गुरुदत्त यांनी स्वत:च का जमीनदोस्त केला त्यांचा मुंबईतील आलिशान 'बंगला नंबर 48'?

गुरुदत्त
    • Author, यासिर उस्मान
    • Role, चित्रपट इतिहासकार, बीबीसी हिंदीसाठी

चित्रपटांची चंदेरी दुनिया ही स्वप्नांची दुनिया असते. चित्रपट बनवणारे रुपेरी पडद्यावर स्वप्नांची पाखरण करतात, तर चित्रपट पाहणारे त्या कथेच्या माध्यमातून स्वप्नं जगतात.

सर्वसामान्य चित्रपट रसिकांप्रमाणेच चित्रपटाची निर्मिती करणारे, अभिनय करणारे यांचं देखील अनेकदा सर्वात मोठं स्वप्नं म्हणजे 'स्वत:चं घर' हेच असतं.

त्यामुळेच तर प्रत्येक फिल्मस्टारच्या घराची चर्चा होते. कारण त्यांना हवा असतो - 'एक बंगला बने न्यारा सा.'

मुंबईतील बांद्रा पश्चिमेला असणारा पाली हिल परिसर प्रसिद्धच आहे. चित्रपटसृष्टीशी निगडीत अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि फिल्मस्टार यांचं इथं वास्तव्य असल्यामुळे हा परिसर तसा चर्चेत असतो.

याच पाली हिलवरील 'बंगला क्रमांक 48' ज्या लोकांनी पाहिला ते त्या बंगल्याची भव्यता कधीही विसरू शकले नाहीत.

हा बंगला होता भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकार आणि चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त यांचा.

हा बंगला म्हणजे त्यांच्या स्वप्नांचं घर होतं. गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्या आलिशान, सुंदर बंगल्याचा क्रमांक होता 48.

मात्र, हा बंगला कधीही 'घर' मात्र बनू शकला नाही. जितक्या प्रेमानं गुरुदत्त यांनी हा बंगला बनवला, तितक्याच वेदनेनं एका दुपारी त्यांनी हा बंगला उदध्वस्त देखील केला होता.

गुरुदत्त यांच्यावर पुस्तक लिहिताना त्यांच्या अप्रतिम चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या पैलूनं देखील मला सर्वात जास्त विचारात टाकलं होतं. ही फक्त एका बंगल्याची कथा नाही, तर ती गुरुदत्त यांच्या आयुष्याची देखील कहाणी आहे.

लाल रेष
लाल रेष
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1950 च्या दशकात मुंबईत (तेव्हाचं बॉम्बे किंवा बंबई) बांद्रा (पश्चिम) मधील पाली हिल हा भरपूर झाडं असलेला, हिरवाईनं नटलेला परिसर होता.

उतार असलेल्या टेकडीवर हा परिसर असल्यामुळे याचं नाव पाली हिल पडलं होतं. त्या काळात पाली हिलवर बहुतांश लोक बंगला किंवा कॉटेजमध्ये राहायचे.

सुरुवातीच्या काळात त्या बंगल्यांचे मालक ब्रिटिश, पारशी आणि कॅथलिक लोक होते. नंतरच्या काळात दिलीप कुमार, देव आनंद आणि मीना कुमारी सारख्या फिल्म स्टार्सनी या भागात बंगले विकत घेत राहण्यास सुरुवात केली.

त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार इथे राहायला येत गेले. नंतरच्या काळात पाली हिल हा एक उच्चभ्रू आणि महागडा परिसर म्हणून विकसित झाला.

आता पुन्हा एकदा गुरुदत्त यांच्याकडे आयुष्याकडे वळूया.

1925 मध्ये बंगळूरू (तेव्हाच बंगलोर) जवळ पन्नमबुरमध्ये गुरुदत्त पादुकोण यांचा जन्म झाला होता. त्यांचं बालपण अतिशय हलाखीत गेलं, त्यामुळे मोठा आर्थिक संघर्ष करावा लागला.

अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. समस्यांना अंतच नव्हता.

