You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Bigg Boss Marathi : संतोष चौधरी उर्फ दादूस नेमके कोण आहेत?
- Author, संकेत सबनीस आणि अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी
बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात संतोष चौधरी उर्फ दादूस बाहेर पडले आहेत.
नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेत मीरा, विकास, सोनली, मीनल आणि दादूस नॉमिनेट झाले होते. सलमान खानने त्यांच्यापैकी दोन सदस्यांना सेफ केलं. डेंजर झोनमध्ये असलेल्या मीनल आणि दादूसपैकी दादूस एलिमिनेट झाले.
पण संतोष चौधरी उर्फ दादूस आहेत कोण?
आगरी समाजातील लग्नात हळदीचा समारंभ हा महत्त्वाचा मानला जातो. सामिष जेवण आणि पारंपरिक गीतांचा कार्यक्रम या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण... खास ड्रमसेटसह सगळा वाद्यवृंद आणि गायक-गायिका यांच्यासह हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते.
हळदीला जमलेली घरातली मंडळी आगरी-कोळी गीतांच्या गाण्यांवर थिरकायला लागतात. त्यातून जर ऑर्केस्ट्रा संतोष चौधरी उर्फ दादूस यांचा असेल तर विचारायलाच नको.
दादूसचा गाण्यांचा कार्यक्रम आपल्या हळदीला असणं याला ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई भागात प्रतिष्ठेचं मानलं जातं. दादूसनं आपल्या घरी हळदीच्या कार्यक्रमाला यावे यासाठी लग्न ठरल्या-ठरल्या दादूस उपलब्ध आहेत की नाही हे पाहिलं जातं.
पण कदाचित मुंबईबाहेरच्या लोकांना संतोष चौधरी हे नाव फारसं परिचयाचं नव्हतं. त्यामुळेच जेव्हा 'बिग बॉस'च्या घरात सेलिब्रिटींसोबत संतोष चौधरी स्पर्धक म्हणून आले, तेव्हा हे कोण असा प्रश्न अनेकांना पडला.
'बिग बॉस' मराठीचा तिसरा सीझन 19 सप्टेंबरपासून सुरू झाला. तसं तर 'बिग बॉसच्या घरात 15 स्पर्धकांनी एन्ट्री घेतली होती. या स्पर्धकांमध्ये टीव्ही-चित्रपटांमधून दिसणाऱ्या चेहऱ्यांशिवाय असेही काही चेहरे होते, ज्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यांपैकी एक नाव होतं गायक संतोष चौधरी यांचं.
संतोष चौधरी हे दादूस आणि 'कोळी समाजाचा बप्पी लाहिरी' म्हणूनच प्रसिद्ध आहेत. बिग बॉसच्या घरात संतोष चौधरी कसे खेळले? त्यांचे कोणाशी वाद, भांडणं झाली आहेत का? या गोष्टी जाणून घेण्याआधी आपण संतोष चौधरी उर्फ दादूस कोण आहेत याची माहिती घेऊ.
आगरी-कोळी गीतं, हळद आणि दादूस
ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आगरी, कोळी समाजाचं वास्तव्य आहे. थोड्या फार फरकाने या समाजांच्या चालीरीती एकच आहेत. विशेषतः त्यांचे विवाह सोहळे सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतो.
लग्नाएवढंच लग्नापूर्वीच्या हळदीला या समाजांमध्ये महत्त्व असतं. आगरी, कोळी समाजाचा हळदीचा कार्यक्रम म्हणजे मटण-भाकरी, डाळ-वजडी आणि असले तर मासे... हा ठरलेला मेनू. 400 ते 800 लोक या हळदीच्या कार्यक्रमांना जेवायला असतात.
या जेवणाच्या आकर्षणाबरोबरच हळदीच्या कार्यक्रमातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पारंपरिक आगरी-कोळी गीतांचा कार्यक्रम.
प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे हा कार्यक्रम जेवढा चांगला होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करत असतो. हळदीच्या कार्यक्रमाला गाणी सादर करणाऱ्यांना लग्नसराईच्या काळात मोठी मागणी असते. त्यात संतोष चौधरी यांच्या कार्यक्रमांना प्रचंड मागणी असते.
दादूस आपल्या घरी हळदीच्या कार्यक्रमाला यावं यासाठी लग्न ठरल्या - ठरल्या दादूस उपलब्ध आहेत की नाही हे पाहिलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये दादूस यांनी अक्षरशः शेकड्याने हळदींचे कार्यक्रम गाजवले आहेत.
गोल्डमॅन आणि गाडी
भिवंडी तालुक्यातल्या कामतघर या गावात 46 वर्षीय संतोष चौधरींचं वास्तव्य आहे. अंगावर दोन ते अडीच किलोचं सोनं घालून हळदींच्या कार्यक्रमात स्टेजवर गाणं गायला ते उभे राहतात. त्यामुळेच त्यांना 'गोल्डमॅन' म्हणून पण ओळखलं जातं.
ते 'फॉर्च्युनर' गाडी वापरतात. त्यांच्या गाडीवर मोठ्या अक्षरात 'दादूस' लिहिलेलं असतं त्यांची ही गाडी हळदीच्या दिवशी लग्नघराबाहेर उभी असली की, ते काहींच्या दृष्टीने प्रतिष्ठेचंही असतं.
