ISWOTY Award : 17 फेब्रुवारीला जाहीर होणार बीबीसी 'इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर'ची मानकरी खेळाडू

ISWOTY साठी नामांकित महिला क्रीडापटू.

भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा बीबीसी 'इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर'च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदाची मानकरी कोण ठरणार हे 17 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. या पुरस्कारांसाठी 31 जानेवारीपर्यंत क्रीडा चाहत्यांनी मतदान केलं.

यात गोल्फपटू अदिती अशोक, नेमबाज मनू भाकर आणि अवनी लेखरा, क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पैलवान विनेश फोगाट या पाच स्पर्धक आहेत.

दरवर्षी भारतीय क्रीडा क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महिला खेळाडूंचा आणि त्यांच्या कामगिरीचा बीबीसीकडून गौरव केला जातो. यंदाचा अवॉर्ड हा 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे.

बीबीसीच्या भारतीय भाषांच्या वेबसाईट्सवर किंवा बीबीसी स्पोर्ट वेबसाईटवर चाहत्यांनी आवडत्या 'इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर'ला भरभरून मतदान केलं.

बीबीसीने निवडलेल्या ज्युरीने पाच भारतीय महिला क्रीडापटूंची यादी तयार केली. या ज्युरीमध्ये देशभरातील काही नामांकित क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश आहे.

ज्या महिला क्रीडापटूला सर्वाधिक मतं मिळतील, ती खेळाडू बीबीसी 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' ठरेल, आणि त्याचा निकाल बीबीसीच्या भारतीय भाषांच्या वेबसाईट्स आणि बीबीसी स्पोर्ट वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मतदान 31 जानेवारी 2025 रोजी सांयकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं होतं. या स्पर्धेचे विजेते 17 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या एका समारंभात जाहीर केले जातील. याबाबतचे सर्व नियम आणि अटी तसेच गोपनीयतेचे धोरण वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

या समारंभात, बीबीसी ज्युरीने नामांकित केलेल्या इतर तीन महिला क्रीडापटूंचा देखील सन्मान करणार आहे.

ISWOTY

युवा खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेणारा 'बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर' अवॉर्ड, भारतीय क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ महिला खेळाडूला 'बीबीसी लाईफटाईम अचिव्हमेंट' अवॉर्ड आणि दिव्यांग श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला 'बीबीसी पॅरा स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' अवॉर्ड दिला जाईल.

या पुरस्कार सोहळ्याशिवाय, बीबीसी चॅम्पियन्स चॅम्पियन्सच्या थीमवर एक विशेष डॉक्युमेंटरी आणि वृत्तांत प्रसिद्ध करणार आहे. यामध्ये क्रीडा चॅम्पियन्स घडवणाऱ्यांचे योगदान अधोरेखित केले जाईल.

यंदाचे हे पाचवे पर्व आहे. महिला क्रीडापटूंच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी बीबीसीने 2019 मध्ये 'इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' अवॉर्ड सुरू केला होता.

या आहेत नामांकित क्रीडापटू

अदिती अशोक (गोल्फपटू)

26 वर्षांची अदिती अशोक गोल्फ खेळातील भारताची एक उगवता तारा आहे. सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी अदिती पहिली भारतीय महिला गोल्फपटू आहे.

वयाच्या 18 व्या वर्षी ती 2016 च्या रियो ऑलिंम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात तरुण गोल्फपटू बनली होती. 2020 च्या टोकियो ऑलिंम्पिकमध्ये ती चौथ्या स्थानी होती.

तर 2023 च्या आशियाई खेळात तिने रौप्य पदक जिंकले. परंतु, 2024 च्या तिसऱ्या ऑलिंम्पिकमध्ये तिला पदक मिळवता आले नाही.

गोल्फपटू अदिती अशोक

लेडिज युरोपियन टूरमध्ये (एलईटी) पाचवेळा विजय आणि प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार मिळवणारी अदिती भारतातील महिलांना गोल्फ खेळाप्रती प्रेरणा देत आहे.

