'फॅशन आयकॉन' ते 'फर्स्ट लेडी', यावेळी मेलानिया वेगळं काय करू शकतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नदीन युसूफ
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या निकालात डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळाला. निवडणुकीतील निकालाच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केलं.
एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, 'अमेरिकेच्या जनतेनी आमच्यावर विश्वास ठेवत आम्हाला ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. स्वातंत्र्य हा या देशाचा प्राण आहे त्याचे आम्ही रक्षण करू' असं त्या म्हणाल्या.
'आपल्या विचारधारेपेक्षा, आपल्या देशाच्या हिताला प्राधान्य द्या,' असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
मेलानिया ट्रम्प यांनी अगदी मोजक्या शब्दांत संदेश दिला आहे. पण येत्या काळात अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक म्हणून त्या काय भूमिका बजावतील याकडे त्यांच्या या पोस्टमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.
2016 साली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळी सुरुवातीला त्यांच्या पत्नी मेलानिया व्हाईट हाऊसमध्ये कमीच दिसायच्या. त्या बहुतेकवेळा आपल्या मुलांबरोबर न्यूयॉर्क मध्ये राहत होत्या.
यापूर्वी जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांच्या पत्नींनी म्हणजेच 'फर्स्ट लेडीज'नी एक परंपरा निर्माण केली होती. त्यानुसार फर्स्ट लेडीज या विविध सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेताना दिसत असत. पण मेलानिया मात्र क्वचितच सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या.
पण यावेळी मात्र त्या अमेरिकेच्या 'प्रथम महिला नागरिक' म्हणून पूर्णतः वेगळ्या रूपात पाहायला मिळू शकतील असं जाणकारांना वाटतं. त्यांनी आपल्या दृष्टीकोनात जाणीवपूर्वक बदल केल्याचे संकेत जाणकारांना दिसतात.
54 वर्षीय स्लोवेनियाई-अमेरिकन वंशाच्या मेलानिया नेव्ह्स आधी फॅशन मॉडल होत्या.
ट्रम्प यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर ट्रम्प दाम्पत्याच्या 'ग्लॅमरस' राहणीमानाची चर्चा व्हायची. ट्रम्प राजकारणात आल्यावर मात्र त्यांना आपल्या अलिशान ट्रम्प टॉवरमधून ओव्हल ऑफिसमध्ये राहायला यावं लागलं. राजकारणात आल्यावर अर्थातच ट्रम्प दाम्पत्यावर अनेक मर्यादा आल्या.
‘फर्स्ट लेडी’ म्हणून मेलानिया ट्रम्प यांनी भूषवलेला कार्यकाळ काहीसा विवादास्पद राहिलाय. काहींनी मेलानिया यांचं वक्तिमत्त्व ‘गूढ’ असल्याचं म्हटलंय. आधीच्या ‘फर्स्ट लेडी’ राहिलेल्या महिलांच्या तुलनेत त्यांनी आपलं जीवन अतिशय खासगी ठेवलंय. त्यांनी त्यांच्या कार्यकाळादरम्यान व्हाईट हाऊस आणि निवडणूक प्रचारात कमी भाषणं केली आहेत.
टॅमी विजिल बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये कम्युनिकेशन्सच्या सहायक प्राध्यापिका असून त्यांनी मिशेल ओबामा आणि मेलानिया ट्रम्प यांच्यावर एक पुस्तक लिहिलंय.
त्या म्हणतात, “मेलानिया फर्स्ट लेडीज म्हणून अनोख्या आहेत. त्यांची काम करण्याची शैली इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यांना जे वाटतं त्या तेच करतात. मात्र ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण व्हाव्यात याकडे त्यांचा कल असतो.
मेलानिया यांच्याशी संबंधित वाद
ट्रम्प यांच्यावर अनेक कायदेशीर खटले होते त्यामुळे मेलानिया देखील माध्यमांपासून दूरच राहिल्या.
ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले पण मेलानिया दिसल्या नाहीत तेव्हा अशा अनेक बातम्या दिसल्या. ज्यात विचारणा झाली की मेलानिया कुठे आहेत.
महत्त्वाच्या प्रसंगी मेलानिया दिसल्याही, उदाहरणार्थ 2022 साली डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण पुन्हा एकदा राष्ट्रराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली तेव्हा त्या उपस्थित होत्या.
जुलैमध्ये आयोजित रिपब्लिकन नॅशनल कन्वेंशनमध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र, यात त्यांनी कुठलंही भाषण किंवा संबोधन केलं नाही. ‘फर्स्ट लेडी’ म्हणून त्यांनी तसं करणं अपेक्षित होतं, पण या परंपरेला त्यांनी छेद दिला.
मेलानिया बोलतानाही काळजीपूर्वक शब्दांचा वापर करतांना दिसतात. यातून त्यांचा दृष्टीकोन दिसून येतो.

