आर. के. स्टुडिओ : राज कपूर यांच्या स्वप्ननगरीच्या उभारणीच्या संघर्षाची आणि अस्ताची कहाणी

राज कपूर

फोटो स्रोत, Film Heritage Foundation

    • Author, यासिर उस्मान
    • Role, बीबीसी हिंदी

राज कपूर यांच्या चित्रपटांनी जशी अनेक वर्षे चित्रपट रसिकांना भुरळ घातली होती, तशीच आरके स्टुडिओनं देखील चित्रपटसृष्टीला भुरळ घातली होती. आरके स्टुडिओचं हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आरके स्टुडिओची उभारणी कशी झाली, राज कपूर आणि चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत त्याचं महत्त्व काय होतं आणि अखेर हा स्टुडिओ कसा पडद्याआड गेला, याबद्दल या लेखातून जाणून घेऊया.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान आणि राज कपूर यांच्या स्वप्नातील स्टुडिओ म्हणजे आरके स्टुडिओ. मात्र तोपर्यंत देशात असलेल्या स्टुडिओ व्यवस्थेपेक्षा आरके स्टुडिओ वेगळ्या प्रकारचा होता.

असंही म्हणता येईल की, भारतीय चित्रपटसृष्टीतील स्टुडिओ व्यवस्था संपल्यानंतर उभा राहिलेला हा पहिला महत्त्वाचा फिल्म स्टुडिओ होता. मात्र त्याची स्थापना झाली कशी? त्याच्या उभारणीमागचा प्रवास कसा होता?

चित्रपट क्षेत्रात पहिली मोठी क्रांती घडली होती ती बोलपटांच्या आगमनानं. मूकपटांकडून बोलपटांकडे होणारा हा प्रवास सोपा नव्हता. चित्रपटांच्या या नव्या तंत्राला पैसा आणि संसाधनांची आवश्यकता होती. छोट्या चित्रपट निर्मात्यांकडे ते नव्हते.

आर के स्टुडिओ

फोटो स्रोत, Getty Images

सहाजिकच एकीकडे बोलपटांचं युग सुरू झालेलं होतं, मात्र छोट्या चित्रपट निर्मात्यांना त्यांची निर्मिती करणं शक्य नव्हतं. त्यामुळे छोट्या चित्रपट कंपन्या बंद पडल्या आणि मोठ्या स्टुडिओंचं युग सुरू झालं. 1934 पर्यंत भारतात हॉलीवूडप्रमाणेच संघटित, व्यावसायिक फिल्म स्टुडिओ व्यवस्था निर्माण झाली होती.

प्रभात फिल्म कंपनी (पुणे) आणि बॉम्बे टॉकीज (मुंबई) या स्टुडिओंनी भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. याबद्दलची माहिती आपण आधीच्या लेखांमधून घेतली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

हे फिल्म स्टुडिओ एखाद्या कारखान्याप्रमाणे चित्रपटांची निर्मिती करत. तिथे कलाकार आणि तंत्रज्ञ दरमहा पगारावर काम करायचे. अशोक कुमार, दुर्गा खोटे, के एल सहगल, दिलीप कुमार, मधुबाला, व्ही शांताराम आणि पी सी बरुआसारखे चित्रपटसृष्टीतील दिग्गज याच स्टुडिओमधून पुढे आले.

त्याकाळी 15 वर्षे हे स्टुडिओच चित्रपटसृष्टीचे खरे सुपरस्टार होते.

स्टुडिओ व्यवस्थेचा मावळता सूर्य

एक दिवस सर्वच गोष्टी मावळतात, लयाला जातात. कधीकाळी शिखरावर असणाऱ्या स्टुडिओंचं देखील तसंच झालं. स्टुडिओ व्यवस्थेचा सूर्य मावळण्याची सुरुवात 1947 मध्ये, देशाच्या स्वांतत्र्यानंतर झाली.

देशाची फाळणी झाली आणि त्याचा परिणाम सर्वच गोष्टींवर झाला. अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला, लोक बेघर झाले, व्यापार-व्यवसाय उद्ध्वस्त झाले. चित्रपटसृष्टी तरी या तडाख्यातून कशी सुटणार ? फिल्म स्टुडिओदेखील त्यात होरपळले.

