बिग बॉस मराठी 4 : घरात स्पर्धक म्हणून कोणाकोणाची एन्ट्री?

'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनला आजपासून (2 ऑक्टोबर) सुरूवात झाली.

या पर्वाचे होस्टही अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच आहेत. 'ऑल इज वेल' अशी यंदाच्या सीझनची थीम आहे.

घराचं घरपण टिकवायचं तर शिस्त हवी, असं प्रोमोमध्ये तरी महेश मांजरेकर यांनी प्रोमोत म्हटलं आहे. त्यामुळे या सीझनमध्ये काय नवीन असेल आणि शिस्तीचा बडगा कसा राहील हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

पण 'बिग बॉस'च्या घराचा आतापर्यंतचा इतिहास पाहता 'बिग बॉस'च्या घरात खरंच सगळं 'वेल' असणार का, हे पाहायचं आहे.

बिग बॉसमध्ये असतील हे स्पर्धक -

1. तेजस्विनी लोणारी

'बिग बॉस'च्या घरातील पहिली सदस्य म्हणून तेजस्विनी लोणारी हिने प्रवेश केला आहे. तेजस्विनी लोणारी ही एक अभिनेत्री असून मकरंद अनासपुरेसोबत दोघांत तिसरा आता सगळं विसरा या चित्रपटात ती दिसली होती.

तेजस्विनी फारशा चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती लोकप्रिय आहे.

2. प्रसाद जवादे

प्रसाद जवादे हा एक अभिनेता असून त्याने मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'असे हे कन्यादान' या मालिका, एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर ही हिंदी मालिका आणि 'मिस्टर अँन्ड मिसेस सदाचारी', 'गुरू' या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारली होती.

3. अमृता धोंगडे

मिसेस मुख्यमंत्री आणि मिथुन या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता धोंगडे हीसुद्धा यंदाच्या बिगबॉसचा भाग असणार आहे.

अमृता ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो , व्हिडिओ व्हायरलही होतात.

4. निखिल राजेशिर्के

अभिनेता निखिल राजेशिर्के याने रंग माझा वेगळा या मालिकेत भूमिका साकारली आहे.

त्याने दे धमाल, अरूंधती आणि आभाळमाया यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.

5. किरण माने

किरण माने हे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेमध्ये विलास पाटील या भूमिकेत होते. मात्र त्यांना या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आलं होतं.

सोशल मीडियावर मांडत असलेल्या भूमिकेच्या कारणामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असा आरोप किरण माने यांनी त्यावेळी केला.

किरण मानेंना राजकीय भूमिकेमुळं नव्हे तर इतर कारणांमुळं काढण्यात आलं आणि त्याची त्यांना कल्पनाही होती, असा दावा निर्मात्या सुझाना घई यांनी केला होता.

6. समृद्धी जाधव

समृद्धी जाधव ही स्प्लिट्झव्हिला X3 चा भाग होती. सोशल मीडियावरही ती लोकप्रिय आहे.

समृद्धीला एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून ओळखलं जातं. शिवाय, स्केटिंग, घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक, नृत्य, गायन इत्यादींमध्ये ती पारंगत आहे.

तिने मॉडेल म्हणूनही काम केलं आहे.

7. अक्षय केळकर

भाकरवडी या मराठी मालिकेतील भूमिकेसाठी अभिनेता अक्षय केळकरला ओळखलं जातं.

एक नंबर, बे दुणे दहा आणि कमला या मालिकेतही अक्षयने काम केलं आहे.

8. अपूर्वा नेमाळेकर

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अपूर्वा नेमाळेकर हीसुद्धा यंदाच्या बिग बॉस शोमध्ये स्पर्धक असणार आहे. अपूर्वाला शेवंताच्या भूमिकेसाठी विशेष ओळखलं जातं.

सोशल मीडियावरही अपूर्वाला चांगला प्रतिसाद मिळतो.

9. योगेश जाधव

योगेश जाधवला आपल्या मजबूत शरीरयष्टीसाठी ओळखलं जातं.

योगेश हा मार्शल आर्ट्स मध्ये पारंगत असून त्याने रोडीज शोमध्येही सहभाग नोंदवला होता.

10. अमृता देशमुख

अभिनेत्री अमृता देशमुख ही पुढचं पाऊल आणि अस्मिता यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली आहे. तिलाही बिग बॉस शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

11. यशश्री मसुरकर

यशश्री मसुरकर ही एक अभिनेत्री आहे. ती स्टार वन या वाहिनीवर रंग बदलती ओढनी मालिकेतील खनक या भूमिकेसाठी ओळखली जाते. याव्यतिरिक्त तिने लाल इश्क, काबाड या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

12. विकास सावंत

विकास सावंत हा एक डान्सर आणि अभिनेता आहे. त्याने अनेक डान्स रिअॅलिटी शोजमध्ये आपली कला सादर केली आहे.

13. मेघा घाडगे

अभिनेत्री मेघा घाडगे या पछाडलेल्या चित्रपटात दिसल्या होत्या. त्यांनी या चित्रपटात सौंदर्या जवळकर ही भूमिका केली होती.

त्यानंतरही त्यांनी इतर काही मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. पण मध्यंतरी त्या चित्रपटांपासून दूर गेल्या होत्या.

14. त्रिशूल मराठे

त्रिशूल मराठे हा सोशल मीडिया स्टार आहे. त्याला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळालेली आहे.

15. रुचिरा जाधव

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील माया नामक भूमिकेसाठी रुचिरा जाधव प्रसिद्ध आहे. तिला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळतो.

16. डॉ. रोहित शिंदे

'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे.

रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे. पण त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. त्याने 'मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल'साठी मॉडेलिंग केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)