फिल्मिस्तान : देव आनंद, दिलीप कुमार, शम्मी कपूर असे स्टार घडवणाऱ्या स्टुडिओची गोष्ट

अशोक कुमार आणि देव आनंद

फोटो स्रोत, BBC World Service

फोटो कॅप्शन, अशोक कुमार आणि देव आनंद
    • Author, यासिर उस्मान
    • Role, चित्रपट इतिहासकार, बीबीसी हिंदीसाठी

हॉलिवूडमधील स्टुडिओ व्यवस्थेनं प्रेरित असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या संघटित स्टुडिओ व्यवस्थेला जेव्हा तडे गेले, तेव्हा प्रभात फिल्म कंपनी आणि बॉम्बे टॉकीजसारखे मोठे फिल्म स्टुडिओ कोसळले, बंद झाले.

या दोन स्टुडिओपासून फारकत घेत आणखी दोन मोठे स्टुडिओ तयार झाले. व्ही शांताराम यांचा राजकमल कला मंदिर आणि शशधर मुखर्जी यांचा फिल्मिस्तान.

जवळपास त्याच काळात सुरू झालेल्या राज कपूर यांच्या आरके स्टुडिओप्रमाणेच हे दोन्हीही एकाच व्यक्तीच्या सर्जनशील विचारांवर आधारित होते.

आज आपण फिल्मिस्तानबद्दल बोलणार आहोत. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात त्याचं जितकं योगदान आहे तितकं त्याबाबत बोललं जात नाही किंवा श्रेय दिलं जात नाही.

'फिल्मिस्तान'च्या चित्रपटांचा एकच उद्देश होता तो म्हणजे 'मनोरंजन'.

आतापर्यंत प्रत्येक स्टुडिओची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली होती. प्रभात फिल्म कंपनी पौराणिक आणि देशभक्तीपर कथांवर आधारित चित्रपट बनवत होती. तर बॉम्बे टॉकीज मनोरंजनात्मक पद्धतीनं सामाजिक समस्या मांडत असे.

प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतर देश स्वतंत्र झाला आणि चित्रपटांमध्ये गाव, समाजवाद आणि देशभक्ती यांसारखे विषय अधिक येऊ लागले होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पण फिल्मिस्ताननं मात्र वेगळा मार्ग स्वीकारला.

त्यांनी प्रत्येक शैलीचे चित्रपट केले, परंतु प्रत्येक चित्रपटाचा एकच उद्देश होता - मनोरंजन.

रोमान्स, नृत्य, गाणी, स्टायलिश कपडे, शहरातील कथा आणि नवीन स्टार्स लाँच करणं. आज बॉलिवूड ज्यासाठी ओळखलं जातं त्या प्रत्येक गोष्टीचा पाया फिल्मिस्तानमध्येच रचला गेला होता.

बॉलिवूडचे पहिले 'स्टार मेकर' शशधर मुखर्जी

या स्टुडिओतून 'अनारकली', 'मुनीमजी', 'पेइंग गेस्ट', 'शहीद', 'नागिन' आणि 'तुमसा नहीं देखा' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट तयार झाले.

दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, प्रदीप कुमार, साधना, वैजयंती माला या स्टार्सचे सुरुवातीचे हिट चित्रपट फिल्मिस्तानचेच होते. नासिर हुसेन, नितीन बोस आणि रमेश सेहगल या यशस्वी पटकथाकार-चित्रपटकारांच्या कारकिर्दीलाही फिल्मिस्तानने पंख दिले.

देव आनंद यांच्यासारखे कलाकार घडवण्यात फिल्मिस्तानचा मोठा वाटा मानला जातो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देव आनंद यांच्यासारखे कलाकार घडवण्यात फिल्मिस्तानचा मोठा वाटा मानला जातो.

प्रकाशात न्हाऊन गेलेले तारे प्रत्येकाला आठवतात, पण ते कोरणाऱ्या, त्यांना घडवणाऱ्या कारागिरांची नावं अनेकदा अस्पष्ट राहतात.

फिल्मिस्तानचे पडद्यामागील प्रमुख शशधर मुखर्जी हे असेच एक कारागीर होते. त्यांनी दिलीप कुमार, देव आनंद, प्रदीप कुमार, वैजयंती माला आणि शम्मी कपूर यांसारख्या स्टार्सची कारकीर्द घडवली.