आधीच दुसरं महायुद्ध आणि महाभयंकर दुष्काळाला तोंड देत असलेले फिल्म स्टुडिओ, या तडाख्यातून सावरू शकले नाहीत. मात्र फिल्म स्टुडिओ लयाला जाण्यामागे हे एकमेव कारण नव्हतं.

आतापर्यंत स्टुडिओमध्ये दरमहा पगारावर काम करणाऱ्या स्टार अभिनेते आणि दिग्दर्शकांना या गोष्टीची जाणीव झाली होती की ते स्वत:च एक मोठा ब्रँड होऊ शकतात.

आरके स्टुडिओ जेव्हा उभा राहिला तेव्हा तो देशातील उर्वरित स्टुडिओ व्यवस्थेपेक्षा वेगळा होता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आरके स्टुडिओ जेव्हा उभा राहिला तेव्हा तो देशातील उर्वरित स्टुडिओ व्यवस्थेपेक्षा वेगळा होता

स्वतंत्रपणे चित्रपटसृष्टीत काम करून म्हणजेच फ्रीलान्सिंग मॉडेल अंमलात आणून पृथ्वीराज कपूर यशाच्या पायऱ्या चढले होते. तर दुसरीकडे व्ही शांताराम आणि महबूब खान यांच्यासारख्या दिग्गजांनी स्टुडिओ व्यवस्था सोडून स्वत:च्याच फिल्म कंपन्यांची स्थापना केली होती.

आता चित्रपटसृष्टीतील वारे बदलले होते. चित्रपटसृष्टीत पैसे ओतणाऱ्या व्यापाऱ्यांची गर्दी होऊ लागली होती. हे व्यापारी आता बडे स्टार्स, निर्माते आणि दिग्दर्शकांवर पैसा लावत होते आणि त्यातून कमाई देखील करत होते.

पडद्यामागे राहून निर्णय घेणाऱ्या स्टुडिओंच्या मालकांची जागा आता दिग्दर्शक आणि स्टार कलाकारांनी घेतली होती. त्यांचा दबदबा वाढत होता. प्रभात आणि बॉम्बे टॉकीज सारखे स्टुडिओ याच काळात बंद पडले.

राज कपूरचं स्वप्नं

भारतीय चित्रपटसृष्टीनं आता फिल्ममेकरचं वैयक्तिक व्हिजन आणि स्टार पॉवरच्या युगात प्रवेश केला होता. चित्रपटांची निर्मिती करण्याचे हेच वेड घेऊन पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज कपूर चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होता.

कपूर कुटुंबात जन्मलेल्या या तरुणानं खूप कमी वयातच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती. मात्र राज कपूर यांना फक्त अभिनेताच व्हायचं नव्हतं. त्यांना चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाचं देखील वेड होतं.

राज कपूर यांना फक्त अभिनेता व्हायचं नव्हतं, त्यांना चित्रपटांच्या निर्मितीचं देखील वेड होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज कपूर यांना फक्त अभिनेता व्हायचं नव्हतं, त्यांना चित्रपटांच्या निर्मितीचं देखील वेड होतं

आरके स्टुडिओ तयार होण्यामागची कहाणी खूपच रंजक आहे. राज कपूर यांनी जेव्हा निर्माता-दिग्दर्शक म्हणून 'आग' हा त्यांचा पहिला चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्याकडे फक्त 13 हजार रुपये होते.

त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल त्यांचा मामा आणि अत्यंत जवळचे असणाऱ्या विश्वा मेहरा यांना सांगितलं. चित्रपटासाठी मेकअप मॅन, अभिनेता आणि नर्तकांची आवश्यकता होती. हे सर्व तेव्हा पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होते.

पृथ्वी थिएटरमधील कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे राज कपूर यांचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली. या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठी राज कपूर यांनी नर्गिस यांची निवड केली.

नर्गिस आणि राज कपूरची भेट

वीस वर्षांच्या नर्गिस तेव्हा चित्रपटांमध्ये नायिका झाल्या होत्या. महबूब खान यांच्यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या कॅम्पचा त्या भाग होत्या आणि स्टारदेखील होत्या.

त्याउलट 22 वर्षांच्या राज कपूर यांना अभिनेता म्हणून तोपर्यंत कोणतंही लक्षणीय यश मिळालं नव्हतं. दिग्दर्शक म्हणून तर ते त्यांच्या पहिल्याच चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते.

'आग' चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेस नर्गिस आणि राज कपूर एकमेकांच्या जवळ आले.

