राज कपूर, दिलीप कुमार आणि देवानंद, एकाच काळातील स्टार्सच्या अनोख्या मैत्रीचे किस्से

फोटो स्रोत, Mohan Churiwala
- Author, वंदना
- Role, सीनियर न्यूज एडिटर, बीबीसी न्यूज
देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर यांचा विचार केल्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील ही तीन सोनेरी पानं होती.
तो हिंदी चित्रपटसृष्टी बहरण्याचा काळ होता. तिघांचीही व्यक्तिमत्वं वेगवेगळी, अभिनयाची शैली वेगवेगळी. तरी देखील या तिघांचे सूर जुळले होते.
या तिघांमध्ये जशी स्पर्धा होती तशीच एक वेगळीच मैत्री देखील होती. या तिघांच्या एकमेकांशी असलेल्या अद्भूत नात्याची ही कहाणी...
आजच्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन महत्त्वाचे स्टार म्हणजे शाहरुख, आमिर आणि सलमान खान.
आजच्या पिढीवर जसा या त्रिकुटाचा प्रभाव आहे. तसंच 1950 आणि 1960 च्या दशकात देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर या तिघांची जादू होती.
2022 मध्ये दिलीप कुमार यांच्या जन्मास 100 वर्षे पूर्ण झाली. 2023 मध्ये देव आनंद यांच्या जन्मास 100 वर्षे पूर्ण झाली तर डिसेंबर 2024 मध्ये राज कपूर यांच्या जन्माला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.


देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर या तिघांनी जवळपास एकाचवेळी म्हणजे 1940 च्या दशकात आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. तिघेही एकाच वेळेस यशाच्या शिखरावर पोहोचले आणि या तिघांनी त्यांची मैत्री देखील निभावली.
हे तिघेही एकाच काळातील असले तरी तिघांच्या शैली मात्र अतिशय वेगवेगळ्या होत्या. राज कपूर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर 'खुल्लम खुल्ला: ऋषि कपूर अनसेंसर्ड' हे आत्मचरित्र लिहिलं आहे.
त्यात ऋषी कपूर यांनी एक अतिशय रंजक किस्सा लिहिला आहे. त्यातून या तिघांचं एकमेकांशी असलेलं नातं आणि त्यांची वैशिष्ट्ये किंवा वेगळेपण लक्षात येतं.

आपल्या आत्मचरित्रात ऋषी कपूर यांनी लिहिलं आहे की, "1999 मध्ये चिंपू (राजीव कपूर) यांचं लग्नं होतं. माझ्या आईनं सांगितलं की आपण स्वत: जाऊन युसूफ साहेब (दिलीप कुमार) आणि देव आनंद यांना आमंत्रण देऊया. ते दोघेही किती वेगवेगळे होते. आम्ही युसूफ साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला राज साहेब आणि त्यांचे असंख्य किस्से सांगितले."
"आम्ही दोन तास युसूफ साहेबांकडे होतो. त्यांनी आमचं अतिशय उत्तम आदरातिथ्य केलं. त्यानंतर आम्ही निघालो तेव्हा युसूफ साहेबांनी सांगितलं की, ते लग्नाला नक्की येतील. ते म्हणाले की, राजला या गोष्टीचा खूप आनंद होईल की त्याचा सर्वात लहान मुलगा लग्न करतो आहे."
"तिथून आम्ही थेट देव आनंद यांच्या घरी गेलो. युसूफ साहेबांचं घर संस्कृतीनं नटलेलं होतं. तर देव साहेबांची खोली हॉलीवूडवरील पुस्तकांनी भरलेली होती. तिथे सर्वकाही अमेरिकन होतं."

