एम. एफ. हुसैन यांच्या चित्राची 119 कोटींना विक्री, सर्वात महागडी भारतीय कलाकृती कुणी केली खरेदी?

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक किर्तीचे चित्रकार दिवंगत एम. एफ. हुसैन यांच्या 'ग्राम यात्रा' या चित्राची विक्रमी किंमत प्राप्त होऊन विक्री झाली आहे.
क्रिस्टीया लिलावामध्ये हे चित्र विकलं गेलं असून ते ज्या प्रचंड किंमतीला विकलं गेलंय, त्यावरुन ते चर्चेत आलं आहे.
हुसैन यांच्या या 'ग्राम यात्रा' चित्राला तब्बल 13.8 दशलक्ष डॉलर्सची म्हणजेच भारतीय चलनामध्ये अंदाजे 119.19 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे.
किरण नादर यांनी हे चित्र विकत घेतलं आहे. किरण नादर या एचसीएल टेक्नोलॉजीचे संस्थापक असलेल्या शिव नादर यांच्या पत्नी आहेत. त्या कला संग्राहक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आहेत.
एखाद्या आधुनिक भारतीय कलाकृतीला दहा दशलक्ष डॉलर्सहून अधिक किंमत मिळण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे.
जगभरातील लिलावात विकली गेलेली ही आजवरची सर्वात महागडी भारतीय कलाकृती आहे. त्यामुळे, कलाविश्वात ही घटना सध्या चर्चेत आहे.
सर्वोच्च बोली मिळालेलं भारतीय चित्र
याआधी अमृता शेरगिल यांचं 'द स्टोरी टेलर' हे 1937 सालचं चित्र सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत सर्वांधिक किंमतीला विकलं गेलं होतं.
तेव्हा या चित्राला 7.4 दशलक्ष डॉलर्सची म्हणजेच 61.8 कोटी रुपयांची बोली मिळाली होती. हुसैन यांच्या 'ग्राम यात्रा'ची विक्री होईपर्यंत हाच या वेळेपावेतोचा सर्वोच्च रेकॉर्ड होता.
त्याविषयी सविस्तर माहिती तुम्ही इथे वाचू शकता.


एस. एच. रझा यांचं 1959 सालचं 'कालिस्ते' हे चित्र 2024 मार्चमध्ये विकलं गेलं. सोथबीज लिलावामध्ये या चित्राला 5.6 दशलक्ष डॉलर्सची किंमत मिळाली.
याआधी 2023 मध्ये, वासुदेव गायतोंडे यांचं एक चित्र 5.79 दशलक्ष डॉलर्सला म्हणजेच 47.5 कोटी रुपयांना विकलं गेलं होतं. हे सगळे चित्रकार आधुनिक काळातील भारतीय चित्रकलेचे जनक मानले जातात.
भारतीय चित्रकलेची पुनर्व्याख्या तसेच पुनर्मांडणीचं श्रेय या चित्रकारांना दिलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
या सर्वांमध्येही एम. एफ. हुसैन कलंदर असे चित्रकार मानले जातात. त्यांच्या चित्रांमधून चारचौघांसारखा विचार न करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते.
त्यांनी मुक्त बाजारपेठेचा स्वीकार करत आपली चित्रकला वृद्धिंगत केली. त्यांच्या चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या उर्जेचं प्रचंड कौतुक झालं. सिनेमा क्षेत्राला आपलंसं करतानाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही.
वादांच्या भोवऱ्यात अडकलेले एम. एफ. हुसैन
आधुनिक चित्रकलेतील त्यांचं स्थान आजही सर्वोच्च मानलं जात असलं तरीही त्यांच्या हयातीत अनेक वादांनी ते घेरले गेले होते.
इतकं की त्यांना या वादांमुळे देश सोडावा लागला होता.

फोटो स्रोत, Getty Images
आयुष्याच्या संध्याकाळी आणि आयुष्याची अखेर होईपर्यंत ते बाहेरच राहिले.
कारण होतं ते त्यांनी काढलेली काही चित्रं, ज्या चित्रांवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप होता. सरतेशेवटी, त्यांना देशाला अलविदा करत कतारचं नागरिकत्त्व घ्यावं लागलं.
कसं आहे 'ग्राम यात्रा'?
एम. एफ. हुसैन यांच्या ज्या चित्राला सध्या सर्वोच्च बोली मिळाली आहे, त्या 'ग्राम यात्रा' चित्राला कसल्याही वादानं शिवलेलं नाही.
किंमतीबाबतचे सर्वप्रकारचे रेकॉर्ड मोडीत काढणारं हे चित्र जवळपास 14 फूट रुंद आहे. हे चित्र भारतीय लघुचित्र परंपरेचा प्रभाव अधोरेखित करतं.

फोटो स्रोत, Christie’s
हे चित्र एकूण 13 तुकड्यांनी मिळून आकारास आलेलं आहे. ग्रामीण भारताचं दर्शन घडवणारी दृश्यं यामध्ये दिसून येतात.
गायीचं दूध काढणारी तसेच बाळाचं संगोपन करणारी महिला, जात्यावर दळत बसलेली बाई यासोबतच बैलगाडीवर बसलेला माणूस इत्यादी अनेक दृश्यांचा हा कोलाज आहे.
कसा राहिलाय या चित्राचा आजवरचा प्रवास?
'ग्राम यात्रा' या चित्राने स्वत:देखील बराच असा प्रवास केलेला असल्याने त्याचाही एक इतिहास आहे. हे चित्र नॉर्वेहून भारतात आलं आहे. एम. एफ. हुसैन यांनी 1954 साली हे चित्र काढलं होतं.
तेव्हा भारताबाहेर ते फारसे प्रसिद्ध नव्हते. कालांतराने हे चित्र युक्रेनमध्ये जन्मलेल्या आणि नॉर्वेमध्ये स्थायिक असलेल्या डॉक्टर लिओन एलियास वोलोडार्स्की यांना विकण्यात आलं.
नॉर्वेजियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या मते, तेव्हा हे चित्र विकत घेताना डॉ. लिओन एलियास वोलोडार्स्की यांनी 17 डॉलर्सहून कमी म्हणजे 1400 रुपये मोजले होते.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. वोलोडार्स्की हे दुसऱ्या महायुद्धातील एक सैनिक होते. ते दिल्लीमध्ये WHO साठी थोरॅसिक सर्जरी ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यासाठी भारतात आले होते.
त्याच काळात त्यांनी हे चित्र विकत घेतलं होतं. आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपल्या पश्चात हे चित्र ओस्लो विद्यापीठाला वारसा म्हणून देण्यात यावं, असं लिहून ठेवलं होतं.
त्यानुसार, साधारण एका दशकानंतर हे चित्र ओस्लो विद्यापीठाकडे सुपूर्द झालं.
विद्यापीठाच्या हॉस्पीटलमध्ये लावण्यात आलेलं हे चित्र अनेक रुग्ण आणि डॉक्टरांच्या दरम्यान वावरत राहिलं. विद्यापीठानं बुधवारी या चित्राची विक्री केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