अर्थात तोपर्यंत नर्गिस यांच्या आई जद्दन बाई याच्या अगदी विरोधात होत्या आणि त्या नेहमीच चित्रीकरणाच्या वेळेस हजर राहायच्या. तर आउटडोअर चित्रीकरण असल्यास त्या नर्गिसला पाठवण्यास नकार द्यायच्या.

नर्गिस खूप लवकर स्टार झाल्या होत्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नर्गिस खूप लवकर स्टार झाल्या होत्या
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल दीर्घकाळ राज कपूर यांचे सहाय्यक आणि निकटवर्तीय होते. त्यांनी 'राज कपूर बॉलीवूड के सबसे बडे शोमॅन' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, "त्या काळी, चित्रपट निर्मात्याचं स्टुडिओशी जोडलेलं असणं खूपच महत्त्वाचं असायचं. कारण स्टुडिओ एक बंदिस्त जागा असायची, तिथे चित्रपटाचा सेट लागायचा आणि सेटची किंमत देखील दिली जायची."

"राज कपूर यांनी ईस्टर्न स्टुडिओशी जोडून घेण्याचं ठरवलं. मिस्टर लखानी त्याचे मालक होते. 'आग' चित्रपटाच्या निर्मितीसाठी तीन लाख रुपयांचा खर्च आला होता. त्याकाळी ही खूप मोठी रक्कम होती."

"चित्रपटाच्या कथेला गांभीर्य, खोली होती. त्यामुळे या चित्रपटातून चांगला नफा मिळेल असा विश्वास राज साहेबांना वाटत होता. चित्रपट समीक्षकांनीही कौतुक केलं. मात्र तिकिटबारीवर चित्रपट फारसा चालला नाही."

'आग' चित्रपटामुळे आर्थिक नुकसान झालेलं असताना देखील राज कपूर यांनी 'बरसात' या पुढच्या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं.

यावेळेस चित्रीकरणासाठी त्यांनी दिग्दर्शक के. आसिफ यांच्या रूपतारा स्टुडिओशी करार केला.

मात्र 'आग' या चित्रपटात आधीच हात पोळून घेतलेल्या निर्माता-दिग्दर्शकावर पैसा लावण्यास कोणताही फायनान्सर तयार नव्हता. अशावेळी राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी त्यांची मदत केली.

'बरसात'मधून राज कपूरचे नवे प्रयोग

बरसात हा एक रोमॅंटिक चित्रपट होता. 'हवा में उडता जाए' हे त्यातील गीत प्रसिद्ध आहे. राज कपूर यांनी या गीताचं चित्रीकरण काश्मीरच्या निसर्गरम्य आणि नितांत सुंदर प्रदेशात करण्याचं ठरवलं. तोपर्यंत कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण तिथे झालं नव्हतं.

तो स्टुडिओमध्ये चित्रीकरण करण्याचा काळ होता. सगळे कलाकार, तंत्रज्ञ यांना घेऊन जायचं, उपकरणं घेऊन जायची आणि त्यांची तिथे राहण्याची व्यवस्था करायची, हे फार खर्चिक काम होतं.

राज कपूर यांना नवीन प्रयोग करायचा होता. त्यामुळे राज कपूर आधी त्यांचे कॅमेरामन जाल मिस्त्री यांच्याबरोबर काश्मीर गेले. तिथे त्यांनी हलक्या ऐमो कॅमेरानं शॉट्स घेतले.

त्यानंतर उर्वरित दृश्यांचं चित्रीकरण महाबळेश्वरमध्ये करण्यात आलं. मग काश्मीरमध्ये घेतलेल्या शॉट्सबरोबर महाबळेश्वरचे शॉट्स एकत्र करण्यात आले.

राहुल रवैल लिहितात, "साऊंड रेकॉर्डिंगसाठी लागणाऱ्या सर्व उपकरणांना ठेवण्यासाठी एक साऊंड ट्रॅक विकत घेणं, हे त्यांचं पुढचं पाऊल होतं. तिसरा टप्पा, व्यावसायिक 35 एमएम मिशेल एनसी कॅमेरा विकत घेण्याचा होता."

"चित्रपटाच्या निर्मितीच्या वेडातून हे सर्व होत होतं. शिवाय एका स्टुडिओचा मालक होण्यासाठी आवश्यक असलेले सुरुवातीच्या टप्प्यातील ते प्रयत्नदेखील होते."

