'माझं घरंच माझं मंदिर', पतीची आत्महत्या ते आईचा मृत्यू, रेखा यांच्या संघर्षाची गोष्ट

मुंबईतील एका लग्नादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री रेखा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतील एका लग्नादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री रेखा
    • Author, यासिर उस्मान
    • Role, चित्रपट इतिहासकार, बीबीसी हिंदीसाठी

झगमगाटापासून दूर राहणारी, एकांतप्रिय आणि काही प्रमाणात रहस्यं बाळगणारी अशी अभिनेत्री म्हणजे रेखा.

रेखा यांना आज त्यांच्या खास साड्या आणि 'दिवा इमेज'साठी ओळखलं जातं. त्यांच्या केसांमधील कुंकू कायम चर्चेचा विषय ठरतं. पण त्यांनी बालपणात अनुभवलेले खोलवरचे आघात आणि चित्रपटसृष्टीतील दीर्घ संघर्ष यावर चर्चा होत नाही.

चित्रपटांपासून दूर राहूनही रेखा नुकत्याच झालेल्या आयफा अवॉर्डमध्ये परफॉर्म करताना दिसल्या. त्यावेळी रेखा यांची एखाद्या नव्या अभिनेत्रीपेक्षा अधिक चर्चा झाली. त्याच रेखा आज 70 वर्षांच्या झाल्या आहेत.

2014 चा चित्रपट ‘सुपर नानी’नंतर रेखा कोणत्याही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसल्या नाहीत. त्या सामान्यपणे मुलाखतीही देत नाहीत. पापाराझींचे कॅमेरेही रेखा यांच्या घरात डोकावू शकत नाहीत.

असं असलं तरी मोठ्या काळानंतर मागील वर्षी रेखा प्रतिष्ठित ‘वोग मॅगझिन’च्या मुखपृष्ठावर झळकल्या. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी वारंवार आपल्या आईची आठवण काढली ही विशेष गोष्ट होती.

यावेळी रेखा यांनी आईच्या नावावरून घराचं नाव 'पुष्पावल्ली' ठेवल्याचाही उल्लेख झाला. मुंबईमधील बांद्रा बँडस्टँडवर सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या घरांजवळच रेखा यांचं घर आहे. याच घरात रेखा आणि त्यांची आई पुष्पावल्ली यांच्या संघर्षाची गोष्टही लपलेली आहे.

प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आईपासून सुरू होते. आई आपली सावली बनून राहते. रेखा यांच्या आयुष्यातही आई सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. रेखा यांच्यावर पुस्तक लिहिताना संशोधनात त्यांचा हा कधीही ऐकिवात नसलेला पैलू समोर आला.

मी चित्रपट दिग्दर्शक मुझफ्फर अली यांना विचारलं की, त्याकाळी प्रस्थापित आणि अभिनयात सरस समजल्या जाणाऱ्या स्मिता पाटील यांचा पर्याय असताना त्यांनी ‘उमराव जान’च्या भूमिकेसाठी रेखा यांनाच का निवडलं? त्यांनी तात्काळ उत्तर दिलं, “जगणं लोकांना हादरवून टाकतं. माणूस वारंवार धडपडतो, मात्र जोपर्यंत तो प्रत्येकवेळी त्याच ताकदीने उभा राहत नाही, तोपर्यंत त्याच्यात जगण्याची उर्मी तयार होत नाही. कोसळून विखुरल्यानंतर पुन्हा स्वतःला उभं राहण्याची ही जाणीव मला रेखा यांच्या डोळ्यात दिसली.”

मुझफ्फर अली यांनी ज्या जाणि‍वेचा उल्लेख केला ती जाणीव कदाचित रेखा यांच्या भूतकाळात, त्यांच्या आईशी संबंधित आहे. यात दुःखं, संकटं अनुभवण्याची आणि त्यावर विजय मिळवण्याची गोष्टही आहे.

बालपणातील संघर्ष

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ही गोष्ट सुरू होते 1947 मध्ये जेव्हा मद्रासचा प्रसिद्ध जेमिनी स्टूडियो तमिळ चित्रपट ‘मिस मालिनी’ची निर्मिती करत होता.