त्यांची छोटी बहीण ललिता लाजमी यांनी मला सांगितलं होतं, "आमच्या संपूर्ण बालपणात आमच्याकडे व्यवस्थित असं घर नव्हतं. आमच्या कुटुंबाला आर्थिक चणचणीमुळे नेहमीच सर्वच गोष्टींची कमतरता असायची. आर्थिकदृष्ट्या तो आमच्यासाठी अतिशय कठीण असा काळ होता."

देव आनंदचं घर आणि गुरुदत्तचं स्वप्न

त्या वेळेस घराबद्दल विचार करणं देखील गुरुदत्त यांच्यासाठी कल्पनेपलीकडचं होतं. आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ते कोलकता (तेव्हाचं कलकत्ता), अल्मोडा आणि पुणे इथे वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांचं नशीब त्यांना मुंबईत घेऊन आलं.

इथे गुरुदत्त यांची भेट झाली अभिनेता देव आनंद या आपल्या मित्राशी. काही वर्षांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध प्रभात स्टुडिओजमध्ये या दोघांची मैत्री झाली होती. त्यावेळेस देव आनंद देखील चित्रपटात काम करण्यासाठी संघर्ष करत होते.

'रोमांसिंग विथ द लाइफ' हे देव आनंद यांचं आत्मचरित्र आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे, "आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की ज्या दिवशी मी चित्रपट निर्माता होईल, त्या दिवशी मी गुरुला दिग्दर्शक म्हणून घेईन आणि ज्या दिवशी तो एखाद्या चित्रपटाचं दिग्दर्शन करेल तो मला त्या चित्रपटात हिरो म्हणून घेईल."

देव आनंद यांना ते वचन लक्षात होतं. गुरुदत्त यांना दिग्दर्शनाची पहिली संधी देव आनंद यांनीच दिली होती. 'बाजी' या आपल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी गुरुदत्तला दिली. हा गुरुदत्त यांचा पहिलाच चित्रपट होता.

देव आनंद यांनी गुरुदत्त वर विश्वास दाखवत आपल्या 'बाजी' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली होती

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLISHER

फोटो कॅप्शन, देव आनंद यांनी गुरुदत्त वर विश्वास दाखवत आपल्या 'बाजी' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली होती

फिल्मस्टार देव आनंद यांचं सुंदर घर पाली हिल परिसरात होतं. चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात गुरुदत्त अनेकदा देव आनंद यांच्या पाली हिलवरील बंगल्यात येत जात असत.

मी गुरुदत्त यांच्यावर 'गुरुदत्त अॅन अनफिनिश्ड स्टोरी' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकाविषयी रिसर्च करत असताना मला गुरुदत्त यांची बहीण आणि प्रसिद्ध कलाकार ललिता लाजमी यांनी मला देव आनंद यांचा बंगला आणि स्वत:च्या घराच्या इच्छेबद्दल सांगितलं होतं.

त्या म्हणाल्या होत्या, "गुरुदत्त देव आनंदच्या बंगल्याची खूप स्तुती करायचे. आम्ही मन लावून त्यांच्या त्या सर्व गोष्टी ऐकायचो. ते म्हणायचे की घर असावं तर असं. आपलं स्वत:चं सुंदर घर असावं ही इच्छा तर आम्हा सर्वांच्याच मनात होती. कारण आमचं स्वत:चं असं घर कधीच नव्हतं."

देव आनंद यांच्या घरी येणं-जाणं असतानाच गुरुदत्त यांनी मनात ठरवलं होतं की जर आयुष्यात कधी संधी मिळाली तर ते पाली हिलमध्येच स्वत:चा बंगला बांधतील. ते त्यांच्या स्वप्नातील घर असणार होतं.

'मी तुझ्या भावाशी लग्न करते आहे, आम्ही आमचं घर बनवू'

बाजी हा चित्रपट गुरुदत्त यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट ठरला. याच चित्रपटानं त्यांच्या मनात बंगल्याची इच्छा निर्माण झाली आणि याच चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात त्यांच्या आयुष्यात प्रेम देखील आलं.

संघर्ष करणारा दिग्दर्शक गुरुदत्त आणि त्या काळातील स्टार पार्श्वगायिका गीता रॉय हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. गुरुदत्त यांच्या कुटुंबाला देखील गीता प्रचंड आवडायच्या.

