राज कपूर@100 : अवघ्या 26 व्या वर्षी जगभर ख्याती पोहोचलेला, चित्रपटसृष्टीवर 'राज' करणारा माणूस

फोटो स्रोत, Puneet
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
14 डिसेंबर, 1924... सध्याच्या पाकिस्तानातल्या पेशावरमधील लायलपूर नावाच्या भागात जन्म झालेलं राजरत्न.. अर्थात राज कपूर. भारतीय सिनेमाला जगभरात लोकप्रिय करणाऱ्या मोजक्या चित्रकर्त्यांपैकी एक.
आजच्या इंटरनेटच्या सुपरफास्ट जमान्यात त्या काळाची कल्पना करणंही कठीण. पण अशी कुठलीही आधुनिक साधनं नसताना राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी भारतीय सिनेमाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं.
राज कपूर यांचा 'आवारा' रशियातल्या सर्वांत लोकप्रिय चित्रपटांमध्ये गणला जातो. त्यांच्या सिनेमातून समाजवादाचा प्रभाव दिसत असला तरी या चित्रपटांची जादू इराण, तुर्कस्तान, अमेरिका, चीन आणि पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आजही कायम असल्याचं दिसतं.
राज कपूर यांची चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द 40 वर्षांची होती. पण पहिल्या तीन वर्षांमध्येच त्यांनी उदंड यश, प्रसिद्धी, लोकप्रियता, संपन्नता आणि महान व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा निर्माण केली होती.
1947 मध्ये केदार शर्मा यांच्या नीलकमल चित्रपटात राज कपूर हिरो म्हणून दिसले. त्यानंतर पुढच्याच वर्षी 1948 मध्ये 'आग' चित्रपटाद्वारे आर. के. फिल्म्सचं बॅनर त्यांनी सुरू केलं. या चित्रपटाचा विषय राज कपूर यांनी त्यांच्या खऱ्या-खुऱ्या आयुष्यातून उचलला होता.
राज यांचे आजोबा आपल्या मुलाने म्हणजे पृथ्वीराज कपूर यांनी त्या काळात समाजात रुबाब आणि प्रतिष्ठा वाढवणाऱ्या वकिली पेशात रमावं अशा विचारांचे होते.
पण पृथ्वीराज कलाप्रेमी. त्यांनी वडिलांविरोधत, घरच्यांविरोधात अक्षरशः बंड करून नाटक आणि चित्रपटांचा रस्ता निवडला होता. राज कपूर यांनी त्यांच्या वडिलांचा हाच अनुभव त्यांच्या पहिल्या चित्रपटाद्वारे पडद्यावर उतरवला.
पृथ्वीराज कपूर यांनी मात्र पेशावरहून त्या काळच्या कलकत्यात आणि नंतर थेट मुंबईत कला क्षेत्रात धडपड सुरू केली. लवकरच त्या काळातील दमदार कलाकार म्हणून ते मुंबईत प्रस्थापित झाले.
राज कपूर हे पृथ्वीराज यांचं सर्वांत मोठं अपत्य. लहानपणापासून चित्रपट व्यवसायाचा प्रभाव त्यांच्यावर होता. वडिलांच्या सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणूनही राज यांनी कामं केली होती. हळूहळू अभ्यासावरून त्यांचं मन उडालं आणि तेही चित्रपट क्षेत्रातच काहीतरी करण्यासाठी आसूसले.
त्या काळच्या मॅट्रिकच्या परीक्षेत चक्क नापास झाले आणि त्यांनी तेव्हाच वडिलांना सांगून टाकलं की, चित्रपट क्षेत्रातच आपल्याला रस आहे. या व्यवसायातले बारकावे शिकून घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.
पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या मुलामधले गुण सुरुवातीच्या काळातच हेरले होते. राज कपूर यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमधून वडिलांबद्दल उल्लेख केले आहेत. वडिलांच्या कीर्तीचा आपल्याला सुरुवातीच्या काळात बराच फायदा झाल्याचे राज कपूर यांनी अनेकदा कबूल केलं आहे.


बीबीसीच्या चॅनेल 4 साठी सिमी गरेवाल यांनी लिव्हिंग लीजंड - राज कपूर या नावाने त्यांच्यावर 1986 साली एक डॉक्युमेंट्री केली होती.
या डॉक्युमेंट्रीसाठी बोलताना राज कपूर सांगतात, "पापाजींनी सांगून टाकलं होतं की, फिल्ममेकिंच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकून घे. चौथ्या- पाचव्या असिस्टंटची कामं त्यासाठी करावी लागली. सेटवर झाडू-पोछा करण्यापासून फर्निचर- सामान इकडे-तिकडे हलवण्यापर्यंत सगळी कामं मी त्या काळात केली.
मी त्या काळातल्या सेलेब्रिटी अॅक्टरचा मुलगा जरूर होतो. पण माझी स्वतःची ओळख शून्य होती. आय वॉज नो बडी. दोन पँट-शर्ट, रेनकोट, छत्री याशिवाय गमबूट मिळाले होते.. बस! वरखर्चाला महिना दहा रुपये दिले जायचे."
ही शिकवण शालेय काळापासूनच होती. राज कपूर यांची मुलगी ऋतू नंदा यांनी 'राज कपूर स्पीक्स' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्या लिहितात – "राज कपूर सर्वसाधारण मुलांप्रमाणे त्या वेळी ट्रामने शाळेत जायचे. एक दिवस तुफान पाऊस पडत होता.
त्या वेळी राज यांनी आईला विचारलं आज शाळेत कार घेऊन जाऊ का? त्यावर आई म्हणाली – वडिलांना विचारून सांगते. वडिलांना – पृथ्वीराज कपूर यांना कळलं तेव्हा ते म्हणाले की, या पावसात पाण्याच्या मारा सहन करत शाळेत पोहोचण्यात खरं थ्रिल आहे. त्याला याचाही अनुभव असायला हवा."
वडिलांच्या सावलीतून बाहेर
राज कपूर दाराआडून आई-वडिलांचं बोलणं ऐकत होते. मग त्यांनी स्वतःहच वडिलांना सांगितलं की, "सर, मी ट्रामनेच शाळेत जाणार."