या चित्रपटाची नायिका होती एक नवी अभिनेत्री पुष्पावल्ली. स्वतःची नोकरी सोडून आलेल्या रुबाबदार तरूण रामास्वामी गणेशनलाही या चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली होती. या चित्रपटाच्या सेटवरच पुष्पावल्ली आणि रामास्वामी गणेशनची जवळीक वाढली.

पुढील काळात रामास्वामी गणेशन, जेमिनी गणेशन या नावाने तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक झाले. जेमिनी आणि पुष्पावल्ली चित्रपटांमध्ये लोकप्रिय जोडीच्या रुपात ओळखले जाऊ लागले.

जेमिनी यांचं लग्न झालेलं होतं, मात्र तरीही त्यांचं पुष्पावल्ली यांच्यासोबतचं नातं कुणापासूनही लपून राहिलं नाही. जेमिनी यांनी आपल्याशी लग्न करावं, अशी पुष्पावल्ली यांची इच्छा होती. मात्र जेमिनी यांनी कधीही या नात्याला सामाजित मान्यता दिली नाही. 10 ऑक्टोबर 1954 मध्ये पुष्पावल्ली आणि जेमिनी यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवण्यात आलं, भानुरेखा गणेशन.

भानुरेखाच्या जन्मासोबतच अनेक अफवाही उठल्या. या अफवा आणि खासगी आयुष्याशी संबंधित चर्चांनी तिचा आयुष्यभर पाठलाग केला. लहानपणापासून आईने तिला तिचं नाव भानुरेखा गणेशन असल्याचं सांगितलं.

या नावाच्या आधारेच पुष्पावल्ली स्वतः ज्या हक्कापासून वंचित राहिल्या तो हक्क आपल्या मुलीला देऊ इच्छित होत्या. गणेशन नाव त्या सन्मान आणि प्रतिष्ठेची जाणीव करून देत होतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

ग्राफिक्स
ग्राफिक्स

भानुरेखानंतर जेमिनी आणि पुष्पावल्ली यांना आणखी दोन मुली झाल्या. भानुरेखाला कमी वयातच लक्षात आलं की, तिच्या वडिलांचं एक दुसरं घर आहे आणि तेथे त्यांचं आणखी एक कुटुंब राहतं. त्या कुटुंबावर त्यांचं खूप प्रेम होतं.

भानुरेखाने संपूर्ण बालपणात तिच्या आईला हळूहळू तुटताना पाहिलं. अशा अनुभवांचा परिणाम लहान मुलांच्या मनावर आयुष्यभर राहतो.

पुष्पावल्लीने वडिलांची कमतरता भरून काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र हे सोपं नव्हतं. पुष्पावल्ली यांचं वय वाढत चाललं होतं आणि चित्रपटांमधील भूमिका कमी व्हायला लागल्या. कुटुंबासाठी त्या सातत्याने शुटिंगसाठी जात होत्या.

बालपणाची आठवण सांगताना रेखा यांनी एका मुलाखतीत (मुवी मॅगझीन, मे 1987) म्हटलं होतं, “आमचं आईवर खूप प्रेम होतं आणि त्याचं एक कारण हेही होतं की, ती कधीही घरी नसायची. ती तिचा जास्तीत जास्त वेळ शुटिंगमध्ये घालवायची. ज्या दिवशी आई घरी असायची तो दिवस आमच्यासाठी एखाद्या सणाप्रमाणे असायचा.

आम्हा सर्वांना आईच्या कुशीत बसायचं असायचं. त्यांचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी होतं. आमच्यावर तिचा इतका प्रभाव का आहे आणि आम्हाला गरज असायची तेव्हा ती आमच्याजवळ का नसते यामुळे मी तिच्यावर नाराजही व्हायचे. मात्र मी नेहमीच आईमुळे प्रभावित झाले.”