'बरसात' चित्रपट 1949 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं तिकिटबारीवर आधीचे सर्व विक्रम मोडले. हा चित्रपट तोपर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला.

बरसात राज कूपर यांचा दुसरा चित्रपट होता. नर्गिस आणि राज कपूरची जोडी सुपरहिट ठरली. त्याच वर्षी महबूब खान यांचं दिग्दर्शन असलेला आणि राज कपूर, नर्गिस आणि दिलीप कुमार यांच्या भूमिका असलेला 'अंदाज' हा चित्रपट देखील सुपरहिट झाला.

या यशामुळे राज कपूर यांना इतकी हिंमत आणि पैसे मिळाले की त्यातून ते स्टुडिओ उभारणीच्या त्यांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याच्या कामास लागले.

स्टुडिओचं स्वप्न केलं पूर्ण

राज कपूर यांनी नर्गिस आणि पृथ्वीराज कपूर यांना घेऊन 'आवारा' या त्यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा देखील केली.

14 डिसेंबर 1949 ला राज कपूर यांच्या वाढदिवशी 'आवारा' चित्रपटाचा मुहुर्त तारा स्टुडिओमध्ये झाला. हा स्टुडिओ मुंबईत दादरला होता.

आशा स्टुडिओमध्ये 'आवारा' चित्रपटाची निर्मिती करण्याचं निश्चित झालं.

राहुल रवैल म्हणतात, "राज साहेबांनी नर्गिस यांच्याबरोबर एक दृश्य करण्याचं ठरवलं. त्या दृश्यात नर्गिस स्विमिंग कॉस्च्युममध्ये तलावात जाणार होत्या."

"या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण स्टुडिओत लावण्यात आलेल्या सेटवरच झालं होतं. मात्र या खास दृश्याचं चित्रीकरण एनएससीआय क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये होणार होतं."

"नर्गिस यांना इतक्या लोकांसमोर स्विमिंग कॉस्च्युम घालण्यास संकोच वाटत होता. हे दृश्य करण्यास नर्गिस यांचं मन वळवण्यासाठी, राज कपूर यांनी विना परवानगी स्टुडिओची जमीन खोदून तिथे चित्रीकरणासाठी तलाव तयार केला."

"त्यामुळे स्टुडिओचे मालक राज साहेब यांच्यावर चिडले आणि त्यांनी ऐंशी हजार रुपयांचा दंड भरण्याचीदेखील मागणी केली."

आवारा चित्रपटातील एका दृश्यात राज कपूर यांच्याबरोबर नर्गिस

फोटो स्रोत, Film Heritage Foundation

फोटो कॅप्शन, आवारा चित्रपटातील एका दृश्यात राज कपूर यांच्याबरोबर नर्गिस

राज कपूर यांनी स्टुडिओनं केलेला दंड तर भरला, मात्र ही गोष्ट त्यांच्या मनाला बोचली.

त्यांनी स्टुडिओच्या मालकाला सांगितलं की त्यांना पैशांची परवा नाही. मात्र त्यांच्या चित्रपटांच्या क्रिएटिव्ह गोष्टींसाठी त्यांना कोणाचीही परवानगी घ्यायची नाही.

मनाप्रमाणे चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी राज कपूर यांना एक अशी जागा हवी होती, जिथे ते कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांच्या इच्छेप्रमाणे चित्रपटाची निर्मिती करू शकतील.

त्यांनी स्टुडिओच्या मालकांना सांगितलं, "मी पुन्हा कधीही या स्टुडिओमध्ये चित्रीकरण करणार नाही."

त्यांनी 'आवारा' चित्रपटाचं उर्वरित चित्रीकरण, श्रीकांत स्टुडिओमध्ये केलं. हा स्टुडिओ मुंबईतील चेंबूरमध्ये होता.

चेंबूर हा एक औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र 1950 च्या दशकात तो शहराबाहेरचा एक शांत निवासी परिसर होता.

आवारा चित्रपटाचं पोस्टर

फोटो स्रोत, RK Films

फोटो कॅप्शन, आवारा चित्रपटाचं पोस्टर

चेंबूरमध्ये राज कपूर बरीच वर्षे राहिले होते. श्रीकांत स्टुडिओच्या अगदी जवळ दोन एकर जागा मोकळी होती. स्वत:च्या स्टुडिओसाठी राज कपूर यांना ही जागा आवडली.