ऋतू नंदा यांनी या आठवणीनंतरचा किस्साही लिहिला आहे. "पृथ्वीराज कपूर यांनी बाल्कनीतून राज यांना त्या पावसात भिजत शाळेत जाताना पाहिलं, तेव्हा बायको, रामसमी यांना म्हणाले की, बघ हा मुलगा एक दिवस वडिलांपेक्षा मोठा होईल आणि याच्याकडे वडिलांपेक्षा फॅन्सी कार असतील."
'द कपूर्स – द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा' या बहुचर्चित पुस्तकात मधू जैन यांनीही साधारण या प्रकारचा एक किस्सा लिहिला आहे.
जैन लिहितात, "एकदा पृथ्वीराज कपूर घराबाहेर पडत असताना त्यांनी राजला तिथे उभा असलेला पाहिलं आणि विचारलं, 'तू अजून स्टुडिओत का नाही गेलास?' त्यानंतर ते गाडीत बडून वेगाने निघून गेले. दोघांनाही खरं तर एकाच ठिकाणी जायचं होतं. स्टुडिओत. पण वडिलांना मुलाला आपल्या कारमध्ये बसवून नाही नेलं. राज कपूर यांना तिथे जाण्यासाठी बस घ्यावी लागली."
किती हृद्य योगायोग आहे पाहा – जेव्हा राज कपूर यांनी बरसात चित्रपटाच्या पहिल्या वहिल्या यशानंतर स्वतःसाठी नवी कन्व्हर्टिबल कार खरेदी केली, तेव्हा वडिलांकडेही एक ब्लँक चेक सुपूर्द केला.
त्यांच्या पसंतीची नवी गाडी घेण्यासाठी. पण वडिलांचा ऊर अभिमानानेच भरलेला. त्यांनी तो चेक कधीच वटवला नाही.

फोटो स्रोत, Rishi Kapoor
वडिलांची कीर्ती आणि यश पाहता राज कपूर यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं की, स्वतःचा ठसा उमटवायचा असेल तर वडिलांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. वडिलांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाकडे आणि तशाच भूमिकांकडे बघून राज कपूर यांनी मुद्दामाच त्यापेक्षा वेगळ्या सर्वसामान्य माणसाच्या भूमिका करण्यावर भर दिला.
एका संपन्न कुटुंबातून आलेला देखणा तरुण असूनही सामान्य, मेहनतीचं खाणाऱ्या, हातावर पोट असलेल्या लोकांमधला एक अशी ते स्वतःची प्रतिमा तयार करू लागले.
वडिलांच्या भूमिका आणि ज्यासाठी ते ओळखले जात ते पल्लेदार संवाद आणि खर्जातला आवाज बाजूला सारून राज कपूर मुद्दामच अडाणी, गरीब, गावरान ढंगातल्या भूमिका निभावू लागले आणि अडखळत बोलणारा नायक रंगवू लागले.
अशा वेगळेपणातूनच त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट आग केला आणि सिनेमाजगतात आपलं स्थान पक्कं केलं. कर्तबगार पित्याच्या छायेपासून वेगळी अशी स्वतःची प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांनी अभिनयाबरोबर दिग्दर्शनाकडेही मोर्चा वळवला.
बरसात हा त्यांचा दुसराच चित्रपट. नर्गिस आणि राज कपूर ही जोडी त्या काळी तुफान हिट ठरली.
पण राज कपूर यांच्या आयुष्यातला सर्वांत मोठा टर्निंग पॉइंट यायचा होता. खरं तर राज यांच्याआधी ती संधी महबूब खान यांच्याकडे चालून गेली होती. ख्वाजा अहमद अब्बास यांनी जेव्हा 'आवारा'ची कथा लिहिली तेव्हा त्यांनी आधी महबूब खान यांनाच ती ऐकवली होती.

फोटो स्रोत, Harper Collins
या चित्रपटात पृथ्वीराज आणि राज कपूर यांना घेऊन चित्रपट करू या असा आग्रह अब्बास यांनी मेहबूब खानांकडे धरला गोता. पण महबूब खान पृथ्वीराज कपूर आणि दिलीप कुमार यांना घेऊन सिनेमा करण्याच्या मताचे होते.
त्याआधी 1949 मध्ये महबूब खान यांनी राज कपूर, नर्गिस आणि दिलीप कुमार यांना घेऊन अंदाज चित्रपट केला होता आणि तो सुपरहिट ठरला होता.
आता आवारामध्ये पृथ्वीराज कपूर यांच्या मुलाची भूमिका कोण चांगली निभावू शकेल यावरून महबूब खान आणि अब्बास यांच्यामध्ये वाद झाला होता, असं जयप्रकाश चौकसे यांनी लिहिलं आहे.
खऱ्या आयुष्यात बाप-बेटे असल्याने राज कपूर हा रोल चांगला करेल आणि चित्रपटालाही या नव्या नात्याच्या जोडीचा फायदा मिळेल. या दरम्यान नर्गिसदेखील तिथे उपस्थित होत्या.
चौकसे या आठवणीबद्दल लिहितात की, 'नर्गिस यांना खरं तर महबूब खान यांनीच ब्रेक दिला होता. पण बरसात सिनेमादरम्यान राज कपूर यांच्याशी नर्गिस यांचे चांगले संबंध जुळले होते. नर्गिसनीच आवाराविषयीच्या या वादाबद्दल राज कपूर यांना सांगितलं असावं.'
कारण त्यानंतर लगेचच राज कपूर यांनी अब्बास यांना भेटून त्यांच्या कथानकावर होणाऱ्या चित्रपटासाठीचे अधिकार विकत घेतले. त्यानंतर राज कपूर यांनी पडद्यावर जी जादू दाखवली त्याविषयी आजही आदराने बोललं जातं.