ती एक उत्कृष्ट गोल्फपटू असून आपल्या कामगिरीमुळे तिने भारताला गोल्फमध्ये जागतिक स्तरावर सन्मान मिळवून दिला आहे.

मनू भाकर (नेमबाज)

22 वर्षीय मनू भाकर, स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची पहिली खेळाडू. 2024 तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पिस्तूल नेमबाजीत दोन कांस्य पदके मिळवली.

2020 च्या ऑलिम्पिकमध्ये, तिचे पिस्तूल खराब झाल्याने तिचे पदक हुकले होते. त्यानंतर तिने 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी तिचे दीर्घकाळचे प्रशिक्षक जसपाल राणा यांच्याशी ती पुन्हा जोडली गेली.

नेमबाज मनू भाकर

2018 मध्ये, वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी विश्वचषक सुवर्णपदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय नेमबाज म्हणून तिने इतिहास रचला.

अर्जुन पुरस्कार प्राप्त मनूला 2021 मध्ये बीबीसीच्या इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. तिला देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

अवनी लेखरा (नेमबाज)

23 वर्षीय अवनी लेखरा ही एक दिव्यांग खेळाडू आहे. तीन पॅरालिंम्पिक पदके जिंकणारी भारताची ती पहिली शूटर आहे. 2024 मध्ये, तिने पॅरिसमध्ये सुवर्ण आणि 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एक कांस्य पदक जिंकले.

2015 च्या उन्हाळ्याच्या सुटीत अवनीची नेमबाजीशी ओळख झाली होती.

सुरुवातीला छंद म्हणून शुटिंग सुरु करणाऱ्या अवनीने विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. शुटिंगमध्ये लवकरच तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

नेमबाज अवनी लेखरा

अवनीने 12 वर्षात अवनीने तीन विश्वचषक स्पर्धांत भाग घेतला आणि सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली. 2022 च्या आशियाई पॅरा गेम्समध्येही तिने सुवर्णपदक जिंकले होते.

असामान्य कामगिरीसाठी अवनीला पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

स्मृती मंधाना (क्रिकेटपटू)

28 वर्षीय स्मृती मंधाना, भारताच्या प्रमुख महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 2024 मध्ये तिने एका वर्षात चार वन डे इंटरनॅशनल शतकांसह सर्वाधिक 1659 धावांचा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील हा विक्रम आहे.

ती रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुची (आरसीबी) कर्णधार असून या संघाला 2024 मध्ये वूमन प्रिमियर लीगचे जेतेपद मिळवून दिले आहे.

क्रिकेटपटू स्मृती मंधाना

2018 आणि 2022 मध्ये दोन वेळा आयसीसी महिला क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार जिंकणाऱ्या स्मृती मंधानाने इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीनंतर हा पुरस्कार दोनदा जिंकणारी ती दुसरी क्रिकेटपटू आहे.

2020 मध्ये T20 विश्वचषक आणि 2017 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघात तिचा समावेश होता. स्मृतीला भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानांपैकी एक अर्जुन पुरस्काराने यापूर्वी गौरवण्यात आलेले आहे.

विनेश फोगाट (पैलवान)

30 वर्षीय विनेश फोगाट ही तीन वेळा ऑलिंम्पियन आणि भारतातील आघाडीच्या पैलवानांपैकी एक आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला पैलवान ठरली. परंतु निर्धारित वजनी गटात अपयशी ठरल्याने ती अपात्र ठरली.

विनेशने 2019 आणि 2022 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले आणि 2014, 2018 आणि 2022 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले.

पैलवान विनेश फोगाट

ती भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात उघडण्यात आलेल्या मोहिमेचा एक प्रमुख चेहरा होती. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर महिला पैलवानांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. सिंग यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ती सध्या हरियाणातील राजकारणात सक्रिय आहे. हरियाणा विधानसभेत ती काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करते.

1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच भारतीय महिला क्रीडापटूंना या ज्युरीने नामांकित केले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)