You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मिस इंडिया नंदिनीः 10 वीमध्ये असतानाच पाहिलेलं मिस इंडिया होण्याचं स्वप्न
- Author, मोहरसिंह मीणा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
नंदिनी जेव्हा दहावीत गेली तेव्हाच ती मला म्हणाली होती की, "मम्मी मला एकदा तरी मिस इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे."
"तिने अभ्यासात देखील स्वतःला सिद्ध केलंय. ती म्हणायची की, मम्मी मी चांगला अभ्यास करते आहे, पण मला तिथेही जायचं आहे."
फेमिना मिस इंडिया-2023 चा किताब पटकविणाऱ्या नंदिनी गुप्ताने तिच्या आईला रेखा गुप्ता यांना तिची स्वप्नं सांगितली होती. आज तिचं हे स्वप्न पूर्ण झालंय.
सध्या रेखा गुप्ता नंदिनीसोबत मुंबईत आहेत.
फोनवर झालेल्या संभाषणात त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "जेव्हा नंदिनीच्या नावाची घोषणा झाली तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. काय बोलावं मला सुचत नाहीये, माझे शब्द अपुरे पडतील."
कोटा ते थेट मिस इंडिया
नंदिनीने पहिल्याच प्रयत्नात मिस इंडियाचा किताब पटकावला आहे. नंदिनी भारताची 59 वी मिस इंडिया बनली आहे.
नंदिनी आणि तिचं कुटुंब कोटा येथील सब्जी मंडी भागात वास्तव्यास आहे. नंदिनीने आपलं शालेय शिक्षण कोटा येथील एका खासगी शाळेतून पूर्ण केलं.
त्यानंतर तिने मुंबईच्या लाला लजपत राय कॉलेजमध्ये मॅनेजमेंट स्टडीजमध्ये ॲडमिशन घेतलं.
मुंबईत राहत असताना नंदिनीने अभ्यासासोबत मिस इंडियाचा बनण्यासाठीही मेहनत घेतली.
नंदिनीचे वडील सुमित गुप्ता बीबीसीशी बोलताना सांगतात की, "नंदिनीच्या नावाची घोषणा झाल्यावर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यानंतर आम्ही स्टेजकडे पाहिलंच नाही."
ते सांगतात, "नंदिनीला लहानपणापासूनच कॅट वॉक करायची आवड होती. नवीन ड्रेस आणल्यावर ती तो लगेचच घालायची आणि मी कशी दिसते म्हणून विचारायची."
नंदिनीच्या आई रेखा गुप्ता सांगतात, "लहानपणी नंदिनी नवे कपडे घालून पोज द्यायची. ती जसजशी मोठी होऊ लागली तशी इंटरनॅशनल मॉडेल्सना फॉलो करू लागली. यातूनच तिला प्रेरणा मिळत गेली."
"दहावीत असताना नंदिनीने मला सांगितलं की मला मिस इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. तेव्हा मी तिला सांगितलं होतं की, तू अजून लहान आहेस."
"तिने अभ्यासात देखील स्वतःला सिद्ध केलंय. जेव्हा ती अठरा वर्षांची झाली तेव्हा आम्ही तिला मिस इंडियाची तयारी करण्यासाठी पाठवलं."
त्या सांगतात, "11 फेब्रुवारीला तिची मिस राजस्थानसाठी निवड झाली. आता तिने मिस इंडियाचा किताब पटकावलाय, पण एका छोट्या शहरातील मुलगी इतकी मोठी झेप घेऊ शकते यावर आमचा विश्वासच बसेना. आता 2024 च्या मिस वर्ल्डसाठी फेमिना तिचं ग्रुमिंग करेल. काही दिवसांनी ती मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होईल "
अभ्यासातही अव्वल
नंदिनीने शाळेपासून ते कॉलेजपर्यंतच्या अभ्यासात कधीच घरच्यांना निराश केलेलं नाही.
तिचे वडील सुमित गुप्ता सांगतात, "नंदिनी कोटा स्टेशनजवळील सेंट पॉल शाळेत शिकली. तिने 10 वीमध्ये 90 टक्के आणि 12 वीकॉमर्समध्ये 92 टक्के गुण मिळवले."