मार्क्सवादी विचारांच्या अब्बास यांच्याबरोबर राज कपूर यांची जोडी छान जमली. अब्बास त्यांच्या आठवणींमध्ये लिहितात की, आवाराबरोबर आमचा प्रवास सुरू झाला, त्यात राज कपूर हळूहळू प्रभावी ठरत गेले. इतके की बॉबी तयार झाला तेव्हा तो माझा नव्हे तर पूर्णपणे राज कपूर यांचाच सिनेमा बनला होता.

फोटो स्रोत, Harper Collins
आवारा चित्रपटाच्या वेळी आरके फिल्म्स या बॅनरखाली केवळ दोन चित्रपट बनले होते, आग आणि बरसात. पण बरसातच्या यशाने राज कपूर यांना एवढा भरभरून आत्मविश्वास दिला होता की, आवारा तयार होत असताना त्यांनी कुठल्याच बाबतीत तडजोड करायची नाही असं ठरवलं होतं आणि ते तसेच वागले.
त्याविषयीचा एक किस्सा ख्वाजा अहमद अब्बास यांनी सांगितलेला आहे. आवाराचे ते लेखक होते. ते लिहितात, "एका संध्याकाळी राज कपूर यांच्याबरोबर सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. तेवढ्यात त्यांचा एक असिस्टंट सांगत आला की, फायनान्सर एमजींनी दिलेले पैसे संपले आहे आणि आता काही शिल्लक नाही. त्याच रात्री राज कपूर यांनी चित्रपटाचा ड्रीम सिक्वेन्स शूट करायला सुरुवात केली. या सिक्वेन्सच्या शूटिंगला तीन महिन्यांचा काळ आणि तीन लाख रुपये एवढा खर्च त्या वेळी आला."
आवाराची कथा तशी बरीच पुरोगामी होती. एक वकिल (जो कालांतराने न्यायाधीश होतो) आपल्या पत्नीला घरातून हाकलून देतो आणि त्यांचा मुलगा गुंडांच्या संगतीत राहून गुन्हे करू लागतो.
मग एक दिवस तो न्यायालयात आपल्याच वडिलांपुढे आरोपी म्हणून उभा राहतो.
अखेर नाट्यमय घडामोडींनंतर सिनेमाच्या शेवटी तो वडिलांकडे परत जातो.
खरं तर या सिनेमाच्या नायकाची प्रतिमा स्वातंत्र्योत्तर भारताच्या दारिद्र्याची, अगतिकतेची गोष्ट आहे. आवारा म्हणजे एक प्रकारे दलदलीत उगवलेलं जणू कमळ ज्यात त्या काळातील समाजजीवनाची झलक दिसत होती आणि परिवर्तनाची आशा दाखवणारा तो सिनेमा होता.
एक आशेचा किरण घेऊन येणारा तो चित्रपट होता. राज कपूर यांचा नितांत सुंदर अभिनय त्यांच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर दिसला तसा त्यांच्यातील दिग्दर्शकाचं सर्वोत्कृष्ट कामही या चित्रपटातून दिसलं. या सिनेमाच्या गीत-संगीताची जादू आज 73 वर्षांनंतरही कायम आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारी कला
14 डिसेंबर, 1951 रोजी प्रदर्शित झालेल्या आवारानंतर राज कपूर यांच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सिनेमांची सुरुवात झाली. ही परंपरा पुढे 'जिस देश में गंगा बहती है' पर्यंत दिसत राहिली.
आवारा हा जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट असल्याचं अनेक सिने पत्रकारांचं मत आहे. तत्कालीन सोव्हिएत संघात एका परदेशी चित्रपटाला राष्ट्रीय गौरव म्हणून सन्मान मिळणं हे मनोरंजन विश्वातलं पहिलंच आणि कदाचित एकमेव उदाहरण. त्या काळी रशियात जन्माला आलेल्या अनेक मुलांची नावं या सिनेमावरून प्रेरित होऊन त्यांच्या माता-पित्यांनी राज आणि रीटा अशी ठेवली होती.
दुसऱ्या महायुद्धात पोळलेल्या आणि त्या विनाशातून पुन्हा उभ्या राहू पाहणाऱ्या रशियाच्या लोकांना आवाराच्या नायकामध्ये आपलेपणा वाटला.
'आबाद नहीं बर्बाद सही, गाता हूँ खुशी के गीत मगर. जख्मों से भरा सीना है मेरा, हंसती है मगर ये मस्त नज़र. आवारा हूँ, आवारा हूँ, गर्दिश में हूँ आसमान का तारा हूँ'' हे गाणारा नायक रशियाला त्यांचाच वाटला आणि त्यांच्यासाठीच गाणारा वाटला.
या गीताच्या लोकप्रियतेबद्दल गीतकार शैलेंद्र यांची मुलगी अमला शैलेंद्र यांनी काही वर्षांपूर्वी बीबीसीशी बोलताना आठवण सांगितली होती.
"आम्ही दुबईत राहात होतो. आमच्या शेजारी एक तुर्कमेनिस्तानचं कुटुंब राहायला होतं. त्यांचे वडील एक दिवस आमच्या घरी आले आणि कौतुकाने विचारू लागले, युअर डॅड रोट दिस साँग – आवारा हूँ... आवारा हूँ... आणि रशियन भाषेत गायला लागले."
आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे या गाण्याची. नोबेल पुरस्काराने सन्मानित रशियन साहित्यिक अलेक्झांडर सोरल्नझॅटसन यांच्या 'द कॅन्सर वॉर्ड' या पुस्तकात कॅन्सर वॉर्डातील एक दृश्य वर्णिलेलं आहे. त्यात कॅन्सरग्रस्तांची वेदना आणि दुःख कमी करण्यासाठी एक नर्स आवारा हूँ गाणं गाताना दिसते.
राज कपूर यांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. 1950च्या दशकात पंतप्रधान नेहरू रशियाच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हाची.
नेहरूंचं स्वागत केल्यानंतर तत्कालीन रशियन पंतप्रधान निकोलाई बुल्गानिन यांची बोलण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाबरोबर आवारा हूँ गाणं गाऊन नेहरूंना चकित केलं होतं.