राहुल रवैल यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, "त्या जमिनीची किंमत त्याकाळी दीड लाख रुपये होती. त्याकाळी राज कपूर यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नव्हती. मात्र चित्रपटावरील प्रेमाबद्दल ते समर्पित होते. स्टुडिओकडे ते त्यांच्या सर्जनशीलतेचा विस्तार म्हणून पाहत होते."

राज कपूर यांनी इतर चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट साइन करण्याबरोबर प्रतिज्ञापत्राद्वारे देखील पैसे उसनवार घेतले आणि आरके स्टुडिओसाठी जमीन खरेदी केली.

हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची साथ देणाऱ्या नर्गिस आता त्यांचं जीवन आणि त्यांच्या चित्रपटांचा महत्त्वाचा भाग झाल्या होत्या.

लेखिका मधु जैन यांनी 'द कपूर्स' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात ते लिहितात, "जेव्हा बरसात चित्रपटाची निर्मिती होत होती, तेव्हा नर्गिस पूर्णपणे राज कपूर यांच्यासाठी कटिबद्ध झाल्या होत्या."

"इतकंच काय, स्टुडिओला जेव्हा पैशांची कमतरता भासली तेव्हा नर्गिस यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या. आरके फिल्म्सला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी इतर निर्मात्यांच्या चित्रपटातही काम केलं."

राज कपूर-नर्गिस यांच्या आरके स्टुडिओची सुरुवात

लेखक बनी रूबेन यांनी राज कपूर यांचं 'राज कपूर दे फॅब्युलस शोमॅन' चरित्र लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, "सप्टेंबर 1950 मध्ये राज कपूर यांनी त्यांच्याशी एकनिष्ठ असलेले तंत्रज्ञ, मित्र आणि निकटवर्तीयांसह चेंबूरमधील जमिनीवर आरके स्टुडिओजचा मुहुर्त केला. त्यानंतर हळूहळू स्टुडिओ उभा राहू लागला."

मात्र जेव्हा सर्व पैसा आणि वेळ, स्टुडिओच्या वेडापायी खर्च होऊ लागला, तेव्हा राज कपूर यांच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ लागला.

राहुल रवैल यांच्यानुसार, कृष्णा आंटी (राज कपूर यांच्या पत्नी) यांना भाड्याच्या घराऐवजी स्वत:च्या मालकीचं घर हवं होतं. मात्र राज कपूर यांना आधी स्टुडिओ उभा करायचा होता. त्यातून कमाई केल्यावर मग त्यांना स्वत:चं घर विकत घ्यायचं होतं.

'आवारा' चित्रपटाचं चित्रीकरण जोशात सुरू होतं. राज कपूर यांना त्यांच्या स्टुडिओमध्ये एक आलिशान ड्रीम सीक्वेंस म्हणजे स्वप्नातील एका दृश्याचं चित्रीकरण करायचं होतं. मात्र तोपर्यंत स्टुडिओला छत नव्हतं. म्हणजे दिवसाचा प्रकाश टाळण्यासाठी फक्त रात्रीचं चित्रीकरण केलं जाऊ शकत होतं.

जोपर्यंत चित्रीकरणाची वेळ आली, तोपर्यंत आरके स्टुडिओच्या जवळपास आठ फूट उंच भिंती बांधून झाल्या होत्या.

आग चित्रपटातील एका दृश्यात राज कपूर यांच्याबरोबर नर्गिस

फोटो स्रोत, Film Heritage Foundation

फोटो कॅप्शन, आग चित्रपटातील एका दृश्यात राज कपूर यांच्याबरोबर नर्गिस

'राज कपूर द फॅब्युलस शोमॅन' या पुस्तकात राज कपूर यांचे निकटवर्तीय आणि मामा विश्वा मेहरा म्हणतात, "स्टुडिओच्या भिंती तर उभ्या राहिल्या होत्या, मात्र छत तर नव्हतंच. राज म्हणाले- त्यामुळे काय फरक पडतो. आपण आपल्या स्टुडिओतच हा ड्रीम सीक्वेंस चित्रीत करूया. आम्ही तसंच केलं."

