बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कार तरुणींना निर्भीडपणे स्वप्नं पूर्ण करण्याची प्रेरणा देतो- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' आयोजित करण्याच्या उपक्रमाबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बीबीसीच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

बीबीसीच्या स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2024 च्या मानकरी खेळाडूच्या नावाची घोषणा आज (17 फेब्रुवारी) सायंकाळी दिल्लीमध्ये होणार आहे.

क्रीडा चाहत्यांनी दोन आठवड्यांच्या काळात त्यांच्या आवडीच्या महिला क्रीडापटूला मतदान करून विजेतीची निवड केली आहे.

बीबीसीच्या स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर या पुरस्काराचं हे पाचवं वर्ष आहे. यंदा पुरस्कारासाठी गोल्फपटू आदिती अशोक, नेमबाज मनू भाकर, अवनी लेखरा, क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांची नामांकनं जाहीर करण्यात आली होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश

'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' या कौतुकास्पद उपक्रमासाठी मी बीबीसीच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करते.

बीबीसी महिला खेळाडूंच्या यशाकडे लक्ष वेधण्यासाठी कटीबद्धता म्हणून 2020 पासून बीबीसी इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द इयर पुरस्काराचं आयोजन करत आहे, हे समजल्यावर मला आनंद झाला.

या उपक्रमाद्वारे वाखाणण्यात आलेल्या गुणी अ‍ॅथलीट्सनी त्यांच्या खेळांमध्ये तर उत्तम कामगिरी केलीच आहे, पण सोबतच त्यांनी अनेक तरुणींना आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी न घाबरता प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा दिली.

आपल्या मुली आणि महिलांना क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार मिळतात, तेव्हा त्याचा मला विशेष आनंद होतो. भारतीय महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक खेळाडू म्हणून आपला ठसा उमटवत असल्याचं पाहून मला आनंद होतो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश

फोटो स्रोत, PRESIDENTOFINDIA.GOV.IN

फोटो कॅप्शन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जेव्हा त्या मेडल्स जिंकतात आणि राष्ट्रगीताची धून वाजवत तिरंगा फडकवला जातो, तेव्हा प्रत्येक भारतीयाला त्याचा विशेष अभिमान वाटतो.

लिंगाधारित पारंपरिक संकल्पना आणि ठोकताळे मोडून काढण्यामध्ये खेळांची भूमिका महत्त्वाची आहे. भारतीय महिला अडथळ्यांवर मात करत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये एक नवीन मानदंड निर्माण करत आल्या आहेत.

ग्राफिक

राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधली त्यांची कामगिरी ही भारतातल्या महिला खेळाडूंनी घेतलेली झेप आणि भारत सरकारचा त्यांना असलेला पाठिंबा दाखवते.

खेळाच्या मैदानात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या प्रेरणादायी कहाण्या लोकांपर्यंत पोहोचवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे खेळाडूंचा गौरव होतो आणि युवा पिढीलाही प्रेरणा मिळते.

मी पालक, शाळा आणि कॉलेजेस, नोकरी देणाऱ्या व्यक्ती आणि इतर संस्थांना आवाहन करते की, मुलींना खेळात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. प्रश्न फक्त जिंकण्याचा नाही, खेळ मुलींना बळ देतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर काय आहे?

बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर या पुरस्कारांची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. देशातील सर्वोत्तम क्रीडापटूचा गौरव करणं आणि त्याचबरोबर देशातील महिला क्रीडापटूंशी संबंधित समस्या, मुद्दे आणि त्यांच्यासमोर असलेली आव्हानं याकडं लक्ष वेधणं हाही त्यामागचा उद्देश होता.

आज (17 फेब्रुवारी) सायंकाळी होणाऱ्या सोहळ्यामध्ये बीबीसी ज्युरीनं निवडलेल्या आणखी तीन महिला क्रीडापटूंचाही गौरव करणार आहे. त्यात बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराद्वारे तरुण महिला क्रीडापटूच्या यशाची दखल घेतली जाईल.

तर क्रीडाक्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानासाठी बीबीसी लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराद्वारे वरिष्ठ महिला क्रीडापटूला गौरवलं जाईल. त्याशिवाय पॅरा स्पोर्ट्समधील उल्लेखनीय कामगिरीसाठी महिला पॅरा क्रीडापटूला बीबीसी पॅरा स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरवलं जाईल.

पुरस्कार सोहळा बीबीसीच्या भारतीय भाषांच्या वेबसाईट आणि बीबीसी स्पोर्ट्स वेबसाईटवरही प्रसारीत केला जाईल.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कारांच्या पहिल्या सोहळ्यात तत्कालिन क्रीडा मंत्री किरेन रिजीजू प्रमुख पाहुणे होते, तर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू पहिल्या पुरस्काराची विजेती ठरली होती.

त्यानंतर 2020 मध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियन कोनेरू हंपी विजेती ठरली होती. वेट लिफ्टर मीराबाई चानूला 2021 आणि 2022 अशा सलग दोन वर्षी क्रीडा चाहत्यांनी पुरस्काराची मानकरी ठरवलं होतं.

यापूर्वी झालेल्या पुरस्कारांमध्ये क्रिकेटपटू शेफाली वर्मा आणि नेमबाज मनू भाकर यांना इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. तर पीटी उषा, अंजू बॉबी जॉर्ज, वेट लिफ्टर कर्नम मल्लेश्वरी आणि हॉकीपटू प्रीतम सिवाच यांना यापूर्वी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

विविधता आणि सर्वसमावेशकता याबाबतच्या कटिबद्धतेमुळं 2023 च्या पर्वापासून बीबीसी इंडियन पॅरा स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. या पहिल्या पुरस्काराची मानकरी होती टेबल टेनिसपटू भाविना पटेल

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)