हळूहळू पुष्पावल्ली यांना चित्रपटांमधील भूमिका मिळणं खूप कमी झालं. परिस्थिती बिघडत केली आणि कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ आली. ताणतणावाने पुष्पावल्ली यांची प्रकृती देखील बिघडवली. कर्ज वाढत जात होतं. संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागण्याच्या स्थितीत केलं होतं.

चित्रपटसृष्टीतील काळं सत्य

भानुरेखा यांना चित्रपटसृष्टी फार आवडत नव्हती. आईच्या संघर्षात त्यांना या चित्रपटसृष्टीचं काळं सत्य दिसलं होतं. मात्र त्याच कुटुंबाची शेवटची आशा होत्या.

“नववीला असताना माझं शिक्षण बंद करण्यात आलं आणि 14 व्या वर्षी मला काम करण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी माझ्या आईवर किती कर्ज आहे हेही मला माहिती नव्हतं. त्यावेळी मला चित्रपटात काम करणं योग्य वाटलं नाही,” असं रेखा यांनी 1990 मध्ये फिल्मफेयरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

मुंबईतील एका चित्रपट निर्मात्यांनी रेखा यांना काम देण्यात रस दाखवला तेव्हा पुष्पावल्ली 13-14 वर्षांच्या आपल्या मुलीला घेऊन मुंबईला पोहचल्या. रेखा आपलं शहर सोडून मुंबई आल्या होत्या, मात्र मनातल्या मनात त्या खूप घाबरलेल्या होत्या.

हे शहर ना त्यांच्या एकटेपणाला समजू शकत होतं, ना त्यांच्या भाषेला. त्यामुळे आपल्या इच्छेविरुद्ध मुंबईत घेऊन येणाऱ्या आईचाही त्यांना राग यायचा. सिमी ग्रेवाल यांना 2004 मध्ये दिलेल्या मुलाखतीत रेखा म्हणाल्या, “मुंबई एक जंगलाप्रमाणे होतं, जेथे मी कोणत्याही हत्याराशिवाय मोकळ्या हाती आले होते. तो माझ्या आयुष्यातील खूप भीतीदायक काळ होता. येथे पुरुषांनी माझ्या संवेदनशीलतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. एका 13 वर्षाच्या मुलीसोबत असं होणं खूप भीतीदायक होतं.”

एक दिवस भानुरेखाने आपल्या आईला जो सन्मान मिळाला नाही तो सन्मान आपणही मिळवायचा, असा निर्धार केला. याची सुरुवात त्यांनी मुंबईत आडनाव गणेशन काढून टाकण्यापासून केली. त्या दिवसापासून भानुरेखा गणेशन केवळ रेखा झाल्या.

आयफा अवॉर्डच्या ट्रॉफीसोबत रेखा
फोटो कॅप्शन, आयफा अवॉर्डच्या ट्रॉफीसोबत रेखा

रेखा यांचं मुंबईतील पहिलं घर म्हणजे जुहूमधील हॉटेल अजंताची रुम नंबर 115. याच ठिकाणी त्या त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या शुटिंग काळात आईसोबत राहिल्या. यानंतरही मोठा काळा रेखा त्यांच्या आईसोबत भाड्याच्या घरातच राहिल्या. त्यांच्याकडे सुखासमाधानाने राहता येईल असं घर सुरुवातीपासून नव्हतंच.

अगदी कमी वयात संघर्ष करायला निघालेल्या रेखा यांना आईसोबत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायला आलेल्या रेखा यांना सुरुवातीला हिंदीही नीट बोलता येत नव्हतं. त्यांचा सावळा रंग, जास्त वजन आणि ‘33 इंचाच्या कंबरे’ची संपूर्ण चित्रपटसृष्टीत चेष्टा करण्यात आली.

रेखा यांनी काळाचा अनेक मुलाखतींमध्ये उल्लेख केला आहे. 3 ऑगस्ट 2008 रोजी इंग्रजी वृत्तपत्र टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “माझ्या काळ्या रंगामुळे आणि दक्षिण भारतीय चेहऱ्यामुळे मला हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अग्ली डकलिंग’ म्हटलं जात होतं. जेव्हा लोक त्या काळातील अभिनेत्रींशी माझी तुलना करून मी त्यांच्यासमोर काहीच नाही असं म्हणायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचं.”