फोटो स्रोत, Getty Images
मतदानाच्या काही आठवड्यांपूर्वी मॅडिसन स्के्वअर गार्डनमध्ये आयोजित ट्रम्प यांच्या रॅलीत मेलानिया यांनी भाषण दिलं होतं. ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्वेनिया येथे हल्ला झाला होता. हा संदर्भ घेऊन त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर टीका केली होती.
न्यूयॉर्क शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे हे महानगर पोखरलं जातंय असं त्यांनी म्हटलं होतं.
ट्रम्प यांच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केला होता त्याचं वर्णन मेलानिया यांनी दैत्य असं केलं होतं.
ट्रम्प यांच्या विरोधकांच्या विखारी प्रचारामुळेच ट्रम्पवर हा जीवघेणा हल्ला झाला होता असं त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
मेलानिया यांनी त्यांच्या 'मेलानिया' या आत्मचरित्रात अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
मेलानिया यांची गर्भपातावरील भूमिका रिपब्लिकन पक्षाहून वेगळी आहे. गर्भपाताचा निर्णय सर्वस्वी त्या व्यक्तीचाच असावा अशी त्यांची भूमिका असल्यामुळे रिपब्लिकन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यावर हरकत व्यक्त केली होती.
ऐन निवडणूक प्रचारावेळीच हा वाद उफाळून आल्यामुळे देखील चर्चेला वेगळा सूर मिळाला.

फोटो स्रोत, Chip Somodevilla/Getty Images
मेलानिया ट्रम्प यांनी त्यांचे मॉडलिंग करिअर, ट्रम्प यांच्याबद्दल आवडणाऱ्या गोष्टी, ट्रम्प यांच्यावर झालेले राजकीय भाष्य इत्यादी गोष्टींवर खुलेपणाने लिहिले आहे पण त्याचवेळी त्यांनी ट्रम्प आणि त्यांच्यात असलेल्या खासगी वादांवर भाष्य करणे टाळले आहे.
असं असलं तरी त्या ट्रम्प यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे देखील दिसले आहे. 2020 च्या निवडणुकीत ट्रम्प यांनी एक खोटा दावा केला होता. या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मेलानिया यांनी त्यांच्या दाव्याचे समर्थन केले होते.
आपल्या पुस्तकात त्या लिहितात, “या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी मी एकमेव व्यक्ती नाही.”
6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटॉल हिलवर झालेल्या दंगलीबद्दल त्यांनी, कामात व्यस्त असल्यामुळे काय घडत आहे याची जाणीव नाही, असंही लिहिलं होतं.
मेलानियाच्या माजी मीडिया सेक्रेटरी स्टेफनी ग्रिशम यांनी त्यांच्याबाबतची आठवण सांगताना लिहिलंय की, मेलानिया ट्रम्प यांनी हिंसाचाराचा निषेध करणारे वक्तव्य जारी करण्यास नकार दिला होता, ज्यामुळे ग्रिशमला राजीनामा द्यावा लागला होता.
‘फर्स्ट लेडी’ म्हणून मेलानिया यांचा मागील कार्यकाळ
मेलानिया यांना प्रथम महिलेची भूमिका पार पाडणं आवडतं का, असा प्रश्न विश्लेषक उपस्थित करतात.
सीएनएनचे रिपोर्टर केट बेनेट, ज्यांनी मेलानिया ट्रम्पचे चरित्र लिहिले आहे. त्या याबाबत म्हणतात, सुरुवातीला त्यांची इच्छा नव्हती, तरीही त्यांनी प्रथम महिला म्हणून आपली भूमिका पार पाडली.
बेनेटने 2021 मध्ये 'पीपल मॅगझिन'ला सांगितलं होतं की, “मेलानिया यांना व्हाईट हाऊसमधील वास्तव्य आणि फर्स्ट लेडी असल्यामुळे मिळालेल्या सर्व सुविधा आवडत होत्या. त्यांनी या सुविधांचा खरोखर आनंद घेतला असेल, असं मला वाटतं.”
मेलानिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की, "प्रथम महिलेच्या भूमिकेत चांगली कामं करून आपली कर्तव्यं योग्यपणे पार पाडण्याची भावना आहे."