गुरुदत्त यांची बहीण ललिता आजमी यांनी मला सांगितलं, "गीता स्टार होत्या. मात्र त्यांना साधेपणा आवडायचा. आमची मैत्री झाली होती. माझं त्यांच्याशी खूपच घनिष्ठ नातं तयार झालं होतं. त्या त्यांच्या कुटुंबासोबत एका बंगल्यात राहायच्या."

"त्या बंगल्याचं नाव होतं, 'अमिया कुटीर'. मला आठवतं की एका रात्री त्यांच्या बंगल्याच्या बाल्कनीत उभे असताना गीता यांनी मला सांगितलं होतं, मी तुझ्या भावाशी लग्न करते आहे. आम्ही आमचं घर बनवू."

26 मे 1953 ला गुरुदत्त आणि गीता या दोघांचं लग्न झालं. विशेष म्हणजे लग्नाच्या वेळेस देखील गीता रॉय यांची लोकप्रियता गुरुदत्त यांच्यापेक्षा अधिक होती.

लेखकाबरोबर गुरुदत्त यांची बहीण ललिता लाजमी

फोटो स्रोत, YASEER USMAN

फोटो कॅप्शन, लेखकाबरोबर गुरुदत्त यांची बहीण ललिता लाजमी

गुरुदत्त यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या गीता रॉय यांनी त्यांचं नाव बदलून गीता दत्त असं केलं होतं. मात्र हळूहळू आयुष्य जसं पुढे सरकू लागलं तसतसं गीता यांच्या लक्षात आलं की त्याचं फक्त नावच बदललं नव्हतं, तर त्यांच्या आयुष्यात देखील खूपकाही बदललं होतं.

गुरुदत्त यांची इच्छा होती की आता गीता यांनी फक्त त्यांच्या चित्रपटांची गाणी गायली पाहिजेत. गुरुदत्त यांना तेव्हा करियरमध्ये झपाट्यानं यश मिळत होतं.

'आर पार', 'मिस्टर अँड मिसेस 55' आणि नंतर 'प्यासा' या त्यांच्या चित्रपटांच्या यशामुळे काही वर्षातच त्यांची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट दिग्दर्शकांमध्ये होऊ लागली होती.

त्याउलट लग्नानंतर गीता यांच्या करियरची मात्र घसरण सुरू झाली होती.

ललिता लाजमी यांनी मला सांगितलं होतं की, गीता यांना करियरवर अधिक लक्ष केंद्रीत करायचं होतं. मात्र गुरुदत्त यांची इच्छा होती की त्यांनी कुटुंब-मुलं याकडे लक्ष द्यावं आणि गीतानं फक्त त्यांच्याच चित्रपटातच गावं.

गीता यांना ही गोष्ट आवडत नव्हती. दोघांमध्ये या मुद्द्यावरून भांडणं व्हायची. मात्र सुरुवातीच्या काळात दोघंही त्यातून मार्ग काढायचे, ते ताणून धरत नसत.

गुरुदत्त यांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण

मग एक दिवस गुरुदत्त यांनी वृत्तपत्रात एक जाहिरात पाहिली की पाली हिलवर एक जुना बंगला विक्रीस आहे.

त्यांनी तो बंगला एक लाख रुपयांना विकत घेतला. त्या काळी ती खूपच मोठी रक्कम होती. तो बंगला होता, बंगला क्रमांक 48, पाली हिल.

अखेर गुरुदत्त यांचं स्वत:चा बंगला असण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात आलं होतं.

हा बंगला जवळपास तीन बिघे जमिनीवर विस्तारलेला होता. त्याच्या अवतीभोवती घनदाट झाडं आणि बागा होत्या.

देव आनंद यांच्या बंगल्या पेक्षाही तो मोठा होता. गुरुदत्त आणि गीता यांनी हे घर बांधण्यासाठी भरपूर वेळ आणि पैसा खर्च केला. घरासाठी त्यांनी खास काश्मीरहून लाकूड मागवलं. लंडनहून गालिचा आणि बाथरुमसाठी खास इटालियन संगमरवर मागवलं.

गुरुदत्त यांची आई वासंती यांनी त्यांच्या 'माय सन गुरुदत्त' या पुस्तकात लिहिलं होतं, "पाली हिलच्या बंगल्याला मोठी बाग आणि समोर लॉनसह सुंदर घराचं रुप देण्यात आलं. पायऱ्यांवरून पश्चिमेला समुद्र आणि सूर्यास्त दिसायचा."