खऱ्या अर्थानं ते बॉलिवूडचे पहिले 'स्टार मेकर' होते.

फिल्मिस्तानची स्थापना कशी झाली?

वर्ष 1940 मध्ये हिमांशू राय यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी देविका राणी यांनी बॉम्बे टॉकीजची सूत्रे हाती घेतली. परंतु लवकरच स्टुडिओला तडे जाऊ लागले. तिथे गटबाजी वाढली आणि हिमांशू राय यांचे निकटवर्तीय शशधर मुखर्जी यांनी बंड केलं.

त्यांच्यासोबत बॉम्बे टॉकीजचे सर्वात मोठे स्टार अशोक कुमार होते. शशधर यांचे ते नात्याने मेहुणे होते. स्टुडिओचा सर्वात यशस्वी चित्रपट 'किस्मत' दिग्दर्शित करणारे ज्ञान मुखर्जीदेखील त्यांच्यासोबत सामील झाले.

हे तिघे आणखी काही जणांना सोबत घेऊन स्टुडिओतून वेगळे झाले. बॉम्बे टॉकीज या धक्क्यातून सावरला नाही आणि काही वर्षांनी तो बंद पडला. पण 1943 मध्ये शशधर मुखर्जी यांनी त्यांच्या टीमसोबत फिल्मिस्तान हा नवीन स्टुडिओ सुरू केला.

फिल्मिस्तान स्टुडिओमधील पोलीस स्टेशन (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फिल्मिस्तान स्टुडिओमधील पोलीस स्टेशन (फाइल फोटो)

पूर्वी इथं 'शारदा' स्टुडिओ होता. तो आगीत जळून खाक झाला होता. मुंबईत गोरेगाव पश्चिममध्ये हीच जागा फिल्मिस्तानने घेतली. सुमारे पाच एकरांमध्ये पसरलेला हा स्टुडिओ काळाच्या तडाख्याला तोंड देत आजही अस्तित्वात आहे.

यात सात शुटिंग फ्लोर, एक शिवमंदिर आणि हिरवीगार बाग आहे. ती तुम्ही हजारो चित्रपटांमध्ये पाहिली असेल.

फिल्मिस्तानचे मुख्य आधारस्तंभ होते शशधर मुखर्जी. दिग्दर्शक होते ज्ञान मुखर्जी आणि आघाडीचे स्टार अशोक कुमार होते.

स्टुडिओच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी चुन्नीलाल कोहली यांच्याकडं देण्यात आली होती. ते बॉम्बे टॉकीजमधून त्यांच्यासोबत आले होते. महान संगीतकार मदन मोहन यांचे ते वडील होते.

फिल्मिस्तानचा पहिला चित्रपट 'चल चल रे नौजवान' (वर्ष 1944) होता. त्यात अशोक कुमार मुख्य अभिनेते होते. (प्रतिकात्मक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फिल्मिस्तानचा पहिला चित्रपट 'चल चल रे नौजवान' (वर्ष 1944) होता. त्यात अशोक कुमार मुख्य अभिनेते होते. (प्रतिकात्मक छायाचित्र)

चित्रपट बनवण्याचे मॉडेल मुख्यत्वे बॉम्बे टॉकीजमधून घेतले गेले होते. फिल्मिस्तानचा पहिला चित्रपट म्हणजे अशोक कुमार आणि नसीम बानो यांचा अभिनय असलेला ज्ञान मुखर्जी दिग्दर्शित 'चल चल रे नौजवान' (वर्ष 1944). पण त्यांचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला.

फिल्मिस्तानच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी आणखी एक चित्रपट म्हणजे 'आठ दिन' (1946) तोही यशस्वी झाला नाही. परंतु प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांनी केवळ त्याच्या लेखनात योगदान दिले नाही, तर त्यामध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका देखील केली होती.

हा तोच काळ होता जेव्हा बंगाली चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ संपुष्टात येत होता आणि तिथली मोठी नावं मुंबईच्या चित्रपट उद्योगाच्या वाटेला लागली होती. फिल्मिस्तानने ही संधी बरोबर ओळखली.