पहिलाच चित्रपट ‘अंजाना सफर’मध्ये एका ‘किसिंग सीन’साठी भाग पाडल्याने झालेल्या वादापासून चित्रपटांमधून काढून टाकलं जाणं आणि अनेक अपयशी नात्यांपर्यंत रेखा यांच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या.

सुरुवातीच्या काळात रेखा यांच्यासोबत जाहिरात करणारे चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी मला सांगितलं होतं, “रेखा 13-14 वर्षांच्या असताना मी त्यांच्यासोबत काही जाहिरातींची निर्मिती केली होती. त्यांना हिंदी बोलता येत नव्हतं, तरीही त्या हिंदी चित्रपटसृष्टीत टिकून आहेत याचं मला आश्चर्य वाटलं. असं असलं तरी त्यांच्या डोळ्यातील चमक आणि कॅमेरासमोरील जबरदस्त आत्मविश्वास मी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळीही त्यांच्यात काही तरी वेगळी गोष्ट होती.”

ग्राफिक्स

या बातम्याही वाचा :

ग्राफिक्स

यशस्वी चित्रपटांचा काळ

स्वतःतील आत्मविश्वासामागे मोठं कारण प्रचंड कठीण काळात सावलीप्रमाणे सोबत असणारी आई आहे, असं रेखा सांगतात. मागील वर्षी वोग मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रेखा म्हणाल्या, "माझी मार्गदर्शक आई होती. आई मला देवीप्रमाणे वाटायची. तिने मला प्रेम आणि सौम्यपणाने जगायला शिकवलं. ती मला नेहमी म्हणायची की, मी कधीही डोळ्यातील चमक गमावू नको."

डोळ्यातील ही चमक रेखा यांनी कधीही गमावली नाही आणि काही वर्षात काळ बदलला. विशेष म्हणजे 1976 मधील ‘दो अन्जाने’ या चित्रपटात रेखा यांनी त्यांच्या अभिनयाकडे सर्वांचे लक्ष वेधले.

हिंदी न येणाऱ्या, जास्त वजन असल्याने चेष्टेचा विषय झालेल्या रेखा सत्तरच्या दशकाच्या शेवटीपर्यंत प्रवाही हिंदी - उर्दू आणि उत्तम फिटनेससाठी ओळखल्या जाऊ लागल्या.

करिअरमध्ये हार न पत्करण्याचा लढाऊपणा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. रेखा यांनी वोग मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "आईने मला कायम मौल्यवानतेवर भर द्यायला शिकवलं. मनाला वाटतं तसं करायला आणि इतरांनी आपल्यावर थोपवलेल्या गोष्टी न करण्याची शिकवण दिली."

2003 मध्ये एका म्युझिक अल्बम लाँच सोहळ्यादरम्यान उपस्थित असलेल्या रेखा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2003 मध्ये एका म्युझिक अल्बम लाँच सोहळ्यादरम्यान उपस्थित असलेल्या रेखा

1980 पर्यंत घर, खून-पसीना, मुकद्दर का सिकंदर आणि खूबसूरत अशा यशस्वी चित्रपटांमध्ये काम करत रेखा अव्वल अभिनेत्रींच्या यादीत आल्या. त्यानंतर इजाजत, कलयुग आणि उत्सवसारख्या समांतर चित्रपटांमध्येही रेखा यांनी आठवणीत राहील असा अभिनय केला.

ऐंशीच्या दशकाच्या जेव्हा श्रीदेवी यांची चर्चा होती तेव्हा रेखा यांनी ब्लॉकबस्टर खून भरी मांग (1988) चित्रपटात अॅक्शन रोल करत सर्वांना आश्चर्यचकीत केलं.