पत्नी गीता दत्त आणि मुलांसह गुरुदत्त

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLISHER

फोटो कॅप्शन, पत्नी गीता दत्त आणि मुलांसह गुरुदत्त

"गुरुदत्तनं अनेक प्रकारची कुत्री, सुंदर पक्षी, एक सयामी मांजर आणि एक माकड देखील बंगल्यात ठेवलं होतं. त्याला एक कोंबड्यांचं फार्म देखील सुरू करायचं होतं."

अरुण या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर गुरुदत्त आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या खार येथील फ्लॅटमधून पाली हिलवरील बंगला क्रमांक 48 वर राहायला आलं.

गुरुदत्त आणि गीता दत्त त्यांची दोन मुलं असं अतिशय आनंदी कुटुंब होतं. आता त्यांना भविष्यात यशस्वी आणि सुखी आयुष्य जगण्याची इच्छा होती.

गुरुदत्त इथे वास्तव्यास आल्यानंतर सुरुवातीच्या काळात या बंगल्यातील वातावरण खूपच उल्हासी होतं.

या बंगल्यात शेकडो कथा, चित्रपटांवर चर्चा झाल्या. अनेक पार्ट्या झाल्या. या बंगल्यानं अनेक संगीतमय संध्याकाळी अनुभवल्या. मात्र याच काळात गुरुदत्त आणि गीता यांच्यातील नातं बदललं होतं.

गुरुदत्तचा चढता काळ तर गीताचं करियर उतरणीला

आता गुरुदत्त स्टार दिग्दर्शक झाले होते. त्यांच्या नावाभोवती वलय निर्माण झालं होतं. तर याच काही वर्षात गीता यांचं करियर मात्र उतरणीला लागलं होतं. त्यांचं नाव वेगानं मागे पडत चाललं होतं.

याच काळात लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही वेगानं पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पुढे येऊ लागल्या होत्या. त्यांची गाणी कमालीची लोकप्रिय होत होती.

या स्पर्धेत गीता मागे पडल्या होत्या. त्यांना आता वाटू लागलं होतं की जणूकाही त्या आता भूतकाळातील गायिका झाल्या आहेत.

तर त्याउलट स्थिती गुरुदत्त यांची होती. ते कामात गढून गेले होते. आता त्यांचा स्वत:चा स्टुडिओ होता आणि त्यांना सातत्यानं नवनवीन चित्रपटांची निर्मिती करायची होती.

त्यामुळे त्यांच्याकडे गीता यांच्यासाठी जास्त वेळ नसायचा. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत गुरुदत्त यांच्या वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबरच्या संबंधांची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती.

गुरुदत्त यांच्या पत्नी गीता दत्त

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLISHER

फोटो कॅप्शन, गुरुदत्त यांच्या पत्नी गीता दत्त

'गुरुदत्त अॅन अनफिनिश्ड स्टोरी' या माझ्या पुस्तकासाठी मला मुलाखत देताना ललिता लाजमी यांनी सांगितलं होतं, "गीता यांचा स्वभाव संशयी होता. त्या खूपच पझेसिव्ह होत्या. एक चित्रपट दिग्दर्शक किंवा अभिनेता अनेक अभिनेत्रींबरोबर काम करत असतो. मात्र गीता यांना या गोष्टीचा स्वीकार करणं कठीण झालं होतं."

याचा परिणाम असा झाला होता की गुरुदत्त आणि गीता यांच्यातील भांडणं वाढतच गेली. एकटेपणापेक्षा आपलं स्टारडम संपल्याच्या जाणीवेमुळे गीता जास्त अस्वस्थ झाल्या होत्या.

वैयक्तिक आणि व्यावसायिक तणाव, समस्या यावर मार्ग काढण्यासाठी गुरुदत्त यांनी दारूमध्ये शांतता शोधली.

गुरुदत्त यांची आई वासंती यांनी त्यांच्या 'माय सन गुरुदत्त' या पुस्तकात लिहिलं आहे, "गुरुदत्तनं घर तर बांधलं. मात्र कामात व्यग्र राहिल्यामुळे तो स्वत:च्या घराकडे नीट लक्ष देऊ शकला नाही."