फोटो स्रोत, RK Films and Studios
"अचानक देव साहेब आत आले. त्यांनी पिवळी पँट, नारंगी रंगाचा शर्ट, हिरवं स्वेटर आणि एक मफलर घातला होता. आम्हाला पाहताच ते म्हणाले - हाय बॉईज, हाऊ आर यू. यू गाईज आर लुकिंग डॅम गूड."
"त्यांना जेव्हा आमच्या येण्यामागचं कारण कळालं, तेव्हा ते म्हणाले खूप चांगली गोष्ट आहे. लग्न करा, गर्लफ्रेंड बनवा. तुम्हा लोकांना गर्लफ्रेंड आहे की नाही. ते इतके बिनधास्त, डॅशिंग होते की त्यांच्या सळसळत्या ऊर्जा प्रवाहाचा तुमच्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहत नसे.
युसूफ साहेब आणि देव साहेब हे दोघेही किती वेगवेगळे होते, हे पाहून मी आणि डब्बू (रणधीर) दोघेही आश्चर्यचकित झालो होतो", असं वर्णन ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलंआहे.
तिघांची वेगवेगळी शैली
1944 मध्ये दिलीप कुमार यांनी 'ज्वारभाटा' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्याच वेळेस लाहोरहून आलेले देव आनंद चित्रपटात हिरो होण्यासाठी मुंबईत (तेव्हाचं बॉम्बे) संघर्ष करत होते.
लवकरच म्हणजे 1946 ला त्यांचा 'हम एक हैं' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर एका वर्षानं, 1947 ला निळ्या डोळ्यांच्या राज कपूर यांचा 'नीलकमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
देव आनंद यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांना हिंदी चित्रपटांचा पहिला शहरी नायक म्हटलं जातं. त्यांच्याबद्दल विचार करताच एक स्टायलिश, फॅशनेबल शहरी तरुणाची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते.
'इंसानियत' सारखे एक-दोन चित्रपट सोडले तर तुम्ही क्वचितच देव आनंद यांना गावातील तरुणाच्या भूमिकेत पाहिलं असेल. ते त्यांच्या उत्स्फूर्त शैलीसाठी ओळखले जायचे.

तर दिलीप कुमार यांची गोष्ट पूर्ण वेगळी होती. ते ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जायचे.
'देवदास' मध्ये पराभूत मन:स्थितीच्या आणि स्वत:लाच बरबाद करणाऱ्या प्रियकराच्या भूमिकेत तर कधी 'मेला' (1948) चित्रपटातून एका दुरावलेल्या आणि शेवटी मृत्यूला कवटाळणाऱ्या प्रियकराच्या भूमिकेत ते दिसले.
अर्थात दिलीप कुमार यांचा अभिनय फक्त ट्रॅजेडी किंवा शोकांतिकेपर्यंतच मर्यादित नव्हता. त्यांनी 'कोहिनूर' सारखे विनोदी चित्रपट देखील केले.
मेथड अॅक्टिंग हे दिलीप कुमार यांचं वैशिष्ट्यं होतं. मात्र पडद्यावरील त्यांचा वावर खूपच सहज होता.
दिलीप कुमारचा अभिनय आणि राज कपूर
1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कोहिनूर' या चित्रपटाचा किस्सा प्रसिद्ध आहे. त्यात 'मधुबन में राधिका नाचे रे' मध्ये दिलीप कुमार सतार वाजवायला शिकले.
एका बाजूला चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं तर दुसऱ्या बाजूला दिलीप कुमार उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्याकडून शिकत होते.
बहुधा या दोघांच्या मध्ये कुठेतरी राज कपूर यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी स्वत:ची चार्ली चॅप्लिन सारख्या साध्या सरळ, भोळ्या नायकाची प्रतिमा तयार केली किंवा असंही म्हणता येईल की लोकांनी त्याला तसं पाहिलं.
राज कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील असे स्टार होते जे 1950 च्या दशकात हिंदी चित्रपटांबरोबरच जागतिक स्तरावर पोहोचले होते.
राज कपूर यांना दिलीप कुमार यांच्याबद्दल खूप आदर होता. याचा उल्लेख स्वत: दिलीप कुमार यांनी त्यांच्या 'दिलीप कुमार - द सब्सस्टन्स अँड द शॅडो' या आत्मचरित्रात केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात दिलीप कुमार यांनी लिहिलं आहे की "ही 1980 च्या दशकातील गोष्ट आहे. तेव्हा 'प्रेम रोग' या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं."
"या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राज कपूर, तर नायक होते ऋषी कपूर. राज कपूर यांना ऋषी कपूर यांच्या चेहऱ्यावर एका पराभूत, हताश प्रियकराचं नैराश्य आणि लाचारी दाखवायची होती. मात्र अनेकवेळा प्रयत्न करून देखील राज कपूर यांना ऋषी कपूर यांच्या चेहऱ्यावर तसे हावभाव दिसत नव्हते."
अखेर राज कपूर यांचा संयम सुटला. सर्व युनिटसमोर ते ऋषी कपूर यांच्यावर ओरडले आणि म्हणाले, "मला युसूफ हवा. चेहऱ्यावर तीच वेदना हवी, जी शॉट देताना युसूफच्या डोळ्यात दिसायची...तोच खरेपणा."
राज कपूर युसूफ खान म्हणजे दिलीप कुमार यांचंच उदाहरण ऋषी कपूर यांना देत होते.
दिलीप कुमार आणि देव आनंद यांचं गुपीत
या तिन्ही अभिनेत्यांनी 1950 आणि 1960 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. मात्र या तिघांना एकाच चित्रपटात पाहायची संधी त्यांच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या वाट्याला कधीच आली नाही.
मात्र 'अंदाज' या चित्रपटात दिलीप कुमार आणि राज कपूर या दोघांच्याही भूमिका होत्या.
ऋषी कपूर यांनी लिहिलं आहे की दिलीप कुमार यांना 'संगम' या चित्रपटात भूमिका देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी ती भूमिका नाकारली होती.
तर 1955 मध्ये देव आनंद आणि दिलीप कुमार यांनी एका चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. 'इंसानियत' हा एकमेव चित्रपट होता ज्यात हे दोन दिग्गज अभिनेते एकत्र दिसले होते.

