्त त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींचा संदेश
या उपक्रमाबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बीबीसीच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.
बीबीसीला पाठवलेल्या खास संदेशात त्यांनी मह्टलं की, मी बीबीसीच्या संपूर्ण टीमचं या स्तुत्य उपक्रमासाठी अभिनंदन करते.

फोटो स्रोत, Getty Images
याद्वारे उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडुंचा गौरव करण्यात आला आहे. या महिला खेळाडुंनी केवळ क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेलं नाही, तर त्यांनी तरुणींनाही नीडरपणे स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा दिली आहे.
बीबीसीच्या स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर या पुरस्काराचं हे पाचवं वर्ष आहे. यंदा पुरस्कारासाठी गोल्फपटू आदिती अशोक, नेमबाज मनू भाकर, अवनी लेखरा, क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांची नामांकनं जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आली होती.
क्रीडा चाहत्यांनी दोन आठवड्यांच्या काळात त्यांच्या आवडीच्या महिला क्रीडापटूला मतदान करून विजेती म्हणून मनू भाकरची निवड केली आहे.
या पाचही क्रीडापटूंबाबत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
जानेवारी महिन्यात बीबीसीने निवडलेल्या ज्युरीने या पाच भारतीय महिला क्रीडापटूंची निवड केली होती. या ज्युरीमध्ये देशभरातील काही नामांकित क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश आहे. त्यानंतर विजेत्या क्रीडापटूची निवड करण्यासाठी क्रीडा चाहत्यांच्या मतदानासाठी ही नावं जाहीर करण्यात आली.

यावर्षीच्या पुस्कारांची थीम 'चॅम्पियन्स चॅम्पियन' अशी होती. या क्रीडापटूंना कारकीर्द घडवून पदकं मिळवण्यासाठी मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्यांच्या योगदानाकडं त्याद्वारे विशेष लक्ष वेधण्यात आलं.
यासंदर्भात अंध धावपटूंसाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी करणारे गाईड रनर्स आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा अभाव एका विशेष माहितीपटाद्वारे मांडण्यात आला आहे.
पुरस्कार सोहळ्यापर्यंत काही विशेष कव्हरेजही करण्यात आलं. यात महाराष्ट्रातील दुर्गम भागातील कबड्डी खेळणाऱ्या मुलींच्या प्रेरणादायी प्रवासाचा समावेश होता. त्यांना चॅम्पियन बनवणारे चॅम्पियन होते कॉलेजमधलेच काही प्राध्यापक.
सरकार आणि खासगी सहभागातून मिळणारा निधी तसंच स्पॉन्सर्समुळं भारतीय क्रीडा क्षेत्राची प्रगती पाहायला मिळाली आहे. त्यामुळंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची संख्याही वाढलेली पाहायला मिळते. मात्र यातही महिलांना मिळणारा वाटा अगदी कमी असल्याचं बीबीसीच्या एका विशेष रिपोर्टमधून समोर आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर या पुरस्कारांची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. देशातील सर्वोत्तम क्रीडापटूचा गौरव करणं आणि त्याचबरोबर देशातील महिला क्रीडापटूंशी संबंधित समस्या, मुद्दे आणि त्यांच्यासमोर असलेली आव्हानं याकडं लक्ष वेधणं हाही त्यामागचा उद्देश होता.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कारांच्या पहिल्या सोहळ्यात तत्कालिन क्रीडा मंत्री किरेन रिजीजू प्रमुख पाहुणे होते, तर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू पहिल्या पुरस्काराची विजेती ठरली होती.
त्यानंतर 2020 मध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियन कोनेरू हंपी विजेती ठरली होती. वेट लिफ्टर मीराबाई चानूला 2021 आणि 2022 अशा सलग दोन वर्षी क्रीडा चाहत्यांनी पुरस्काराची मानकरी ठरवलं होतं.
यापूर्वी झालेल्या पुरस्कारांमध्ये क्रिकेटपटू शेफाली वर्मा आणि नेमबाज मनू भाकर यांना इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. तर पीटी उषा, अंजू बॉबी जॉर्ज, वेट लिफ्टर कर्नम मल्लेश्वरी आणि हॉकीपटू प्रीतम सिवाच यांना यापूर्वी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
विविधता आणि सर्वसमावेशकता याबाबतच्या कटिबद्धतेमुळं 2023 च्या पर्वापासून बीबीसी इंडियन पॅरा स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. या पहिल्या पुरस्काराची मानकरी होती टेबल टेनिसपटू भाविना पटेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