गुरुदत्त यांचा बंगला त्याकाळच्या मुंबईतील रिअल इस्टेटमधील सर्वात सुंदर बंगल्यांपैकी एक होता. मात्र आता त्याच घरात गुरुदत्त यांना झोप देखील येत नव्हती.

अभिनेत्री वहीदा रहमानसोबत गुरुदत्त

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLISHER

फोटो कॅप्शन, अभिनेत्री वहीदा रहमानसोबत गुरुदत्त

बिमल मित्र गुरुदत्त यांचे मित्र होते. बिमल यांनी 'बिनिद्र' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात लिहिलं आहे की, "गुरुदत्त यांनी एकदा त्यांना म्हटलं होतं, मला माझ्या घरात नेहमीच आनंदानं जगायचं होतं. माझा बंगला पाली हिलवरील सर्वात सुंदर वास्तू आहे."

"या बंगल्यात असल्यावर वाटतच नाही की तुम्ही मुंबईत आहात. ती बाग, ते वातावरण मला कुठे मिळणार आहे? मात्र असं असतानाही मी त्या घरात जास्त वेळ थांबू शकत नाही."

अनेकदा गुरुदत्त पहाटे पहाटे, डोळ्यात झोप असतानाच त्यांच्या स्टुडिओत पोहोचायचे. तिथे एका छोट्या खोलीत ते गपचूप झोपायचे. इथेच त्यांना झोप यायची.

कधी कधी मन:शांतीसाठी ते मुंबईतून लोणावळ्याला जायचे. तिथे त्यांचं फार्महाउस होतं. ते तिथेच राहायचे आणि अनेक दिवस शेती करायचे.

लाल रेष

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

लाल रेष

बंगल्यात भूत राहतं!

गुरुदत्त आणि गीता यांच्यात नात्यातील तणाव वाढतच गेला. त्यांचं नातं दुरावत गेलं. गीता यांच्याबरोबरचं नातं पुन्हा सुरळीत व्हावं यासाठी दिग्दर्शक गुरुदत्त यांनी 'गौरी' या मोठ्या चित्रपटाची सुरुवात केली.

मात्र, या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस या दोघांमधील भांडणं इतकी वाढत गेली की सुरुवातीचे काही दिवस चित्रीकरण केल्यानंतर गुरुदत्त यांनी चित्रपटच बंद केला.

दोघांच्याही नात्याला यातून मोठा धक्का बसला होता. तणावात राहिल्यामुळे गीता अंधश्रद्धाळू होत गेल्या. गुरुदत्तबरोबरच्या नात्यातील तणावाचा, नातं दुरावण्याचा दोष त्यांनी बंगल्याला द्यायला सुरुवात केली.

त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी ही भावना होती की पाली हिलवरील या आलिशान बंगल्यात राहायला आल्यापासूनच त्यांच्या आणि गुरुदत्त यांच्या नात्यात कधीही भरून न निघणारी दरी निर्माण झाली होती.

त्यांना खरंच असं वाटू लागलं होतं की, बंगला क्रमांक 48 मुळेच त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाली आहे.

ललिता लाजमी या गुरुदत्त आणि गीता यांच्या सुरुवातीच्या काळातील भेटीगाठींपासून ते त्यांच्या नात्यातील शेवटाची त्या साक्षीदार होत्या.

के. आसिफ यांच्या 'लव अॅंड गॉड' या चित्रपटात अभिनय करताना गुरुदत्त, या चित्रपटात ते मजनूं ची भूमिका करत होते, मात्र चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्यांचं निधन झालं

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLISHER

फोटो कॅप्शन, के. आसिफ यांच्या 'लव अॅंड गॉड' या चित्रपटात अभिनय करताना गुरुदत्त, या चित्रपटात ते मजनूं ची भूमिका करत होते, मात्र चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्यांचं निधन झालं

त्यांनी मला सांगितलं होतं, "गीता यांना वाटू लागलं होतं की बंगल्यात भुताचं वास्तव्य आहे. घराच्या लॉनमध्ये एक विशिष्ट झाड होतं. त्या म्हणायच्या या झाडावरच भूत राहतं आणि त्यामुळेच त्यांच्या कुटुंबात तणाव निर्माण झाला आहे."