फोटो स्रोत, Mohan Churiwala
बहुधा हा चित्रपट अशाच मोजक्याच एक-दोन चित्रपटांपैकी एक असेल ज्यात देव आनंद गावातील माणसाच्या वेषात म्हणजे धोतर, कुर्ता परिधान केलेले दिसले होते. हे दोन बडे कलाकार असून देखील हा चित्रपट तिकिटबारीवर चालला नाही.
राज कपूर आणि देव आनंद या दोघांनी 'श्रीमानजी' नावाच्या एका चित्रपटात पाहुण्या कलाकाराची (कॅमियो) भूमिका केली होती. मात्र ते दोघे एकाच सीनमध्ये दिसले नव्हते.
देव, राज आणि दिलीप यांची मैत्री
ही गोष्ट तर उघड आहे की या तीन स्टारमध्ये त्याकाळी स्पर्धा होती. मात्र त्याचबरोबर त्यांची जबरदस्त मैत्रीदेखील होती आणि जिथे मैत्री असते तिथे गैरसमजाला देखील वाव असतोच.
या गोष्टीचा संदर्भ देव आनंद यांनी त्यांच्या 'रोमान्सिंग विथ लाईफ' या आत्मचरित्रात दिला आहे. त्यात देव आनंद यांनी अभिनेत्री झीनत अमान आणि राज कपूर यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.
देव आनंद यांनी लिहिलं आहे की, "झीनत अमान यांना चित्रपटसृष्टीत मी आणलं. एका वेळी मला असं वाटू लागलं होतं की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मी विचार केला की माझ्या मनातील गोष्ट मी त्यांना सांगेन. मी त्यांना एक पार्टीतून घेण्यासाठी गेलो. मात्र तिथे सर्वात आधी राज कपूर झीनतला भेटले आणि त्यांनी झीनतला जवळ घेतलं."
"ते पाहून असं वाटत होतं की हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. झीनतनं देखील राज कपूरना जो प्रतिसाद दिला तो काहीतरी खास होता. झीनत राज कपूरच्या पाया पडली. राज कपूर यांनी माझा हात घट्ट पकडला. जणूकाही एखाद्या चुकीच्या गोष्टीची ते भरपाई करत होते. त्यामुळे मला शंका वाटू लागली."
"माझं मन दुखावलं गेलं. मी एका अशा नात्याला संपवण्याचा निर्णय घेतला ज्यात दोन्ही बाजूनं कोणतीही कटिबद्धता नव्हती. मात्र ते प्रामाणिक नातं होतं."
अर्थात झीनत अमान यांनी 2023 मध्ये या सर्व गोष्टी फेटाळत त्यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "मी जेव्हा माझ्या करियरची सुरूवात केली तेव्हा तो दिलीप कुमार, देव साहेब आणि राज कपूर या सोनेरी त्रिकुटाचा काळ होता. राज कपूर यांच्या चित्रपटात भूमिका मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती. मात्र मला या गोष्टीची अजिबात जाणीव नव्हती की या गोष्टींबद्दल देव साहेबांचा गैरसमज होतो आहे."
"ज्यावेळेस देव साहेबांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं होतं तेव्हा मला खूप राग आला होता. कारण त्यात त्यांनी सूचित केलं होतं की राज कपूर आणि माझ्या मध्ये दिग्दर्शक-नायिका या नात्यापलीकडे आणखी वेगळं नातं होतं. मात्र हे देखील खरं आहे की देव आनंद दुर्मिळ गुणवत्तेचे कलाकार होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात फक्त आभाराची भावना आहे. देव साहेबांच्या बाबतीत मी कोणताही अपमान सहन करणार नाही."

