बिग बॉसच्या घरात 'गोल्डन गाइज', 3 किलो सोनं घालणारे हे पुणेकर तरुण कोण आहेत?

कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या बिग बॉसच्या (हिंदी) घरात 'गोल्डन गाइज' ची एन्ट्री झाली आहे.

'गोल्डन गाइज' या नावाने प्रसिद्ध असलेल्या सनी नानासाहेब वाघचौरे आणि संजय गुर्जर यांना बिग बॉसने एक काम सोपवलं आहे.

'गोल्डन गाइज' बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या कंटेस्टंटना हरलेली 25 लाख रुपयांची रक्कम पुन्हा एकदा जिंकण्याची संधी मिळवून देतील.

बिग बॉस-16 चे कंटेस्टंट्स एका टास्क दरम्यान विजेत्याला मिळणाऱ्या 50 लाख रुपयांच्या रकमेपैकी 25 लाख रुपये हारले होते. आता हीच रक्कम स्पर्धकांना पुन्हा जिंकून देण्यासाठी एक खास टास्क घेऊन हे गोल्डन गाइज' बिग बॉसच्या घरात आले आहेत.

कोण आहेत हे गोल्डन गाइज?

2016 साली ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेते विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले होते.

याच शोमधून पहिल्यांदा प्रेक्षकांना 'गोल्डन गाइज'चं दर्शन घडलं.

गळ्यांत जाडजूड सोन्याच्या साखळ्या, मनगटात मोठेमोठे कडे आणि सोन्याच्याच चप्पल घालणाऱ्या सनी नानासाहेब वाघचौरे आणि संजय गुर्जर यांनी शो चा होस्ट कपिल शर्माचं लक्ष वेधून घेतलं.

हे 'गोल्डन गाइड' मूळ पुण्यातील पिंपरी-चिंचवडचे आहेत. तिथेच लहानाचे मोठे झालेले हे दोघं लहानपणापासूनच सोन्याचे दागिने घालतात. ते दररोज तीन किलो किंवा त्यापेक्षाही जास्त सोनं घालतात.

पुण्यात त्यांना 'गोल्ड मॅन' नावानेही ओळखले जातात.

सनी नानासाहेब वाघचौरे यांना लोक 'नाना' म्हणूनही बोलावतात. त्याने आपल्या पित्याला समर्पित नाना नावाची सोन्याची चेन बनवली आहे. सनीच्या गळ्यात ही चेन नेहमी दिसते.

सनीने मॉडेल-अभिनेत्री प्रीती सोनीसोबत लग्न केलं आहे.

संजय गुर्जरला लोक 'बंटी' म्हणूनही ओळखतात. आपला लकी नंबर सात असल्याचं संजय मानतात आणि त्यामुळेच त्या आकड्याची जाड सोन्याची चेन सनीच्या गळ्यात दिसते.

फिल्मी कनेक्शन

2016 मध्ये कपिल शर्मा शोमध्ये आलेल्या रितेश देशमुखने प्रेक्षकांना सांगितलं होतं की, सनी अभिनेता विवेक ओबेरॉयचा मित्र आहे आणि विवेकच्या चित्रपटांचे फायनान्सरही आहे.

या चित्रपटांमध्ये 'जिला गाजियाबाद' आणि 'जयंताभाई की लव्ह स्टोरी'चा समावेश आहे.

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिला गाजियाबाद'मध्ये सनी वाघचौरेने एक लहान भूमिकाही साकारली होती.

2012 साली या दोघांनी सिनेमांना वित्तपुरवठा करणं सुरू केलं. त्यासोबत या दोघांचे स्वतःचे व्यवसायही आहेत. स्क्रॅप, रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायामध्ये हे दोघे आहेत.

त्यांनी अनेक गोडाऊन, फ्लॅट आणि घरं भाड्याने दिली आहेत. पुण्यात त्यांची दोन हॉटेल्स आहेत आणि एक रिसॉर्टही आहे. हे सर्व व्यवसाय सनी त्याचे वडील आणि मोठ्या भावाच्या मदतीने सांभाळतो.

दुसरीकडे बंटी आणि त्याचा मोठा भाऊ, जो राजकारणात आहे, व्यवसाय पाहतात.

सलमान खानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता सोहैल खान 'गोल्डन गाइज'ना आपला मित्र मानतो.

कपिल शर्मा शोमध्ये आल्यानंतर हे दोघं रातोरात प्रसिद्ध झाले आणि सोशल मीडिया स्टार बनले.

हे दोघं टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल, द खतरा शो यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

सोशल मीडियावर या दोघांचेही लाखो फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर हे दोघेही चित्रपट कलाकारांसोबतचे फोटोही शेअर करतात. 2021 साली अन्सारी मोहसिन आणि निकिता राय यांच्या 'दोनों यारा' आणि 2022 मध्ये आलेल्या स्टाय बॉय एलओसीच्या 'नाच बसंती' या व्हीडिओ अल्बममध्येही गोल्डन गाइजची झलक पाहायला मिळते.

पुण्यातल्या अनेक स्थानिक कार्यक्रमांमध्ये त्यांना सेलिब्रिटी म्हणून बोलावलं जातं.

सोशल मीडियातील त्यांच्या फोटोंमधून त्यांची छानछौकीची जीवनशैली पाहायला मिळते.

या दोघांनी 'गोल्डन गाइज़' नावाने एक एनजीओही सुरू केली आहे. त्यांच्या या संस्थेमार्फत पुण्यातील गरीब मुलांना रोज जेवण दिलं जातं आणि गरजू लोकांना मदतही केली जाते.

'गोल्डन गाइज'चं एकमेकांशी नातं काय?

हे दोघेही मूळचे पुण्यातील पिंपरी-चिंचवडचे. सनीचा जन्म 2 जानेवारी 1990चा आणि संजयचा जन्म 27 जानेवारी 1985चा.

हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र. त्यांनी डी वाय पाटील कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. कपिल शर्मा शोमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, ते कॉलेज आमचंच आहे.

या कॉलेजची जमीन मूळ त्यांची आहे आणि त्याचं बांधकामही त्यांच्याच कंपनीने केल्यामुळे त्यांनी असं म्हटलं होतं.

सनी आणि संजय लहानपणापासून सोनं घालायचे. दोघंही एकत्र कुटुंबात वाढलेत. त्यांच्या कुटुंबात तब्बल 58 सदस्य आहेत.

सनी वाघचौरे आणि संजय गुर्जर यांना केवळ सोन्याचाच शौक आहे असं नाही, त्यांना महागड्या गाड्यांचीही आवड आहे. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडिज, ऑडी, रेंज रोव्हर, जग्वारसारख्या महागड्या गाड्या आहेत.

यातल्या काही गाड्यांवर तर त्यांनी सोन्याचा मुलामाही दिला आहे.

हे दोघे जेव्हा सोन्याचा मुलामा दिलेल्या गाडीतून बाहेर पडतात, तेव्हा या गाड्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मागेपुढे दोन-चार गाड्यांचा ताफा असतो.

दागिने आणि गाड्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडे फोन, घड्याळं आणि सायकल पण सोन्याच्या आहेत.

हे 'गोल्डन गाइज' जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमी दोन बॉडीगार्ड सोबत असतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)