"घरातील त्यांच्या भल्या मोठ्या हॉलमध्ये बुद्धाची एक मूर्ती देखील होती. त्या मूर्तीबद्दल देखील त्यांना आक्षेप होता. गुरुदत्त आणि गीतामध्ये खूप जास्त भांडणं व्हायची. गीता वारंवार तो बंगला सोडून इतरत्र राहण्याबद्दल बोलत असत."

गीता यांची ही इच्छा गुरुदत्त यांच्या स्वप्नावर घाला घालणारी होती. कारण ते त्यांच्या स्वप्नातील घर होतं.

मात्र, नंतर गुरुदत्त यांना या कटू सत्याची जाणीव होऊ लागली होती की त्यांना ज्या घराची इच्छा होती तसं घर ते बनवू शकले नाहीत. कारण आलिशान बंगला तर होता, मात्र त्याला घरपण नव्हतं.

सुरूवातीच्या आनंदी दिवसांमध्ये गीता दत्त बरोबर गुरुदत्त

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLISHER

फोटो कॅप्शन, सुरुवातीच्या आनंदी दिवसांमध्ये गीता दत्त बरोबर गुरुदत्त

ललिला लाजमी यांनी मुलाखतीच्या वेळेस मला सांगितलं, "गीता यांच्या इच्छेप्रमाणे शेवटी गुरुदत्त तो बंगला सोडण्यास तयार झाले होते. मात्र त्यांचं मन खिन्न झालं होतं. ते गीतालाच दोष द्यायचे."

याच बंगल्यात वास्तव्य करताना गुरुदत्त यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अजरामर चित्रपटांची निर्मिती केली. मात्र या दोघांमधील तणाव इतका वाढला होता की याच बंगल्यात गुरुदत्त यांनी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता.

ललिता लाजमी यांनी मला सांगितलं होतं की, मोठ्या प्रयासानं दोन्ही वेळा गुरुदत्त यांचा जीव वाचवण्यात आला होता.

त्यांनी सांगितलं होतं, "अनेकवेळा गीताशी भांडण झाल्यावर ते मला बोलवायचे. मी अर्ध्या रात्री सुद्धा त्यांच्याकडे पोहोचायची. ते गुपचूप बसलेले असायचे. मला वाटायचं की त्यांना काहीतरी बोलायचं आहे. मात्र ते फक्त गुपचूप बसलेले असायचे. ते कधीही बोलले नाहीत, कधीही नाही."

दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या या माणसानं या तणावाबद्दल कधीही कुटुंबाजवळ हा विषय काढला नाही. याबद्दल ते कुटुंबातील सदस्यांशी कधीही बोलले नाहीत. मात्र 1963 साली आपल्या वाढदिवशीच गुरुदत्त यांनी एक विचित्र निर्णय घेतला.

(नोट: आत्महत्या ही एक गंभीर स्वरुपाची मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्ही देखील तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 वर कॉल करून मदत घेऊ शकता. तणावासंदर्भात तुम्ही मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)

'बंगला तोडू द्या! मीच त्यांना सांगितलं आहे'

त्या दिवशी दुपारी गीता बंगल्यात झोपलेल्या होत्या. तेव्हा त्यांना मोठ्यानं आवाज आला. त्यांनी पाहिलं की काही मजूर बंगल्याची भिंत तोडत होते. त्यांनी लगेच गुरुदत्त यांना स्टुडिओमध्ये फोन केला.

त्यावर गुरुदत्त यांनी गीता यांना सांगितलं, "त्यांना तोडू दे गीता. मीच त्यांना तसं सांगितलं आहे. काही दिवस आपण हॉटेलमध्ये राहू. मी आधीच एक खोली बूक केली आहे."

गीता आणि त्यांच्या मुलांना वाटलं होतं की गुरुदत्त बहुधा बंगल्यात काही बांधकाम करत आहेत आणि ते पूर्ण होताच आपण सर्व पुन्हा या बंगल्यात राहायला येऊ.

गुरुदत्त यांनी हे सर्व इतक्या सहजतेनं सांगितलं होतं की जणूकाही चित्रपटाचं चित्रीकरण संपताच त्याचा सेट पाडला जात असावा. मात्र यावेळेस हा चित्रपटाचा सेट नव्हता.