दिग्दर्शक नितीन बोस प्रथम आले आणि त्यांच्या नंतर एक संगीतकार आले. त्यांनी फिल्मिस्तानपासून सुरुवात केली आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महान संगीतकार म्हणून ओळखले जाऊ लागले, त्यांच नाव होतं एसडी बर्मन.

फिल्मिस्तानने दिलीप कुमार यांच्यासारख्या कलाकाराला स्टार म्हणून प्रस्थापित केलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फिल्मिस्तानने दिलीप कुमार यांच्यासारख्या कलाकाराला स्टार म्हणून प्रस्थापित केलं.

नितीन बोस यांनी त्यांचा पुढचा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याचं नाव होतं मजदूर. परंतु, एसडी बर्मन यांचं संगीत असलेला शिकारी (1946) हा चित्रपट चांगलाच गाजला आणि स्टुडिओला त्याचा मोठा फायदा झाला.

चांगली गाणी आणि संगीत हीच चित्रपटांच्या यशाची हमी असते, हे शशधर मुखर्जींच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं एसडी बर्मन यांच्यानंतर सी. रामचंद्र आणि हेमंत कुमारही फिल्मिस्तानशी जोडले गेले.

या स्टुडिओची 'म्युझिक सिटिंग्ज' त्या काळात इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध होती आणि इथल्या चित्रपटांमध्ये सात-आठ गाणी असणं सामान्य होतं.

बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं 'वंदे मातरम' हे भारताचं राष्ट्रीय गीत जे 1950 मध्ये रचलं होतं. हे अद्वितीय गीत हेमंत कुमार यांनी 1952 मध्ये फिल्मिस्तानच्या आनंद मठात संगीतबद्ध केल्यानंतर दोन वर्षांनंतर संपूर्ण देशात गाजलं.

दिलीप कुमार बनले फिल्मिस्तानचे स्टार

काही मतभेदांमुळे अशोक कुमार यांनी 1946 मध्ये फिल्मिस्तान सोडलं आणि ते बॉम्बे टॉकीजमध्ये परत गेले. तिथे त्यांनी काही हिट चित्रपटही केले. पण फिल्मिस्तानला त्याच्यानंतर एका नव्या मोठ्या स्टारची गरज होती.

अशोक कुमार तिथून गेल्यानंतर वर्षभरानंतर दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांचा 'नदिया के पार' हा चित्रपट फिल्मिस्तानमध्ये हिट ठरला. पण खरा हिट 1948 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा 'शहीद' चित्रपट होता. हा त्या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.

यानंतर कामिनी कौशलसोबत फिल्मिस्तानचा 'शबनम' हा तिसरा चित्रपटही हिट ठरला. फिल्मिस्तान व्यतिरिक्त दिलीप कुमार यांनी इतर निर्मात्यांसोबत मेला आणि अंदाज सारखे सुपरहिट चित्रपटही दिले.

या दोन वर्षांनी दिलीप कुमार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार अभिनेता म्हणून प्रस्थापित केलं.

जेव्हा शशधर मुखर्जींनी स्टुडिओ सोडला...

फिल्मिस्तानच्या यशात एक मोठं वळण आलं. शशधर मुखर्जी यांनी 1950 मध्ये त्यांच्या स्टुडिओचे शेअर्स उद्योगपती तोलाराम जालान यांना विकले.

याच काळात मुंबईत एकापाठोपाठ एक जुने स्टुडिओ बंद होत होते.

एक वेळ अशी आली की शशधर मुखर्जी 'फिल्मिस्तान' सोडून गेले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एक वेळ अशी आली की शशधर मुखर्जी 'फिल्मिस्तान' सोडून गेले.

अनेक वर्षे चित्रपट केल्यानंतर शशधर मुखर्जी थकले होते. त्यांना ब्रेक घ्यायचा होता. ते इंग्लंडला गेले आणि तोलाराम जालान फिल्मिस्तानचे मुख्य निर्माता झाले. पण जालान यांनी बनवलेले चित्रपट फारसे चालले नाहीत.

जालान यांना समजलं की, चित्रपट इतर व्यवसायांपेक्षा वेगळा आहे. फिल्मिस्तानमध्ये शशधर मुखर्जी यांच्या क्रिएटिव्ह इनपुटची कमतरता जाणवत होती.

अखेरीस शशधर मुखर्जी परतले आणि त्यांच्यासोबत फिल्मिस्तानचे यशही परतले.