फोटो स्रोत, Penguin Viking
देव आनंद यांनी या गोष्टी आत्मचरित्रात खूप नंतरच्या काळात लिहिल्या. तोपर्यंत राज कपूर यांचं निधन होऊन अनेक वर्षे झाली होती. त्याचबरोबर देव आनंद या गोष्टींबद्दल उघडपणे कधीही बोलले नाहीत.
आपल्या आत्मचरित्रात देव आनंद यांनी राज कपूर यांच्याबद्दल लिहिलं आहे की, "आम्ही सोबतच सोव्हिएत युनियनला (आताचा रशिया) गेलो होतो. तिथे राज कपूर यांची लोकप्रियता आम्हा सर्वांपेक्षा अधिक होती. आम्ही कुठेही गेलो तरी एकच मागणी व्हायची. ती म्हणजे राज कपूर यांनी 'आवारा हूँ' हे गाणं गावं. राज कपूर देखील पिआनो स्टूलावर बसून पूर्ण जोशात हे गाणं गायचे. तर लोक त्यांना व्होडकाचे ग्लास द्यायचे."
"राज कपूर सोव्हिएत युनियनमध्ये इतके लोकप्रिय होते की जेव्हा भारतीय लोक तिथे जायचे तेव्हा त्यांना विचारलं जायचं की तुम्ही 'आवारा'च्या भूमीतून आला आहात का? जवाहरलाल नेहरू जेव्हा पहिल्यांदा सोव्हिएत युनियनला गेले होते, तेव्हा ते देखील राज कपूर यांची लोकप्रियता पाहून थक्क झाले होते."
"नंतर भारतातील एका कार्यक्रमात पंडित नेहरूंनी आम्हा तिघांना म्हणजे मला, राज आणि दिलीप यांना बोलावलं होतं आणि आम्हाला आलिंगन दिलं होतं."
दिलीप कुमार यांनी देखील त्यांच्या आत्मचरित्रात देव आनंद आणि राज कपूर यांच्याबरोबरच्या आपल्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले आहेत.
गंमतीचा भाग म्हणजे या तिन्ही कलाकारांचा जन्म फाळणीपूर्वीच्या भारताच्या त्या भागात झाला जो आज पाकिस्तानात आहे.

फोटो स्रोत, jagte raho movie
देव आनंद गुरदासपूरचे होते. तर राज कपूर आणि दिलीप कुमार पेशावरचे होते.
दिलीप कुमार यांचं आत्मचरित्र वाचून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की या तिघांमध्ये स्पर्धा होती, तसाच ते एकमेकांचा आदर करायचे आणि त्यांच्यात प्रेमाचं नातं देखील होतं.
प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राज कपूर नेहमी सांगायचे की, "दिलीप कुमार जेव्हा लग्न करतील तेव्हा मी गुडघ्यांवर रांगत त्यांच्या घरी जाईन."
प्रत्यक्षात तसं घडलं देखील. जेव्हा दिलीप कुमार यांचं लग्न झालं तेव्हा राज कपूर यांनी आपलं वचन पूर्ण केलं. ते खरोखरंच गुडघ्यांवर रांगत दिलीप कुमार यांच्या घरी गेले होते.
राज कपूर आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना दिलीप कुमार त्यांना भेटायला गेले होते.
दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रात ऋषी कपूर यांनी या घटनेचं वर्णन असं केलं आहे, "राज साहेबांची तब्येत गंभीर होती. दिलीप अंकल राज साहेबांच्या खोलीत आले आणि बोलू लागले - हे बघ, राज मी आताच पेशावर हून आलो आहे...तिथल्या चपली कबाबचा सुगंध तुझ्यासाठी माझ्यासोबत घेऊन आलो आहे."
"आपण दोघे एकत्र पेशावरला जाऊ, तिथल्या गल्ल्यांमध्ये फिरू, पूर्वीसारखंच तिथे कबाब आणि रोटीचा आनंद घेऊ. राज तू मला पेशावरच्या घराच्या अंगणात घेऊन जा."
मात्र त्याच दिवशी राज कपूर यांनी आपल्या मित्राच्या या आर्जवाकडे देखील एकप्रकारे दुर्लक्ष केलं.
हे तिघे मित्र आता कदाचित आपापल्या शैलीत हा वाढदिवस साजरा करत असतील.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