जो बंगला पाडला जात होता, त्याचं 'घर' बनवण्याचं स्वप्न गुरुदत्त यांनी पाहिलं होतं. काही दिवसातच बंगला क्रमांक 48 जमीनदोस्त झाला.

'मिस्टर अॅंड मिसेस 55' या चित्रपटातील एका दृश्यात गुरुदत्त आणि मधुबाला

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLISHER

फोटो कॅप्शन, 'मिस्टर अॅंड मिसेस 55' या चित्रपटातील एका दृश्यात गुरुदत्त आणि मधुबाला

बंगल्याच्या ढिगाऱ्याखाली विटा माती, तुटलेला निळा संगमरवर, विखुरलेली लाकडं आणि प्लास्टरचे तुकडे होते. मात्र इथे फक्त प्लास्टर आणि विडाच तुटल्या नव्हत्या तर त्याच्यासोबत एक स्वप्नं देखील चक्काचूर झालं होतं.

गुरुदत्त यांची बहीण ललिला लाजमी यांनी मला सांगितलं होतं, "मला आठवतं की तो त्यांचा वाढदिवस होता. त्यांचं बंगल्यावर खूप प्रेम होतं. जेव्हा तो बंगला पाडण्यात आला तेव्हा त्यांच्या मनावर काय आघात झाला असेल याची कल्पना करवत नाही."

बिनिद्र या पुस्तकात म्हटलं आहे की आपले मित्र आणि 'साहिब, बीबी और गुलाम' या चित्रपटाचे लेखक बिमल मित्र यांना गुरुदत्त म्हणाले होते की पत्नी गीतामुळे गुरुदत्त यांनी तो बंगला पाडला होता.

बंगला क्रमांक 48 पाडल्यानंतर गुरुदत्त यांचं आयुष्य आणि कुटुंबाचा आनंद देखील दिवसागणिक ढासळत गेला. त्या कुटुंबाला उतरती कळा लागली.

बंगला सोडल्यानंतर गीता आणि मुलांसह गुरुदत्त पाली हिलमध्येच दिलीप कुमार यांच्या बंगल्यासमोरील आशीष नावाच्या इमारतीत राहायला गेले. मात्र त्यांच्या आणि गीतामधील नात्यात सुधारणा झाली नाही. दोघांमधील तणाव तसाच राहिला.

काही काळानं गीता आपल्या मुलांसह बांद्रा येथील दुसऱ्या एका भाड्याच्या घरात राहण्यास गेल्या.

राज कपूर, देव आनंद आणि चित्रपटसृष्टीतील इतर लोक

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLISHER

फोटो कॅप्शन, गुरुदत्त यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस राज कपूर, देव आनंद आणि चित्रपटसृष्टीतील इतर लोक

आपल्या आलिशान, भव्य बंगल्याच्या आठवणी मागे सारून गुरुदत्त आता मुंबईतील पेडर रोड वरील आर्क रॉयल अपार्टमेंट एकटेच राहू लागले होते.

गुरुदत्त यांच्या आईनं 'माय सन गुरुदत्त' या पुस्तकात लिहिलं आहे, "गुरुच्या आयुष्याला ग्रहण लागलं होतं. त्यानं आपला सुंदर बंगला पाडला होता. तो बंगला पाडल्यानंतर गुरुच्या कौटुंबिक जीवनाची देखील वाताहात होत गेली."

त्यानंतर तो दुर्दैवी दिवस आला. जवळपास एक वर्षानंतर 10 ऑक्टोबरच्या सकाळी याच फ्लॅटमध्ये गुरुदत्त मृतावस्थेत आढळले.

गुरुदत्त यांची आठवण काढताना ललिता लाजमी यांनी अतिशय दु:खानं मला सांगितलं होतं की जर घर, कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं तर त्यांचा भाऊ इतक्या लवकर गेला नसता. आपल्या अप्रतिम चित्रपटांद्वारे गुरुदत्त तर अमर झाले. मात्र त्यांच्या बंगला क्रमांक 48 चं आज अस्तित्व देखील नाही.

गुरुदत्त म्हणाले होते, "घर नसण्याच्या दुःखापेक्षा, घर असण्याचं दु:खं आणखी भयानक असतं."