'आवारा' देखील मोठा हिट झाला. या चित्रपटातून राज कपूर यांनी इतका पैसा कमावला की चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आरके स्टुडिओ पूर्णपणे सज्ज झाला. त्यानंतर तिथे एक एडिटिंग रुम आणि प्रीव्ह्यू थिएटरदेखील बांधण्यात आलं, ते स्टुडिओच्या छतावर होतं.

स्टुडिओच्या आत राज कपूर यांचं प्रसिद्ध कॉटेजदेखील होतं. त्याला ते त्यांच्या कलेचं मंदिर मानायचे.

चेंबूरमध्ये दोन एकरांमध्ये विस्तारलेला हा स्टुडिओ हिंदी सिनेमाचं एक जिवंत स्मारक होता. इथे प्रसिद्ध गाणी तयार झाली, अविस्मरणीय स्क्रिप्ट्स वाचल्या गेल्या आणि अनेक क्लासिक हिंदी चित्रपट तयार झाले.

शंकर-जयकिशनपासून ते शैलेंद्रपर्यंत आणि 'बॉबी'मधील ऋषी कपूर-डिंपलपासून ते 'राम तेरी गंगा मैली'च्या मंदाकिनीपर्यंत, अनेक कलाकारांनी त्यांचं सर्वोत्कृष्ट काम आरके स्टुडिओसाठी केलं होतं.

या स्टुडिओचं नाव भलेही राज कपूर यांच्या नावावर होतं. मात्र या स्टुडिओच्या उभारणीतील नर्गिस यांचं योगदान कपूर कुटुंब नाकारत नाही.

राज कपूर यांनी 'आवारा'चे दिग्दर्शन केले होते आणि त्यात अभिनयही केला होता.

फोटो स्रोत, Harper Collins

फोटो कॅप्शन, राज कपूर यांनी 'आवारा'चे दिग्दर्शन केले होते आणि त्यात अभिनयही केला होता.

मधु जैन त्यांच्या 'द कपूर्स' या पुस्तकात लिहितात, "आरके हा खरोखरंच नर्गिस-राज कपूर यांचा बॅनर होता. ती एक भागीदारी होती. त्यांनी त्यांच्या सोनेरी काळातील बहुतांश दिवसांमध्ये आरके फिल्म्सची जबाबदारी सांभाळली होती."

"या दोघांनी एकत्र सोळा चित्रपट बनवले. 1948 मध्ये 'आग' चित्रपटाद्वारे सुरू झालेली ही भागीदारी 1956 मध्ये 'जागते रहो' चित्रपटानंतर संपली."

आरके स्टुडिओच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला लोगो त्याची ओळख होता. ही सुंदर प्रतिमा राज कपूर यांच्या रोमॅंटिक आणि संगीतमय चित्रपटांचं प्रतीक बनली होती.

या लोगोचं डिझाईन बरसात चित्रपटातील एका प्रसिद्ध दृश्यातून घेण्यात आलं होतं. या दृश्यात राज कपूर हातात व्हायोलिन घेऊन उभे आहेत आणि नर्गिस त्यांच्या हातावर झुकल्या आहेत.

प्रसिद्ध डिझायनर एम. आर. आचरेकर यांनी हा आयकॉनिक लोगो तयार केला होता. विशेष म्हणजे, हा लोगो पेंट केला होता, बाळासाहेब ठाकरे यांनी. पुढे त्यांनी शिवसेना स्थापन केली.

लोगोच्या खाली भगवान शिवाची एक मोठी मूर्ती होती. प्रत्येक नव्या चित्रपटाच्या मुहूर्ताला राज कपूर यांचे वडील, पृथ्वीराज कपूर, भगवान शिवाच्या या मुर्तीची पूजा करायचे.

आरके स्टुडिओजमध्ये राज कपूर यांच्या खोलीच्या मागच्या बाजूला नर्गिस यांचीदेखील एक खोली असायची. ती तशीच्या तशी ठेवण्यात आली होती. नर्गिस त्यांचं सामान जसं सोडून गेल्या होत्या, ते सामानदेखील तसच्या तसंच ठेवण्यात आलं होतं.

नर्गिस यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर जवळपास वीस वर्षांनी 1974 मध्ये एका मुलाखतीत राज कपूर यांनी सांगितलं होतं की नर्गिस यांनी जेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्या पुन्हा कधीही आरके स्टुडिओमध्ये आल्या नाहीत.

आरके स्टुडिओचे वेगळेपण

प्रभात आणि बॉम्बे टॉकीजसारखे जुने स्टुडिओ, एखादी मोठी संघटना किंवा संस्थेप्रमाणे काम करत.