प्रदीप कुमार यांना स्टार बनवलं

'अनारकली' (1953) मध्ये एक नवीन नायक प्रदीप कुमार यांना लाँच करण्यात आलं. 'अनारकली' हा त्या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. याच कथेवर के. आसिफ यांनी सात वर्षांनी 'मुघल-ए-आझम' बनवला.

'अनारकली'सोबत आणखी एका स्टारचा जन्म झाला. हे पटकथा लेखक होते नासिर हुसैन जे नंतर बॉलिवूडचे एक अतिशय यशस्वी निर्माता-दिग्दर्शक बनले.

प्रदीप कुमार यांना नायक म्हणून बनवलेला पुढचा चित्रपट होता 'नागिन' (1954). तो त्या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानं प्रदीप कुमार यांना मोठा स्टार बनवलं.

अभिनेत्री वैजयंती माला यांचाही हा पहिलाच यशस्वी हिंदी चित्रपट होता.

'नागिन' चित्रपटाची धून आजही अजरामर आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'नागिन' चित्रपटाची धून आजही अजरामर आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'नागिन'मधील गाणी प्रचंड हिट झाली आणि त्यांची 'नागिन धून' आजही अमर आहे. देशातील गारुडीही त्यांच्या पुंगीवर तीच धून वाजवतात. विशेष म्हणजे चित्रपटाची ही धून क्लॅव्हियोलिन नावाच्या वाद्यावर वाजवण्यात आली होती.

वर्ष 1954 हे फिल्मिस्तानचे सुवर्ण वर्ष होते. या वर्षी 'नागिन'सह, 'नास्तिक' आणि 'जागृती' हे देखील टॉप हिट चित्रपट ठरले.

'जागृती'मधील कवी प्रदीप यांनी लिहिलेली गाणी – 'आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की', 'साबरमती के संत तूने कर दिया कमाल' आणि 'हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के', या सर्व गाण्यांनी खळबळ उडवून दिली होती.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 'अजंत्रिक' आणि 'मेघे ढाका तारा' सारखे अजरामर चित्रपट करणारे देशातील महान बंगाली चित्रपट निर्माते ऋत्विक घटक देखील 1955 मध्ये फिल्मिस्तानमध्ये पटकथा लेखक म्हणून सहभागी झाले होते.

पण ते फिल्मिस्तान आणि मुंबई शहरात रमू शकले नाही. त्यांचा कल नेहमीच कलात्मक आणि प्रायोगिक चित्रपटांकडे होता. तर फिल्मिस्तानला यशस्वी व्यावसायिक चित्रपट बनवण्यात रस होता.

त्यामुळं अल्पावधीतच घटक ही नोकरी सोडून कलकत्त्याला परतले.

शहरी जीवनाशी संबंधित चित्रपट

स्वातंत्र्यानंतर देशात एक काळ असा आला जेव्हा लोक कामाच्या शोधात खेड्यापाड्यातून आणि छोट्या शहरांमधून मोठ्या शहरांकडे जाऊ लागले होते.

शहरांत संघर्ष, स्वप्नं, रोमान्स आणि यशाच्या नवनवीन कथा सिनेमात दिसू लागल्या. शशधर मुखर्जी यांनाही अशा शहरी कथांवर आधारित मनोरंजक आणि व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करायची होती.

देव आनंद यांच्या 'मुनीमजी'पासून सुरुवात झाली. हा चित्रपट नासिर हुसेन यांनी लिहिला होता आणि शशधर यांचा धाकटा भाऊ सुबोध मुखर्जी यांनी तो दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट हिट झाला. पुढच्या चित्रपटातही हीच टीम होती आणि हिरो पण देव आनंद होते.

यावेळी केवळ शहरी विषयच नाही तर चित्रपटाचे नावही इंग्रजीत होते, 'पेइंग गेस्ट'. त्यावेळी, हा पूर्णपणे नवीन शैलीचा चित्रपट होता आणि तो खूप हिट झाला होता.

किशोर कुमार, आशा भोसले यांनी गायलेले 'छोड दो आंचल', 'माना जनाब ने पुकारा नहीं' आणि 'निगाहें मस्ताना' ही गाणी आजही सर्वांच्या स्मरणात आहेत.