फोटो स्रोत, RK Films and Studios
1954 मध्ये राज कपूर आणि नर्गिस आवाराच्या चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्ताने एकत्र रशिलाला (तत्कालीन सोव्हिएत संघ) गेले होते. त्यावेळची चित्रफीत, व्हिडीओ फूटेज आजही उपलब्ध आहे. राज कपूरना पाहण्यासाठी तिथल्या रस्त्यांवर अक्षरशः लोकांची गर्दी झाल्याचं त्यात दिसतं.
राज कपूर यांना चीनकडूनही निमंत्रण मिळालं होतं. पण त्यावेळी ते जाऊ शकले नव्हते. 1996 मध्ये जेव्हा राज यांचा मुलगा रणधीर कपूर आणि मुलगी ऋतू नंदा चीनला गेले तेव्हा लोकांनी त्यांना बघताच आवारा हूँ गायला सुरुवात केली. ते पाहून त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
त्या लोकांना ही राज कपूरची मुलं असल्याचं माहीत नव्हतं. पण राज कपूर यांचा आणि भारताचा सन्मान करण्यासाठी ते गीत गात होते. आवारा माओ त्से दांगचा आवडीचा चित्रपट असल्याचंही सांगितलं जातं. आवारा चित्रपटाबद्दल तुर्कस्तानात एक टेलिव्हिजन सीरिअलही करण्यात आली होती.
जगभरात 'आवारा'ची जादू
ऋतू नंदा यांनी राज कपूर स्पीक्स पुस्तकात लिहिलं आहे की, 1993 मध्ये रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा नंदा यांनी त्यांना भेटू इच्छिल्याचं कळवलं.
येल्तसिन केवळ भेटीसाठी तयार झाले एवढंच नाही तर भेटल्यानंतर त्यांच्या पुस्तकावर स्वतःच्या हाताने संदेश लिहिला - "मी तुमच्या वडिलांवर खूप प्रेम करायचो. आजही त्यांच्या आठवणी आमच्या मनात आहेत."
ख्वाजा अहमद अब्बास यांनी देखील सोव्हिएतचे नेते निकिता ख्रुश्चेव्ह यांना आवाराच्या लोकप्रियतेविषयी एकदा विचारलं होतं. "दुसऱ्या महायुद्धात सर्वाधिक विनाश रशियन लोकांनी पाहिला होता. अनेक रशियन चित्रपटकर्त्यांनी या विषयावर चित्रपट केले आणि त्या भयंकर काळाची आठवण करून दिली.
पण राज कपूर यांनी 'आवारा'च्या माध्यमातून खचलेल्या, भयकंपित लोकांमध्ये आशेचा किरण जागवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं दुःख विसरायला लावण्यास मदत केली."
आवाराबद्दल बोलताना चित्रपट आणि सामाजिक बदलांचे अभ्यासक जावरिमल पारख म्हणतात, "आवारा चित्रपटातून राज कपूर यांनी दाखवून दिलं की, मेलोड्रामा आणि रिएलिटी यांचं बेमालूम मिश्रण करून ते प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकतात, निखालस मनोरंजन करू शकतात. राज कपूर यांनी त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत हे काम अगदी चोखपणे केलं."

फोटो स्रोत, RK Films
आवारा ही एक कल्ट फिल्म होती. त्याबरोबर तो एक परिपूर्ण चित्रपट होता. त्यामध्ये गाणी, संगीत आणि सामाजिक संदेश ओतप्रेत भरलेले होते आणि तरीही आजही या चित्रपटाचा ताजेपणा कमी झालेला नाही. पण यालाही एक मर्यादा होती.
याविषयी पारख म्हणतात, "काळाबरोबर या चित्रपटाचा प्रभाव कमी झाला असं नाही. पण बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की, राज कपूरचा आवारा ज्या उद्दिष्टाची वकिली करतो त्यालाच हरताळ फासतो.
आवारामध्ये दाखवलं आहे की, माणूस ज्या परिस्थितीत जगतो, ज्या प्रभावाखाली येतो तसाच तो घडत जातो. चांगल्या घरातला मुलगा आवारागर्दी करूनही नंतर सज्जनांच्या आखीव दुनियेत परत जातो. स्वीकारला जातो. पण जग्गा डाकू का सुधारत नाही, हे काही चित्रपटात दाखवलेलं नाही."
झावरीमल पारख यांच्या मते, आवारा एक चित्रपट म्हणून फक्त तिथेच कमी पडतो. कळत नकळत चित्रपट हेच बिंबवतो की, चांगल्या घरातली व्यक्ती भलेही परिस्थितीमुळं वाईट संगतीत राहो पण तिच्यात सुधारणा होऊ शकते आणि त्या व्यक्तीचा समाज तिचा पुन्हा स्वीकारही करतो.
पण जो समाज त्या अभिजन वर्गाखेरीजचा आहे तो काही सुधारू शकत नाही. सुधारला तरी मूळ अभिजन प्रवाहात सामील होऊ शकत नाही. म्हणजेच मूळ समाजप्रवाह काही बदलू शकत नाही."
हेच प्रश्न आणि शंका राज कपूर यांच्या इतर समाजवादी विचारांच्या चित्रपटांबद्दलही विचारले जातात. 1954 मध्ये त्यांचा बूट पॉलिश चित्रपट आला. मुंबईच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबातील मुलांना अक्षरशः फुटपाथवर आपलं आयुष्य जगावं लागतं. त्यांच्या स्वप्नांची कहाणी राज कपूर मांडतात.
समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांना कशा प्रकारे वर्गभेदाचा सामना करावा लागतो हे दाखवण्यात राज कपूर यशस्वी होतात हे खरं. पण जातिभेदाबद्दल त्यांचा सिनेमा काहीच भाष्य करताना दिसत नाही.
पण झावरीमल पारख म्हणतात त्याप्रमाणे, राज कपूर यांच्या काळात त्यांनी केलेल्या चित्रपटांमधून हालाखीच्या गरीब, दुर्बल लोकांचं आयुष्य मुख्य भूमिकेत राज कपूर यांनी ज्या पद्धतीने मांडलं त्याला तोड नाही.