दादूस नाव कसं पडलं?
संतोष यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या पत्नी योगिता चौधरी यांनी सांगितलं की, "त्यांना लहानपणापासूनच गाणी म्हणायची आवड होती. इयत्ता आठवीपासूनच ते कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले होते. यासाठी ते स्वतः एखाद्या ठिकाणी हळद, दांडिया, पूजा असेल तर आम्ही इथे कार्यक्रम करतो सांगून गाणी म्हणायचे. हळूहळू हीच आवड जोपासत त्याचं कायम स्वरुपी करिअर त्यांनी निवडलं."
संतोष चौधरींना दादूस कसं नाव पडलं याची गोष्टही त्या सांगतात.
"माझी आणि त्यांची ओळख ही गाण्यांचे कार्यक्रम सादर करतानाच झाली. मी त्यांच्या टीममध्ये पूर्वीच कलाकार म्हणून सहभागी झाले होते. नंतर आमचं लग्न झालं. मला आमच्या टीममधले इतर सगळेच जण बहीण किंवा वहिनी मानायचे. आमच्याकडे बहिणीच्या नवऱ्याला 'दादूस' म्हटलं जातं. त्यानंतरच त्यांचं नाव दादूस पडलं. आता लोक त्यांना दादूस म्हणूनच ओळखतात."
वडील गेले तरी...
संतोष आपल्या गाण्यांचे किंवा हळदींचे कार्यक्रम कधीच चुकवत नाहीत असं योगिता सांगतात. "संतोष यांच्या वडीलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यादिवशी सुद्धा त्यांचे गाण्यांचे कार्यक्रम आधीच बुक झाले होते. आता वडील गेले म्हणजे ते कार्यक्रम रद्द करतील असं सगळ्यांना वाटलं होतं.
मात्र, वडिलांचं सगळं अंतिम कार्य नीट पार पाडून ते रात्री उशिरा ठरलेल्या कार्यक्रमाला जाऊन आले होते."
'बिग बॉस'मध्ये कशी झाली संतोष चौधरींची एन्ट्री?
स्वतः संतोष चौधरी यांना 'बिग बॉस'बद्दल काहीही माहिती नव्हती. त्यांना जेव्हा 'बिग बॉस' बद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी घरच्यांना विचारून सांगतो असं म्हटलं होतं.
योगिता यांनी सांगितलं की, मला आणि मुलीला जेव्हा हे कळलं तेव्हा आम्ही खूप खूष झालो. मी आणि मुलीने त्यांना सगळं समजावून सांगितलं. बिगबॉसमधले टास्क कसे असतात आणि ते कसे पूर्ण करायचे हे सांगितलं.
वीज चोरीप्रकरणी का झाली होती अटक?
पण हे दादूस एकदा वादातही अडकले होते. त्यांना एकदा वीज चोरीप्रकरणात अटक झाली होती.
भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हाही दाखल झाला होता. त्यांच्यासोबत एका बांधकाम व्यावसायिकालाही अटक झाली होती. टोरंट पॉवर या वीज वितरण कंपनीने याप्रकरणी त्यांना 3 लाख 66 हजारांचं बिल भरण्याची नोटीस पाठवली होती.
या सगळ्याबद्दल दादूस यांच्या पत्नी योगिता यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्या म्हणाल्या, "या प्रकरणात त्यांचा काहीच दोष नव्हता. आमच्या जागेत त्या बांधकाम व्यावसायिकाने इमारत बांधली. त्यामुळे बिल्डींगच्या मालकीत आमचं नाव होतं. हे बघून अटकेची कारवाई झाली. अशी वीज घेतली जातेय याची संतोष यांना माहितीही नव्हती. मात्र, आता ही केस पूर्णतः बंद झाली आहे."
बिग बॉसमधला 'तो' टास्क
काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस'च्या घरात एक टास्क झाला. या टास्कमध्ये एक स्पर्धक यजमान होता, तर एक अचानक आलेला पाहुणा.
यजमानाने घरात आलेल्या पाहुण्याला सर्वांत वाईट पदार्थ करून खायला घालायचा होता.
घरातील एक स्पर्धक असलेल्या अक्षय वाघमारे याने पाहुणा म्हणून आलेल्या दादूस यांना कारलं, गरम मसाला, अंडी, मिरची आणि भरपूर मीठ वगैरे घालून एक विचित्र डिश खायला दिली. दादूस यांनी कोणतीही तक्रार न करता ती डिश खाल्ली.
त्यांना ती डिश खाताना पाहून तृप्ती देसाई, सुरेखा कुडची या स्पर्धकांच्याही डोळ्यांत पाणी आलं होतं.
नंतर बिग बॉसनं हा टास्क थांबवायला सांगितलं. याच टास्कवरून नंतर बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री मीरा जगन्नाथला चांगलंच सुनावलंही होतं.
कारण घरातल्या महिला सदस्यांचं विजेत्याबद्दल एकमत न झाल्यानं हा टास्क रद्द झाला. मीरा जगन्नाथनं यात योग्य भूमिका घेतली नसल्याचा आक्षेप घेतला गेला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)