फिल्मिस्तान स्टुडिओचे 2011 मध्ये घेतलेले छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फिल्मिस्तान स्टुडिओचे 2011 मध्ये घेतलेले छायाचित्र

त्याच वर्षी लेखक नासिर हुसेन यांना फिल्मिस्तानच्या पुढच्या 'तुमसा नहीं देखा' या चित्रपटातून दिग्दर्शक बनण्याची संधी मिळाली. नायकासाठी देव आनंद यांच्याशी बोलणं झालं.

काही कारणास्तव त्यांनी नकार दिला आणि या चित्रपटाचा नायक म्हणून नाव समोर आलं अभिनेता शम्मी कपूर यांचं. शम्मी कपूर तोपर्यंत इंडस्ट्रीत संघर्ष करत होते. या ब्लॉकबस्टर संगीतमय चित्रपटातून त्यांना पहिलं मोठं यश मिळाले.

पण या चित्रपटाबरोबर स्टुडिओच्या नशिबानं पुन्हा एकदा कलाटणी घेतली. हा चित्रपट फिल्मिस्तानचा शेवटचा हिट चित्रपट ठरला.

तोलाराम जालान आणि शशधर मुखर्जी यांच्यात काहीतरी बिनसलं. त्यानंतर मुखर्जींनी पुन्हा एकदा फिल्मिस्तान सोडलं. यावेळी ते परतले नाहीत. त्यांच्यानंतर 'संस्कार', 'बाबर', 'दूज का चाँद' हे चित्रपट बनले. पण त्यांचा दर्जा आधीच्या टीमनं बनवलेल्या चित्रपटांसारखा नव्हता.

वर्ष 1943-57 पर्यंत शशधर मुखर्जी यांनी फिल्मिस्तानसाठी 27 चित्रपट केले, त्यापैकी 19 हिट ठरले. या काळात स्टुडिओचे प्रमुख अभिनेता-दिग्दर्शक (राज कपूर, व्ही शांताराम) होते, तेव्हा शशधर मुखर्जी यांनी निर्माता म्हणून आपली वेगळी छाप पाडली होती.

त्यांनी केवळ चित्रपटच नाही तर अनेक स्टार्सही घडवले. नंतर मुखर्जींनी फिल्मिस्तान स्टुडिओची स्थापना केली.

मुखर्जी कुटुंबातील पिढ्या

शशधर मुखर्जी यांचं कुटुंब हिंदी चित्रपट उद्योगातील प्रमुख कुटुंबांपैकी एक होतं आणि ते आजपर्यंत चित्रपटांशी संबंधित आहेत.

शशधर मुखर्जी यांचे चित्रपट दिग्दर्शक सुबोध मुखर्जी आणि चित्रपट निर्माता प्रबोध मुखर्जी हे धाकटे भाऊ होते. शशधर यांना चार मुलं होते, जॉय मुखर्जी, देब मुखर्जी, शोमू मुखर्जी आणि शुभीर मुखर्जी.

अशोक कुमार यांचे शशधर मुखर्जी यांच्याशी कौटुंबिक नातेसंबंध होते.

फोटो स्रोत, BBC World Service

फोटो कॅप्शन, अशोक कुमार यांचे शशधर मुखर्जी यांच्याशी कौटुंबिक नातेसंबंध होते.

देब मुखर्जी यांचा मुलगा अयान मुखर्जी आज एक यशस्वी दिग्दर्शक आहे. शोमू यांची मुलगी अभिनेत्री काजोल आहे. शशधर यांचे मोठे भाऊ चित्रपटात नव्हते पण त्यांची नात राणी मुखर्जी आहे.

आपला सुवर्णकाळ मागे टाकणारा फिल्मिस्तान स्टुडिओ आजही मुंबईच्या गोरेगावमध्ये आहे आणि आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे.

टीव्ही मालिका आणि जाहिरातींचे शूटिंग येथे केले जाते. इथली परिस्थिती पाहता काही वर्षांत त्याचीही परिस्थिती आरके स्टुडिओसारखी होईल, असं वाटतं.

येथेही फिल्म स्टुडिओच्या जागी नवे कॉम्प्लेक्स उभारले जातील. या स्टुडिओचे अस्तित्व असेल किंवा नसेल परंतु, चित्रपट इतिहासात त्याची यशोगाथा कायम राहिल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)