Bigg Boss Marathi : अक्षय वाघमारे घरातून एलिमिनेट, अरुण गवळी, दादा कोंडकेंशी काय नातं?

बिग बॉस मराठी - 3 मधून अभिनेता अक्षय वाघमारे बाहेर पडला आहे. बिग बॉस मराठीच्या घरातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं आणि त्यात अक्षय वाघमारेने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला.

बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतर अक्षय वाघमारेने इन्स्टाग्रामवर बिग बॉसच्या घरातील प्रवासाचा व्हीडिओ शेअर केला आहे.

तसंच, या पोस्टसोबत लिहिलंय की, "आपण आयुष्य किती जगतो ह्यापेक्षा कसं जगतो हे जास्त महत्वाचं असतं! अगदीच तसचं बिग बॉसच्या प्रवासात महेश मांजरेकर सरांनी मला 'जेंटलमन' म्हणत 'डिग्निटी'ने खेळलो असे कौतुक केलं. तुम्हांला देखील माझा प्रवास आवडला, त्यासाठी मनापासून आभार."

बिग बॉसच्या घरात असताना 'हल्ला बोल' टास्कदरम्यान विशाल निकम आणि अक्षय वाघमारे यांच्यात भांडणही झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये या दोघांबाबत बरीच चर्चाही रंगली होती.

'मी खोटं वागलो नाही'

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अक्षयनं म्हटलं की, मी घरात उगीच कुणावर ओरडलो नाही. उगीच कुणासोबत वाद घातले नाहीत. मी जसा होतो तसाच मी तिथे वागलो. मी खोटा वागलो नाही. मी जे नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न केला नाही.

बिग बॉसच्या घरात राहणं खूप अवघड आहे. तिथे 15 लोक असतात. आपल्याला एवढ्या माणसांची सवय नसते. अनेक कलाकारांना जे तीन महिन्यात करायला जमत नाही ते मी तीन आठवड्यात करून दाखवलं, असंही अक्षयनं म्हटलं होतं.

कोण आहे अक्षय वाघमारे?

अक्षय वाघमारे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या हंगामातील त्याच्या प्रवेशापासूनच चर्चेत होता. अभिनेता म्हणून तो मराठी प्रेक्षकांना बऱ्यापैकी माहित होताच. मात्र, गँगस्टर अरुण गवळीचा जावई म्हणूनही तो चर्चेचा केंद्र होता.

मॉडेलिंगमध्ये करिअरची सुरुवात केलेल्या अक्षय वाघमारेला मराठी सिनेजगतात 'हॉटेस्ट मॅन ऑफ द मराठी टीव्ही' संबोधलं जातं.

2020 साली अक्षय वाघमारेने अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी हिच्याशी लग्न केलं. दगडी चाळीत झालेलं दोघांचं लग्न त्यावेळी माध्यमांसह लोकांमध्ये चर्चेचा विषय होता. अक्षय आणि योगिताला एक मुलगी आहे.

अक्षय वाघमारे याचं अभिनेते दादा कोंडके यांच्याशीही नातं आहे. अक्षयची आजी ही दादा कोंडकेची बहीण.

अक्षयनं आतापर्यंत फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या सिनेमात काम केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)