फोटो स्रोत, Keystone-France
'आवारा'नंतर 'बूट पॉलिश', 'श्री 420', 'जागते रहो', 'अब दिल्ली दूर नहीं' आणि 'जिस देश में गंगा बहती है', सारख्या चित्रपटांमधून राज कपूर यांनी समाजाच्या दुर्बल, शोषित समाजाला हिरो बनवलं आणि त्याचबरोबर त्यांची कमजोरी सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर उतरवली.
'बूट पॉलिश' चित्रपटात स्वतः राज कपूर यांनी अभिनय केलेला नसला तरी त्यांच्या प्रॉडक्शनचा तो अत्यंत महत्त्वाचा सिनेमा मानला जातो. 'नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है', गाण्यातून स्पष्ट होतं की, जवाहरलाल नेहरूंच्या समाजवादाचा राज कपूर यांच्यावर प्रभाव होता.
'जागते रहो' चित्रपटात राज कपूर यांनी ग्रामीण युवकाची भूमिका ज्या पद्धतीने उभी केली ते पाहता काही सिने विश्लेषक तीच राज यांची सर्वोत्कृष्ट भूमिका आणि चित्रपट असल्याचं मानतात.
या सिनेमाच्या नायकाला मुंबईत पाणी पिण्यासाठी दारोदार भटकावं लागतं. राज कपूर आणि नर्गिस यांचा हा शेवटचा चित्रपट होता.
1959 मध्ये ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'अनाडी' चित्रपटात राज कपूर अभिनेता म्हणून काम केलं. राज कपूर जेव्हा एक अत्यंत प्रामाणिक व्यक्तिरेखा उभी करताना - 'सबकुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों हम हैं अनाड़ी' – हे गाण गातात तेव्हा त्या अनाडीच्या प्रेमात पडायलाच लावतात.
चित्रपट इतिहासकार रामचंद्रन श्रीनिवासन राज कपूर यांच्या सिनेमाविषयी सांगतात, "राज कपूरच्या सुरुवातीच्या चित्रपटांकडे पाहिलं तर कॉमन मॅन ठळकपणे दिसतो. त्यांच्यावर चार्ली चॅपलिनचा खूप प्रभाव होता, हे स्पष्ट दिसतं."
या प्रभावाखालचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'मेरा नाम जोकर'चं नाव घ्यावं लागेल. हा त्यांचा आत्मकथात्मक चित्रपट असल्याचंही बोललं जातं.

फोटो स्रोत, Harper Collins
प्रत्यक्षात राज कपूर यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. यातून त्यांना खूप मोठं नुकसान सोसावं लागतं.
अनेक चित्रपट समीक्षकांनी राज कपूर संपल्याचं मानायला सुरुवात केली. पण अशा अपयशी चित्रपटाबद्दलही राज कपूर कमालीचे हळवे होते. हा चित्रपट कायम त्यांचा सर्वांत जवळचा सिनेमा होता.
सिमी गरेवाल त्यांच्या डॉक्यूमेंट्रीमध्ये स्वतःच सांगतात, "कुठल्या एकाच चित्रपटाबद्दल निर्मात्याला विचारणं म्हणजे आईला तुझा कुठला मुलगा चांगला विचारण्यासारखं आहे. माझ्यासाठी मेरा नाम जोकर हा तेवढाच जवळचा आहे."
या सिनेमाच्या अपयशाने आरके फिल्म्सला कर्जाच्या डोंगराखाली घालवलं. पण तो चित्रपट मैलाचा दगड मानला गेला.
2011 च्या आयफा पुरस्कार सोहळ्यात राज कपूर रेट्रोस्पेक्टिव्ह आयोजित केलं होतं. याविषयी माध्यमांशी बोलताना राज यांचे सुपुत्र रणधीर कपूर म्हणाले, "मेरा नाम जोकर माझ्या वडिलांच्या सर्वांत जवळचा सिनेमा होता. त्यांनी खूपच मन लावून आणि जिद्दीने तो सिनेमा तयार केला होता. पण सिनेमाला यश मिळालं नाही आणि ते वडिलांच्या मनाला खूप लागलं. उनका दिल ही टूट गया."
रणधीर कपूर यांनी हेदेखील सांगितलं की, चित्रपट दुसऱ्यांदा प्रदर्शित केला तेव्हा चांगला चालला. रणधीर कपूर म्हणाले, "मेरा नाम जोकर हा आरके फिल्म्ससाठी आजपर्यंतचा सर्वांत नफ्याचा सौदा ठरला आहे. त्याचे टीव्ही राइट्स विकून आम्हाला सर्वाधिक पैसा मिळाला."
राज कपूर यांची ड्रीम टीम
राज कपूर यांच्या 'बरसात'च्या यशानंतर त्यांनी एक टीम तयार केली आणि त्याच्या जोरावरच ते एकामागोमाग एक मनोरे रचत गेले. आरके फिल्म्सची स्थापना भले राज कपूर यांनी केलेली असली तरी त्यांच्या 'बरसात'बरोबर नर्गिसही या टीमचा महत्त्वाचा भाग ठरल्या. या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. आजही लोक त्या दोघांबद्दल बोलतात.
1948 मध्ये राज कपूर आणि नर्गिस यांची पहिली भेट झाली त्या वेळी नर्गिस केवळ 16 वर्षांच्या होत्या पण त्यांनी तोवर 8 चित्रपट केलेले होते. त्यावेळी राज होते 22 वर्षांचे आणि त्यांनी तोवर एकही चित्रपट दिग्दर्शित केलेला नव्हता.
'बरसात' चित्रपट तयार होत असताना नर्गिस आणि राज कपूर एकमेकांचे विश्वासू साथीदार बनले. मधु जैन त्यांच्या 'फ़र्स्ट फॅमिली ऑफ़ इंडियन सिनेमा- द कपूर्स' पुस्तकात लिहितात, "नर्गिस यांनी आमलं मन, आपला आत्मा आणि अगदी आपला पैसाही राज कपूर यांच्या चित्रपटांसाठी देण्यास सुरुवात केली होती.