तिथे अभिनेते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ, सर्वचजण पगारी असायचे. चित्रपटाच्या निर्मितीची सर्व प्रक्रिया म्हणजे लेखन, चित्रीकरण, संपादन आणि वितरण, सर्वकाही स्टुडिओच्या आतच होत असे.

हे एखाद्या कारखान्यासारखं होतं. तिथे एकापाठोपाठ एक चित्रपटांची निर्मिती होत राहायची. तिथे कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या सर्जनशील विचारांपेक्षा, एक संघटित व्यवस्था काम करायची.

तर आरके स्टुडिओ, पूर्णपणे राज कपूर यांच्या स्वप्नांवर आधारलेला एक कौटुंबिक स्टुडिओ होता. तिथे त्यांचा विचारच सर्वात महत्त्वाचा होता. तिथे प्रत्येक चित्रपट एखाद्या स्वप्नाप्रमाणे तयार केला जायचा.

आरके स्टुडिओ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आरके स्टुडिओ

चित्रपटाच्या निर्मितीसाठी आधीपासूनच पैशांची व्यवस्था केली जायची. मग कलाकार आणि तंत्रज्ञांना कामावर ठेवलं जायचं.

नंतर, हा स्टुडिओ इतर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीदेखील भाड्यानं दिला जाऊ लागला.

स्टुडिओ व्यवस्था संपुष्टात आल्यानंतर भारतात हेच मॉडेल कोणत्या ना कोणत्या रूपानं सुरू राहिलं.

'आवारा' चित्रपटानंतर राज कपूर यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट बनवले. श्री 420, संगम, मेरा नाम जोकर, सत्यम शिवम सुंदरम, बॉबी आणि राम तेरी गंगा मैली सारख्या अप्रतिम चित्रपटांचे सेट याच स्टुडिओत तयार झाले.

इतकंच नाही, तर याच स्टुडिओमध्ये इतर ख्यातनाम दिग्दर्शकांनी त्यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं चित्रीकरण केलं. चित्रपटकार मनमोहन देसाई यांचा हा आवडता स्टुडिओ होता.

आरके स्टुडिओ फक्त चित्रपटांसाठीच नाही, तर होळीसाठीच्या त्यांच्या जबरदस्त पार्ट्यांसाठी देखील प्रसिद्ध होता.

आरके स्टुडिओचा पडता काळ

1988 मध्ये राज कपूर यांचं निधन झालं. त्यानंतर आरके स्टुडिओची सक्रियता हळूहळू कमी होत गेली.

1990 च्या दशकात स्टुडिओतील चित्रपटांचं चित्रीकरण कमी झालं. स्टुडिओचा वापर टीव्ही मालिका आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी जास्त केला जाऊ लागला.

कारण आता मुंबईत अनेक आधुनिक स्टुडिओ आणि शूटिंग फ्लोअर्स तयार झाले होते. शिवाय ते शहरापासून फार लांबदेखील नव्हते. त्यामुळेच हळूहळू आरके स्टुडिओमधील काम कमी होऊ लागलं.

इतक्या मोठ्या स्टुडिओच्या देखभालीचा खर्च आणि जबाबदारी मोठी होती.

ग्राफिक्स

2017 मध्ये स्टुडिओमध्ये आग लागली आणि या ऐतिहासिक वारशाचं मोठं नुकसान झालं. व्यासपीठ, उपकरणं, इतकंच काय, ज्यात सर्व क्लासिक चित्रपटांचे कॉस्च्युम होते तो प्रसिद्ध कॉस्च्युम विभाग आणि इतर मौल्यवान वारसादेखील त्या आगीत जळाला.

2018 मध्ये कपूर कुटुंबानं हा स्टुडिओ विकायचा ठरवला. मग 2019 मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजनं हा स्टुडिओ विकत घेतला. आता तिथे आरके स्टुडिओ नाही. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्याची एक वेगळी ओळख नेहमीच राहील.

राज कपूर यांची एक आठवण त्यांचे चिरंजीव रणधीर कपूर यांनी सांगितली होती. राज कपूर मला म्हणाले होते की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला आर. के. स्टुडिओत घेऊन जा. तिथल्या प्रकाशामुळे कदाचित मी उठून उभा राहील आणि ओरडेल - ॲक्शन, ॲक्शन.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.