ते सांगतात, "पुढे उच्चशिक्षण घेण्यासाठी तिने मुंबईच्या हाजी अली भागातील लाला लजपत राय कॉलेजची निवड केली. ती इथे मॅनेजमेंट स्टडीज करते आहे. मॅनेजमेंटच्या पहिल्याच वर्षात तिने 90 टक्क्यांहून जास्त गुण मिळवले आहेत."
"फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभगी होण्यासाठी तिने दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा दिल्या नाहीत. कारण मार्च महिन्यात 45 दिवसांसाठी तिला मणिपूरला जावं लागणार होतं. पण आता कॉलेजने तिला दुसऱ्या वर्षाची परीक्षा देण्यासाठी परवानगी दिली आहे."
नंदिनीची आई रेखा गुप्ता बीबीसीला सांगतात, "नंदिनीचा अभ्यास सुरूच राहील."
सुमित गुप्ता सांगतात, "सर्वात आधी शिक्षण आहे. त्यानंतर मॅनेजमेंटमध्येच मास्टर्स डिग्री घेणार आहे."
शेतकरी कुटुंब
नंदिनीचा जन्म 2003 साली झाला. नंदिनीची धाकटी बहीण अनन्या नववीत शिकते. आई रेखा गुप्ता गृहिणी आहेत आणि 56 वर्षीय वडील सुमित गुप्ता शेती करतात.
"मी आणि माझा धाकटा भाऊ शेती सांभाळतो. मोठा भाऊ सेवानिवृत्त डॉक्टर आहे," असं सुमित सांगतात.
ते सांगतात, "शेतीसोबतच, मी पोल्यूशन कंसल्टंट म्हणून काम करायचो. पाण्याचं टेस्टिंग, पर्यावरण ऑडिट यासह अनेक कामं करायचो."
"पण, नोटाबंदीपासून मी पूर्ण वेळ शेतीत काम करू लागलो."
नंदिनीचा स्वभाव
सुमित गुप्ता नंदिनीच्या शेतात आल्याचे किस्से सांगतात, "नंदिनी सर्वांशी खूप मैत्रीपूर्ण वागते. ती खूप सोशल आहे. शेतात आल्यावर तिथे काम करणाऱ्या लोकांशी ती सहज गप्पा गोष्टी करत असते. ती बऱ्याचदा शेतात येत असते "
रेखा गुप्ता सांगतात, "नंदिनीला फोटोग्राफीची खूप आवड आहे. नेहमी लोकांना मदत करण्याचा आणि गरजूंसाठी काहीतरी करण्याचा विचार तिच्या मनात सुरू असतो."
त्या सांगतात, "नंदिनीच्या पर्समध्ये चॉकलेट आणि बिस्किटं हमखास असतात. कोणी काही मागायला आलं तर ती त्यांना चॉकलेट आणि बिस्किट देते."
त्या सांगतात, "एक दिवस आम्ही कोटामध्येच फिरत होतो. तिच्या समोर एक गरीब व्यक्ती आला. त्यादिवशी तिच्या पर्स चॉकलेट्स आणि बिस्किटं नव्हती."
"तेव्हा मी म्हणाले, पैसे देऊन टाक."
तेव्हा नंदिनीने पैसे द्यायला नकार दिला आणि म्हणाली, "मम्मी पैसे देऊन आपणच सवयी बिघडवतो."
फेमिना मिस इंडिया 2023 चा खिताब पटकावल्यानंतर तिच्यावर आणि कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरूच आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह देशभरातून अनेकांनी नंदिनीवर कौतुकाचा वर्षाव केला.
नंदिनीचे वडील सुमित गुप्ता आणि तिची धाकटी बहीण अनन्या सध्या मुंबईतील मालाडमध्ये आहेत. तर तिची आई रेखा नंदिनीसोबत वांद्र्यात आहे.
रेखा सांगतात, "त्या नंदिनीसोबत आहेत पण आणि नाहीत पण. म्हणजे नंदिनीचे सर्व कार्यक्रम फेमिना ऑर्गनायझेशनची टीम पाहत आहे."
नंदिनी कोटाला कधी येणार या प्रश्नावर तिचे वडील सुमित गुप्ता म्हणतात, "फेमिना मिस इंडियाचा वेलकम प्रोग्राम तिची होम सिटी कोटा इथे होणार आहे. हा कार्यक्रम तीन दिवसांचा असेल. पुढच्या काही दिवसांतच तिची कोटाला येण्याची वेळ निश्चित केली जाईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)