ज्या वेळी आरके स्टुडिओकडे पैशांची चणचण होती तेव्हा नर्गिसने सोन्याच्या बांगड्याही विकल्या. आरके फिल्म्सच्या खजिन्यात कमी होती त्या वेळी बाहेरच्या प्रोड्युसर्ससाठी अदालत, घर संसार आणि लाजवंतीसारखे सिनेमे करून नर्गिस यांनी RK साठी पैसा उभा केला."
राज कपूर यांचे कनिष्ठ बंधू शशी कपूर लिविंग लीजेंड राज कपूर डॉक्यूमेंट्रीत सांगतात, "नर्गिस आरके फिल्म्सची जान होती. कुठलाही सीन नसतानाही त्या सेटवर हजर असायच्या."
राज कपूर आणि नर्गिस यांचं लग्न होऊ शकलं नाही कारण राज कपूर विवाहित होते, असं बोललं जातं. ख्वाजा अहमद अब्बास सांगतात की, "कदाचित नर्गिस यांनादेखील अंदाज आला होता की राज कपूर त्यांच्याशी कधीच विवाह करणार नाहीत. त्यामुळे त्यांनीही आपल्यासाठी वेगळा मार्ग निवडून टाकला".
नर्गिस यांनाच केंद्रस्थानी ठेवून राज कपूर यांनी सिमी गरेवाल यांच्या डॉक्युमेंट्रीत सांगितलं होतं, "माझ्यासाठी पहिल्या दिवशीच ठरलेलं होतं की, माझी पत्नी माझी अभिनेत्री नसेल आणि माझ्या अभिनेत्री कधीच माझी पत्नी होणार नाहीत."

फोटो स्रोत, jh thakker vimal thakker
कदाचित याच व्यावहारिक दृष्टिकोनामुळे असेल पण नर्गिस आरके फिल्म्सपासून दूर झाल्यानंतरही राज कपूर यांचा करिश्मा कायम राहिला. वैजयंती माला, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे आणि मंदाकिनी यांना घेऊन राज कपूर यांनी सुपरहिट सिनेमे दिले.
पण या चित्रपटांमधून ते आपणच निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्टतेच्या सीमा ओलांडू शकले नाहीत, ज्या नर्गिस यांच्या बरोबर त्यांनी पडद्यावर साकारल्या होत्या.
जावरीमल पारेख सांगतात, "राज कपूर यांनी वैयक्तिक आयुष्य आणि फिल्मी जग यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यात यशस्वीही झाले. त्यांचे समकालीन चित्रपटकर्ते गुरुदत्त यांना असा समातोल राखणं जमलं नव्हतं."
राज कपूर यांच्या याच वैशिष्ट्याबद्दल सांगताना ख्वाजा अहमद अब्बास लिहितात, "राज कपूर स्वतःवर, असं म्हणू या की स्वतःच्या चित्रपटांवर सर्वाधिक प्रेम करत असत. बाकी लोकांवर त्यांचं प्रेम होतं. पण ते सिनेमाच्या संदर्भातच. चित्रपटाविषयी ते कमालीचे फोकस्ड होते आणि त्याचमुळे ते लागोपाठ चांगले चांगले चित्रपट देऊ शकले."
नर्गिस व्यतिरिक्त राज कपूर यांच्या टीममधील अन्य सदस्यांचीही ते मनापासून काळजी घ्यायचे. गीतकार शैलेंद्रला ते कविराज म्हणून हाक मारायचे. गायक मुकेश यांना तर माझा आवाज असं म्हणायचे.
शंकर जयकिशन राज कपूर यांचे संगीतकार म्हणून जोडलेले राहिले. तसंच राधू कर्माकरसारखे कॅमेरामनला राज कपूर यांनी चांगली साथ देत एकाहून एक चांगल्या संधी दिल्या."
एका पाठोपाठ एक हिट सिनेमे, आपल्या अभिनेत्रींबरोबर जवळीक आणि एक यशस्वी टीम लीडर अशा वेगवेगळ्या ओळखींतूनच त्यांची शो मॅन इमेज मोठी होत गेली.
असं असलं तरी, त्यांच्या सिनेमातून अश्लीलतेचं प्रदर्शन केल्याचा आरोपही राज कपूर यांच्यावर केला गेला. पण स्त्री-पुरुष संबंध भारतीय कलेचा भाग आहे. अजिंठा-वेरुळपासून खजुराहोपर्यंतच्या कलाकृतीत त्यांची झलक दिसते, असं सांगत त्यांनी नेहमी हे आरोप फेटाळून लावले. "लाइफ इरोटॉजिम के बिना कुछ नहीं है." असं त्यांनी सिम्मी गरेवाल यांच्या डॉक्युमेंट्रीत म्हटलं आहे.
बोल्ड, बिनधास्त दृश्य असूनही त्यांनी चित्रपट सुंदर बनवले. 'संगम', 'बॉबी', 'सत्यम शिवम सुंदरम', 'प्रेम रोग' आणि 'राम तेरी गंगा मैली'सारखे सुपरहिट चित्रपट नंतरच्या काळात राज कपूर यांनी दिले.
'सत्यम शिवम सुंदरम' आणि 'प्रेम रोग' हे काळाच्या पुढचे सिनेमे मानले जातात. स्क्रिप्ट असो, चित्रांकन असो, संगीत असो वा प्रोसेसिंग, एडिटिंग राज कपूर प्रत्येक गोष्टीवर स्वतः लक्ष देत असत.
राज कपूर आणि त्यांचं चित्रपट संगीत
राज कपूर गाणं गुणगुणत आपला चित्रपट तयार करत आणि तसंच संगीतही करवून घेत. गाणीही तशीच तयार होत. आपल्या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनावर राज यांचं लक्ष असायचं तेवढंच संगीताकडेही असायचं.
लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, "मन्ना डे 'घर आया मेरा परदेसी' गाण्याचं रिकॉर्डिंग करत होते. संगीतकार शंकर जयकिशन यांनी आम्हा दोघांना गाण्याचे शब्द आणि चाल समजावून सांगितली होती. पण राज कपूर आले आणि आमच्या दिवसभरातल्या मेहनतीवर पाणी फिरवलं जायचं."