रेखा यांच्याबरोबर घर आणि इजाजत चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक गीतकार गुलजार मला म्हणाले होते, “रेखा भूमिकेला कपड्यांप्रमाणे स्वीकारते.” विचार करा ज्या अभिनेत्रीला सुरुवातीला हिंदी - उर्दू बोलता येत नव्हतं तिने काही वर्षात अतिशय चांगली उर्दू बोलत ‘उमराव जान’मधील भू्मिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.

अमिताभसोबतच्या नात्याची गोष्ट

असं असलं तरी रेखा यांचा उल्लेख आजही सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबतची ऑनस्क्रीन केमेस्ट्री आणि खासगी आयुष्यातील जवळीक याबाबत अधिक केला जातो. याचं कारण खूप प्रमाणात स्वतः रेखाही आहेत.

त्यांनी त्यांच्या व्यक्तित्वातील आणि करियरमधील मेकओव्हरचं श्रेय कायम अमिताभ बच्चन यांना दिलं. कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वतःतील कायापालटाची प्रेरणा त्यांनाच म्हटलं.

रेखा नेहमीच लाजून किंवा संकोचून त्यांच्या जीवनातील अमिताभ यांच्या महत्त्वावर बोलायच्या. अमिताभ यांच्यामुळे जगण्यात नाट्यमय परिवर्तन होत, त्यांनी यश मिळवल्याचं त्या सांगायला विसरल्या नाहीत. त्यांच्या आयुष्यातील अमिताभ यांचं महत्त्व आईच्या बरोबरीचं असल्याचं रेखा यांनी सांगितलं होतं.

आजही रेखा यांच्या करिअरपेक्षा अधिक चर्चा अमिताभ यांच्यासोबतच्या जवळीक असलेल्या नात्याचीच होते. या एकांगी चर्चेच्या गोंगाटात रेखा यांची मेहनत आणि यश कायम मागे राहतं. विशेष म्हणजे आपल्या कुटुंबाप्रती रेखा यांच्या त्यागाचाही मुद्दा नजरेआड होतो.

एक मोठं आणि सुंदर घर हे रेखा आणि त्यांच्या आईचं कायमच स्वप्न राहिलं. अनेक चढउतारांनंतर ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला रेखा यांनी आपल्या आईचं घराचं स्वप्न पूर्ण केलं.

रेखा यांनी मुंबईतील बांद्रामधील घराचं नाव आईच्या नावावरून पुष्पावल्ली असं ठेवलं.

"मला मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याची गरज वाटत नाही. माझं घरंच माझं मंदिर आहे," असं मत रेखा यांनी वोग मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.

रेखा

फोटो स्रोत, Getty Images

रेखा यांची लहान बहीण धनलक्ष्मी यांचे पती आणि अभिनेते तेज सप्रू यांनी मला सांगितलं की, रेखा लढवय्या आहेत. सगळ्या बहिणी त्यांच्या आईवर खूप प्रेम करायच्या. मात्र रेखा यांनी खरोखर अवघड काळात एकट्याने सगळं केलं.

त्या चांगल्याप्रकारे लढल्या आणि जिंकल्या. त्यांनी आपल्या कुटुंबाला एका उंचीवर पोहचवण्यासाठी मोठ्या वादळांना तोंड दिलं. त्यामुळेच रेखा खास आहेत.”

अनेक कमी महत्त्वाचे चित्रपट केल्याने रेखा यांच्यावर खूप टीकाही झाली. मात्र तेज सप्रू यांनी सांगितलं की, रेखा यांनी सत्तरच्या दशकात डोळे झाकून चित्रपट केले. कारण त्यांच्यावर आई, दोन भाऊ आणि तीन बहिणी असलेल्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी होती.

जितके अधिक चित्रपट तेवढे अधिक पैसे मिळणार होते. त्या काळात अभिनेता आणि अभिनेत्रींच्या कमाईत खूप फरक होता.

कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या

रेखा यांनी 2011 च्या फिल्म फेअरमध्ये कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांवर म्हटलं होतं, “अनेकदा तर मी माझ्या आईचीही आई होते आणि माझ्या भावा-बहिणींचीही आई होते.

जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून माझ्या मातृत्व भावना खूप अधिक प्रमाणात आहे. हा मातृत्वभाव आयुष्यभर माझ्यात राहिला आणि माझ्यासोबत असणाऱ्यांना तो मिळाला. मात्र मला वाटतं हा एका महिलेचाच विचार असू शकतो. काही लोक जीवनाच्या चौकटीत बरोबर बसतात.

मी घराची कमावती सदस्य होते. मला रात्रीत मोठं होऊन भाऊ-बहीण आणि कुटुंबाची काळजी घ्यायची होती. माझ्या भावाचा अकाली मृत्यू झाला. मी माझ्या अनेक सहकलाकारांच्या भावा-बहि‍णींना दारू आणि ड्रग्सच्या व्यसनाच्या आहारी जाताना पाहिलं आहे. मी माझ्या कुटुंबाला यापासून वाचवेल, असं वचन मी खूप आधीच स्वतःला दिलं होतं."

बहि‍णींचं लग्न केल्यानंतर 1990 मध्ये रेखा यांचं स्वतःचं लग्नाचं स्वप्नही पूर्ण झालं होतं. त्यांनी दिल्लीचे उद्योगपती मुकेश अग्रवाल यांची भेट झाल्यानंतर एका महिन्याच्या आत लग्न केलं होतं. मात्र हे नातं खूप टिकलं नाही आणि ते दोघे वेगळे झाले.

लग्नानंतर सात महिन्यात 2 ऑक्टोबर 1990 रोजी त्यांच्या पतीने आत्महत्या केली. माध्यमांसाठी मुकेश यांची आत्महत्या मोठी बातमी होती. माध्यमं आणि चित्रपटसृष्टीनेही मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूसाठी रेखा यांनाच जबाबदार धरलं.

ठिकठिकाणी लोकांनी रेखा यांच्या चित्रपटांच्या पोस्टर्सला काळे फासले. यामुळे बिनधास्त वावरणाऱ्या रेखा अनेक महिने शांत झाल्या. यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी सुपरहिट ठरलेल्या ‘फूल बने अंगारे’ चित्रपटातून पुनरागमन केले, पण यावेळी रेखा पूर्णपणे बदलल्या होत्या.

रेखा

फोटो स्रोत, Getty Images

याचवर्षी रेखा यांची आई पुप्षावल्ली यांचा मद्रासमध्ये दीर्घ आजाराने मृत्यू झाला. रेखा यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, पण या प्रत्येक चढउतारात त्यांची आई त्यांच्यासोबत उभी होती.

आईच्या मृत्यूपर्यंत रेखा यांना ही जाणीव होती की, प्रत्येकवेळी त्यांची आई त्यांची सुरक्षारक्षक म्हणून उभी राहायची. दोघी माय-लेकीचे संबंध किती जवळचे होते याचं उदाहरण रेखा यांचं घर आहे.

पती मुकेश अग्रवाल यांची आत्महत्या आणि त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर रेखा पूर्णपणे बदलल्या. त्यांनी माध्यमांपासून अंतर राखलं. त्यांच्या मुलाखतीतील बोलण्याचा सूरही बदलला. त्यांनी स्वतःच्या आधीच्या बेधडक आणि प्रामाणिक स्वभावाच्या अगदी उलटं स्वतःला तयार केलं. त्यांनी स्वतःभोवती एक अशी भिंत उभी केली जी आजही पडत नाही. त्या आजही ज्या काही थोड्या मुलाखती देतात त्यातही त्यांची उत्तरं स्वतःसाठी बनवलेल्या सुरक्षित मर्यादेतच असतात.

असं वाटतं की, रेखा यांनी ठरवून स्वतःची ओळख स्वप्न सुंदरी अशी केली आहे. त्यांच्या मुलाखती आता निराकार आणि तात्विक होतात. मात्र, ‘पुष्पावल्ली’च्या सावलीत जगणाऱ्या रेखा चित्रपटसृष्टीत सक्रीय नसतानाही प्रभावी ठरणाऱ्या व्यक्ती आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)