फोटो स्रोत, Reuters
1999 मध्ये, दिलेल्या एका मुलाखतीत मेलानिया म्हणाल्या होत्या की, त्यांचे पार्टनर डोनाल्ड ट्रम्प यांनी भविष्यात कधी अध्यक्षपदाची निवडणूक लढवली तर मी माजी फर्स्ट लेडीज जॅकलिन केनेडी आणि बेटी फोर्ड यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून प्रथम महिलेची भूमिका पार पाडतील. यावेळी त्यांनी माजी ‘फर्स्ट लेडी’ज यांचा उल्लेख ‘व्हेरी ट्रेडीशनल’ असा केला होता.
जॅकलिन केनेडी या एक फॅशन आयकॉन होत्या, त्या व्हाईट हाऊसच्या संरक्षणाबाबतीत अत्यंत वचनबद्ध होत्या. तर मुलगी फोर्ड यांना गर्भपात हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणारी अग्रगण्य वकील म्हणून ओळखलं जातं.
वॉशिंग्टनमध्ये आल्यानंतर मेलानियाने फर्स्ट लेडी म्हणून आपले कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली. यामध्ये जागतिक नेत्यांसाठी भेटी दरम्यान स्नेहभोजन वगैरे सारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
व्हाईट हाऊसची सजावट, इंटेरियर या गोष्टीही त्यांनी पाहिल्या होत्या. ख्रिसमस वेळी कशी सजावट असावी या गोष्टींकडेही त्या वैयक्तिकरीत्या लक्ष देत असत.
मेलानियांचा पोशाखही वेळोवेळी चर्चेचा विषय ठरला होता.
खासकरून 2018 साली जेव्हा स्थलांतरित मुलांसाठी बांधलेल्या डिटेन्शन सेंटरला भेट देताना त्यांनी घातलेल्या जॅकेटवर ‘मला फरक पडत नाही, आणि तुम्हाला?’ असा मजकूर लिहिलेला होता. यावरून बरीच चर्चा झाली.
याबाबत बोलताना त्या म्हणाल्या होते, जे लोक माझ्यावर टीका करतात आणि डाव्या विचारसरणींच्या माध्यमांसाठी या जॅकेटवरचा संदेश होता.


मेलानिया यांचे जुने मित्र आणि वरिष्ठ सल्लागाराने गुपचूप त्यांचा व्हीडिओ रेकॉर्ड केला होता, यावरूनही वादाला तोंड फुटलं होतं. या व्हिडिओत मेलानिया स्थलांतरित मुलांना त्यांच्या कुटुंबांपासून विभक्त करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर टीका करताना आणि निराशा व्यक्त करताना दिसल्या होत्या.
मात्र, नंतर त्यांनी ‘मला या धोरणाची माहिती नव्हती’ असं म्हटलं. तसेच आपण या धोरणाचं समर्थन करत नसल्याचंही त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना वैयक्तिकरित्या सांगितलं असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
या धोरणावरून झालेल्या वादानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जून 2018 मध्ये हे धोरण मागे घेतलं.
मेलानियांपुढे होती ‘ही’ आव्हानं
टॅमी व्हिजिल म्हणतात, 'मेलानियापुढे असणाऱ्या आव्हानांपैकी सर्वांत मोठे आव्हान होतं की त्यांच्याकडे अनुभव नव्हता. त्यांच्याकडे असणारे कर्मचारीदेखील मर्यादित कालावधीसाठी होते आणि त्यांनाही तितकाच कमी अनुभव होता. ते कर्मचारी कधीच विश्वासार्ह नव्हते.'
मात्र, व्हिजिल असंही म्हणतात की, 'या आव्हानांना न जुमानता, मेलानिया यांनी आपली कामं पार पाडली आणि आणि ऑनलाइन बुलिंगविरोधात 'बी बेस्ट' मोहिमेद्वारे त्यांनी मुलांसाठीच्या कल्याणकारी गोष्टींना पाठिंबा दिला.'
डोनाल्ड ट्रम्प यांचा सोशल मीडियाचा आक्रमक वापर पाहता, मेलानिया यांना त्या मोहिमेचा बचाव करणं भाग पडलं.
2016 मध्ये त्यांनी सीबीएसला सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांचा ज्या पद्धतीने ऑनलाइन वावर असतो त्यामुळे त्यांना त्रास झाला पण त्याचवेळी त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली.

फोटो स्रोत, Getty Images
मेलानिया यांनी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी त्यांनी काम केलं. त्यांनी त्यासाठी एक संस्था देखील सुरू केली. ज्याद्वारे त्यांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला जातो.
अनेकांना अशी अपेक्षा आहे की, वॉशिंग्टनला परतल्यानंतर त्या आपली कामं सुरू ठेवतील. मात्र, त्या तेथे पूर्णवेळ राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
व्हिजिल म्हणतात की प्रथम महिलेच्या भूमिकेतील जबाबदाऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे.
त्यामुळे मेलानिया यांना त्या सार्वजनिकरित्या किती सक्रिय राहतील, याबाबत त्यांना लक्ष द्यावे लागेल.
‘मेलानिया यावेळी हे पाऊल आणखी विचारपूर्वक उचलतील, असं मला वाटतं’, अशी भावना प्रोफसर व्हिजिल यांनी व्यक्त केली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