फोटो स्रोत, RK Films and Studios
राहुल रवैलनाही राज कपूरबरोबर सहायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली गोती. त्यांनी बीबीसी हिंदीच्या पत्रकार मधुपाल यांना सांगितलं की, "राज कपूर यांच्याबद्दल बोलताना हेच सांगायला हवं की ते सिनेमाला 360 अंशातून समजून घेत आणि मांडत. म्हणूनच त्यांचा भारतीय सिनेमा जागतिक सिनेजगतात महत्त्वपूर्ण योगदान देऊन गेला."
चित्रपटकर्ते अनीस बझ्मी यांना 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटात सहायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. बीबीसी हिंदीसाठी इकबाल परवेझ यांच्याशी बातचीत करताना सांगितलं की, "मी स्वतःला भाग्यवान समजतो. खूप काही शिकायला मिळालं मला. तीन-चार वर्षं मी त्यांच्याबरोबर काम केलं. पुढच्या चाळीस वर्षांत शिकलो नाही एवढं मला त्या चार वर्षांत शिकायला मिळालं."
आरके स्टुडिओ विकायला लागला तेव्हा...
15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला त्यानंतर बरोबहर एका वर्षाने 1948 मध्ये राज कपूर यांनी आरके फिल्म्स आणि स्टुडिओ स्थापन केला.
त्यांनी 'आग' हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ असे काही चित्रपट केले आणि भारतीय सिनेमावर आपला अमीट ठसा उमटवला की, आजही तो कायम आहे. 'बरसात', 'आवारा', 'बूट पॉलिश', 'श्री 420', 'जागते रहो', 'मेरा नाम जोकर', 'सत्यम शिवम सुंदरम', 'बॉबी', 'प्रेम रोग', 'राम तेरी गंगा मैली हो गई' हे त्यांचे चित्रपट आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.
बरसात चित्रपटातील एक दृश्य आर के फिल्म्सचा लोगोमध्ये साकारलं गेलं. हीरोच्या एका हातात व्हायोलिन आणि दुसरा हात हिरोइनच्या हातात आहे. राज कपूर यांच्या चित्रपटातील नायिका आणि संगीत या दोन्ही गोष्टी नेहमीच नितांत सुंदर ठरल्या.
राज कपूर यांचे बंधू शम्मी आणि शशी कपूर लोकप्रिय अभिनेते होते. पण राज कपूर यांनी त्यांना शोभेल अशा भूमिका होत्या तेव्हाच त्यांना काम दिलं.
शम्मी कपूर आरके फिल्म्सच्या प्रेमरोग मध्ये पहिल्यांदा दिसले. शशी कपूरना 'सत्यम शिवम सुंदरम' मध्ये हिरोचं काम करण्याची संधी मिळाली.

फोटो स्रोत, Randhir Kapoor
राज कपूर यांच्यावर घराणेशाहीला चालना देण्याचा आरोपही होतो. पण त्यांनी वारंवार हे सांगितलं आहे की, आपल्याला आपल्या पित्याच्या नावाचा खूप फायदा मिळाला नाही, किंवा आपण तो करून घेतला नाही. पण प्रत्यक्षात त्यांच्या मुलांना राज कपूर यांच्या नावाचा बराच फायदा मिळाला.
या विषयी चित्रपट इतिहासकार रामचंद्रन श्रीनिवासन एक किस्सा सांगतात. "एकदा राज कपूर सुभाष देसाई यांच्याबरोबर एका चित्रपटाविषयी चर्चा करत होते. तेव्हा देसाई एक गोष्ट वारंवार सांगत होते की, याचा डायरेक्टर तर आपला मनूच असेल.
राज कपूर यांनी विचारलं हा मनू कोण? सुभाष देसाई म्हणाले माझा लहान भाऊ आहे. राज कपूर यांनी विचारलं – तो करेल ना व्यवस्थित दिग्दर्शन – त्यावर सुभाष देसाई म्हणाले की, 'डायरेक्टर तो वही रहेगा, भले आपकी जगह किसी और हीरो लेना पड़ जाए."
1959-60 मध्ये ही स्थिती होती जेव्हा राज कपूर यांच्या नावाचा डंका वाजत होता. 'छलिया' नावाचा चित्रपट राज कपूर यांनी केला आणि मनमोहन देसाई यांच्या रूपाने भारतीय सिनेमाला नवा दिग्दर्शक मिळाला.
श्रीनिवासन यांचं मत असं आहे की, कदाचित या कारणाने असेल पण राज कपूर यांनी तेव्हाच आपल्या मुलांसाठी चित्रपट करण्याचं मनोमन ठरवून टाकलं असावं.
आरके स्टुडिओत चित्रपट करण्याचा प्रवास राज कपूर यांच्यानंतरही रणधीर कपूर यांनी सुरू ठेवला. त्यांनी 'कल आज कल' करून ही परंपरा पुढे नेली. 'धरम करम' आणि 'हिना' हे आणखी दोन चित्रपट त्यांनी केले.

फोटो स्रोत, RK Films and Studios
राज कपूर यांचा दुसरा मुलगा राजीव कपूर यांनी 'प्रेम ग्रंथ' आणि ऋषी कपूर यांनी 'आ अब लौट चले' चित्रपट आरके स्टुडिओत केले. या स्टुडिओचा डोलारा एवढी वर्षं सांभाळणं आणि अचानक तो विकायला काढणं त्या भावांसाठी सुद्धा सोपं नसणार.
पण आज आर. के. स्टुडिओ अस्तित्वात नाही हे सत्य आहे. आपल्या स्टुडिओबद्दल बोलताना एकदा ते म्हणाले होते, "या स्टुडिओच्या मदतीने कुठून कुठे पोहोचलो. काय काय नाही बनवलं या स्टुडिओत... नाहीतर वेगळ्या दृष्टीनं पाहिलं तर नुसत्या भिंती, विटा म्हणजे स्टुडिओ आहे."
राज कपूर यांच्या निधनानंतर 21 वर्षांनंतर आर के स्टुडिओचा मालकी हक्क बदलला. 33000 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला हा स्टुडियओ ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनी विकून टाकला.
रणधीर कपूर यांनी आरके स्टुडिओच्या विक्रीबद्दल 2019 मध्ये बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं होतं, "आरके स्टुडिओ राज कपूर यांच्यामुळेच जीवंत होता. तिथली जमीन, तिथला प्रत्येक कोपरा, प्रत्येक फोटो, प्रत्येक फिल्म त्यांनीच बनवली होती.
आम्ही तिन्ही भावंडांनी आमच्या करिअरची सुरुवात आरके स्टुडिओतून केली. अनेक फॅन्सप्रमाणे आमच्यासाठीही ते एक मंदिर होतं. लहानपणापासूनच्या आमच्या अनेक आठवणी या स्टुडिओशी निगडित आहेत. त्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सोबत असतील."
2019 च्या पूर्वीपर्यंत आरके स्टुडिओमध्ये कितीतरी फोटो, चित्र, सिनेमांची पोस्टर्स, अभिनेता, अभिनेत्रींचे कॉस्च्युम्स, दागिने, 'मेरा नाम जोकर' चा तो क्लोन मास्क आणि चित्रपटांशी निगडित अनेक संग्राह्य गोष्टी होत्या.
पण तिथे लागलेल्या आगीत त्यातील अनेक गोष्टी भस्मसात झाल्या. 2019 नंतर गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीने ही जागा खरेदी केली.
आरके स्टुडिओ पुन्हा नव्याने उभा करण्याचे प्रयत्न करण्याबद्दल प्रश्न केल्यावर रणधीर कपूर म्हणाले की, "वाहतुकीमुळं इथे कुणी येऊ-जाऊ इच्छित नाही. आम्ही पैसे खर्च करून पुन्हा एकदा स्टुडिओ उभा केला तरी तो मूर्खपणा ठरेल.
कितीतरी वर्षं इथे चित्रपटाचं शूटिंग बंद आहे. आम्ही कपूर कुटुंबीयच इथे येतो आणि आमचे फोटो काढतो. शूटिंगसाठी एवढ्या लांब कोणी यायला तयार नसतं. त्यामुळे यात आमचंच नुकसान आहे. अशा परिस्थितीत काही नव्याने उभारून कुणाचाच फायदा होणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
राज कपूर जेवढे मोठे होते तेवढेच सर्वसाधारण माणूस होते. सामान्य माणसामधले सगळे गुण त्यांच्यात होते. पण त्याबरोबर काही खास गोष्टी होत्या. ते वडिलांसमोर कधीच सिगरेट किंवा दारू प्यायचे नाहीत. पण खाण्या-पिण्याची त्यांना खूप आवड होती. त्यामुळेच त्यांचं वजन झपाट्याने वाढलं होतं.
विदेशी मद्याचे ते शौकिन होते. पण जमिनीवर अंथरूण टाकून ऐसपैस झोपायला त्यांना आवडायचं. साधे कपडे ते वापरायचे.
राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार यांच्यामध्ये निखळ मैत्री होती. पण या दोघांच्या तुलनेत राज कपूर यांना अल्पायुष्य मिळालं. वयाच्या 64 व्या वर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार घेत असतानाच त्यांना दम्याचा झटका आला.
राष्ट्रपतींनी प्रोटोकॉलची तमा न बाळगता राज कपूर यांच्यापाशी जात त्यांना पुरस्कार दिला. राज कपूर यांना नंतर हॉस्पिटलमध्ये नेलं, पण एक महिन्यात ते आयुष्याचा संघर्ष हरले.
राज कपूर जाऊन एवढा काळ लोटला तरी त्यांची जिगरबाज मैत्री, खाण्या-पिण्याच्या मैफली यांची चर्चा आजही त्यांचे मित्रवर्ग आणि परिवार करतो. एके काळी बॉलिवूडमध्ये राज कपूर यांच्या होळीची खूप चर्चा होत असे. आरके स्टुडिओच्या होळीची सारी फिल्म इंडस्ट्री वर्षभर प्रतीक्षा करत असे.
पेंग्विन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बॉलीवूड टॉप 20 सुपरस्टार्स ऑफ इंडियन सिनेमा या पुस्तकात राज कपूर यांच्यावर मेघनाद देसाई यांनी लेख लिहिला आहे.
राज कपूर हे हिंदी सिनेमाचे पहिले ग्लोबल आयकॉन असल्याचं ते लिहितात. "राज कपूर श्रेष्ठ अभिनेते होतेच. पण त्यांची समावेशकता त्याहून ग्रेट होती. फिल्म मेकर म्हणूनही त्यांचं श्रेष्ठत्व वादातीत आहे."
जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम
राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आरके फिल्म्स, फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि नॅशन फिल्म अर्काइव्हज ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सिनेमाच्या सर्वात मोठ्या शो मॅनच्या आठवणीत त्यांच्या 10 चित्रपटांचा रेट्रोस्पेक्टिव्ह 13 ते 15 डिसेंबरदरम्यान सादर करण्यात येत आहे.
यात 'आग', 'आवारा', 'श्री 420', 'संगम', 'बॉबी', 'बरसात', 'जागते रहो', 'जिस देश में गंगा बहती है', 'मेरा नाम जोकर' और 'राम तेरी गंगा मैली' असे सदाबहार चित्रपट पुन्हा पाहता येणार आहेत.

फोटो स्रोत, Sangam Movie
हे चित्रपट देशभरातल्या 40 शहरांमध्ये 135 थिएटर्समध्ये प्रदर्शित केले गेले आहेत. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये हे सिनेमे सर्वसामान्य सिनेरसिकांसाठी फक्त 100 रुपयांत दाखवण्यात येत आहेत.
पृथ्वी थिएटरमध्ये राज कपूर यांनी अभिनयाचे धडे गिरवले तिथेच त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दास्तान-ए-राजकपूर कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











